Thursday, October 4, 2012

ईश्वर, धर्मबजार व माझे आस्तीकपन

ईश्वर व धर्म हे दोन असे गुळगुळीत शब्द आहेत की ज्या शब्दाविरोधात गरीब, श्रीमंत, अशिक्षित व शिक्षित सारेच बोलण्यास घाबरतात. ईश्वराविरोधात बोललो तर माझ्यावर व कुटुंबावर कोणते संकट तर येणार नाही ना?. या भीतीनेच त्यांच्या मनाची चाळन होत असते. ईश्वराविरोधात बोलण्यास बहुतांश जनता पुरती घाबरत असते. असा हा ईश्वर आहे तरी कोण?. तो दिसतो तरी कसा?. तो कसा निर्माण झाला?. या प्रश्नाच्या मुळाशी सहसा कोणी जात नाहीत. तरीही देवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत काहींनी देवाला नाकारले होते. चार्वाक या प्राचीन
काळातल्या तत्ववेत्त्याने ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. ग्रीक तत्ववेत्ता साक्रेटीस यांनी ईश्वरासबंधात आपले मत मांडत ईश्वराच्या अस्तित्वासबंधाची प्रचीती आल्याशिवाय आपण देवाला मानणार नाही असे स्पष्ट केले होते. त्याचे हे म्हणणे बायबलच्या विरोधी ठरवून साक्रेटीसला धर्माच्या ठेकेदारांनी विष देऊन मारले. गलिलीओ ज्याने दुर्बिणीचा शोध लावला त्याने एका पुस्तकात सूर्य पृथ्वी भोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे लिहिले होते परंतु त्याचे हे मत बायबल च्या एकदम विरोधी होते. चर्च व बायबलचे ठेकेदार असलेल्या पोपनी ते विधानच बदलवायला भाग पाडले अन्यथा त्याचीही अवस्था साक्रेटीस सारखी होईल असे त्याला बजावण्यात आले होते. माझे विधान बदलल्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याचे थांबविणार नाही असी पुस्तीही मग त्याने पुस्तकात लिहिली. म्हणजेच धर्मग्रंथात लिहिलेल्या असत्य गोष्टी विरोधात लिहिले तर त्यांचा किती छळ होत होता हे या उदाहरणावरून दिसते. धर्मग्रंथातील एक जरी गोष्ट खोटी ठरविल्या गेली व तिला मान्यता मिळाली तर धर्मग्रंथातील बाकीच्या गोष्टीही खोट्या ठरू शकतात?. असे झाले तर तो धर्मग्रंथच ताद्दान खोटा व काल्पनिक ठरविण्यात येईल  असी भीती धर्माच्या ठेकेदारांना वाटते. त्यामुळेच धर्माच्या ठेकेदाराकडून जबरदस्तीने धर्मग्रंथातील वचनाचे  पालन करण्यास सांगितले जाते. तरीही काहींनी देवाला नाकारले तर काहींनी कल्पनाच्या दुनियेला जवळ करत अध्यात्मावादाच्या माध्यमातून ईश्वराला स्वीकारले. ईश्वराला स्वीकारणारे हे एकतर स्वार्थी व दुसरे म्हणजे  मनोरुग्णच असू शकतात. ईश्वराला नाकारून वा स्वीकारून मानवांच्या देहावर, देहाचे अंतरंग व बाह्यांग यावर कोणता परिणाम होतो काय?. हे पाहणे मोठे रंजक ठरेल. ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारणा-याना ईश्वर भिकारी, भुकेकंगाल, रोगराईच्या नरकात ढकलतो व जे ईश्वराला मानून त्याची पूजापाठ करतात त्यांना ईश्वर एकदम सुखी करतो, त्यांना रोगमुक्त करतो, त्यांच्याकडे मेहनत न करता पैसा व संपत्ती जमा होते व प्रत्येक अपघातात भक्तांना तो वाचवित असतो काय?. यावर संशोधन करण्यात आले. या संशोधनानुसार ईश्वराला मानले तरी वा नाही मानले तरी मानवाच्या कार्यबंधात काडीचाही फरक पडत नाही असे निष्कर्ष समोर आलेत.
मनुष्याच्या कार्यकारणभावावर जर ईश्वराच्या असण्यानसण्याचा फरक पडत नाही तर मग देवाचे एवढे स्तोम कशासाठी?. देवाचे माजविले जाणारे हे स्तोम कोणाच्या फायद्यासाठी याचा शोध घेणे आवश्यक ठरते?. ईश्वर हा शब्द पोकळ व काल्पनिक असून भोळ्याभाबड्या जनतेला लुबाडणा-या चतुर लोकांनी तो निर्माण केला आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. लोकांची ईश्वरावर श्रद्धा बसावी म्हणून आमचा धर्म ईश्वर निर्मित आहे, तो सनातन असून जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे अशी आवई उठवीत असतात. ईश्वर हा भ्रष्टाचा-यांचा, गुंडाचा व सामान्य लोकांना लुबाडना-यांचा सारथी तर भोळ्याभाबड्या लोकांचा दुष्मनच असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोणताही गुन्हा करण्यापूर्वी देवाची पूजा करून आपले काम फत्ते व्हावे याची कामना करतात. भ्रष्टाचारी अधिकारी, राजकीय नेते व ग्राहकांची लुट करणारे व्यापारी हे तर आपल्या लुटीचे करोडो रुपये शिर्डीचा साईबाबा, तिरुपतीचा बालाजी व वरळीचा सिद्दीविनायक गणपती यांना अर्पण करीत असतात व यापेक्षाही मोठी लुट करण्यासाठी त्या देवांकडे आशीर्वाद मागित असतात. मंदिरातील दगडाच्या मूर्तींच्या आजूबाजूला भटब्राम्हण पूजा-याचा वेढाच असतो. देवाच्या नावाने मिळालेली सगळी लुट ते आपल्या घरी घेऊन जात असतात. देवाच्या नावावर लुट करणा-या या चौकडीला कोणीही जाब विचारत नाही?. आणि जाब विचारलाच तर देव माझे काही बरेवाईट तर करणार नाही ना?. अशी एक भीतीही असते.
सामान्य माणसाच्या संपूर्ण मेंदूची वाढ ईश्वराच्या नावे फायदा लाटणारी ढोंगी जमात होऊ देत नाही. त्यामुळे सामान्य माणसांच्या अविकसितपणाला अप्रत्यक्षरीत्या ईश्वर जबाबदार असतो. लोकांनी ज्ञानी व जागृत व्हाव हे राजकारण्यांना व धर्मकारन्यांना मान्य नसते. लोक जागृत झालीत तर त्यांचा स्वार्थ लोकांना समजेल. अस होऊ नये म्हणून जनतेला धर्मकारणात व देवपनात अडकविल्या जात असते. त्यासाठी ते काल्पनिक कथांचे पुस्तके छापून अल्पकीमतीत लोकांना विकत असतात. भारतात जाती व वर्ण आधारीत शोषण व्यवस्था आहे. ही व्यवस्था ईश्वर निर्मित आहे असे या देशातील चलाख पंडित पुरोहिताने खोटी थाप मारीत लोकांच्या मनावर बिंबविले आहे.
   
असंख्य भारतीय आपली जात लपउन फिरत असतात व ते आपली जात सहसा कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडत नसतात. परंतु भारतात जातीचा खूलेपनाने अभिमान बाळगणारी व तिचा सार्वजनिक देखावा करणारी एक जात आहे. ब्राम्हण जातीचे लोक मुत्री घरापासून ते तुमच्या घरच्या सत्यनारायणाच्यापूजेपर्यंत आपल्या जातीच्या बडेजावपणाचा देखावा करीत वावरत असतात. मुत्री घरात जाताना ते बिनदिक्कतपने कानाला गळ्यातील धागा ओढून गुंडाळून लावीत असतात. ते इतरांना दिसेल अशा प्रकारे गळ्यात सुताचे धागे घालीत असतात. डोक्यावर केसांची शेंडी करून फिरत असतात. काही ब्राम्हण सोवळे व पगडी घालून वावरत असतात. भारतातील ब्राम्हण जातीशिवाय दुसरी कोणतही जात असा देखावा करीत नाही. आपण इतर भारतीयापेक्षा काहीतरी वेगळे आहोत, आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे दाखविण्याचा ब्राम्हणांचा नेहमी प्रयत्न असतो. अध्यात्म, देवधर्म व सण-उत्सव याच्या माध्यमातून बहुजन समाजाला लुटण्याच्या कामात ते एकनंबरीच ठरावेत. ब्राम्हण जातीतील कोणत्याही कमूनिस्ट, पुरोगामी व प्रतिगामी बुद्धिवादी व्यक्तींनी ब्राम्हनवाद व ईश्वराला झिडकारले नाही याउलट बर्नाड रसेल या ख्रिस्ती लेखकाला ख्रिस्ती धर्मातील फोलपणा व मुर्खपणाची जाणीव झाली तेव्हा त्याने मी ख्रिछ्चन का नाही? हे पुस्तक लिहल. भारतातल्या कोणत्याही ब्राम्हणांनी मात्र अशी हिंमत दाखविली नाही. अवकाशात उपग्रह सोडणारे वैज्ञानिक तिरुपतीला जाऊन पूजा करतात. वैज्ञानिकांच्या अशा दृष्टिकोनामुळेच जगातील कोणतेही शोध भारतीयाच्या नावावर नाहीत. केवळ दुस-यांची केवळ नक्कल करून आपले वैज्ञानिकपणाचे काम करणे चालू आहे.

हे विश्व कसे निर्माण झाले?. निसर्गाच्या दैनंदिनी कार्यकारणभावावर कोणाचे नियत्रण आहे?. याच उत्तर सध्यातरी कोणाहीजवळ उपलब्द नाही. विश्वाच्या या गुढपणाचा फायदा धर्ममार्तंडानी मात्र पुरेपूर घेतला. हजारो वर्षापासून  निसर्गाची दैनंदिन कार्यक्रमपत्रिका बिनातक्रार चालूच आहे. ऋतू बदलतात, ढग पाउस घेऊन येतात, भूंकप होतात, बीजापासून झाडे तयार होतात, प्राणी तसेच स्त्री-पुरुषाच्या संभोगातून बालके जन्म घेतात हे सारे कोणाच्याही हस्ताक्षेपाशिवाय अनादी काळापासून चालू आहे व पुढेही चालूच असणार आहे. कोणताही  धर्म व देवाचे त्यावर नियंत्रण नसते. येशूने स्वत:ला देव घोषित केले होते. मग या येशू देवाने त्यालाच क्रुसावर चढउन ठार मारणा-या ज्युवर नियंत्रण का मिळविले नाही?. राम व कृष्ण हे जर देवच होते तर त्यांनी युध्दात हजारो लोकांना का मरु दिले?. त्यांनी सर्वावर नियंत्रण का ठेवले नाही?. येथेच ईश्वर वा देव नावाच्या वस्तूचा फुगा फुटतो. 
आत्मा व परमेश्वर ह्या केवळ कल्पना आहेत. देशातील अनेक लोकांनी परमेश्वराला नाही मानले तर त्यांचे काय बिघडले?. जसे देवाला न मानणारा बिमार पडतो तसेच देवाला मानणारे व त्याची सेवाभावे पूजा करणारे असंख्य भक्तही बिमार पडत असतात. देवाला मानणारे व न मानणारे या दोघानाही सारखाच सूर्य व चंद्रप्रकाश मिळतो. निसर्ग कोणावरही वक्रदृष्टी करीत नसतो. देव भक्तांचे भले करतो, त्यांना वाचवितो असे म्हटले जाते. हे जर खरे असेल तर मग देवाला भेटण्यासाठी जाणा-या व देवाचे दर्शन घेऊन परत येणारे अनेक भक्तलोक रस्त्यातच अपघात होऊन मरतात तर असंख्य भक्त देवाच्या दालनातच चेंगराचेंगरीत मरत असतात. अशावेळी देव त्यांना का वाचवीत नाही?. जे लोक देवाला मानीत नाहीत, जे देवाला दुषणे देतात त्यांना तरी देव शिक्षा करतो का?. महमद गजनीने सोमनाथ मंदिर लुटले त्याचे सोमनाथ देवाने काय बिघडविले?.  म. बुद्ध, महावीर, चार्वाक, साक्रेटीस, गलीलीयो, कबीर, म. फुले, महर्षी कर्वे, ओशो रजनीश, स्वामी विवेकानंद, डाक्टर आंबेडकर, कार्ल मार्क्स, बर्नाड रसेल व कोर्पनिक्स  यांनी तर ईश्वराला मानले नाही, त्यांचे देवाने काय बिघडविले?. ते तर उच्चकोटीचे विद्वान होतेच ना! याउलट महात्मा गांधी व मार्टिन ल्युथर किंग हे दोघेही   निस्सीम देवभक्त. गांधी हिंदू देवाचे भक्त तर ल्युथर किंग हा निग्रो चर्चचा प्रमुख परंतु दोघांच्याही शरीराची बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण केली तेव्हा त्यांचा देव कुठे होता?.   स्वामी विवेकानंद  म्हणतात देवता ह्या माणसानीच निर्माण केल्या आहेत व धर्म म्हणजे नाना त-हेच्या मताची भांडोळी होय त्याशिवाय ते दुसरे तिसरे काही नाही. देवाने माणसाला हीनदिन  बनविले असी तक्रार विवेकानंद करतात.
जगातील सर्व जनता सुखी झालेली धार्मिक लोकांना कधीही आवडत नाही. धार्मिक लोक तुम्हाला उपास व व्रत पकडायला लावतात. यज्ञ संस्कृती व आहुती यांची बजबजपुरी बुद्धपुर्वी काळात होती. बुध्दाच्या पूर्वी संपूर्ण भारतावर ब्राम्हण पंडितपुजारी यांचा पगडा होता. ब्राम्हण सर्वशक्तिमान होता. सामान्य जनाबरोबरच क्षत्रिय राजावर त्यांचे आधिपत्य होते. ब्राम्हण सांगेल ती दिशा. परंतु बुध्दाचे आगमन होताच सर्व काही बदलले. बुद्धांने ईश्वर व आत्म्याला नाकारत या दोन्ही गोष्टीच्या भानगडीत पडू नका असा जनतेला सल्ला दिला.  पुरोहित ब्राम्हणांच्या प्रत्येक गोष्टीचा ते विरोध करीत. त्यामुळे ब्राम्हण पुरोहितवर्ग बुध्दावर चवताळला होता. ब्राम्हण पुरोहित वर्ग बुध्दाला वादविवादासाठी आमंत्रित करीत. उद्देश एकच बुध्दाला वादविवादात हरविणे व आपले वर्चस्व सिद्ध करणे. परंतु बुध्दाला वादविवादात हरविणे कोणालाही शक्य झाले नाही. परिणामत: त्यांना ईश्वर व आत्म्याला नाकारणा-या बुध्दाचे अनुयायीत्व स्वीकारणे भाग पडले. येथे देव व ईश्वर याचे स्तोम माजविणा-याचा पराभव झाला होता. परंतु त्यांनी बुध्दाचा धर्म स्वीकारला तो खुल्या मनानी नव्हे तर बुध्दानंतर त्याच्या धम्माला शोषनाकुल बनऊन धम्माची दिशा बदलविण्यासाठी.  

एक तत्ववेत्ते कांट अध्यात्मवादावर हल्ला चढवत म्हणतात अध्यात्म हे केवळ तर्काचे तारे तोडणारे शास्त्र असून ते सा-या अनुभवजन्य ज्ञानाविरुध्द जाते. ते केवळ काही कल्पनांवर आधारून बुद्धीला गुलाम बनविते. शास्त्राच्या पातळीवर येण्याचे भाग्य अजून त्याला लाभले नाही आणि विशेष दुर्दव्याची गोष्ट म्हणजे आजही ते केवळ कल्पनाच्या अंधारातच चाचपडत आहे”. माझ्या मते शोषनावर आधारलेल्या व्यवस्थेतूनच ईश्वरशाहीचा जन्म होतो. चलाखी अंगी असणारा एक खास वर्ग ईश्वरशाहीला पुढे करीत असतो. हजारो वर्षापासून देशातील ब्राम्हणवर्ग ईश्वराचे स्तोम माजवीत आला आहे. शोषित समाजाचा बौद्धिक स्तर निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे यांची चलाखी नजरेआड होते व बहुजनांच्या मानगुटावर वार करते. संत, महंत, ज्योतिषी, गोसावडे व  मांत्रिक यांच्या कच्छपी बहुजन समाज बळी पडतो असतो.

अज्ञानाचा अंधकार नष्ट करणे व ज्ञानप्रकाश फैलावणे हे आजच्या घडीला निकडीचे झाले आहे. यावर केवळ वैचारिक प्रबोधन हा उपाय नव्हे कारण जेवढ्या तन्मयतेने प्रबोधनाची प्रक्रिया होते त्याहूनही अधिक वेगाने प्रतीप्रबोधन होत असते. बहुजनांच्या तोंडी असलेली संस्कृती व धर्म ही पुरोहीतशाहीची चारा खायची कुरणे झाली आहेत. भौतिकवाद व समानतावाद जपना-या क्षेत्रातील विविध चळवळींना माणुसकीच्या धर्मानुसार मानवी पातळी गाठून नशीब व ईश्वराला दोष देऊन आपल्या जीवनाचे गणित मांडना-या बहुजनाला दैववादाच्या कचाट्यातून बाहेर काढावे लागेल. आत्मविश्वास असेल तर प्रयत्नाने इच्छा सफल होतातच  अशा विवेकबुद्धीचे रोपण बहुजनात झाले पाहिजे. देव, धर्म ज्योतिष्य या काल्पनिक गोष्टीला त्याज्य समजून केवळ समोर दिसते त्याचा स्वीकार करणे हेच आस्तीकपण होय तर ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही अशा काल्पनिक गोष्टीना नाकारणे हे नास्तिकपण होय.

माझ्यापुरते बोलावयाचे झाल्यास ईश्वर असण्यानसण्याची भावना माझ्या मनात निर्माण व्हायला माझ्या लहानपणातील प्रसंग कारणीभूत आहेत. पचमढी येथील महादेवाच्या यात्रेला आमच्या घरातील व नातेवाईक मंडळी दरवर्षी जायची. घरी भजन कीर्तन व्हायचे. महादेवाच्या यात्रेवरून परत आल्यानंतर घरात सत्यनारायणाची पुजा व्हायची. घरात ईश्वरमय वातावरण असायचे. परंतु एकदा माझी मावसी महादेवाच्या यात्रेला गेली  देवाचे दर्शन घेऊन मागे परत असतानाच मृत्यू झाला. मग मात्र माझ्या मेंदूने उचल खाल्ली.  ईश्वराने आपली  भक्त असलेल्या मावशीला का वाचविले नाही?. याचा राग आला. जो ईश्वर आपल्या परमभक्ताला वाचऊ शकत नाही तो कसला देव?. या धारनेनेच मी ईश्वराला नाकारले आहे. ईश्वराच्या देवाघरी मावशीला चांगले मरण आले तिला स्वर्गात स्थान मिळाले या इतरांच्या मताशी मी सहमत नव्हतो. आतातर मी केवळ अस्तित्वात असणा-या गोष्टीला मानणा-यापैकी झाल्याने धर्म व देव या कल्पनादत्त बाबींना नाकारणारा व केवळ अस्तित्वात असलेल्या बाबींना मानणारा एक आस्तिक आहे.

                                लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment