Saturday, April 26, 2014

डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय


अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट(जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्हणजे आर्यसमाज प्रणित जातपात तोडक मंडळाचा लाहोर येथे होणा-या वार्षिक अधिवेशना करिता तयार करण्यात आलेले अध्यक्षीय भाषण होते. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम लाहोर येथील जात-पात-तोडकमंडळ करीत असे. आंबेडकरांनी अध्यक्षीय
भाषण देण्यापुवी सदर भाषण मंडळाच्या सभासदांना दाखविण्याची मागणी आंबेडकरांकडे केली होती. त्याच्या मागणीनुसार भाषणाची प्रत मंडळाला उपलब्ध्द करून देण्यात आली.  परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे ते छापील भाषण वाचताच जातपात तोडक मंडळाच्या सभासदांना हादरे बसण्यास सुरु झाले. विजा कडाडाव्यात तसे त्यांच्या हृदयाचे ठोके चमकू लागले होते. त्या छापील भाषणात बाबासाहेबांच्या शब्दाची तलवार हिंदू धर्म व त्याच्या तत्वज्ञानावर तुटून पडली होती. घाबरलेल्या आर्यसमाजी जातपात तोडक मंडळाने भाषणात बदल करण्याची मागणी आंबेडकरांकडे केली. बाबासाहेबानी त्यांचे म्हणने नाकारताच  परिषदेमध्ये येना-या श्रोत्यांना सदर भाषण असह्य होईल ही सबब पुढे करून मंडळाच्या स्वागत समितीने अधिवेशनच रद्द करून टाकले होते. या प्रसंगानंतर अंतर्गत वादातून जात-पात-तोडक मंडळच बरखास्त करण्यात आले. जात-पात-तोडक मंडळासाठीच्या वार्षिक अधिवेशनासाठी विस्तृतपणे लिहिलेले भाषण हेच नंतर ‘अॅनिहीलेशन  ऑफ कास्टया प्रबंधाच्या स्वरुपात बाबासाहेबांनी प्रकाशित केले.

डाक्टर बाबासाहेबांच्या अॅनिहीलेशन  ऑफ कास्टया पुस्तकाचा त्या काळात दोन घटकावर फार परिणाम झाला होता. त्यातील पहिला घटक म्हणजे मोहनदास करमचंद गांधी तर दुसरा घटक म्हणजे जातीयतेचे चटके सहन करीत असलेला दलित समाज. याव्यतिरिक्त सदर पुस्तकाचा भारतीय समाजाच्या इतर कोणत्याही घटकावर (ब्राम्हण/बहुजन) कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसून येत नाही. दलितांच्या घरातील पुस्तकाच्या कपाटात या पुस्तकाने जागा मिळविली परंतु ब्राम्हण व बहुजनांच्या घरात हे पुस्तक अस्पृश्यच राहिले. एवढेच नव्हे तर “डाक्टर आंबेडकर विचारधारा” या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर सामाजिक, आर्थिक व राजकीय अभ्यासक्रमात बाबासाहेबांच्या पुस्तकांना कोणत्याही प्रकारचे स्थान मिळाले नाही ही या देशाची शोकांतिका आहे. एक प्रख्यात अर्थतज्ञ, प्रख्यात समाज शास्त्रज्ञ व प्रख्यात राजकीय विचारवंत म्हणून जे स्थान बाबासाहेबांना प्राप्त व्हायला पाहिजे होते ते मनुवाद्यांनी मिळू दिले नाही. त्यांच्या कोणत्याही पुस्तकांना कोणत्याही प्रकारच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू दिला नाही. याहूनही मोठा कहर म्हणजे त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके अत्यंत प्रतिष्ठित समजलेल्या प्रकाशनाकडे व ते चालवीत असलेल्या पुस्तकालयात व ग्रंथालयात शोधूनही सापडत नाहीत. आजही बाबासाहेब हे भारतीय सवर्णासाठी अस्पृश्य आहेत. या उलट ज्या गांधीनी बाबासाहेबांच्या विचाराचा व कार्याचा धसका घेतला त्या गांधीचे ढगभर पुस्तक जागोजागी मिळतात. एकूणच जातीयवादी विचाराच्या विषारी टोकाची व्याप्ती दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. त्याचे हे उत्तम उदाहरण होय.

अलीकडेच बुकर विजेत्या अरुंधती राय यांनी अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट या ग्रंथाचा आशय मांडण्यासाठी डाक्टर व संत : एक परिचय नावाचे पुस्तक लिहिले असून ते नवयान प्रकाशकाने प्रसिध्द केले आहे. सदर पुस्तक तीन विभागात विभाजित असून पहिला भाग म्हणजे अरुंधती राय ने अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट या पुस्तकाचे केले विश्लेषण, बाबासाहेब आंबेडकर व गांधी यांच्यातील वाद प्रतिवाद व आजची वास्तव स्थिती यावर टाकलेला प्रकाश तर दुसरा भाग म्हणजे बाबासाहेबांचा अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट हा संपूर्ण ग्रंथ तर तिसरा एस. आनंद यांचे ‘पुणे करारावरील नोट’ हे होय.

अरुंधती राय लिहितात, “आंबेडकर हे गांधीजींच्या सनातवादी विचाराचे घोर विरोधी होते, डाक्टरांनी गांधीना केवळ राजकीय वा बौद्धिक आव्हानच दिले नव्हते तर त्यांना नैतिक आव्हानही दिले होते. गांधीजींने आपल्या साहित्यातून आंबेडकरांची भ्रामक प्रतिमा निर्माण केली. आमच्या कोवळ्या मनावर ‘नकारात्मक आंबेडकर’ बिंबविला गेला. परंतु आता आंबेडकरांचे साहित्य वाचल्यावर मात्र गांधीजीकडेच दुर्लक्ष करावेसे वाटते. कारण गांधीजीच्या अतिरंजित भपकेबाजपणानेच डाक्टर आंबेडकरांचे व त्यांच्या कार्याचे अपरिमित नुकसान केले आहे. खरे तर, गांधीजी हे अहिंसावादी नसून हिंसावादी होते. दैवीव्यवस्थेचा धाक/भीती दाखवून प्रत्येक जातीने वर्णव्यवस्थेने नेमून दिलेली कामे विनातक्रार करीत राहिले पाहिजे हा गांधीजीचा मुलमंत्र होता. जबरदस्तीने आपले विचार दुस-यावर थोपवून त्याला विनातक्रार काम करायला लावणे हा एक हिंसाचारच होता. त्यांचे विचार हिंसावादी असून समानतेचे मानवी मूल्य पायदळी तुडविणारे होते. प्राणांतिक उपोषण करने ही गांधीच्या अहिंसेचा मार्ग नव्हता, तर उपोषनाद्वारे व आपल्या लोकप्रियतेद्वारा लोकदबावातून आपल्याला जे हवे ते मान्य करवून घेण्याचा अघोरी उपाय होता. त्यांचा उपोषणाचा मार्ग म्हणजे दुस-यांना पराभूत करने वा आपल्या समोर प्रतिस्पर्ध्यांना झुकविणे हा होता. त्यामुळे गांधीजीच्या अहिंसावादी तत्वाचे  पुनर्मुल्यांकन होणे फार गरजेचे आहे.
अरुंधती राय म्हणतात, डाक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म व त्याच्या तत्वज्ञानावर सरळ हल्ला केला होता. त्यामुळे धर्माचे ठेकेदार असलेल्या ब्राम्हणांनाकडून त्यांचा द्वेष होणे स्वाभाविक होते परंतु त्यांच्या विचाराचा व कार्याचा ज्यांना अपरिमित फायदा होणार होता त्यांनी आंबेडकरांचा द्वेष करने हे न समजण्यापलीकडचे आहे. असे लोक आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना वाचण्याची व ते समजून घेण्याची हिम्मत दाखवीत नाहीत. दलितांनी त्यांना अनेक वर्षापासून समजून घेतले. परंतु आता इतर देशवाशियावर आंबेडकरांना गंभीरपणे समजून घेण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक भारतीयाने हिंदू समाजव्यवस्था व तिची मानसिकता समजून घेण्यासाठी आंबेडकरांचा अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट हा ग्रंथ वाचणे फार गरजेचे आहे. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी हा ग्रंथ एक जालीम उपाय आहे. त्या म्हणतात, जातीव्यवस्था ही कुजलेल्या समाजव्यवस्थेचे केंद्रीभूत अंग आहे. प्रत्येक उच्च जात ही खालच्या जातीचे शोषण करते. काहीही केले तरी जात जात नाही. त्यामुळे ती नष्ट करण्यासाठी आज केवळ आंबेडकरांचीच नितांत गरज आहे (We need Ambedkar urgently).

१९३६ मधिल एका लेखात, आदर्श भंगी कसा असला पाहिजे याची गांधीनी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, आदर्श भंगी तोच असतो जो आपल्या परंपरागत व्यवसायातच आपले जीवन आनंदाने व्यतीत करतो, जो नेमून दिलेले दैवी काम करतो तोच देवाला प्यारा असतो. दुस-या शब्दात भंग्याने मालमत्ता जमा करण्याचे स्वप्न बघू नये, दुस-याचे सुखी जीवन बघण्यातच स्वत:चा आनंद उपभोगावा. गांधी हे अस्पृश्यांना  बुद्धीहीन व डोके नसलेली माणसे समजत असत ( Some untouchable are worse than cows in understanding). जातीव्यवस्थासमर्थन, धर्मपरिवर्तनविरोध व गोरक्षनाच्या बाबतीमध्ये गांधी व कट्टर हिंदुवाद्यात एकमत होते जात ही समाजव्यवस्थेवर कंट्रोल ठेवण्याचे सूत्र आहे. जातीव्यवस्थेमुळे आंतरजातीय जेवण वा आंतरजातीय विवाहास प्रतिबंध बसत असतो. त्यामुळेच जातीव्यवस्था नष्ट करण्यास माझा स्पष्ट विरोध आहे असे गांधी म्हणत असत. . गांधीच्या ह्या विचारांना बघून त्यांच्या महात्मा असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात?.

दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना गांधीनी रंगभेद नीतीचा कधीच निषेध केला नाही. गांधी हे ब्रिटीश साम्राज्यवादाचे कट्टर समर्थक होतेच, एवढेच नव्हे तर ब्रिटीश लष्करामध्ये ते काम करीत होते. त्याचे बक्षीस म्हणून लंडनमध्ये गांधीना “कैसर ए हिंद” चा किताब ब्रिटीशांनी बहाल केला होता. गांधी हे मोठे जमीनदार व भांडवलदार यांचे पाठीराखे होते. त्यांनी १९२४ मध्ये मुळशी धरणाच्या संदर्भात  कामगारांनी पुकारलेला बंद टाटाच्या आग्रहाखातीर बिनशर्त मागे घ्यायला लावला होता. त्यांनी गरीबांचे कल्याण हे जमीनदार व भांडवलदारांच्या दयेवर सोडले होते. त्यामुळे आंबेडकरांनी कांग्रेसच्या स्वातंत्र्यलढया संदर्भात उपस्थित केलेला प्रश्न फार महत्वाचा वाटतो. ते म्हणाले, गांधी/कांग्रेसने ब्रिटीशांविरुध्द पुकारलेल्या स्वातंत्र्यलढयापेक्षा काग्रेस हा लढा कोणासाठी लढत आहे? हे पाहणे महत्वाचे आहे..

जातीचे उच्चाटन कसे करता येईल.? यावर अरुंधती पुढील मुद्दे समोर ठेवतात. १.जोपर्यंत समाज आकाशातील ग्रहावर विसंबून न राहता आपल्या मध्येच पुनर्रचना करण्याचे धैर्य दाखवू शकणार नाही तोपर्यंत जातीचे उच्चाटन शक्य नाही २.  जोपर्यंत स्वत:ला क्रांतिकारक समजणारे लोक ब्राम्हणवादाविरोधात मूलगामी टीकात्मक पध्दत विकसित करीत नाही तोपर्यंत ३. ब्राम्हणवाद व भांडवलशाही यांच्या परस्पर स्बंधाची धार समजून घेत नाही तोपर्यन्त ४. जोपर्यंत बहुजन समाज डाक्टर आंबेडकरांना वाचणार व समजणार नाही तोपर्यंत ५. आंबेडकरांना परिघाच्या आत कोंबून न ठेवता परिघाच्या बाहेर त्यांना सामावून घेत नाही तोपर्यंत. भारतीय समाजाने आपल्या विचारशैलीत बदल न केल्यास तो आपले चांगले न होण्याच्या मानसिकते मध्येच जगणारा एक ‘आजारी हिदू पुरूष व स्त्री’ या व्यतिरिक्त त्याला दुसरे कोणते विशेषण लावता येणार?  

गांधीजींचे बुद्धीकौशल्य तसेच त्यांच्या तत्वज्ञानातील वैगुण्य व दोष बाहेर काढणे आज खूप गरजेचे आहे. कारण हे गांधीचे युग नसून डाक्टर आंबेडकरांचे युग आहे. आंबेडकरासाठी गांधीला खुर्ची सोडावीच लागेल. परंतु माझ्या मते हे युग आंबेडकराचे असले तरी आंबेडकरवाद व आंबेडकरवाद्यांचे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आंबेडकरांना मानणारा वर्ग हा कांग्रेस व भाजपा कडे आकृष्ठ होत आहे. असंख्य आंबेडकरवादी पक्ष हे भविष्यात कधीही कोणा एका दलित नेतृत्वाखाली एकत्र येवू शकणार नाहीत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आंबेडकराच्या नावाचा कितीही बोलबाला असला तरी अंमलात येणारी नीती ही गांधीवादी व धर्मवादीच असणार आहे. असे असले तरी डाक्टर आंबेडकर हे हिंदुत्वावाद्यासाठी फार मोठे आव्हान आहे.

डाक्टर आंबेडकरांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांनी देशाला जगातील सर्वात मजबूत राज्यघटना दिली. पाकिस्तान फाळणी संदर्भात कोणत्याही देशप्रेमिला लाजवेल अशी त्यांनी भूमिका घेतली. हिंदू धर्म सोडताना त्यांना मुस्लीम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारून हिंदुत्ववाद्यांना मोठे आव्हान देवून या देशाचे वाटोळे करता आले असते परंतु तसे न करता त्यांनी याच देशातील शांतीचा बौध्द धर्म स्वीकारला. परंतु त्यामोबदल्यात डाक्टर आंबेडकरांना काय बक्षीस मिळाले? तर त्यांची केवळ दलितांचा नेता म्हणून हेटाळणी करण्यात आली. देशाचा व बहुजनांचा नेता बनण्यापासून त्यांना सतत रोखण्यात आले.

भारतावर आपल्या प्रभावाची छाप पाडणा-या या डाक्टर (बाबासाहेब आंबेडकर) व संत (महात्मा गांधी) यांची राजकीय तुलना करताना अरुंधती म्हणते, गांधी हे मुरब्बी व कूटनीतिक राजकारणी होते. त्यामानाने आंबेडकर हे कच्चे राजकारणी होते. गांधीना एखाद्या प्रसंगाची चित्रपटाप्रमाणे मांडणी करून लोकांना कसे झुकवून ठेवायचे याचे नाटकी ज्ञान अवगत होते तर आंबेडकराजवळ ही कला मुळातच नव्हती. डाक्टर हे जाती व वर्णव्यवस्थेवर जालीम उपाय सांगत होते तर गांधी नावाचा संत रुग्णाची चिंता शमविण्यासाठी खरे औषध असल्याचे भासवून खोटे औषध देत होते. अरुंधती राय यांनी सदर ग्रंथामध्ये ब्राम्हणवाद्यांवर व गांधीवर वैचारिक हल्ला करण्यासाठी उपयोगी पडणारी अनेक टिपणे व आकडेवारी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक जागरूक नागरिकाने जागरूक नसणा-या समुहास चेतविण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे.


बापू राऊत
९२२४३४३४६४

1 comment: