Tuesday, April 19, 2016

त्रीरूपी रामदेव: बाबा, व्यापारी आणि कसाई

आजकाल “रामदेव” नाव धारण केलेले रामकृष्ण यादव हे खूप फार्मात असल्या सारखे दिसतात. हे रामदेव सध्या अनेक अवतारात दिसू लागले आहेत. टीव्हीचे कोणतेही चेनेल चालू केले की ‘रामदेव’ या ब्रान्ड वल्लीची जाहिरात झळकताना दिसते. या रामकृष्ण यादवाचे अनेक रूप बघायला मिळतात. त्यापैकी एक ‘योगा’ च्या मल्लखांबातून निर्माण झालेले “बाबा रामदेव”, दुसरे पतंजली पिठाच्या माध्यमातून औषध विकणारा एक उद्योगपती (व्यापारी) म्हणून तर तिसरे मनात आणले तर भारत माता की जय न म्हणाऱ्या लाखो टोपीधारक लोकांचे शीर धडावेगळे करण्याची दर्पोक्ती करणाऱ्या कसायाच्या अवतारात.
या रामदेव उर्फ रामकृष यादव याना अनेकजन ‘संत व बाबा’  अशी बिरुदावली लावतांना दिसतात. अशांनी संताची लक्षणे कशी असतात? हे डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे. “संत” कसा असावा? या संदर्भात तुकाराम महाराज, चोखोबा, नामदेव आणि ज्ञानेश्वर या संतांचा नीट अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांती रामदेव यांना संत किंवा बाबा म्हणण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती.
रामदेव यांनी योगाची सुरुवात करताना योग केल्यास शरीर निरोगी, सुदृढ व सुडौल बनते असे सांगण्याबरोबरच योगक्रीयांनी शरीर रोगमुक्त होवून कसलेही औषध घेण्याची गरजच भासणार नाही असा दावाही केला होता. परंतु आपल्या या दाव्यावर पलटी मारत आता रामदेव यांनी स्वत:च विविध औषधाची निर्मिती करून बाजार मांडलाय व स्वत:च त्याचे मार्केटिंग करताना दिसतात. रामदेव हे पक्के राजकारणी झाले आहेत. भारतीय राजकारणी हे खोटे बोलण्यात व जनतेला गंडविन्यात पक्के सराईत झालेले आहेत. दहा मिनिटापुर्वीच आपण जे बोललो त्याला खोटे ठरविण्यात भारतीय राजकारण्याचा हातखंडा आहे. आता त्याहीपुढे रामदेव गेलेले दिसतात.
नवीन ‘वाद’ निर्माण करने हा रामदेव यांचा स्वाभाविक गुणधर्म झालेला आहे. ‘पुत्रजीवक’ नावाचे औषध काढून रामदेव निपुत्रीकाना पुत्र प्राप्त करून देण्याचे आमिष दाखवून आपला धंद्यामध्ये तेजी आणू पहात आहेत. परंतु ही शुध्द लोकांची फसवणूक असून अवैज्ञानिक कृत्य आहे. परंतु याविरुद्ध कोणीही आवाज काढताना दिसत नाही. भाजपा सरकार व संघाच्या पाठिंब्यामुळे रामदेव मध्ये नव्या शक्तीचा संचार झाला आहे. लोकांना भीती व आपली ताकद दाखविण्यात या शक्तीचा वापर करण्यात येत असल्याचे दृष्टीपटास पडते.
देशात स्वत:ला साधू, संत व बाबा म्हणविणार्या नव्या जमातीचा उदय झाला असून हे तथाकथित बाबा हजारो  कोटीच्या संपत्तीचे मालक बनले आहेत. हे बाबा राजकीय पटलावरील ‘व्होटबँकेचे’ दलाल झालेले आहेत. त्यांचे  करोडो भक्त म्हणजे त्यांची व्होटबँक असून राजकीय पक्ष या व्होटबँक साठी अशा बाबांचे चाकर (सेवक) झालेले बघायला मिळते. सरकारी जमीन म्हणजे त्यांच्यासाठी फुकटचे आंदण झाले आहे. एवढेच नाही तर गरीब शेतकरी व आदिवासीच्या जमिनी दबावातून लाटत आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा अशा बाबांचे कवचकुंडले बनला असून  संघासाठी हे बाबा आपले इप्सित साध्य करून घेण्याचे साधन झाले आहे.

भारतात सध्या चर्चित असलेल्या “भारत माता की जय” या वादात रामदेव यांनीही आपली जीभ टाळ्याला लावली. मोहन भागवतांच्या ‘भारत माता की जय’ च्या कटाक्षावर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवैसीनी प्रतिक्रिया देताच रामदेव यांनीही  आपली जीभ उचलली. कायद्याने आपले हात बांधले नसते तर डोक्यावर टोपी टाकून भारत माता की जय न बोलानार्या अनगिनत लोकांचे शीर कापून काढले असते असे गौरवौद्गार काढले. परंतु स्वत:ला संत व बाबा म्हणविणाऱ्या या विद्वेषी कसायाचे हे म्हणने कोणालाही गंभीर व कार्यवाहीदर्शक वाटत नाही याचेच अधिक आश्चर्य वाटते. हेच वाक्य एखाद्या मुस्लीम धर्मगुरू वा नेत्याने म्हटले असते तर त्याच्या अटकेसाठी साऱ्या देशातून मोर्चे निघाले असते. झी टीव्ही सारख्या मिडीया तंत्रांनी २४ तासाची ब्रेकिंग न्यूज बनविली असती. सोशल मीडियावर शिव्याचा व धमक्यांचा पाउस पडला असता. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीला कधीच अटक होवून जेलची हवा खायला लागली असती. परंतु सरकारच्या अशा दुटप्पी धोरणामुळे  भारतात कायदाच पराभूत होत आहे की काय? असेही वाटू लागले आहे.

आज राज्य सरकारे व केंद्र सरकार या रामकृष्ण यादवांच्या उद्योग वाढीसाठी लाल गालीचे अंथरविन्यास उत्सुक आहेत. यांच्या सत्संगासाठी पाणी, वीज व मैदाने याचा खुला वापर करण्यात येतो. परंतु या करोडोपती बाबांनी गरीबी, दुष्काळ  व पाणी प्रश्नावर मदतीचा हात पुढे केल्याचे ऐकिवात नाही. कधीकाळी काहीक्षणी स्त्रीवेषात दिसलेले रामदेव हे आज मात्र बाबा, कसाई व व्यापारी या तीन रूपात मुक्तपणे वावरताना दिसतात. पुढच्या काळात त्याचे भक्त रामदेव यांना याच तीन रूपातील दत्त सुध्दा बनविण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

बापू राऊत

९२२४३४३४६४

7 comments:

  1. रामदेव बाबाच्या फसव्या प्रतिमेला नेमकं उघडं पाडलंत,सुंदर लेख राऊत साहेब.

    ReplyDelete
  2. धन्यवाद गद्रे साहेब

    ReplyDelete
  3. असे अनेक रामदेव बाबा (?) फसवेगिरी करणाऱ्या बाबांना आपल्याला समाजातून हाकलायचे आहे. कोट्यावधी ची महा माया जमा करणारे हे लोक काही दिवसांनी देवत्वाचे रूप घेतील, कोणाचा तरी अंश आहे सांगतील , . भक्त अफवा पसरवन्या आधी ही समाजाला लागलेली कीड दूर करणे गरजेचे आहे त्याचं खर रूप समाजासमोर येणे गरजेचे आहे

    सुंदर लेख

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख.

    ReplyDelete