Sunday, July 27, 2014

भारतीय इतिहास बदलविण्याचे षडयंत्र

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जनतेनी नरेंद्र मोदीच्या अच्छे दिन आनेवाले है, सबका विकास – सबका भला अशा प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना व त्यांच्या पक्षाला बहुमताने निवडून दिले. मोदीच्या प्रचारात धर्म, मंदिर यासारखे मुद्दे नव्हते तर विकास हा मुख्य मुद्दा होता. मोदी जिथे जात तिथल्या स्थानिक प्रश्नासी  निगडीत होत ते प्रश्न सोडविण्याची हमी देत असत. मोदींच्या याच हमीवर विश्वास ठेवून
देशातील सर्व समाज्याच्या व धर्माच्या लोकांनी त्यांना एकहाती बहुमत दिले. भारतीय जनता आता अच्छे दिन येण्याची वाट पहात असतानाच एकामागून एक धक्के देणारे निर्णय सरकार, त्यांचा पक्ष व त्यांची मातृ संघटना असणा-या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून होत आहे. सामान्य लोकांचे बुरे दिन येण्याची ही चाहूल तर नाही ना! असे आता वाटायला लागले आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला वाटू लागले असावे आपल्या पक्षाला एवढे बहुमत यापुढे कधीही मिळणे शक्य नाही. त्यामुळे चालून आलेल्या संधीचा आताच फायदा घ्यावा, अन्यथा आपल्या सनातनी विचाराचा ब्राम्हनवाद राबविण्याची संधी यापुढे कधीही मिळणार नाही. म्हणून संघ अनेक माध्यमातून देशाचा इतिहास, सांस्कृतिक रचना बदलवून मिथ्यांना (काल्पनिक गोष्टीना) सत्यघटनामध्ये परिवर्तीत करण्यासाठी ते कार्यप्रवण झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या अध्यक्षपदी  प्रो.येल्लप्रगदा सुदर्शन राव यांची नेमणूक केलेली आली. प्रो.येल्लप्रगदा सुदर्शन राव हे संघसमर्थक असून त्यांनी चातुर्वण्य व जातीव्यवस्थेचे समर्थन केले आहे. आजपर्यंत महाभारत व रामायण यांना भारतीय इतिहासकार ऐतिहासिक दस्तावेज मानत नसत. परंतु प्रो.येल्लप्रगदा सुदर्शन राव हे महाभारत व रामायण यांना इतिहास ठरविण्याचे आखले आहे. भारतीय इतिहासकारांनी पुराने, रामायण व महाभारत यांना मिथक ठरविले आहे. भारतीय इतिहास हा महावीर जैन व बुध्दापासून सुरु होतो. कारण इतिहास हा नेहमी पुरावे व तथ्यावर आधारित असतो. संघाच्या काल्पनिक मिथ्यावर आधारित रामजन्मभूमीचे/बाबरी मस्जिद परिसराचे उत्खनन करण्यात आले. परंतु त्यातही रामाच्या संदर्भातील कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झाला नाही. जैन व बौद्धांनी सबंधित उत्खनन विवादात पार्टी होण्यासाठी सरकारकडे मागणी केली परंतु ती नाकारण्यात आली होती. अयोध्या ही बुद्धकालीन पुरातन साकेत नगरी असल्याचा बौद्धांचा दावा आहे.
दिनानाथ बात्रा हे असेच संघसमर्थक, शिक्षा बचाव आंदोलन समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी अमेरिकन लेखिका वेंडी डानिजर यांनी लिहिलेल्या द हिंदुइझम –अन आल्टरनेटिव्ह हिस्ट्री या पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे भारतातील वितरण हाणून पाडले. याच दिनानाथ बात्रांनी गुजरात मधील ४२,००० हजार सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये वितरणासाठी ९ पुस्तकांचा एक संच लिहिला आहे. गुजरातचे शिक्षामंत्री भूपेंद्रसिन्ह चुडासामा यांनी ते जारी केले. त्यात त्यांनी युरोपीय पध्दतीने वाढदिवस साजरा न करण्याचे त्यांनी आव्हान केले आहे, स्वदेशी कपडे घालण्यावर, हवन करण्यावर व गाईना खाऊ घालण्यावर त्यांनी भर दिला आहे. भारतीय नकाशा काढताना त्यात पाकिस्तान, अफगाणिस्थान, नेपाल, भूतान, तिबेट, बांगलादेश, श्रीलंका व म्यानमार या देशांचा समावेश केला आहे. पाकीस्तानचा १४ आगस्ट ह्या स्वातंत्र्य दिन. या दिवसाला सुट्टी घोषित करून अखंड भारत स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दिनानाथ बात्रांनी देशातील संपूर्ण शाळांसाठी त्यांनी शिफारस केलेली समान शिक्षण पद्धती अवलंबविण्याची मागणी केली.
विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल व प्रवीण तोगडिया यांनी तर हिंदू राष्ट्राचा व समान नागरी कायद्याचा आलाप सुरु केला आहेच. इतर धर्मियांनी दुस-या दर्जाच्या नागरिकाप्रमाणे राहण्याचा आगावू सल्लाही त्यांनी दिला आहे. गोव्याचे भाजपाचे पदाधिकारी व मंत्री हे तर हा देश हिंदू राष्ट्रच आहे अशी भूमिका मांडू लागले आहेत. मोदी सरकारमुळे हिंदू संघटनाचा दहशहवाद व मग्रुरी अधिक वाढू लागली असून त्यांना अगोदर वाटणारे भय नष्ट झाले आहे. पुण्यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या नेत्यांनी जी दंगल करून मुस्लीम युवकाचा बळी घेतला त्याने हे अधिक स्पष्ट होते. देशात अधिकाधिक मंदिरे बांधून जनतेला मानसिक व धार्मिक गुलामगिरीच्या बेड्यात अडकवून जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था व सनातन धर्मपध्दतीची साखळी मजबूत करण्याची कसरत संघ करीत आहे. त्यामुळे  नरेंद्र मोदी सरकारच्या आगामी कार्यकाळात काय घडणार याचा रोडमप वा झलक जनतेला न कळण्याइतपत ती दुधखुळी नाही. त्यामुळे अच्छे दिन येण्याच्या प्रतीक्षेत जनतेच्या पायांना  काट्यांची चमक मात्र नक्कीच जाणवेल.
भारतीय जनता पक्षाचे सरकार व त्यांची मातृ संघटना आर. एस. एस ही देशाच्या इतिहासाचा चेहरा मोहरा बदलविणार हे  स्पष्टच आहे. परंतु अशा बदलांना विरोध करून ते बदल हाणून पाडण्याची कुवत विरोधी पक्ष व पुरोगामी विचाराच्या संघटना मध्ये राहिलेली नाही. तथाकथित विरोधी पक्षाची मानसिकता ही साधारणपणे संघाच्या ब्राम्हनवादी विचारासी मिळतीजुळती असून आतून त्यांची संमतीही असेल. केवळ पुरोगामी विचाराची, अन्य धर्माच्या (मुस्लीम,इसाई, बुद्धिष्ट) लोकांची मते आपल्याला मिळावीत या अंतस्थ हेतूने देखाव्यासाठी शाब्दिक विरोध करतील की ज्याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही. तर पुरोगामी विचाराच्या संघटना इतक्या व्यक्तिवादी झाल्या आहेत की आपले व्यक्ती महात्म्य वाढविण्यासाठी ते एकला चलो चाच नारा लावीत असतात. त्यांना एकीत बळ असते हे कळत असते परंतु त्यात आपले महत्व नष्ट होईल अशी त्यांना भीती असते. अशा एकला चलोवाल्यांना सरकार कधीही आपल्या जाळ्यात ओढू शकते. जे सरकारी जाळ्यात न अडकता विरोध करतील त्यांची पोलिसी खाक्या दाखवून मुस्कटदाबी होईल. अशा परिस्थितीमध्ये इतिहासाचे पुनर्मुल्यांकन करून नव्या पिढीला नवा ब्राम्हणी इतिहास शिकविण्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मनसुबे साकार करण्याचे दिवस आता दूर नाहीत हे स्पष्टच आहे.
बापू राऊत

९२२४३४३४६४ 

No comments:

Post a Comment