Tuesday, September 3, 2013

हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक: संजय पवार { कलामनामा)



हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.
हेमंत करकरे तसे काही फारसे परिचित नव्हते. खैरनार, वाय. पी. सिंग, वाय. सी. पवार, रिबेरो यांच्यासारखे काही ना काही कारणांनी ते प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. मर्यादित राजकीय, माध्यम वर्तुळात माहीत असतील कदाचित. पण ते एकदम प्रकाशात आले, जेव्हा मालेगाव स्फोटात मुस्लीम नव्हे तर हिंदू दहशतवाद्यांना त्यांनी संशयित म्हणून अटक केली!
ज्या कुजबूज आघाडी कडून ‘प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो पण पकडलेला प्रत्येक दहशतवादी मुस्लीम असतो’ असे एसएमएस फिरवले जात होते, त्यांना जवळच्या अशा अभिनव भारत, सनातन प्रभात, प्रज्ञा सिंहसारखी साध्वी यांना जेव्हा करकरेंनी ‘आत’ टाकलं तेव्हा हाहाकार माजवण्यात आला. स्वतःला स्वयंघोषित राष्ट्राभिमानी समजणार्या भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने आणि शिवसेनेसारख्या भगवं/हिरवं असं समाजाचं रंग विभाजन करणार्या पक्षाने या आरोपींना न्यायालयात आणलं तेव्हा त्यांच्यावर फुलं उधळली!
इंदिरा गांधी वा राजीव गांधी यांच्या मारेकर्यांवर शिखांनी किंवा तामिळींनी अशी जाहीर सुमनं उधळली नव्हती. तीही कोर्टाच्या आवारात.
पण गर्विष्ठ हिंदू संघटनांना आपल्या विचारांच्या लोकांना असं दहशतवादी ठरवलेलं आवडलं नाही. बहुसंख्य असलेल्या हिंदुंच्या देशात हिंदुच अतिरेकी? हे म्हणजे भगव्या रक्ताला हिरव्या विद्वेषाची फोडणी दिल्यासारखं झालं.
एका रात्रीत हेमंत करकरे नतद्रष्ट, राष्ट्रदोही इ.इ. झाले.
करकरेंना ‘सामना’तून लाखोली वाहून, धिंड काढावी इथपर्यंत शब्दमजल गेली. भाजपसह संघपरिवार यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खतपाणी घालत होता.
करकरे काही खैरनार, हजारेंसारखे बोलके नव्हते. ते शांत राहिले. पण या सार्या टीकेमुळे व्यथित झाले. गृहमंत्र्यांशी त्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. एटीएसच्या प्रमुख पदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. पण आबांनी त्यांना शांत केलं.
आणि त्याच रात्री बहुधा, ते त्या २६/११ च्या हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकरांसह शहीद झाले!
त्याबरोबर उजव्यांनी मांडी बदलून ‘हिरव्यां’विरुद्ध लढताना शहीद झाले म्हणून इतरांसोबत करकरेंचीही भगवी आरती सुरू केली आणि त्यांच्या हौतात्म्याचा ‘सरकार’ला जाब विचारू लागले!
धोतराचं पितांबर कसं होतं त्याचा हा चांगला वस्तुपाठ होता. आदल्या रात्रीपर्यंत ‘काफर’ असलेला लगेच ‘शहीद’ ‘अमर’ ‘हुतात्मा’ झाला. गुहेतून डरकाळ्या फोडणार्या वाघासकट, समयोचित जान्हवी कानाला अडकवणारे सगळे चेहरे बदलून शोकसभेत सामील झाले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर समाजवादी परिवारातला जुना, जाणता कार्यकर्ता. या दशकातला साधनेचा संपादक, सामाजिक कृतज्ञता निधीसह अनेक विचारपीठांचा, संस्थांचा अध्यक्ष, विश्वस्त, कार्यकर्ता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, लेखक, कार्यकर्ते. अथक भ्रमंती तेवढंच विस्तृत, माहितीपूर्ण लिखाण करणारं लिखाणही ललित वगैरे नाही तर प्रबोधनात्मक, परिवर्तनास पूरक.
साधनेच्या संपादकपदी आल्यावर तर त्यांनी अनेकांना लिहायला लावलं. साधना मीडिया सेंटर सुरू केलं. चांगली प्रकाशनं काढली. तीनएकशे पृष्ठांचे दिवाळी अंक काढले.
तरीही समाजवादी चळवळ्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आम जनतेच्या गावीही नसे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्या कार्याच्या, रेट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धाविरोधी कायदा करण्यासाठी बिल तयार केलं, ते विधानसभेच्या पटलावर आणलं, तसे डॉ. दाभोलकर हिंदू सनातन्यांच्या रडारवर आले.
करकरेंप्रमाणे दाभोलकरही निर्भत्सना आरतीचे धनी झाले. पण दाभोलकर खचले नाहीत, मागे फिरले नाहीत, थकले नाहीत. हा कायदा व्हावा यासाठी सहिष्णू होत ते १८ वर्षं सतत सरकार, विधिमंडळं, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, व्यक्ती, संप्रदाय यांच्याशी संवाद साधत राहिले. भूमिकेत ‘उद्देशाला’ धक्का न लावता बदल करत राहिले. पण समाजवादी माणसाने भूमिका सांगितली आणि आपल्याला ती ‘पटली’ हे जाहीरपणे कसं मान्य करायचं? आपल्या शंका/कुशंकांना दाभोलकरांनी सप्रमाण खोडून काढलं हे ‘सत्य’ धर्माभिमान्यांना पचवता येईना. मग काही ना काही खुसपटं काढून विषय प्रलंबित ठेवला. फारच अंगावर आलं तर धर्मावर आक्रमण म्हणून डांगोरा पिटायचा!
तरीही दाभोलकर पिच्छा सोडेनात, तेव्हा त्यांना पिशाच या आपल्याच संकल्पनेवर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होऊ लागला. विधिमंडळात अमुक एक संख्येने आहोत म्हणून सेनेसारख्या पक्षाने हिंदुत्वाची झाल पांघरत विरोध केला. प्रबोधनकारानंतर एकाही ‘ठाकरे’ने भटशाही विरुद्ध आपला कोदंडाचा टणत्कार केला नाही, उलट निओ ब्राह्मनीझमच्या इशार्यावर ते आपलं हिंदुत्व अधोरेखित करत आले!
जिवंतपणी ज्या दाभोलकरांना विरोध केला, त्यांची हत्या होताच या सार्यांनी अश्रू ढाळत सरकारला टार्गेट केलं पुन्हा एकदा तीच करकरे नीती!
सरकराने या संधीचा फायदा घेत वटहुकूम काढला तसे सगळे भगवे परत लाल झाले!
बारा कलमं जगाला उपलब्ध झाली, त्यात धर्म शब्द नाही. धार्मिकतेवर अंकुश नाही की टाच नाही तरी फडणवीसांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे ‘आमच्या धर्मावर’ म्हणून छात्या फुगवत राहिले. कायदा वाचला नाही तरी भाष्य! आणि दुसरीकडे स्वतःच्या आमदाराचे महिला कर्मचार्यांशी असभ्य वर्तनाचे रेकॉर्डेड पुरावे बघूनसुद्धा माझं कुटुंबवत्सल बाळ म्हणून त्याचं समर्थन!
यांच्या सभास्थानी शिवरायांचे ‘पुतळे’ असतात हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवं! महाराजांच्या विचारांवर तप्त शिसं ओतून ते गोठवून यांची मर्दुमकी त्यांच्या नावावर! हरहर महादेव.
अशा पद्धतीने सनातन्यांचा थयथयाट गेला आठवडाभर चालू आहे. श्रावणात आमदारांचे भाद्रपदी प्रकार सुरू आहेत. दाभोलकरांचा असा मृत्यू ही ईश्वरी कृपा असं लिहून छापण्याचा सनातन प्रभातच्या आठवलेंचा निर्लज्जपणा, त्याचं समर्थन करण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा कोडगेपणा यातून काय दिसतं?
लोकशाही पद्धतीने भारतीय समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाकडे नेण्याचा प्रयत्न गाईचं शेण उचलून तिची शेपटी मस्तकी लावणार्यांना पचत नाहीय!

2 comments:

  1. shree Raut sir;

    1947 nantar brahmanetar chalwalila (ji sudharak

    chalwal hoti) bahujanancha prachand pathinba

    milala . Pun geli 20 warshe hi chalwal bund

    zali.Karan congress wa maratha netrutwa KUTHETARI

    KAMI PADLE.Atatat martha arashan muddya-warun

    obc-martha fut padwayache kam chalu ahe.Tyamule

    pudhil anek warshe andharach disat ahe.

    ReplyDelete
  2. कांग्रेसने नेहमीच फोडा व राज्य करा ही नीती अवलबविली. हिंदू विरुध्द दलित ,हिंदू विरुध्द मुस्लीम .कांग्रेसच्या अशा राजकारनानेच बहुजन समाज एकत्र येवू शकत नाही. सत्तेचे दलाल सगळ्याच जाती-जमातीमध्ये आहेत. ते कांग्रेसचे काम सोपे करीत असतात.

    ReplyDelete