Friday, June 26, 2015

शाहू महाराज व बहुजनवादी चळवळ

आज देशात बहुजनवादी राजकारण व समाजकारणाची धार अधिक तीव्र झालेली दिसते. आपल्या हक्कासाठी बहुसंख्य असलेल्या मध्यम व मागास जातींनी एकत्र येवून अल्पसंख्य परंतु पुढारलेल्या व शोषक धर्मसत्ताक जातीविरुध्द केलेली चळवळ म्हणजे “बहुजनवादी चळवळ” असी प्रचलित व्याख्या आहे. या बहुजनवादी चळवळीची नाळ ही २५०० वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जाते. गौतम बुद्धांच्या “बहुजन हिताय बहुजन सुखाय” या शब्द रचनेची फोड केल्यास पुढारलेल्या व धर्मसत्ता हाती असणाऱ्या अल्पसंख्यांक जाती  ह्या अशिक्षित शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी ह्या बहुसंख्यांक जातीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक शोषण करून स्वत: मजेत जीवन जगत असत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तथागत बुद्धाने  “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ची हाक बहुजनांना दिली होती.
सम्राट अशोका नंतरच्या पर्वात क्रांती व प्रतिक्रांतीच्या कलंगीतुर्यात ब्राम्हणांनी बाजी मारत येथील बहुजनसमाजावर आपले वर्चस्व स्थापून धर्मशास्त्रे व स्मुर्त्यांचे कडक नियम लादले. सामान्य जनता तर हवालदिल झाली होतीच परंतु राजे/महाराजे व बहुजन संत यांच्यावरही ब्राम्हणांनी आपली धर्मशास्त्रे उगारली होती. शिवाजी महाराज, संभाजी राजे, सातारचे प्रतापसिंह भोसले, बडोद्याचे गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराजही त्यातून सुटले नाही.  एकोणिसाव्या व विसाव्या शतकात काही समाजक्रांतीकारकांनी मस्तावलेल्या शोषक जातीविरुध्द बहुजन समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी तुमच्या दुरावस्थेला देव किंवा नशीब कारणीभूत नसून समाजातील मुठभर अल्प व उच्च जातीचे लोक व त्यांनी निर्माण केलेली समाजव्यवस्था कारणीभूत आहे असे बहुसंख्यांक जातीना पटवून दिले. याचे बहुतेक श्रेय बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, रामासामी पेरियार, डाक्टर आंबेडकर व मा.कांशीराम यांचेकडे जाते.
सामाजिक क्रांतीसाठी बंड करणारा शाहू महाराजाशिवाय दुसरा राजा जगाच्या पाठीवर कोठेही मिळणार नाही. त्यांच्या कार्याचे फळ म्हणून त्यांना लोकराजा, लोकनेते, राजश्री, बहुजनांचा राजा अशी विविध बिरुदे लोकांनी दिली. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्व ते शेतकऱ्यास सांगत. पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी राधानगरी धरणाची योजना आणली. कारखानदारी व उद्योगधंद्याबरोबरच त्यानी सहकार क्षेत्रात मोठे काम केले. १९१२ साली सहकारी कायदा करून अर्बन व बलभीम को-ऑप.बक अशा दोन बका त्यांच्याच काळात निघाल्या. त्यांच्या ह्या कार्याची तळमळ बघून म.गांधी त्यांना “निस्वार्थ मिशनरी भावनेचे अद्वितीय उदाहरण” असी पोचपावती देतात. शाहू महाराज म्हणत “लोकशाहीचे यश हे लोकशिक्षणावर अवलंबून आहे. त्यांनी विविध जातीधर्माच्या मुलासाठी वस्तीगृहे व शाळा काढल्या, अस्पृशाना रोजगारांच्या संधी निर्माण करून दिल्या.
महाराज हे ब्राम्हनद्रेष्ते नव्हते. परंतु आपले धार्मिक व इतर बाबतीत अन्याय व माणुसकीला लाजविणारे वर्चस्व इतरावर कायम राहावे यासाठी धडपड करणाऱ्या ब्राह्मणाचा त्यांनी कसून विरोध केला. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणानी दाखविलेल्या पाखंडाला व वर्णवर्चस्ववादाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ब्राम्हणांनी दाखविलेल्या देवाच्या कोणत्याही भितीपुढे ते नमले नाही. आज मात्र महाराष्ट्रात उलटेच होताना दिसते. नेते व प्रस्थापित राजकारणी उठता बसता शाहू महाराजांचे नाव घेतात परंतु वर्तन त्यांच्या विचाराविरोधी करीत असतात. देवाला नैवैद्य व ब्राम्हणाला दक्षिणा दिल्याशिवाय त्यांच्या कामाची सुरुवात होत नाही. भित्र्यांची पिलावळ निर्माण झालेली आज सगळीकडे बघायला मिळते.  
शाहू महाराजाचे कार्यकाळात ब्रिटीश भारताच्या राजकारनाची व धर्मकारनाची सर्व सूत्रे ही ब्राह्मणाकडे व काही प्रमाणात जमिनदाराकडे होती. देशात राष्ट्रीय कांग्रेसची स्थापना ही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झाली नव्हती. तर भांडवलदार व जमीनदार यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी उच्चवर्गीय लोकांनी केलेली ती कृती होती. बहुजन जनतेवर ब्राम्हणाच्या धार्मिक अत्याचाराचा जो कहर चालू होता त्याचेसी कांग्रेसचे काहीही देणेघेणे नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सामाजिक व्यवस्था ही मनुस्मृती प्रमाणेच चालू होती. नंतरच्या काळात भारतीय राष्ट्रीय कांग्रेसने जामीनदार व भांडवलदार याचे रक्षण करण्याबरोबरच आपल्या राजकारणाची दिशा बदलविली. कांग्रेसनी देशाला ब्रिटीशाच्या शासनव्यवस्थेतून मुक्त करण्याची घोषना केली. परंतु या कांग्रेसवर पूर्णत: उच्चवर्णीय ब्राम्हणाचे वर्चस्व होते. व्योमेशचंद्र बेनर्जी, बाळ गंगाधर टिळक व नामदार गोखले हे कांग्रेसचे धुरीण होते. म्हणजे एकूणच अल्पसंख्यांक ब्राम्हणाचे देशाच्या धर्म व समाजकारणावर जशी मजबूत पकड होती तसीच ती राजकारणावरही होती. ब्रिटीश भारतातील स्वातंत्र्य आंदोलन हे ब्राम्हणांचे स्वत:साठी राजकीय सत्ता हिसकावून घेण्याचे ते एक आंदोलन होते. टिळकांनी म्हटलेच होते, शेतकरी, तेल्या तांबोळ्यानी कौन्सिलमध्ये जावून काय नांगर हाकायाचे आहेत, की तागडी धरायची आहे. या देशातील बहुजन समाजावर ब्रिटिशांचे व मोगलांचे फार मोठे उपकार आहेत. अन्यथा मनुस्मृतीच्या तळत्या तेलात आजही बहुजन समाज भाजत व तडफडत राहिला असता.
महाराष्ट्रात ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर असा वाद निर्मित होण्याच्या प्रक्रियेचे मूळ विष्णुशास्त्री चिपळूणकर व बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारधारेत आहे. विष्णुशास्त्री चीपळूणकरांनी म. ज्योतिबा फुल्यांच्या परिवर्तन व सुधारकी विचारावर कठोर हल्ले करून व टिळकांनी वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणाची बाजू घेत शाहू महाराजांना दुषणे देत ब्राम्हण श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ब्राम्हण विरुध्द इतर सर्वजाती असी पार्श्वभूमी तयार करून बहुजनवादी चळवळीचे बीज निर्माण केले. या बीजातून अंकुरलेल्या बहुजनवादी चळवळीचे नेतेपद शाहू महाराजाकडे (१९२२) ते जिवंत असेपर्यंत कायम होते.
ब्राम्हणांनी वेदोक्त प्रकरणे गाजवून ब्राम्हनेतरांचा धार्मिक व सामाजिक छळ केला. कोल्हापुरात झालेल्या वेदोक्त प्रकरणाचे फलित म्हणून महाराजांनी पुरोहित शाळा सुरु करून जातपात निरपेक्ष पुरोहित तयार केले. त्यांच्याकडून गावोगावी लग्ने व धार्मिक विधी करवून घेतले. हा ब्राम्हणांना शिकविलेला धडा तर होताच त्याचबरोबर पुरोहीतशाहीविरुध्द महात्मा फुले यांनी केलेल्या बंडाचा विजय होता. राजश्री शाहू महराजांनी १९०२ साली आपल्या संस्थानात मागासासाठी ५० टक्के आरक्षण जाहीर करून ब्राम्हण पुरोहितांना दुसरा धक्का दिला होता. महाराजांनी आपल्या आदेशात ब्राम्हण, प्रभू व शेणवी ह्या जाती सोडून बाकीच्या जातीचा समावेश “बहुजन” या शब्दात केल्याचे दिसते.
महात्मा फुल्यांनी शेटजी व भटजीच्या मिलीभगत राजकारणाची दिशा ओळखली होती. म्हणून त्यांनी ब्रिटीश भारतातच बहुजन समाजासाठी संपूर्ण स्वातंत्र्यासाठीचे स्वप्न बघितले होते. तीच रि शाहू महाराजाने ओळखली. २४ नोव्हेंबर १९१८ साली मुंबई येथे सीताराम बोले यांनी भरविलेल्या कामगार सभेत शाहू महाराज म्हणतात, ‘देशातील प्रत्येक माणसास मत देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणजे बहुजन समाजाच्या मताप्रमाणे कारभार चालला पाहिजे. येथेही ब्रिटन प्रमाणे मजुरांचे संघ झाले पाहिजेत व सर्वास आपले हक्क काय आहेत हे कळले पाहिजेत’. पुढे ते असेही म्हणतात, ब्राम्हणांना व वैश्यांना दाबात ठेवल्याशिवाय मजुरांची उन्नती होणे फार कठीण आहे. नाशिक येथे १५ एप्रिल १९२० साली झालेल्या परिषदेत ते ब्राम्हणांची जन्मसिध्द धार्मिक ब्युरोक्रासी मोडून काढा असा उपदेश करतात.  
म.फुल्यांच्या निधनानंतर नारायणराव लोखंडे यांनी सत्यशोधक चळवळीची धुरा वाहिली होती. त्यांच्या १८९७ साली प्लेगच्या साथीतील मृत्यू नंतर ड.विश्राम रामजी घोले, ड.संतुजी रामजी लाड, कृष्णराव भालेकर आणि रामय्या अय्यावारू यांनी म. फुल्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम केले. शाहू महाराज १९१० पर्यंत सत्यशोधक चळवळीसी सबंधित नव्हते. शाहू महाराजांच्या सल्ल्याने ११ जानेवारी १९११ रोजी सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापुरात परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे व  म.म.डोंगरे यांचा त्यात मुख्य सहभाग होता. हरिभाऊ चव्हाण, विसोजी डोने मास्तर हे त्यांचे सहाय्यक होते. १९१६ साली महाराजांच्या प्रेरणेने ‘डेक्कन रयत असोसिएशन’ नावाची राजकीय संस्था काढली. म.फुलेंच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या पाठिंब्याच्या उत्साहाने प्रथमच पुणे येथे १७ एप्रिल १९११ साली पहिली सत्यशोधक परिषद रामय्या अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शाहू महाराजामुळे बहुजनवादी चळवळीस एकप्रकारे बळ व प्रतिष्ठा प्राप्त झाली हे त्याचे एक उदाहरण होय.
कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर शाहू महाराज ब्राम्हणेत्तर बहुजनवादी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक जागृती व परिवर्तनाचे काम करीत असत. परंतु ह्या गोष्टी अनेक ब्राम्हणांना खटकत असत. याची त्यांनी ब्रिटीश सरकारकडे महाराजाविषयी तक्रार करून ब्रीटीशाकडून “कोल्हापूर संस्थानाच्या बाहेरच्या हद्दीत तुम्ही कोणतीही चळवळ करू नये” अशा प्रकारची समज देण्यास भाग पाडले. परंतु यावर शाहू महाराज ब्रिटीशांना इशारा देवून म्हणतात, “तुम्ही मला पदच्युत करण्यापूर्वी मी राजीनामा देईन, परंतु बहुजन समाजाच्या उध्दाराचे माझे पवित्र कार्य मी प्राण जाईतोवर सोडणार नाही”. त्यांच्या अकाली निधनाने बहुजनवादी चळवळीचे अनेक तऱ्हेने नुकसान झाले. ते जाताच ब्राम्हणेत्तर चळवळीच्या नेत्यामध्ये भांडणे सुरु झाली. या चळवळीचा फायदा बहुजनातील मराठा जमीनदार व सावकार यांनी घ्यायला सुरुवात केली. नंतरच्या काळात या चळवळीचे जेधे-जवळकराकडून कांग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात येवून समतेच्या लढाईची ज्योत ज्या महापुरुषांनी सुरु करून ती अशीच तेवत राहील याचे स्वप्न बघितले होते ती चळवळ त्यांच्या अनुयायांनीच विझविली असे म्हणण्यावाचून राहवत नाही.
शाहू महाराजांचा वसा सांगणाऱ्या आजच्या बहुजनवादी चळवळीचे देशात भवितव्य काय?. असा प्रश्न निर्माण होतो. जाती जातींमध्ये विभागलेल्या बहुजनांची एकजूट होण्यास “जातच” कारणीभूत आहे. असे असले तरी शोषितांची व्यापक एकजूट होण्यास लायक व चारित्र्यवान नेत्याची गरज असतानाच आपण “काहीतरी करू शकतो” व “हे होवू शकते” असी उर्मी समाजात निर्माण होवून बहुजनांच्या हिताचे  सामाजिक व आर्थिक लढे लढावे लागतील. आजच्या बहुजन चळवळीचे दुर्दैव असे की, बहुजनातीलच माथेफिरू नेते व विचारवंत थोड्या स्वार्थासाठी शत्रूच्या गोटात जावून  आपल्याच भावी पिढ्यांचे हजारो पटीने नुकसान करीत आहेत. असे नेते व कार्यकर्ते शाहू महाराजांचे चारित्र्य, विचार व त्यांच्या कार्यातून बोध घेतील असी अपेक्षा करू या.    

बापू राऊत

९२२४३४३४६४ 

No comments:

Post a Comment