Tuesday, October 23, 2012

कोल्हापूरचा शाही दसरा हा जातीसंस्थेचे मूर्तिमंत उदाहरण


कोल्हापूर येथे दरवर्षी शाही दसरा साजरा करण्यात येतो. याला कोल्हापूरच्या राजघराण्याचा आशीर्वाद असून राजघरान्यासाठी तो प्रतिष्ठेचा मानला जातो असा समज आहे. या दस-याला काही लोक सामाजिक एकतेचा आशियाना समजतात. त्यात कोल्हापूर राज संस्थांनचे वारस असलेले  संभाजी राजे  हा सामाजिक आशय फुगउन सांगतात. दस-याचा सोहळा म्हणजे सर्व जातीधर्माना  मानाच स्थान मिळवून देणारा सण असे संभाजी राजे मानतात. वास्तविकत: जातीची चौकट अधिक मजबूत करीत त्या त्या जातीने आपल्याला पूर्वपरंपरेने नेमून दिलेले काम इमानईतबारे करीत राहण्याचा तो दर्शन सोहळा आहे. या शाही दस-यात बारा बलुतेदारांना मानाच स्थान देण्यात येते असे संभाजी राजे गर्वाने सांगतात.  पण या गर्वात जातीसंस्था जपण्याचा दर्प स्पष्ट दिसतो हे मात्र  ते सोईस्करपणे विसरलेले दिसतात.
या दसरा सोहळ्यात बक-याचा बळी दिला जातो. यात बक-याची मान कापायचा मान गायकवाड घराण्यास मिळतो. दसरा सोहळ्याची पालखी हरिजन वस्तीत नेली जाते. या सोहळ्यात वाजंत्री वाजविण्याचा मान कोरवी समाजाला देण्यात येतो तर पालखी उचलण्याचा मान भोई समाजाचा आहे. तर पूजेचा मान राजोपाध्ये या ब्राम्हण समाजाकडे आहे.यात जातीची उतरंड स्पष्ट दिसते.
सोहळ्याचा हा क्रम बघितला तर सामाजिक परिवर्तनाला यात पूर्णपणे डच्चू देण्यात आला आहे. त्या त्या जातीचा जातीनिहाय व्यवसायानुरूप या सोहळ्याची  कामे वाटून दिलेली आहे.
राजश्री शाहू महाराजांना त्या धकाधकीच्या काळात कदाचित या सोहळ्याच्या  कार्यक्रमात बदल केला नसेल. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य व परीवर्तानांच्या वैचारिक  तक्त्यात हा सोहळा कुठेही बसत नाही. त्यामुळे  शाहू महाराजाच्या विचाराच्या कोल्हापूरवासीयांनी या दसरा सोहळ्याला सामाजिक एकतेचे प्रतिक मानू नये कारण या सोहळ्यात समानतेचा साधा लवलेशही आढळत नाही.

                                                                                                                      बापू राऊत 

No comments:

Post a Comment