Saturday, April 30, 2016

शक्ती, प्रतिष्ठा व लालसा: एक अन्योन्य सबंध

प्रतिष्ठा कुणाला हवी नसते. प्रतिष्ठेसाठी मानवी मन तर हपापलेलेच असते. व्यक्तीगत पातळीवर  प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून भौतिक जीवनात अनेक तडजोडी केल्या जातात. अशा तडजोडी बहुतेकदा स्वत:च्या तत्वाच्या विरोधात असतात. तरीही प्रतिष्ठे साठी अशा तडजोडी केल्या जातात. म्हणून प्रतिष्ठेचा पहिला बळी म्हणून “तत्वाकडे” बघितल्या जाते. जो तत्वाला बाजूला सारून प्रतिष्ठेसाठी तडजोडी करतो त्याला अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते. लाचार होवून मिळविलेली प्रतिष्ठा हि पदाचे वलय असेपर्यंत चमकत असते. परंतु जी व्यक्ती ‘तत्वाला’ आपला अलंकार समझते व तत्वाप्रमाणे कार्यप्रवण करीत असते अशा व्यक्तीला प्रतिष्ठा मिळत नाही काय? एकार्थाने अशा व्यक्तींना भौतिक प्रतिष्ठेची गरजच नसते. पदांची लालसा हि त्यांच्यासाठी गौण असते. कारण अशा व्यक्तीकडे समाजातील प्रत्येक वर्ग व व्यक्ती आदरानेच बघत असतो. ते त्यांना ठायी ठायी सन्मान व प्रतिष्ठा देत असतात.

Tuesday, April 19, 2016

त्रीरूपी रामदेव: बाबा, व्यापारी आणि कसाई

आजकाल “रामदेव” नाव धारण केलेले रामकृष्ण यादव हे खूप फार्मात असल्या सारखे दिसतात. हे रामदेव सध्या अनेक अवतारात दिसू लागले आहेत. टीव्हीचे कोणतेही चेनेल चालू केले की ‘रामदेव’ या ब्रान्ड वल्लीची जाहिरात झळकताना दिसते. या रामकृष्ण यादवाचे अनेक रूप बघायला मिळतात. त्यापैकी एक ‘योगा’ च्या मल्लखांबातून निर्माण झालेले “बाबा रामदेव”, दुसरे पतंजली पिठाच्या माध्यमातून औषध विकणारा एक उद्योगपती (व्यापारी) म्हणून तर तिसरे मनात आणले तर भारत माता की जय न म्हणाऱ्या लाखो टोपीधारक लोकांचे शीर धडावेगळे करण्याची दर्पोक्ती करणाऱ्या कसायाच्या अवतारात.
या रामदेव उर्फ रामकृष यादव याना अनेकजन ‘संत व बाबा’  अशी बिरुदावली लावतांना दिसतात. अशांनी संताची लक्षणे कशी असतात? हे डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे. “संत” कसा असावा? या संदर्भात तुकाराम महाराज, चोखोबा, नामदेव आणि ज्ञानेश्वर या संतांचा नीट अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांती रामदेव यांना संत किंवा बाबा म्हणण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती.

Friday, April 8, 2016

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ

आंबेडकरोत्तर काळात मुख्यत: पाच चळवळीचा उदय झाला. त्यापैकी १९५७ मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना,   १९७२ ला दलित पथरचा उदय, तिसरा अन्याय व शोषणाविरुध्द लेखणीच्या माध्यमातून रोष प्रगट करीत जगाला आपली कैफियत सांगणारे दलित साहित्य तर चौथे बहुजनवादी भूमिका घेत निर्माण झालेली बामसेफ व बहुजन समाज पक्ष आणि पाचवे धम्मपरिवर्तन चक्राला गतिमान करण्याच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या खंडीत धार्मिक संघटना. रिपब्लिकन पक्षाचे रचनाकार स्वत: बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु १९५६ ला अचानक झालेल्या महापरीनिर्वानामुळे रिपब्लिकन पक्षाची घोषणा त्यांना करता आली नाही. १९६२ च्या मध्यात झालेल्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाने आपल्या भविष्याची दमदार सुरुवात केली होती. पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये अनुक्रमे ३ खासदार व ८ आमदार तर महाराष्ट्रात ३ आमदार, १९६७ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये १ खासदार व १० आमदार तर महाराष्ट्रात ५ आमदार निवडून आले होते. मात्र हे यश पक्षाला पचविता आले नाही. रिपब्लिकन पक्षावरील वर्चस्ववादाच्या भांडणात पक्षाचा राजकीय ग्राफ तेजीने घसरू लागला. कांग्रेस पक्षाने याचा नेमका फायदा घेत रिपब्लिकन पक्षाची गटातटात विभागनी करून भविष्यात हे गटतट कधीच एकत्र येणार नाही याचीही तजवीज करण्यात आली.