Saturday, August 22, 2015

शिवाजी महाराज, शिवसेना व पुरंदरे

श्री ब. मो. पुरंदरेना “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच पुरंदरे हे चर्चेत आहेत. पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यात कोणते निकष वापरले गेले? हा प्रश्न अनेकजन उपस्थित करीत आहेत. वास्तविकत: महाराष्ट्रात पुरंदरेपेक्षा घराघरात जनजागृतीचे व खरा शिवाजी महाराज पोहोचविण्यात इतिहासकार मा.म.देशमुख यांचे कार्य मोठे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असूनही मा.म.देशमुख यांच्या नावाचा महाराष्ट्र भूषण साठी कधीही विचार करण्यात आला नाही. परंतु फडणवीसाचे सरकार सत्तेवर येताच पुरंदरेना महाराष्ट्र भूषण घोषित करून तो कडेकोट बंदोबस्तात प्रदान करण्यात आला. हा “महाराष्ट्र भूषण” या शब्दाचा खरा तर अपमान आहे. आजच्या घडामोडीत या पूरस्काराला “जातीवादाचे पारितोषिक” ह्या शब्दाशिवाय दुसरा पर्यायी शब्द होवू शकत नाही.
सध्या दोन तऱ्हेचे शिवरायप्रेमी समूह महाराष्ट्रात बघायला मिळतात. एक शिवरायप्रेमी समाज परंदरेना विरोध करतो तर दुसरा पुरंदरेचे समर्थन करतो. वरीलपैकी एक शिवरायप्रेमी समूह शिवाजी महाराजा संबंधात बदनामीकारक लिहिलेल्या गोष्टीचा विरोध करतो तर दुसरा शिवाजी महाराजाच्या व जिजाऊची झालेल्या बदनामीचे मौन समर्थन करीत चूप बसतो. त्यामुळे त्यांना शिवरायप्रेमी कसे म्हणावे? हा एक प्रश्नच आहे. ज्या शिवरायाच्या नावाच्या बळावर राजकीय सत्ता प्राप्त झाली त्या उद्धव ठाकरे व शिवसेनेला तसेच राज ठाकरे यांना शिवराय व जिजाऊच्या बदनामीसी काही देणेघेणे नव्हते परंतु शिवाजीवर ऐतिहासिक अन्याय करणाऱ्या पुरंदरेला काहीही झाल्यास ते खपवून घेणार नाही अशी बहुजन समाजास धमकी देवून आपल्या आतमधल्या भावना जाहीर केल्या. त्यामुळे शिवराय प्रेमींनी व बहुजन समाजाने शिवसेना, भाजपा व ठाकरे बंधूचे शिवाजी महाराजा बद्दलचे पुतना मावशी प्रेम समजून घेतले पाहिजे.   
जेम्स लेनचे “द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” हे पुस्तक प्रकाशित झाले. आणि महाराष्ट्रात नव्या वादाला सुरुवात झाली. त्यात 'शिवाजीचे खरे पिता शहाजी नसून दादोजी कोंडदेव होते, असं महाराष्ट्रात काही लोक खाजगीत म्हणतात.' अशा प्रकारचं विधान लेनच्या पुस्तकात आहे. अस लिहायला शिवाजी महाराज हे काल्पनिक दंतकथातील राम व कृष्ण नव्हेत. ते महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले भूमिपुत्र होते. शहाजी महाराज व जिजाऊ हे त्यांचे जन्मदाते असताना जेम्स लेन ला खाजगीत दादोजी कोंडदेव हे त्यांचे जैविक वडील आहेत. असे सांगणारे कोण असू शकतात? हा जीजाऊच्या चारित्र्यावर जेम्स लेनच्या माध्यमातून सरळ सरळ केलेला हल्ला होता. त्याचा परिणाम म्हणून भांडारकर प्राच्य संस्था व पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्यांचे नाव होते त्यांच्यावर शिवाजी प्रेमीची नजर गेली व नंतर भांडारकर संस्था व पुरंदरेसकट इतरांना त्याची किंमत चुकवावी लागली हा आता इतिहास झालाय.
शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना तो जातीय दृष्टीकोनातून व वर्णश्रेष्ठत्वातून  लिहिला गेला. सगळीकडे पसरलेल्या मुस्लीम राजवटीमध्ये स्वत:च्या ताकदीवर स्वतंत्र राज्य निर्मिती केली होती. त्यांच राज्य हे सर्वधर्मीय जनतेसाठी होते. शिवरायाचे स्वराज्य उभारण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अलुतेदार, बलुतेदार जाती व मुस्लिमांनी एकत्रित लढा दिला व त्यांच्यासाठी मरणही पत्करले. परंतु शिवाजी महाराजाच्या उतुंग व्यक्तीमत्वावर इतिहास लिहिण्याचा ठेका घेतलेल्यांनी ते एका धर्माचे व एका विशिष्ठ जाती विरोधक होते असी प्रतिमा निर्माण केली. या प्रतिमेचा फायदा शिवसेनेसारख्या धर्मभीरू संघटनेने महाराष्ट्रात जातीय व धार्मिक विद्वेषी राजकारणासाठी केला. शिवरायाचे संपूर्ण स्वराज्य आकारास आले तेव्हा कोणत्याही अलुतेदार, बलुतेदार व मुसलमानाने  शिवरायाच्या राज्याभिषेकास विरोध केला नाही मात्र महाराष्ट्रातील सर्व  सर्व ब्राम्हणांनी शिवरायांना शूद्र ठरवून राजा बनण्यास विरोध केला होता.
रायगडावर जावून शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम म.फुले यांनी शोधून काढली व प्रथम शिवजयंती साजरी केली. म.फुल्यांनी शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिला. परंतु ब्राम्हणी साहित्यिक व वर्तमानपत्रे याचा कधीच उल्लेख करीत नाहीत उलट बाळ गंगाधर टिळक यांनीच प्रथम शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली असा प्रचार केला व पुरंदरेनी पोवाड्याच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविला असे खोटे सांगितल्या जाते.
“जाणता राजा” हे बाबा पुरंदरेचे नाटक लोकांची दिशाभूल करणारे आहे. ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता ह्यात काल्पनिकता व रंजकता असते परंतु हे सारे वाचून हाच इतिहास व सत्य आहे असे सामान्य जणांना वाटू लागते. पुरंदरेनी बरोबर असेच केले. त्यांनी आपल्या लिखाणात, नाटकात व पोवाड्यात काल्पनिक गोष्टी घुसडविल्या. तत्सम मराठा संघटनानी केलेल्या रेट्यामुळे शिवाजी महाराज व रामदास यांचा सबंध दाखविणारे पुरंदरे नंतर शिवाजी महाराज व रामदास याची भेट झाली नाही असे सांगतात( तरुण भारत १६.०२.२०००). अफझलखानाच्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या ब्राम्हण वकिलाने शिवाजीवर हल्ला करून त्यांच्या डोक्यावर वार केला होता परंतु इतिहास सांगताना कृष्णाजी भास्कर यांनी शिवाजीवर वार केला असे लिहिले. शेवटचे कुलकर्णी हे आडनाव ब्राम्हण इतिहासकारांनी आजपर्यंत दडवून ठेवले होते. पुरंदरेही केवळ कृष्णाजी भास्कर असेच म्हणत व्याख्याने देतात.
अनेक सत्य बाबी अशा आहेत की त्या ब्राम्हणी इतिहासकाराना लोकांना सांगायचे वा माहीत होवू द्यायचे नाही आहे आणि ब्राम्हणेत्तर इतिहासकारांना ते सत्य सांगण्याची हिंमत होत नाही. सत्य सांगायला त्यांचे हात पाय लटालट कापत असतात. बहुजन साहित्यिकांनी बहुजन समर्थक व ब्राम्हण विरोधक इतिहास वा पुस्तक लीहायला घेतल्यास त्यांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यास कोणताच प्रकाशक भेटणार नाही. त्यांच्या साहित्याला प्रसिध्दी भेटणार नाही व पारितोषकापासून मुकावे लागेल असी भीती असते. केवळ साहित्यिकच नाही तर शरद पवारासारखे राजकीय नेतेही ब्राम्हणांना भिवून वागत असतात. ब्राम्हणांना नाराज करू नये असे अनेक ब्राम्हणेत्तर पुढार्यांना वाटते. ब्राम्हनाविरूध्द बोलणार्या व लिहिणार्या व्यक्तीला ब्राम्हणी प्रसार माध्यमे कधी सुळावर लटकवतील याचा काहीही नेम नसतो. आज साडे तीन टक्क्यांची दहशत ८५ टक्के बहुजन समाज सहन करतो.
शिवाजी महाराज हे शिवसेनेचे कधीही आदरास्थान नव्हते. ते कालही नव्हते व आजही नाहीत. शिवाजी महाराजांचा वापर त्यांनी हिंदू विरुध्द मुस्लीम दंगे घडवून आणण्यासाठी, ओबीसी /मराठा विरुध्द दलित असा जातीयवाद निर्माण करून राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी केला. जेम्स लेनला साहित्य पुरविनार्या व शिवाजी महाराजावर अन्याय करणाऱ्या पुरंदरे व इतर ब्राम्हण लेखकावर बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना नेत्यांनी कधीच टीका केली नाही. उलट दुसऱ्यांनी टीका केलीच तर ब्राम्हणाची बाजू घेण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे.   
विदर्भात ज्या ठिकाणी कधी दंगली होत नसत व नेहमी सौहार्दाचे वातावरण असायचे त्या ठिकाणी शिवसेना नेते जावून उत्तेजनार्थ भाषणे देवून गावागावात तुमचा भीमराव तर आमचा शिवाजी असी वातावरण निर्मिती करून दंगली घडवून आणीत. रिडल्स इन हिंदूइझम, गायरान जमिनी, मराठवाडा नामांतर, आरक्षण या मुद्द्याचा शिवसेनेने सराईतपणे वापर केला. शिवसेनेच्या एका बाजूला पुरंदरे व्याख्यानातून, नाटकातून व पोवाड्यातून आवेशपूर्ण शिवाजी मांडत तर दुसऱ्या बाजूला या आवेशाचा उपयोग बाळ ठाकरे, छगन भुजबळ व मनोहर जोशी मुस्लीम व दलित विरोधी भूमिका मांडून शिवाजीचे नाव घेत लोकांना राडे करण्यास उत्साहित करीत कारण भावना भडकलेले जनमानस काही काळापुरता आपल विदारक आर्थिक वा सामाजिक वास्तव विसरून जाऊन आपला मतदार बनु शकतो हे शिवसेनेच्या पक्के लक्षात आले होते.  
आज बहुसंख्य बहुजन हे भटाब्राम्हनाचे सांस्कृतिक व धार्मिक ग्राहक आहेत. हा ग्राहक आपल्या तावडीतून सुटला तर आपले वर्चस्व संपेल म्हणून हा समाज जास्तीत जास्त अंधश्रध्द, अल्पशिक्षित, असंघटीत, फाटाफुटीत व आर्थिक अडचणीत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखण्यात आले. बहुजन समाजात देवभक्ती वाढविण्याचे प्रकार चालू आहेत. सांस्कृतिक क्षेत्र तर यांनी पूर्ण सडवून टाकले आहे. शाळा कालेजातील अभ्यासक्रम, क्रमिक पुस्तके, कथा, काव्य, नाटके, क्रीडा व कला या सगळ्या क्षेत्रात ब्राम्हण्याचा पुरस्कार आणि बहुजनांचा तिरस्कार ठासून भरला असून जातीय तणाव व अंधश्रद्धा वाढविण्यासाठी वेगवेगळे अभियान आखण्यात येत आहे. आता तर पुरंदरेनी लिहिलेली पुस्तके, डीओ व व्हीडीओ यात संकलित झालेली त्यांची भाषणे, नाटके व व्याख्याने हे इतिहासाची साधने, वस्तुस्थिती व दस्ताऐवज आहे हे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. हे सर्व पुसून काढण्याची मोठी जबाबदारी बहुजन समाज, बहुजन अभ्यासक व इतिहासकार यांच्यावर येवून पडली आहे.

बापू राऊत

९२२४३४३४६४

6 comments: