Monday, March 18, 2019

मान्यवर कांशीराम व निवडणूकातील संधिपर्व


भारतीय लोकशाहीचा मोठा उत्सव हा एप्रिल ते मे महिन्यात संपन्न होणार आहे. हा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच भारतीय निवडणुका होत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका ह्या ऐतिहासिक असतील. ऐतिहासिक अशासाठी की, जर मनुवादाचे समर्थक  (भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) या निवडणुका मध्ये यशस्वी होत सत्तेवर परत आल्यास भारताची लोकशाही, तिचे नैतिक मुल्ये, सामाजिक संरचना आणि तिच्या विविधतेचा चेहरा बदलण्याची दारुण शक्यता. दूसरा, ज्यांचेवर भारतीय लोकशाही वाचविण्याची जबाबदारी ज्या संस्था, पक्ष आणि व्यक्तींची होती त्यांचा आपसातील टकराव, मतभेद, दंडेलशाही आणि स्वार्थ यामुळे तिचा होणारा पराभव. कोणीतरी म्हटलेच होते, जर भारतीय संसदेची सूत्रे ही परत भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेली तर भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली “संसदीय निवडणुक” निकाली निघेल आणि देशात अराजकता दडपशाहीचे नवे पर्व सुरु होवून गुलामगिरीची नवी पध्दत विकसित होईल. आजच्या अशा अवस्थेमध्ये मान्यवर कांशीराम असते तर निवडणुका व गठबंधना संदर्भात त्यांची भूमिका कशी असती? हे त्यांच्या विचारांचे स्मरण करून समोर ठेवण्याचा एक प्रयत्न आहे.


बाबासाहेबांच्या संघर्षाची आठवण करीत मान्यवर कांशीरामजी म्हणाले होते, संघर्ष कोणताही असो त्यासाठी अगोदर स्वत:जवळचे काहीतरी गमवावे लागते परंतु या संघर्षाची फळे पुढच्या पिढीच्या विकासाची दारे खुली करीत असतात. आणि तेव्हाच वंचिताना त्यांचे अधिकार, स्वाभिमान, सन्मान आणि विकास प्राप्त होत असतो. त्यांनी वंचित घटकांना सावधान करीत म्हटले होते, तुम्ही तुमच्यातील शक्तीला ओळखले पाहिजे, कुणाच्याही हातचे खेळणे बनता कामा नये. आज भारतात बहुजन समाज बहुसंख्येने असतांनाही त्याचे जीवन हे अल्पसंख्यांकासारखेच आहे. तुमच्याच मताच्या आधारावर मनुवादी निवडणुका जिंकताहेत, आता त्याच तुमच्या मताच्या आधाराने मनुवादी शक्तींना निवडनुकामध्ये हरवावे लागेल.

आज आपण बघतोय बहुजन समाजाचे अनेक पक्ष उदयास आले. हे पक्ष प्रत्येक मतदार संघात आपले उमेदवार उभे करताहेत. वास्तविकता या सार्‍यांचा मतदार हा एकच आहे. ह्या मतांचे विविध पक्षात व गटात  विभाजन होवून प्रत्येकांच्या अनामती जप्त होतात. यावर कांशीराम साहेबांनी म्हटले होते, जोपर्यंत वंचित बहुजन समाजाचे नेते एक होत नाहीत तोपर्यंत त्यांना यशाची प्राप्ती होणार नाही. लोकांना आवाहन करीत ते म्हणाले, तुम्हाला मजबूत नेता घडवायचा असेल तर त्याअगोदर आपले मत न विकणार्‍या तत्ववादी समाजाची निर्मिती करावी लागेल. निवडणूकामध्ये छोट्या साधनाचा वापर करून इतरावर मात करावी लागेल. बाबासाहेब म्हणाले होते, राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही शिवाय यशस्वी होवू शकत नाही. परंतु खरा प्रश्न आहे की, आम्ही खरेच सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू शकलो? याचे उत्तर हे नकारार्थीच आहे. या सामाजिक लोकशाहीच्या अभावामुळेच आम्ही जातीच्या आधारावर एकमेकासी लढतो आहोत. हे सारे होण्याला कोण जबाबदार आहे आणि भावी नीती काय असली पाहिजे? यावर चिंतन होणे आवश्यक आहे. बहुजनांना आपला विकास साधायचा सेल तर त्यांनीच प्रथम चिंतनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

आज बहुजन समाज ६००० जातीमध्ये आपल्या जाती अस्मितेमुळे विभागला आहे. यावर कांशीराम म्हणतात. जर या विभाजित बहुजन समाजाने आपसात बंधुभाव (भाईचारा) निर्माण करून संगठन बनविले तर वर्चस्ववादी पार्टीया आपोआपच नष्ट होतील. जाती व्यवस्थेला बळी पडलेल्या सर्व जातींना जोडल्यास राजकीय सत्ता हातात घेवून शासक बनता येवू शकते. यालाच बाबासाहेबांनी मास्टर की म्हटले होते. वंचित समाज शासक बनुनच नवी समाजनिर्मिती करू शकतो. त्यासाठी बहुजन समाजाने आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहून शक्ति निर्माण केली पाहिजे. आजचा समृध्द आणि शिक्षित मध्यमवर्ग आपल्या सामाजिक पुर्वस्थितीला विसरला असून तो केवळ स्वत:च्या प्रगतिच्या चिंतेमध्ये असतो. तर दुसरीकडे झोपडी मध्ये राहणारा गरीब समाज निवडणुकीमध्ये पैसे व दारूच्या बदल्यात आपले किमती वोट विकत असतो. या लुटीला रोकने फार गरजेचे आहे. यासाठी शिक्षितानी समोर येत नवनिर्मानाच्या प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे. या वर्गाला उत्साहित करण्यासाठीच मान्यवरानी “वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा” चा नारा दिला होता. देणारा वर्ग कोणता असू शकतो? केवळ शासक वर्गच काही देवू शकतो. त्यासाठीच शासक बनले पाहिजे. केवळ तोच एक उपाय आहे.  

आजच्या निवडणूक आखाड्यात मा.कांशीराम यांची भूमिका कशी असती? याचा मागोवा घेता येतो. कांशीराम साहेबांनी सुरुवातीच्या काळात पक्षाच्या विस्तारासाठी एकला चलोची भूमिका घेतली होती. नंतरच्या काळात अकाली दल व काही आदिवासी पक्षासकट निवडणुक समिकरणासोबतच उत्तरप्रदेश मध्ये सपा-भाजपा-कांग्रेस या पक्षासोबत सत्तागठबंधने स्थापित केली होती. त्यांनी या पक्षाना नागनाथ व सापनाथ असी सज्ञा दिल्यानंतरही हे घडत होते. मात्र त्याचे उत्तरही त्यांनी स्वत:च दिले होते. ते म्हणतात, मी भारतातील सर्वात मोठा संधीसाधू नेता आहे. मी केवळ बहुजन-वंचित समाजाचा फायदा बघून केवळ आमच्या अटीवर सत्तेमध्ये भागीदारीसाठी आणि आपल्या पक्षाचा विस्तार होण्यासाठी गठबंधन करीत असतो. त्यांनी कल्याणसिंग यांचे उत्तर प्रदेशातील व अटलबिहारी यांचे केंद्रातील भाजप सरकार पाडून ते सिध्द केले होते. भारतात राजकीय अस्थिरता कायम राहून बहुजन समाज लवकरच सत्तेत हिस्सेदार बनावे अशी त्यांची इच्छा होती. मा.कांशीराम हे मोठे कुटनितिज्ञ होते. आजच्या संदर्भात बघितले तर त्यांनी धोकादायक असलेला संघ व त्यांच्या भाजपाला नेस्तनाबूत करण्यासाठी व बहुजन वंचित घटकांच्या सत्तेतील सहभागासाठी राष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाखाली महागठबंधन बनविले असते. परंतु कांशीरामजी यांना आपला नायक मानणारे पक्ष व संगठना  त्यांच्या विचारांना विसरलेले दिसतात. त्यांचा विचार व उद्देश हा एक असला तरी त्यांच्यात अधिक फाटफुट दिसते. मा.कांशीराम यांची “कूटनीति आणि संधीसाधूपणा भाजपा आणि संघाने स्वीकारला म्हणून ते आज सत्तेच्या शिखरावर आहेत. मा.कांशीरामजी जीवनाच्या अंतापर्यंत पायात भिंगरी घालून देशात फिरत होते.  मात्र त्याउलट कांशीरामजीच्या शिष्यांनी त्यांच्या “निष्काम कर्माला” तिलांजली देत केवळ ऐश्र्वामध्ये राहून दिल्ली आणि लखनौ येथे राजदरबार भरवून आदेशाचे फर्मान सोडण्याव्यतिरिक्त काही करीत असल्याचे ऐकिवात नाही.
आज नेमके काय हवे? आमदार व खासदार बनणे की वंचित बहुजणांची चळवळ चालविणे? हे सत्य आहे  की, वंचित बहुजनांच्या हितासाठी संसद व विधानसभा ही मोक्याची केंद्रे आहेत. परंतु वंचित बहुजनातील आरक्षित कोट्यातून तथाकथित पक्ष कोणत्या व्यक्तींना निवडणुकिंची तिकीट देतात? काय त्या व्यक्ति संसदेमध्ये समाजाचे प्रश्न मांडतात? याचे उत्तर केवळ नकारार्थी आहे. ते केवळ मुके व बहीर्‍यांची भूमिका वठवीत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पक्ष एक नेता असा सल्ला दिला होता. परंतु दुर्भाग्यवश या वंचिताचे अनेक पक्ष आहेत. वंचित-बहुजनांचे नेते कांग्रेस किंवा भाजपा सारख्या पक्षांच्या नेत्यासमोर लोटांगण घालून त्यांच्या थैल्या उचलण्याचे काम करतात परंतु  आपल्याच घटकाच्या नेत्यांच्या छत्रछायेत राहणे त्यांना सहन होत नाही.

आजच्या भारतावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने  हिंदुत्ववाद आणि कट्टर धर्मांधतेची चादर चढविलेली आहे.  अल्पसख्यांक समुदायांचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बहुसंख्यांक बहुजनांना धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली भ्रमित करीत आहे. अशा असहिष्णुतेच्या वातावरणात भारताच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. परंतु ”संविधान धोक्यात आहे” असा नारा देणारे नेते ज्यांच्यापासून संविधानाला धोका आहे त्यांना हरविण्यासाठी एकत्र येत नाही. हे एक दुर्दैव्यच आहे. सत्तेच्या संकुलात जाण्याची संधी केवळ निवडणुकांच्या माध्यमातून निर्माण होत असते परंतु अशा संधीला सुध्दा ते ठोकर मारीत आहेत.

आज लोक साम्यवादनक्षलवाद, मार्क्सवाद आणि समाजवाद अशा वादात फसलेले दिसतात. परंतु या सर्वांचा बाप असलेला मनुवाद या सर्व वादाना उडवून लावतो. कांशीरामजी म्हणतात, ज्या देशात मनुवाद आहे त्या देशात कोणताही वाद यशस्वी होवू शकत नाही. कारण वरील सर्व वाद हे जातीची वास्तविकता स्वीकारण्यास तैयार नाहीत. केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवाद व जातिवादाला ओळखून ते नष्ट करण्याचे मार्ग सुचविले आहेत. ते हेसुध्दा म्हणतात, जेव्हा वंचित समाज हा मुसलमानाच्या बाबतीत आणि मुसलमान वंचिताच्या बाबत विचार करावयास लागेल तेव्हाच मनुवादी ताकते या देशातून गायब होतील.

बहुजन कर्मचा-यांच्या संदर्भात मा. कांशीरामजी म्हणतात, कर्मचारी हे राजकारणात सक्रिय होवू शकत नाहीत, परंतु राजकारणाला ते आपल्या वंचित समुहासाठी परिणामकारक बनवू शकतात. त्यांनी बामसेफ या संस्थेची स्थापणा केली होती. बामसेफ ही एका नियंत्रकाच्या स्वरुपात होती. त्यानीच लिहलेल्या “बामसेफ:एक परिचय” या पुस्तिकेत तसे स्पष्ट नमूद केले आहे. परंतु बहुजन समाज पक्षाच्या स्थापणेनंतर त्यांनी बामसेफ वरील आपले नियंत्रन सोडून दिले. ही कांशीराम साहेबांची सर्वात मोठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चूक होती. जर त्यांनी बामसेफला मातृसंघटनेचा दर्जा देत त्याचे मुख्य प्रवर्तक बनून राजकीय पक्ष व इतर संस्थावर नियंत्रण ठेवले असते तर आजच्या भारताचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे स्वरूप काही वेगळे दिसले असते. राष्ट्रीय संघाचे वाढते प्राबल्य व त्यापासून होणार्या धोक्याना थोपविन्यासाठी मा.कांशीरामजीनी लिहलेल्या “बामसेफ: एक परिचय” या पुस्तकातील संकल्पनेवर नव्याने कार्य करण्याची गरज आहे.      

बापू राऊत
922434346

No comments:

Post a Comment