Tuesday, August 25, 2015

चळवळीत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या तरुण नेत्याची गरज


आता देशात असंतोषातून आंदोलने पेटू लागलेली आहेत. गुजरात मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनामध्ये एक हितेश पटेल हा तरुण पटेल समुदायाचे नेतृत्व करताना दिसतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाखाचा समुदाय आंदोलनात सहभागी होतो. हितेश पटेल या तरुणाच्या संघटन कौशल्याला दाद द्यावी लागेल. दुसरा अल्पेश ठाकूर हा तरुण ओबीसी जातीचे नेतृत्व करून पटेल समुदायाला मागणीला आव्हान देतो. एकूणच गुजरातचे २२ ते २५ वयोगटातील तरुण त्या त्या समुहाचे नेतृत्व करताना दिसतात.
महाराष्ट्राचे तरुण याबाबतीमध्ये मागेच दिसतात. मागच्या सहा दशकापासून आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळ ही गंजलेल्या, विकावू, स्वार्थी व दलालांच्या हातामध्ये आहे. याकडे आंबेडकरी तरुण केवळ ओशाळल्यागत नजरेने पहात आहे. परंतु गटातटाच्या या मस्तवाल बैलांना कोणीही प्रश्न विचारन्याची हिंमत करीत नाही. आताच्या या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बैलांना समाजाचे कोणतेही प्रश्न दिसत नाहीत. बेरोजगारी, शिक्षणाचा प्रश्न, दलितांवरील सामाजिक बहिष्काराचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, खाजगी संस्थामध्ये आरक्षणाचा प्रश्न, आरक्षनाच्या अंमलबजावणीचा प्रश्न, महिलावरील अत्याचाराचा प्रश्न व राजकीय सत्तेमध्ये स्वत:च्या ताकदीवर उभा राहण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. पण समाज भरडत असलेल्या विविध प्रश्नावर ह्या बैलांनी तोंडाला कुलूप लागल्यागत केले आहे. ह्या अज्ञानी, प्रश्नाची समज व त्याची खोली माहीत नसलेले व बोलण्याचा ढब नसलेल्या नेत्यांचा भार आता का सहन करायचा? सिंग नसलेल्या ह्या बैलांना चळवळीच्या मार्गातून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. वेगवेगळया पागाच्या (गटांच्या) या बैलांची वेसन धरून त्यांना गोठ्यात जेरबंद केले पाहिजे.
नवचैतन्य निर्माण करणारे तरुण आता समाजाचे नेते झाले पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक अशा विविध विषयाचे ज्ञानकौशल्य प्राप्त करून समाज मनाला सरळ हात घालेल असे संभाषण कौशल्य साधले पाहिजेत. संघटन शक्ती व जनतेचे मुद्दे घेवून जो तरुण समाजात जाईल त्याला आपोआपच नेतृत्व मिळेल. गंज लागलेल्या बैलांना बाजूला सारून तरुणांनी समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तरुणाकडून भरपूर आशा होत्या.

बापू राऊत  

Saturday, August 22, 2015

शिवाजी महाराज, शिवसेना व पुरंदरे

श्री ब. मो. पुरंदरेना “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच पुरंदरे हे चर्चेत आहेत. पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यात कोणते निकष वापरले गेले? हा प्रश्न अनेकजन उपस्थित करीत आहेत. वास्तविकत: महाराष्ट्रात पुरंदरेपेक्षा घराघरात जनजागृतीचे व खरा शिवाजी महाराज पोहोचविण्यात इतिहासकार मा.म.देशमुख यांचे कार्य मोठे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असूनही मा.म.देशमुख यांच्या नावाचा महाराष्ट्र भूषण साठी कधीही विचार करण्यात आला नाही. परंतु फडणवीसाचे सरकार सत्तेवर येताच पुरंदरेना महाराष्ट्र भूषण घोषित करून तो कडेकोट बंदोबस्तात प्रदान करण्यात आला. हा “महाराष्ट्र भूषण” या शब्दाचा खरा तर अपमान आहे. आजच्या घडामोडीत या पूरस्काराला “जातीवादाचे पारितोषिक” ह्या शब्दाशिवाय दुसरा पर्यायी शब्द होवू शकत नाही.