Saturday, April 8, 2017

बहुआयामी “बाबासाहेब”

बाबासाहेब आंबेडकर हे एक केवळ वादळ होते असे नव्हे तर ते एक उष्माघात होते. या “आंबेडकर” नावाच्या उष्माघाताने अनेकांना आपल्या ज्वालामध्ये गुरफुटले. आजही काहीना या ज्वाला फार दाहक वाटतात तर काहीना अंगात सामावून घ्यावा एवढा थंडावा. बाबासाहेबावर जेवढे प्रेम करणारे आहेत तेवढेच त्यांचे कट्टर विरोधकही आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांमध्ये संघ परिवाराचा मोठा गोतावळा आहे. परंतु हा संघीय गोतावळा “आंबेडकर की जय” म्हणू लागला आहे. हेगडेवार व गोळवळकर यांना कधी वाटले नसेल की, मनुस्मृतीला जाळणाऱ्या आंबेडकरांना संघ कधी आपला महानायक म्हणून कवटाळेल?. कारण ज्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ व प्रसारार्थ हेगडेवार व गोळवलकर जंग जंग पछाडत होते, त्याच काळात बाबासाहेब वर्णव्यवस्था उध्वस्थ करण्यास निघाले होते. भारतीय संविधान हाच लोकाधीकाराचा ‘आत्मा’ आहे असे सांगत सुटले होते. भाई म्हणत लाल सलाम ठोकणारे मार्क्सवादी, ज्यांनी कधीकाळी बाबासाहेबांना राजकीय जीवनातून बहिष्कृत करण्यासाठी जंग जंग पछाडले ते कम्युनिस्ट आता प्रथम जयभीम व नंतर लाल सलाम ठोकू लागले. बाबासाहेब आंबेडकरामध्ये ते आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधू लागले आहे. कम्युनिस्टांच्या मरणासन्न चळवळीचा आधार
“बाबासाहेब आंबेडकर” बनू पाहत आहेत. तर जाती व पोटजातीच्या आधारावर “मानमरातबा” मध्ये गुंग झालेल्या मध्यम जाती आता बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य,  त्यांचे लिखाण व घटना समितीतील त्यांचे मत्यंतर याचा आत्मिक धुंडवळा करीत आपले अधिकार व हक्कासाठी जागृत होवून आंबेडकरांच्या प्रतिमांना आपल्या मोर्च्याच्या मध्यात ठेवीत आहेत.  ज्यांच्यात आपल्या हक्काची कधी चेतनाच निर्माण होवू दिल्या गेली नाही, केवळ धर्मशास्त्राच्या कचाट्यात गुलामीच जीवन जगत राहिले, व्यवस्थेने नेमून दिलेल्या चाकोरीबाहेर कोणते जग आहे? याचा कधीही विचार न केलेल्या लोकासाठी बाबासाहेब आंबेडकर “आत्मा व मन” बनलेले आहे. ‘आंबेडकर’ हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग  झालेला आहे.

डाक्टर बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांपैकी अनिहीलेशन  ऑफ कास्ट,  मुक्ति कोन पथे व कास्टस इन इंडिया हे त्यांचे गाजलेले प्रबंध होत. वरील तीनही प्रबंध म्हणजे वादविवादपटूता, तर्कसंगत युक्तिवाद, ज्ञान, पांडित्य व संभाव्य बौद्धिक हल्ल्याची आकलन शक्ती व त्याच ताकदीने दिलेले प्रतिउत्तर यांचा मिलाप असलेले अप्रतिम ग्रंथ आहेत. जागतिक दर्जाचे हे ग्रंथ बहुजन समाजातील बुद्धिवाद्यांनी अभ्यासले की नाही हे माहीत नाही परंतु जो अभ्यासेल तो पेटून उठल्याशिवाय राहणार हे मात्र निसंदिग्धपणे सांगता येते. हे तीनही प्रबंध क्रांती घडवू शकणा-या ज्वाला ठरू शकतात. याभितीपोटीच  भारताच्या कोणत्याही विद्यापीठाच्या समाजशास्त्र, तत्वज्ञान तसेच इतर शास्त्राच्या अभ्यासक्रमाला वरील प्रबंध लावलेले दिसत नाही. यावरून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही भारतीय विद्वानांना व बहुजन विद्यार्थ्यांना अस्पर्शच (untouchable) आहेत. यामुळेच बहुजन समाजातील कोणत्याही विचारवंत वा विद्वानाच्या साहित्यकृतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे खरेखुरे विश्लेषण व प्रतिपादन उमटलेले दिसत नाही. उलट बाबासाहेबांचे विचार तोडून मांडल्या जातात. संघपरिवाराचा गोतावळा हे विचार तोडण्यात फार पारंगत आहेत. मागील वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त संघाच्या पाचजन्य, विवेक व आर्गनायझर या पत्रांनी काढलेले विशेषांक त्याची साक्ष आहेत. हेच तोडून मांडलेले विचार बहुजन समाजात व ग्रंथप्रदर्शनात पोहोचत असतात. त्यामुळेच निसंकोचपणे बहुजन वाचकाच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात विरोधात्मक प्रतिमा तयार होवून विरोधी मत तयार होत असते.
अँटोनियो ग्रॅमसी या विचारवंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन जैविक बुद्धिवंत (Organic Intellectual) म्हणून केले आहे. असा जैविक बुद्धिवंत एखाद्या संपूर्ण समाजाचे हितसंबंध न्याय्य पद्धतीनं राष्ट्रासमोर मांडत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातल्या भारताचे सर्वश्रेष्ठ जैविक बुद्धिवंत होते. देशाच्या संरचनेत असलेले त्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. डॉ. आंबेडकर हे एक उच्चप्रतीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व मानवी अधिकाराचे प्रवक्ते होते. शास्त्रीय निकषांवर अधिक कल्याणकारी समाजरचना कशी निर्माण करता येईल? याचे जबाबदार प्रारूप मांडणारे सिद्धान्तक (Theorist) होते. डॉ. जॉन ड्युई यांचा त्यांच्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव होता. सामाजिक तत्त्वज्ञान मांडतांना डॉ. आंबेडकर हे "स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्वया त्रयीला नेहमी उच्चस्थानी ठेवीत. ते म्हणत "माझ्या तत्त्वांची मुळ हे धम्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत, आणि ती सारी तत्व तथागत बुद्ध यांच्या शिकवणुकीतून आली आहेत.  
"एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिलचे सदस्य असताना आंबेडकरांनी भारतीय  जलनितीचा (सिंचन व ऊर्जा धोरणाचा) पाया घातला. बाबासाहेब आंबेडकरांना कळून चुकले होते की, शेती व उद्योग या दोन्ही महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांच्या विकासासाठी सिंचन व ऊर्जा हे दोन महत्वाचे पायाभूत क्षेत्रं आहेत. डॉ. आंबेडकरांच्या सिंचन धोरणात मुख्यत: तीन बाबी दिसतात. 1) जलसंसाधन विकास करण्यासाठी नदीखोरं (पाणलोट) क्षेत्र हा आधार धरून सिंचन योजनांचं नियोजन करताना शेतीसिंचन, पिण्यासाठी पाणी, जलवाहतूक, वीजनिर्मिती व उद्योगांसाठी बहुउद्देशीय दृष्टिकोन (Multi-purpose). 2) जलप्रकल्प राबवण्यासाठी पाणलोट प्राधिकरण (River Valley Arthority) अशा प्रशासकीय व्यवस्थेची निर्मिती. 