Wednesday, August 9, 2017

विठ्ठल रामजी शिंदे यांचे बौध्दानुयायन

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील सुधारक चळवळीतील अग्रगण्य नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग हा मवाळ व्हाया जहाल असा होता. सामाजिक सुधारणांच्या संदर्भात बाळ गंगाधर टिळकासी वैचारिक खटके उडाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झाला होता. धार्मिक व सामाजिक विषमतेतील विसंगती त्यांना डिवचू लागली होती. धर्म ही त्यांच्या जीवनातील मुलभूत प्रेरणा होती. परंतु त्यांच्या कल्पनेतील धर्म हा पोकळ व भाटूगिरी तत्वाचा नव्हता. त्यानी धर्माची सरळसुध व्याख्या केली होती. धर्म म्हणजे सबलानी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये व ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणे हाच धर्म होय असे ते सांगत असत.


महर्षी शिंदे हे जन्माने मराठा होते. बहुजन समाजातील एक अग्रमान्य व्यक्ती असा त्यांचा एक लौकिक होता. महर्षी शिंदे हे प्रचलित रीवाजाने हिंदू धर्मीय असले तरी त्यांना बौद्ध धर्माचे विशेष आकर्षण होते. १९१० साली पुणे येथे त्यांचे बौध्द धर्मावर व्याख्यान झाले होते. भारतात बौध्द धर्माचा जीर्णोद्धार व्हावा असे त्यांना वाटत होते. त्याचे एक वेगळे कारण होते. शिंदेना बौध्द धर्म व त्याचे विचार हे इतर धर्मापेक्षा अधिक मानवतावादी असल्याचे वाटू लागले होते. या धर्मात विधी, वैफल्य व गंडदोऱ्याना स्थान नसून तो निर्जीव आचारापासून मुक्त असल्याचा त्यांचा दावा होता. याच धर्माच्या उदार तत्वाच्या आधारे मनुष्य आपली उन्नती करू शकतो या निष्कर्षाप्रत ते आले होते. बौध्द धर्म व तो धर्म मानणाऱ्याची वास्तविक जीवनपध्दती कशी असते? त्या धर्माचे रहस्य काय आहे? विहाराचा एकांतवास कसा असतो? हे जाणण्यासाठी ते १९२७ ला ब्रम्हदेशात गेले होते. तेथील एका बुद्ध विहारात उ कोडन्ना ह्या भिक्षूकाची भेट झाली. या भिक्षुकाच्या शांत व गंभीरपणाचा महर्षी शिंदे यांचेवर फार परिणाम झाला. विहाराच्या वस्तुनिष्ठ आध्यात्मिक विचारानी त्यांचे मन भारावून गेले होते. याचा त्यांचा मनावर एवढा परिणाम झाला की आपण बौध्द धम्माची इथेच उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असे त्यांना वारंवार वाटू लागले होते. बौध्द धर्मात असलेली विशुध्द मानवी समतेची प्रेरणा त्यांना सारखी खुणावत होती.

महर्षी शिंदे हे राजा राममोहन राय स्थापित ब्राम्हो समाजाचे सक्रीय सदस्य होते. त्यांनी कलकत्ता येथे ब्राम्हो समाजाच्या उत्सवात “मी बौध्द आहे” असे जाहीर करून टाकले होते. तथागत बुद्धाचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे वैशाखी पोर्णिमा. हा दिवस त्यांच्यासाठी बुद्धानुवासी होता. ते ब्राम्हो समाजाचा वार्षिकोत्सव वैशाखी पौर्णिमेलाच साजरा करीत असत.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत तुरुंगवास झाला असताना तुरुंगात कोणत्या तत्वाचा अभ्यास करावा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता? शेवटी तथागत बुद्धाच्या शिकवणुकीचा संचय असलेला ग्रंथ “धम्मपद” सोबत नेला होता. प्रवासातही ते या ग्रंथाला सोबत नेत असत. जातीपातीच्या भिंती पाडण्यासाठी  व मानवी समतेचा प्रवाह अखंडपणे खळाळून वाहत ठेवण्यासाठी बौध्द धर्माचा स्वीकार केला पाहिजे असे ते सांगत असत.

महर्षी शिंदे यांचा पिंड हा संशोधकाचा होता. त्यांच्या संशोधनाने प्रस्थापित स्थितीवर आघात करायला सुरुवात झाली होती. आर्यपूर्व संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती व तिचा प्रभाव आर्यसंस्कृतीवर पडला हे त्यांच्या संशोधनाचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अवैदिक संस्कृती महत्वाची असून भारतीय जीवन याच अवैदिक संस्कृतीमुळे समृध्द झाले असी त्यांची धारणा होती.

अवतारवाद त्यांना मान्य नव्हता. ही संकल्पनाच रोगट असून व्यक्तीचे कर्तुत्व व त्याच्या इच्छाशक्तीला मारक ठरणारी आहे असी त्यांची भूमिका होती. लाखो व्यक्तींना पंगु बनविणारे अवतारवादाचे तत्वज्ञान हे तकलादू  व तत्वशुन्य आहे असे म्हणत असत. सर्वांची, सर्व बाजूनी व तीही स्वत:च्या प्रयत्नांनी उन्नती व्हावी असे त्यांना वाटत असे. तथागत बुद्धाच्या “अत्त दीप भव्” या तत्वाचा महर्षी शिंदे यांचेवर झालेल्या परिणामाचा तो परिपाक होता. बौध्द धर्म हा भारतीय लोकांच्या पुर्वेतिहासातील महत्वाचा घटक आहे असून तो आमचा अनमोल वारसा असून साऱ्या भारतीयांनी अभिमानाने त्याचा स्वीकार करावयास पाहिजे असे ते सांगत असत.

महर्षी शिंदे यांनी बौध्द धर्माची काही लक्षणे सांगितली होती. त्यापैकी पहिले लक्षण म्हणजे त्याची सयुक्तिकता. बुध्दाच्या ज्ञानवादाने अंधकल्पना, पोकळ तर्क, रुढी व हीन दर्जाचे व्यापार याबाबत लोकामध्ये सजगता निर्माण झाली. तथागताच्या सिद्धांतात चमत्कार, गुढ तत्वे व गुप्तज्ञान  यांना मुळीच थारा नाही असा ते दावा करीत. महर्षी शिंद्याच्या मतानुसार बुद्ध हे नास्तिक नव्हते तर ते व्यव्हारवादी होते. तथागत बुद्धद हे निरर्थक व दुराग्रही बाबी पासून सावध राहण्याचा संदेश देत. परंतु शंकराचार्यासकट  इतर ब्राम्हणांनी त्यांना नास्तिक ठरविल्याचा ठपका ते ठेवतात.

बुद्ध धर्माचे दुसरे लक्षण म्हणजे त्याचे धर्माचरण हे पूर्णपणे प्रागतिक असून त्याचे विचार व आचार हे सहिष्णुतापर व सहानुभूतीपर असणे होय. आजच्या काळात खोटे सुधारक जागोजागी आढळतात. हे सुधारक केवळ बोलघेवडे असून जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा ते मैदानातून पळ काढीत असतात. कधी कधी तर मुलतत्ववाद्यांना सपशेल शरण जात असतात. अशा वेळेस त्यांच्या विवेक, तर्क व बुद्धीनिष्ठता कुठे पळून जाते याचा थांगपत्ता ही लागत नाही. बौध्द धर्मातील आचार अशा कोटीतला मुळीच नव्हता असे महर्षी ठामपणे सांगतात.

महर्षी शिंदे म्हणतात, सिद्धार्थ गौतमानेच काय, त्याच्या कोणत्याही अनुयायाने सुधारणा घडवून आणण्याच्या कार्यात स्वत:च्या सहिष्णुतेचा बळी दिल्याचे उदाहरण कुठेच आढळत नाही. बुध्दाचा युक्तिवाद इतका विकसित झाला होता की, जे त्यांच्या समोर परधार्मिय चर्चेचे आवाहन देवून वादविवाद करीत असत त्या साऱ्यांनाच शेवटी बुध्दाचे अनुयायित्व स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसे. तथागताचे विचार, विनय व प्रसन्नता पाहून उघडपणे बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करण्यास कोणीही कचरले नाही.  कधी कधी तर तथागताने अशा उतावीळपणे आपला मूळ धर्म न सोडण्याचा सुध्दा सल्ला दिलेला आढळतो. लालूच दाखवून किंवा जबरी करून केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याची प्रवृत्ती बौध्द धर्मात कधीच नव्हती. धर्म प्रसारासाठी बुद्धाने आपले राज्य, पत्नी व मुलगा यावर पाणी सोडले. तसाच स्वार्थत्याग करणारे अनेक भिक्षुक त्यांना मिळाले होते. बुध्दाचा हा धर्म इतर अनेक धर्मापेक्षा अनेकपटीने आकर्षक वाटतो असे ते म्हणत. एक प्रकारे महर्षीं शिंदेनी बौध्द धर्माचे प्रवक्तेपद स्वीकारले होते की काय असे वाटू लागते.

बौध्द धर्माचे तिसरे लक्षण सांगताना महर्षी म्हणतात, हा धर्म निश्चीतवादी, व्यव्हारवादी आणि प्रासंगिक आहे. बौध्द धर्मातील विरक्ती व निर्वाण विषयक अत्युच्च आध्यात्मिक आदर्श सर्वश्रुतच आहे. भूतदया हा बुद्धाच्या शिक्षेचा एक विशिष्ट गुण होय. आजच्या संपूर्ण भारत खंडात जो निर्मासाहार (शाकाहारीपणा) प्रचलित झाला आहे त्याचे सर्व श्रेय बौध्द धर्माकडेच जाते. बुद्धाच्या अहिंसेला व प्राणीमात्रावर दया करण्याच्या संदेशाला लोकांनी स्वीकारले होते. बुद्धांनी हवने व क्रूर विधी बंद करविल्या. महर्षी शिंदे  म्हणतात, बौध्द धर्मात हिंदूचा सोवळेपणा व जैनांचा वेडगळपणा या दोन्ही गोष्टीचा पूर्णपणे अभाव आहे. बौध्द भिक्षुक म्हणजे बैराग्यासारखे तुष्ट व गावाबाहेरच्या धर्मशाळात लोळत पडणारे सन्यासी नव्हते. आज भारतभर निर्जन गीरीकंदात ज्या बौध्द गुंफा आणि लेणी दिसतात, त्या लोकवस्तीच्या अशुध्द वातावरणापासून अलिप्त असल्या तरी त्या जनसमूहाच्या शिक्षणार्थ व कल्याणार्थाची केंद्रे होती. या केंद्रात भिक्षुक अविश्रांत मार्गदर्शकाची भूमिका वठवीत असत. महर्षींच्या मतानुसार, पूर्वीच्या काळात आतासारखी वाहतुकीची साधने अस्तित्वात नव्हती तरी बौध्द धर्माचा दूरवर प्रसार झाला होता. संपूर्ण भारत खंड हा बौद्धधर्मीय तर होताच, विशेषत: बँक्ट्रीया, पर्शिया व आशिया या भागातही तो विस्तारलेला होता.

नंतरच्या काळात जन्मभूमी असलेल्या भारतात बौध्द धर्माला उतरती कळा लागली. त्याची अनेक कारणे आहेत. काही कारणांचा उहापोह करताना महर्षी म्हणतात, या धर्मात असलेली सहिष्णुता व सौम्यता हे उतरत्या कळीचे कारण असेलही परंतु बौध्द राज्याच्या काळात बौद्ध राजांनी जसा बौध्द धर्माला राजाश्रय दिला तसेच त्यांनी वैदिकानाही दूर सरले नव्हते. परंतु पुढे याच वैदिकांच्या म्हणजे कुमारील भट्ट व शंकराचार्याच्या चिथावणीने बौध्दाचा राजाश्रय नाहीसा होवून त्यांचा छळ व जुलूम सुरु झाला. शेवटी या सात्विक व सौम्य धर्माने आपल्याच मायभूमीला गमावल्याची खंत महर्षी शिंदे व्यक्त करतात.
अशा या सात्विक धर्माचा जीर्णोद्धार परत आपल्या मायभूमीत व्हावा असे महर्षी शिंदेना वाटत होते. या धर्माचा जीर्नोदार त्याच सहिष्णुता व सौम्यतेच्या विचारांनी होईल अशी शक्यता ते व्यक्त करतात. या धर्माचा सात्विक व सौम्यपणा जसजसा लोकासमोर येईल तसतसे लोक या आपल्या पुरीच्या मातृधर्माकडे आकर्षित होतील असा महर्षी शिंदेना विश्वास वाटतो. या संदर्भात ते मद्रास येथील प्रोफेसर नरसू व धर्मानंद कौसंबी या दोघावर विश्वास ठेवून बौध्द धर्माला परत त्यांच्या पुर्वांजाकडे (बहुजन समाजाकडे) घेवून जातील असा आशावाद व्यक्त करतात. परंतु महर्षी शिंदे हे जरी बौध्द धर्माच्या प्रवक्त्या सारखे वागत असले तरी त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. त्यामुळे ते तकलादू प्रवक्ते वाटतात. १९१० साली मी बौध्द धर्मीय आहे असे सांगणाऱ्या महर्षी शिंदेनी बौध्द धर्माच्या प्रसार व प्रचाराकडे लक्ष देवून देशात सामुहिक बौध्द धर्मांतरे घडवून आणली असती तर भारतात त्यांच्याच काळात धर्मक्रांती होवून ते धर्मदूत ठरले असते. परंतु अशी क्रांती आपण नाही तर दुसऱ्यांनी कोणीतरी करावी या पठडीतील भूमिका त्यांनी वठविली. हे काम प्रोफेसर नरसू व धर्मानंद कोसंबी यांनी करावे असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. एरवी सामाजिक तत्वज्ञान व व्यवहार यात निपुण असलेल्या महर्षी शिंदे यांना ब्राम्हो समाज की बौध्द धर्म यापैकी एकाची निवड करता आली नाही. त्यामुळेच भारतातील सामाजिक संरचनेमुळे महर्षी शिंदे सारख्या अनेकांना ना धड साक्रेटीस  होता आले ना धड क्रांतीकारक. उलट त्यांना स्वत:च्या वैचारिक द्वंदतेचे बळी ठरत आजच्या राजकारण्यासारखे समोरील वेगवेगळे समूह बघून भाषणाचा रोख बदलणारे धुरंधर “राजकारणी व समाजधुरीण” असेच म्हणे लागेल.


बापू राऊत

९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment