Monday, June 5, 2017

संवादासाठी अधीर “काश्मीर”

वर्तमानपत्रात काश्मीर प्रश्नावर लिहताना पत्रकार वृत्तलेखक भड़क मथळ्याचे लेख लिहीत असतात. धगधगते काश्मीर, काश्मीरचा पेटता वणवा व हातून निसटता काश्मीर असे ते शीर्षक असलेले लेख असतात. असे लेख वाचूनच सामान्य माणसांचे माथे भडकायला सुरुवात होत असते. अशा लेखांच्या माध्यमातून काश्मिरी लोकासंदर्भात अन्य भारतीय समाजात विष पेरल्या जाते. याहूनही भयानक असते ते भारतीय वृत्त वाहिन्यांचे महा “आकडतांडव”. या वाहिन्यांचे वृत्त निवेदक काश्मीर संदर्भातील बातम्यांना अधिक रंजक बनवीत असतात. त्याच त्या ब्रेकिंग न्यूज, तेच ते रक्ताळलेले फोटो. न्यूज दाखविताना ज्या जोशात व आवेशात वृत्त निवेदक (ॲक़ंर) बातम्या सांगत असतो, ते ऐकून इतर भारतीयांचे रक्त न खवळले तर नवलच. वाहिन्यांचा हा प्रकार देशासाठी व काश्मीर साठी मात्र धोक्याचा आहे. वास्तविकता जमिनी हकीगत ही फार वेगळीच असते.


काश्मीर हे एक प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे. काश्मीरचे नयनरम्य दृश्य, तेथील सुंदर बगीचे, बर्फाची पहाडे, ज्या नदीपासून हिंदू शब्दाची उत्पत्ती झाली ती सिंदू (सिंधू) नदी, दुसरी प्रसिध्द झेलम नदी, अमरनाथ गुंफा व मोगल किल्ले हे बघण्यासाठी अन्य राज्यातील पर्यटक काश्मिर वारी करीत असतात. आजच्या स्थितीमध्ये पर्यटन हाच काश्मीरचा एकमेव मुख्य उद्योग आहे. एक पर्यटक म्हणून काश्मीरला जाण्याची अगतिकता होती. परंतु जानेवारी ते एप्रिल या कालावधी मध्ये वृत्तपत्रे व न्यूज वाहिन्यानी काश्मिरात होत असलेली दगडफेक व बुरहान वानीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या बातम्यांनी भारतीय पर्यटकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले गेले होते. या भीतीमुळे बऱ्याच पर्यटकांनी काश्मीरवारीतून मागता पाय घेतला. आम्ही सुध्दा पर्यटन आयोजकाकडे काश्मीर परिस्थितीबाबत वारंवार विचारणा करीत होतो. ते मात्र आम्हाला आश्वासन देत होते, मिडिया व वृत्तपत्रामध्ये जे काही सांगण्यात येत आहे, तसे तिकडे काहीही नाही. टीव्हीवरील बातम्यावर विश्वास ठेवू नका वगैरे वगैरे. “मे” महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही श्रीनगरला पोहोचलो. मनात धास्ती व तणाव होताच.
टूर ऑपरेटरनी गाईड सोबत दिला होता. बोचऱ्या व कुडकुडत्या थंडीमध्ये हॉटेलकडे जाताना मंत्रालयाची मोठी इमारत व मंत्री / आमदारांचे निवासस्थान दाखवीत गाईड म्हणाला, भाई साहब, वो, देखो काश्मीर का सबसे बडा लुटेरा हाऊस. आणि मंत्र्याच्या बंगल्याकडे बोट दाखवीत म्हणाला, यहा सब लुटेरे और हरामी लोग रहते है. मी मनातच म्हणालो, हा तर संपूर्ण भारताचाच मोठा भयानक प्रश्न आहे. जे लुटारू दिल्लीच्या संसदे मध्ये व इतर राज्याच्या राजाधान्यामध्ये आहेत तेच लुटारू कमी अधिक प्रमाणात काश्मीरच्या विधानभवनामध्ये असतील. गाईडच्या या माहितीमध्ये मला काही नवल, रस वा नवे असे काही वाटले नाही.

परंतु मला भारतीय वृत्तपत्रे व न्यूज चँनेल्स मध्ये दाखविला जात असलेला अशांत व धगधगता काश्मीर बघण्याची खूप आतुरता होती. त्यामुळे माझी नजर मुख्यत: चौक, गर्दीची ठिकाणे व रस्त्याच्या आजूबाजूचे वातावरण यावर केंद्रित होती. श्रीनगर चा पहिला दिवस मात्र शांतच वाटला. हॉटेल मालक, मॅनेजर व कर्मचारी सर्व मुस्लीम होते परंतु सारे आदरतिथ्य करणारेच वाटले. भारत व भारतीयाबद्दलचा द्वेष मात्र यतकिंचीतही दिसला नाही. दुसऱ्या दिवशी श्रीनगर वरुन पहलगामला जायचे होते. रस्त्यामध्ये क्रिकेट बॅट ची अनेक दुकाने होती.  भारतामध्ये मुख्यत: येथूनच बॅट पुरविल्या जातात. बॅट दुकान मालक शकील अहमद म्हणाला, भाई साहब काश्मीर कैसा लग रहा? मी म्हटले बहुत सुंदर. यावर तो म्हणाला, हम काश्मिरी लोग बहुत शांत और मेहनती है. हम काश्मीर का विकास चाहते है. लेकिन कुछ लोग कश्मीर को हमेशा के लिये अशांत रखना चाहते है. मी सहज विचारले, वे कौन लोग है जो काश्मीर को अशांत रखना चाहते है ? या माझ्या प्रतिप्रश्नावर त्यांनी “भारतीय आर्मी” कडे बोट दाखविले. काश्मीर के नाम पर आर्मी के बडे बडे अफसर कश्मीरपर राज कर रहे है. वे करोडपती, कंत्राटदार और बिचौले बने बैठे है. सरकार की तरफसे उन्हे सुविधाए और विशेष अधिकार दिये है. वे नही चाहते की, कश्मीर उनके कब्जे से बाहर निकले. इसीलिये वे स्वयं षडयंत्र रचकर कश्मीर और कश्मीरीयोंको बदनाम करते रहते है. शकील अहमदचा हा प्रश्न भारतीयासाठी मात्र चिंतनाचा नक्कीच असून त्यावर मंथन होणे गरजेचे आहे.
काश्मिरी युवक आता अधिक अग्रेसिव्ह होत आहेत. हा शकील अहमदचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. त्यावर शकील अहमद म्हणतो, अब कश्मीर का नौजवान पढा लिखा है, वह डाक्टर, इंजिनियर बना है. वे उच्चशिक्षित है, लेकिन वह बेरोजगार है. नौकरी न मिलने के कारण वह आंदोलक बन जाता है, वे टो चलाते या मजदूरी करते है. काश्मीर मे बडे बडे उद्योग न आने के लिये भारत सरकार को जीम्मेवार मानता है. शकील अहमद कहता है, कलतक का कश्मीरी आंदोलन अल्पशिक्षित लोग चलाते थे. लेकिन अब इस आंदोलन की कमान उच्च शिक्षित बेरोजगार युवाओंके हाथ मे जा रही है. काश्मीर के हालात के लिए वे भारत सरकार को जीम्मेवार मानते है. अगर यही स्थिती निरंतर कायम रहती है, ऐसे मे काश्मीर भारत के हात से छूट जाने का इशारा भी करता है.

कश्मीरच्या दल लेक मध्ये लतीफ भाई सोबत भेट झाली. तो तिथे शिकारा चालवितो. त्याला मी विचारले, भाई साहब आप भारत मे रहना पसंद करते है या पाकिस्तान मे? यावर तो म्हणाला, भाई साहब हम ना भारत मे रहना चाहते है, न पाकिस्तान मे. हम आझाद कश्मीर मे रहना पसंद करते है. हमारा पाकिस्तान से कोई रिश्ता नाही. पाकिस्तानी कश्मीरी आज बहोत मुश्कील मे फसे है, हम क्यो पाकिस्तान मे जाये? कोई भी कश्मीरी पाकिस्तान मे जाना नही चाहता. काश्मीरच्या लोकांचा पाकिस्तान मध्ये विलय करण्यास सक्त विरोध आहे. काश्मीर मध्ये रोजगार आणि उद्योग नसल्याचा तोही आरोप करतो.
लेह आणि कारगीलकडे घेवून जाणाऱ्या मार्गावर सोनमर्ग पडतो. येथे डोंगराळ बर्फाच्या छावणीत गेल्यास तेथील तरुण पर्यटकाकडे ग्राहकाच्या नजरेतून बघत असतात. ते धावत पळत पर्यटकाकडे येवून बर्फाच्छादित भागाकडे घेवून जाण्याचा भाव करीत असतात. कारण त्यांच्यासाठी हा केवळ सहा महिन्याचा धंदा असतो. उरलेल्या सहा महिन्यात तिथे बर्फाच्या वर्षावाशिवाय काहीही नसते. रस्ते व घरावर पूर्णपणे बर्फाचे साम्राज्य असते. त्यांचा एक प्रश्न होता, साहब पर्यटको मे कमी क्यू आई है ? त्यांना काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसेबाबत बोलल्यास, ते म्हणतात, साहब यहा, कहा हिंसा है? आप जैसे लोग यहा आनेसे ही हमे रोजगार मिलता है. कश्मीरी युवकांची ही एक अगतिकता आहे. रोजगार नसेल तर जीवन जगायचे कसे? हा एक मोठा प्रश्न त्यांच्याकडे असतोच. परंतु काश्मिरी लोक संभाषणात पाकिस्तानचे नाव घेण्यास कचरत होते.

प्रश्न अनेक असतात. ते कधी क्लिष्ट तर कधी साधे व सोपे असतात. परंतु प्रत्येक प्रश्नांची उत्तरे असतातच. काश्मीरचा प्रश्न क्लिष्ट असला तरी तो एकदाचा सुटावा ही प्रत्येक भारतीयांची इच्छा आहेच. एकेमेकासोबत संवाद साधून प्रश्न निकाली काढता येणे का शक्य नाही? खरे तर या संवादासाठी काश्मिरी जनता बधीर झाली आहे. हे सामान्य नागरिकांच्या संवादातून सहज जाणवते. भारतीय लष्करावरील त्यांचा राग मात्र कायम जाणवत दिसतो. विद्यार्थ्या पासून ते मेंढपाळ्या पर्यंत हा राग कायम दिसतो. त्याची काही कारणे असतीलच. या कारणांचा शोध घेणे फार गरजेचे आहे.

भारतातील अनेक समस्या व त्या चिघळण्याच्या पाठीमागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व काही राजकीय पक्षाची अतिरेकी विचारधारा जबाबदार आहे. भारतातील काही संघटनासाठी ३७० वे कलम, मुस्लीम लोकसंख्या वाढ, तलाक पध्दत, मंदिर-मस्जिद प्रश्न व लाउड स्पीकर वरील आवाज हे अशा संघटनांची वाढ व विस्तारासाठी फायदेमंद मुद्दे झाले आहेत. त्यामुळे हे प्रश्न मुळात सुटूच नयेत असे त्यांना वाटत असते. परंतु त्यावर चर्चा व संघर्ष मात्र नेहमी होत राहावा अशी त्यांची व्युव्हनिती आहे. संवादासाठी जिथे जागा नसते तिथे अतिरेक अधिक माजत असतो. आणि भारतासारख्या बहुआयामी व बहुसांस्कृतिक देशासाठी ते घातक ठरण्याआधीच संवादातून मार्ग काढणे कधीही चांगलेच.

बापू राऊत
Phone: ९२२४३४३४६४

E-mail: bapumraut@gmail.com

2 comments:

  1. सध्याच्या सरकारच्या काळआत कश्मीर तीढा वाढतच जाईल.हया सरकारला संवाद नकोच!

    ReplyDelete
  2. सध्याच्या सरकारच्या काळआत कश्मीर तीढा वाढतच जाईल.हया सरकारला संवाद नकोच!

    ReplyDelete