3) सिंचन व ऊर्जानिर्मितीसंबंधात राष्ट्रीय पातळीवर तांत्रिक महामंडळ निर्माण करणे. डॉ. आंबेडकरांच्या नियोजनामुळेच देशात महत्त्वाचे दामोदर, हिराकुड, सोने, कोसीह असे जलप्रकल्प उभे राहिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे सिंचन व ऊर्जाधोरणात उत्क्रांती झाली. ऊर्जावाटपासाठी ग्रिड पद्धतीचा विचार त्यांनीच मांडला होता. परंतु बाबासाहेबांच्या या धोरणाचा उहापोह कधीच शैक्षणिक अभ्यासक्रमात करण्यात आला नाही. धर्मशास्त्रीय जातीय कीड यास मुख्यत: जबाबदार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलंबिया विद्यापीठात भारतातील जातिव्यवस्था : त्यांची रचना, व्युत्पत्ती व विकासया विषयावर शोधनिबंध सादर केला होता. भारतीय जातिसंस्थेच्या व्युत्पत्तीच्या अनुषंगाने मांडणी करणाऱ्या प्रो. सिनर्ट, प्रो. नेसफिल्ड, सर एच. रिस्ले आणि डॉ. केतकर यांच्या सिद्धांताच्या मांडणीतील अपुरेपना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधातून भरून काढला. ज्या जातिसंस्थेमुळे अस्पृश्‍य समाजाला हीन अवस्था प्राप्त झाली, त्या जातिसंस्थेबद्दलची माहिती जगाला सांगण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. विविध धार्मिक ग्रंथ, पुराणांमधून जातींच्या निर्मितीबद्दल कपोलकल्पित कथा मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या त्याज्य आहेत हे त्यांनी जगाला निक्षून सांगितले. बाबासाहेबांच्या या मांडणीमुळे भारतीय जातिव्यवस्थेकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून गेलेला बघायला मिळतो. जातिनिर्मूलनया ग्रंथात धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह, व्यापक लोकशिक्षण आणि संसाधनांचे फेरवाटप या चतुःसूत्रीच्या बळावरच जातिप्रथेचे समूळ उच्चाटन करता येणे शक्‍य असल्याचा निष्कर्ष मांडून त्याखेरीज स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना अशक्‍य असल्याचे ते सांगतात. याच ग्रंथात जातीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्याचप्रमाणे जातिव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी असल्याचे ठाम प्रतिपादन करतात.
ब्राह्मणवाद व भांडवलशाही हे दुर्बल घटकांचे मुख्य शत्रू आहेत. राष्ट्राच्या हितासाठी जमिनीचं राष्ट्रीयीकरण, सामुदायिक वा सहकारी शेती यांचा बाबासाहेबांनी पुरस्कार केला होता. योजनेसाठी साधनसामग्री गोळा करण्यासाठी विमा उद्योगाचं राष्ट्रीयीकरणही त्यांनी सुचवलं. महार वतन व खोती या व्यवस्था रद्द करण्यासाठी त्यांनी कमालीचे प्रयत्न केले. कारण या दोन्ही पद्धतींत मागासवर्गाचे आर्थिक व सामाजिक असे दुहेरी शोषण होते अस त्यांचे ठाम मत होत. शेतीची प्रगती करण्यासाठी औद्योगिकीकरण करून शेतीवरच्या श्रमशक्तीचा भार कमी करणे आणि जमीन महसूल प्राप्तिकराच्या कक्षेत आणून सहकारीसामुदायिक शेती उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्‍यक आहे, अशी त्यांची धारणा होती. आज शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यास बाबासाहेबांनी सांगितलेला जमिनीच्या राष्ट्रीयकरणाचा पर्याय किती समर्पक होता याची जाणीव होते. म्हणूनच सिंचनटंचाई, वीजटंचाई, शेती-उत्पन्नकराचा प्रश्‍न, वाढता बेरोजगार, वाढती विषमता, भाववाढ, वाढती गरिबीवाढती तूट इत्यादी प्रश्‍न लक्षात घेता डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार काळजीपूर्वक परिशीलन करून त्यातल्या गोष्टी सरकारच्या धोरणात व कार्यक्रमांत समाविष्ट केल्यास ते लोकांच्या अधिक कल्याणाच होईल. शिक्षणाचं वाढतं खासगीकरण, खासगी आरोग्यव्यवस्थेचा महागडेपणा, सार्वजनिक स्वस्त वाहतुकीची दुर्दशा, असंघटित रोजगाराचं वाढतं प्रमाण, श्रमशक्तीची अमानुष पिळवणूक व स्त्रियांचे आणि इतर दुर्बल घटकांचे वाढते शोषण लक्षात घेता बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच आज देशाला तारू शकतात.
डॉ. आंबेडकरांचं लिखाण हे अर्थशास्त्रीय धोरणांवर व संस्थागतनिर्मितीवरही महत्त्वपूर्ण प्रकाश टाकून गेलेल आहे. 1926 मध्ये ब्रिटिश सरकारनं भारतीय चलन व राजस्व याचा अभ्यास करण्यासाठी हिस्टनयंग आयोग नेमला होता. त्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये डी.एस्‌सी पदवीसाठी 1925 मध्ये "दि प्रॉब्लेम ऑफ दि रुपी: इट्‌स ओरिजन अँड इट्‌स सोल्युशनहा ग्रंथ म्हणून प्रकाशित झाला होता. हिस्टनयंग आयोगानं आपल्या अहवालासाठी या ग्रंथाचा भरपूर वापर केला. ग्रंथातील आराखड्याप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना झाली व त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या संकल्पना, कार्यपद्धती, मार्गदर्शक सूत्रं व एकूण धोरण यांचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
बाबासाहेबांनी पिण्याच्या पाण्यासाठी व मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. मंदिर प्रवेशाचा संघर्ष हा हौस म्हणून किंवा मंदिरात जावून पूजापाठ करवून घेण्याचा कार्यक्रम नव्हता. तर इतराप्रमाने आम्हीही  माणसेच आहोत. त्यामुळे इतरांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत यासाठीचा तो संघर्ष होता. मंदिर प्रवेशाने आमचे काहीही भले होणार नाही त्यामुळे कोणीही स्वत:हून मंदिराचे द्वार खुले केले तरी मंदिर व पूजापाठ अशा थोतांड गोष्टीकडे लक्ष देवून आपला वेळ व पैसा वाया घालवू नका असा सज्जड इशारा  बाबासाहेब आपल्या अनुयायांना देतात. याउलट विवेकवाद व सद्सदविवेक बुद्धीचे रोपण प्रत्येकानी आपल्या मन व मस्तीषकात करण्याचा ते आग्रह धरतात. जे लोक तर्कच करीत नाहीत असे लोक धर्मशास्त्र व पुरोहितांचे बळी ठरत धार्मिक गुलामीच्या गर्तेतील सावज बनत असतात.  बाबासाहेब कुटुंबनियोजनाचे खंदे समर्थक होते. त्यांनी कुटुंब नियोजनावर तयार केलेले विधेयकनगरचे आमदार दादासाहेब रोहम त्यांच्या अनुपस्थित सादर केले होते. असे क्रांतिकारक विधेयक विधानसभे मध्ये आणणे साधे काम नव्हते. अशा विचाराची साधी कल्पनाही कधी गांधी, नेहरू वा मुंजे सारख्यांना शिवली नसावी.
भारताच्या फाळणी संदर्भात बाबासाहेबांचे विचार स्पष्ट होते. भारताची फाळणी करायची असल्यास लोकसंख्येची अदलाबदल करून भारतातील मुसलमानाना पाकिस्थानात तर पाकिस्थानातील मुस्लीम नसलेल्यांना भारतात आणण्याची सूचना त्यांनी केली होती. पण ही सूचना मान्य करण्यात आली नाही. त्याचे दुष्परिणाम आजही बघायला मिळतात. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बहुजन समाजात मुस्लीम विरोधी विचाराची पेरणी करून देश अशांत करू बघताहेत तर दुसरीकडे काश्मीर हा भारतासाठी डोकेदुखी ठरू लागला. मध्यवर्ती सरकारचे बजेट हे काश्मीरच्या जनतेसाठी खर्च न होता केवळ त्याच्या सुरक्षेसाठी खर्च होतेय. बाबासाहेबांच्या व्यापक दूरदृष्टीची जाणीव गांधी-नेहरूंना झाली असती तर भारत आज रणसंग्रामाचे मैदान बनले नसते. हिंदू कोड बिल, ओबीसीच्या विकासाचा मागासवर्गीय आयोग, भाषावार प्रांतरचना व छोटी राज्ये अशा अनेक संदर्भात बाबासाहेबांच्या भूमिकेकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीना विरोध करणे म्हणजे राष्ट्रीय चळवळीतून बाहेर फेकल्या जाणे हे एक समीकरणच झाले होते. त्यामुळे गांधीजीच्या विरोधात कोणीही ब्र काढण्याची हिंमत करीत नसत. कारण गांधीजीनी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय चळवळीतून बाद केल्याचा प्रसंग त्या काळातील नेत्यासमोर ताजाच होता. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे एक वेगळेच रसायन होते. गांधीना ‘मिस्टर गांधी’ म्हणणारे ते एकमेव असावेत. आपण आपल्या पूर्वजांचा परंपरागत धंदा चालवून आपला उदरनिर्वाह करावा असे वर्णाश्रम धर्म सांगत असतो, तो पाळला पाहिजे असी गांधीजीनी हरिजन या पत्रात टिप्पणी केली होती, त्यावर उत्तर म्हणून बाबासाहेब म्हणाले, गांधी हे बनिया जातीचे परंतु त्यांनी आपल्या पूर्वजांचा धर्म जो व्यापार कधी केलाच नाही. त्यामुळे गांधी हे स्वत:च वर्णाश्रम धर्माचे पालन करताना दिसत नाही मात्र दुस-यांनी तो करावा असा ते आग्रह करतात. याचा अर्थ भडवेगिरी करणा-याच्या वारसांनी भडवेगिरी व वेश्यांच्या मुलीनी वेश्याव्यवसायच करायला सांगणे असे नव्हे काय? असा गांधीला त्यांनी प्रतिप्रश्न केला. बाबासाहेब म्हणत, गांधी पूर्णत: गोंधळलेले आहेत. त्यांनी  राजकारणाचे पूर्णत: व्यापारीकरण केलेले आहे. ते जात व वर्णव्यस्थेस पाठिंबा देतात कारण जर त्यांनी या हिंदू व्यवस्थेस विरोध दर्शविला तर राजकारणातील आपले स्थान धोक्यात येईल याची भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे या गोंधळलेल्या गांधीना कोणीतरी सांगायला हवे की, ते स्वत:ची फसवणूक करीत तर आहेतच परंतु वर्णव्यस्थेच्या नावाखाली जाती व्यवस्थेचे समर्थन करून जनतेचीही फसवणूक करीत आहेत. जेव्हा गांधीजी विचार करतात तेव्हा ते आपल्या बुद्धीचा व्यवसाय करीत असतात कारण ते विचाराच्या विवंचनेत हिंदुच्या जातीव्यस्थेकरिता समर्थन शोधण्याचा मार्ग धुंडाळीत  असतात.
आयुष्याच्या उत्तरार्धात आंबेडकरांनी समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेल्या तत्त्वज्ञाचा अंतर्भाव असलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार केला. धर्मांतराचा हा निर्णय म्हणजे हिंदू नावाच्या मनोरुग्ण व व्याधीग्रस्त धर्मास फेकून टाकण्याचा क्रांतिकारी निर्णय होता. समाज व सांस्कृतीकीकरणाच्या संदर्भात बाबासाहेब अविवेकी भारतीयांना मनोरुग्ण समजतात आणि अशा मनोरुग्णाचा दुसऱ्या भारतीयांचे आरोग्य व त्यांच्या आनंदीमय जीवनासाठी धोका आहे असा इशारा देतात. बाबासाहेबांचा हा इशारा वर्तमान भारतात तंतोतंत खरा होताना दिसतोय. हिंदुत्वाच्या नावाखाली देशात ज्या संघीय संस्था धुमाकूळ घालीत आहेत, त्याची झळ सार्या भारतीयांना बसू लागली आहे हे बघता बाबासाहेबांची दूरदृष्टी किती भेदक व अचूक होती याची प्रचीती येते. 

लेखक: बापू राऊत 

1 comment: