Thursday, April 11, 2019

महाराष्ट्रातील बहुजनवादी पक्षांची सद्यस्थिती

प्रचलित प्रघातानुसार बहुजनवादी पक्ष समुहामध्ये मुख्यत: फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेवर बोलणार्‍या पक्षाचा अंतर्भाव होतो. त्या अर्थाने बहुजन समाज पक्ष, भारीप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, बहुजन मुक्ति पार्टी  इत्यादी पक्षाना बहुजनवादी पक्ष असे म्हणता येते. या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात या पक्षांची महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर असलेली वास्तव स्थिती काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. बहुजनवादी पक्ष हे मुख्यत: वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात ज्यात अनु.जाती, जमाती विमुक्त भटक्या जाती यांचा समावेश होतो. एकदा भाषणात भाजप मंत्री नितिन गडकरी यानी म्हटले होते, फुले-आंबेडकरी पक्षांचे एक मोठे दुर्दैव्य आहे, ते म्हणजे या पक्षांची विचारधारा व उद्देश एक असला तरी हे पक्ष निवडनुका मध्ये कधीच एकत्र येवून लढत नाहीत. हे पक्ष गटातटामध्ये इतके विभागले आहेत की त्यांची गणनाही करता येत नाही. हे वास्तव आज कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात या पक्षांच्या म्हणविल्या जाणार्‍या एकूण दीड कोटी मतापैकी केवळ २० लाख मते या पक्षांना पडतात. याचा अर्थ मतांचे मोठया प्रमाणात विभाजन होवून ९० टक्के मते ही प्रस्थापित पक्षाकडे वर्ग होतात.