Sunday, June 9, 2019

केमेस्ट्री सोबतच जातीय मानसीकतेने केलाय माया-अखिलेशचा पराभव


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका (2019) मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल व बहुजन समाज पक्षाचे गठबंधन होते. हे गठबंधन केवळ तीन पक्षांचे नव्हते तर ते जाट-दलित-ओबीसी आणि मुस्लिम समाजाचे होते. कारण एकत्र आलेले हे पक्ष त्या त्या जातीसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे होते. यांची कागदी लोकसंख्या अंदाजे 78 टक्के आहे. या एकगठ्ठा मतामुळे भाजप युपी मध्ये पराभूत होईलच हे स्पष्ट होते. यामागील कारणही तसेच होते. या पक्षाच्या संयुक्त गणितीय आकडेवारीमुळेच गोरखपूर, फुलपूर आणि कैराना मध्ये झालेल्या पोटनीवडणुकामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. गोरखपूर फुलपूर हे मतदारसंघ मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य याचे मजबूत गढ होते. त्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणुक सपा-बसपा गठबंधन मोठ्या अंतराने सहज जिंकेल असे निवडणूक पंडित व विश्लेषकांनी मांडलेले गृहीतक मात्र  सपशेल पराभूत झालेय.
निवडणुकानंतर जे चित्र समोर आले, त्यावरून कांग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढल्यामुळे सपा-बसपा गठबंधनाला सुमारे 10 जागावर पराभव स्वीकारावा लागला. 2014 च्या निवडणुकांच्या तुलनेत 2019 ला भाजपाच्या मतदानाचे प्रमाण 42.3 टक्क्यावरुन 50.7 टक्क्यापर्यंत वाढत 62 जागावर विजय प्राप्त केलाय. तर सपा-बसपाची मतसंख्या ही 2014 च्या तुलनेमध्ये नीचांक स्थानावर गेली. 2019 मध्ये सपा-बसपाने ज्या जागावर स्वतंत्रपने निवडणुक लढविली त्यात अनुक्रमे 38.4 आणि 40.8 टक्के मते मिळाली. दोन्ही पक्षाची एकूण मतांची टक्केवारी 39.6 आहे. बहुजन समाज पक्षाचा विजयी जागावरील  स्ट्राइक रेट 26.3 टक्के असून समाजवादी पक्षाचा स्ट्राइक रेट 13.5 टक्के आहे. यावरून समाजवादी पक्षाला मानणार्‍या मतदारांनी सपा-बसपा हे गठबंधन स्पष्टपने नाकारत आपले मत भाजपाला दिल्याचे दिसते.   (आधार: द्विवेदी राजकीय डेटा केंद्र)
उत्तर प्रदेशात सपा-बसपाचे गठबंधन जाहीर होताच मोदी-अमित शहानी ओबीसीतील  लहान जातीसमूहाना स्वपक्षात वळविण्यास सुरुवात केली. या ओबीसी समूहात एकूण 79 उपजाती आहेत. मोदी-अमित शहाने यादव जातींना सोडून कुर्मी(4.5%), लोध (2.1%), निषाद (2.4%), गुज्जर(2%), तेली(2%), कुम्हार(2%), न्हावी(1.5%),  सैनी(1.5%), कहार (1.5%),काची(1.5%) या जाती समुहाना  सत्तेत सहभागाची स्वप्ने दाखविण्यात आली. या जातीकडून भाजपास 26 ते 27 टक्के मते प्राप्त झाली. मोदी शहाच्या कूटनीतीमुळे संघास न मानणार्‍या समूहानी सुध्दा भाजपास व्होट दिल्याचे दिसते. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात अनु. जातीची एकूण टक्केवारी 22 ते 23 टक्के असून त्यात एकूण 65 उपजाती आहेत. यातही मोदी-शहानी सेंध लावीत गैरजाटव जाती व्यतिरिक्त पासी(3.2%), खटिक(1%), धोबी (1.4%), कोरी(1.3%) आणि वाल्मिकी (1%) समुदायाना आपल्या गोटात घेतले. या समुदायातून भाजपाला 9 ते 10 टक्के मिळाली. एकूणच भाजपाच्या पारड्यात गैर जाटव आणि गैर यादव यांच्याकडून 37 टक्के मताची भर पडली. याचा अर्थ आरक्षणाचा व सत्तेचा फायदा यादव व जाटव या समुहानीच कसा लाटला हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाली तर भाजपामुळे मागासवर्गाचे नुकसान कसे होते हे पटवून देण्यास गठबंधन नाकामी ठरले.  
78 टक्के मतसंख्या असताना समाजवादी पक्षाला केवळ 5 जागा तर बहुजन पक्षाला 10 जागा मिळाल्या. याचा अर्थ बहुसंख्यांकवादाच्या  आसर्‍याखाली जे पक्ष निवांत होते त्यांच्यासाठी हा लोकांनी दिलेला झटकाच म्हणावा लागेल. यावरून पुढे जातीप्रेम  आणि बहुसंख्य लोकसंख्या गृहीत धरता येणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युपीच्या निकालावर म्हणाले, शेवटी केमेस्ट्रीने अंकगणितावर मात केलीय. खरंच, मोदीजींच्या केमेस्ट्रीने त्यांना विजय मिळवून दिला असेल काय?  की जातीय मानसिकता सपा-बसपाच्या पराभवास कारणीभूत ठरली असेल? यावर प्रकाश टाकणे फार महत्वाचे आहे. मोदीजींच्या केमेस्ट्रीतील काही तथ्य पुढीलप्रमाणे आहेत. मोदीजी आणि अमित शाह हे हुशार राजनीतिक रणनीतिकार आहेत. लोकांना भावनात्मक मुद्यात गुंतूवून ठेवणे त्यांना चांगले अवगत झाले मात्र  मोदी-शहा यांची रणनीती विरोधी पक्ष समजू शकले नाही. ते केवळ आपल्या गणिती आकड्यात रममाण झालेत. मोदी-शहानी निवडणूक प्रचारात धर्म, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि मंदिर हे मुद्दे प्रामुख्याने आणत विरोधी पक्षानी केलेल्या टीकाना  आपल्यासाठी सकारात्म्क बणविल्या. अनू.जातीचे संत असलेले रविदास यांच्या मंदिरात मोदीजी लंगरला बसले होते, समरसता भोज च्या नावाखाली आपल्या खासदारांना ते दलितांच्या घरी जेवण घेण्यास सांगतात. मोदीजी दलितावर अत्याचार करणार्‍यांवर कधीही कार्यवाही करीत नाहीत परंतु दलितांच्या हत्यावर भावुक होत सभेत रडण्याचे अवसान आणतात. ते मुसलमानाच्या होत असलेल्या सामूहिक हत्येवर चूप राहतात. हा गौरक्षक व इतर कार्यकर्त्यासाठी सरळ संदेश असतो. ते कधी स्वत:ला गरीबाहूनही गरीब असल्याचे सांगतात. त्यांनी कुंभ मेळ्यात काम करणार्‍या वाल्मिकी सफाई कामगारांचे पाय धुतले. मोदींचा हा संदेश चातुर्यपणाचा असला तरी वाल्मिकीसाठी तो आपलेपनाचा होता.
दूसरा, अमित शहानी बहराईचमध्ये राजभर जातीचा राजा सोहेलदेव यांच्या मूर्तीचे  उद्घाटन करताना सोहेलदेव यांना हिंदूरक्षक संबोधून त्यांनी सोमनाथ मंदिरावर चढाई करणार्‍या मुसलमानाचा पराभव केल्याचे सांगितले. असे सांगून त्यांनी मागास वर्गाच्या व्होटबैंकला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. तिसरा त्यांनी गैरयादवाना समाजवादी पक्षापासून तर गैरजाटव जातींना बहुजन पक्षापासून तोडण्याची नीती बनविली. भाजपा ने केशवप्रसाद मौर्याच्या माध्यमातून अनु.जाती आणि मागासांच्या 150 कार्यशाळा घेतल्या. चौथा ऐन निवडनुकाच्या काळात नीरव मोदींना अटक करण्यात आली. हा मुद्दाही भाजपासाठी महत्वाचा होता. त्यांनी बालाकोट मध्ये झालेल्या सैनिकी कार्यवाहीला हिंदू राष्ट्रवादासी जोडले. ह्या सार्‍या मुद्दयानी मोदींना जिंकविण्यास मदत केली. हीच मोदीची केमेस्ट्री होती. येथे ईव्हीएम चा मुद्दा प्रस्तुत नाही.  
भाजपच्या विजयामध्ये संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण संघ आणि दुर्गा वाहिनी यांसारख्या राष्ट्रीय संघटनांचे पाठबळ होते. या संघटनाचे कार्यकर्ते हे कॅडर बेस आहेत. ज्यांचे कॅडर मजबूत असते त्यांना निवडणुकीत पराभूत करणे फार कठीण असते. भविष्यात भाजपा विरोधकांसाठी हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडे कोणतेही कॅडर बेस कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे जाळे नाहीत. वेळ आल्यास गांधी परिवार वगळता काँग्रेस मधील सर्व नेते भाजपमध्ये कधीही प्रवेश करू शकतात. कारण कॉंग्रेस नेत्यांसाठी विचारधारा महत्वाची नसून सत्ता, पद  व पैसा महत्वाचा असतो. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी कॅडर बेस कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संस्थांची निर्मिती केली होती. ह्या संस्था बहुजन पक्षाच्या पाठीराख्या होत्या. परंतु मायावती बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा होताच कॅडरबेस कार्यकर्त्यांना नामशेष करीत संस्थाही नेस्तनाबूत केल्या. जनतेवर पकड असलेल्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.  कांशीराम यांनी जोडलेल्या बहुजन समाजातील लहान समुहाना मायावती टिकवू शकली नाही. बसपामध्ये युवक आणि महिलांना महत्वपूर्ण हिस्सेदारी मिळत नाही. एकूणच कांशीराम यांनी रचलेला पाया मायावती ने उध्वस्त केला. मायावतीवर मागास जातीच्या नेत्यांना दुर्लक्षित करण्याचा आणि उच्चजातीय नेत्यांचा पुळका असल्याचा वारंवार आरोप होतो. केवळ आरक्षित जागांवर दलितांना तिकीट दिल जात असून त्या पक्षात आपल्या नातेवाईकासाठी महत्वाचे स्थान निर्माण करीत आहेत. या सार्‍या बाबीचा गठबंधनाच्या निकालावर परिणाम झाला, हे नाकारता येत नाही.   

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष या गठबंधनाचा निवडणुकीतील दारुण पराभवास “जातीयवादी मानसिकता” कारणीभूत  असणे होय. मायावतीने स्वत:स “प्रधानमंत्री पदाची दावेदारी” घोषित करणे हेच गठबंधनाच्या पराभवाचे मूळ कारण होते. त्यांनी पदाची दावेदारी न करता केवळ भाजपास हरविण्याचे मुद्दे प्रचारात आणले असते तर गठबंधनाचे  विजयी आकडे वाढले असते. भारतातील जातीयवादी मानसिकता इतकी मजबूत आहे की, ती कधीही दलिताला देशाचा प्रधानमंत्री बणू देण्यास तैयार नाही. मायावती प्रधानमंत्री बणू नये म्हणून यादव आणि गैर यादव ओबीसीनी भारतीय जनता पक्षास मतदान केल्याचे स्पष्ट संकेत आहेत. एवढेच नव्हे तर हिंदुवादी संस्थाकडून “दलित व्यक्ति प्रधानमंत्री” पदावर कसा? यावर लोकात नकारात्मक प्रचार करण्यात आला. याच भीतीमधून मुलायमसिंग यांच्या यादव जातीनी स्वत:चा पक्ष मानून घेतलेल्या “समाजवादी पक्षालाही” आपले मत दिले नाही. हे समाजवादी पक्षाला मिळालेल्या एकूण टक्केवारीतून स्पष्ट होते. किती भयानक मानसिक असंतुलन आहे हे? अमेरिकन जनता वंशवादाला विसरून बराक ओबामाला देशाच्या सर्वोच्चपदी निवडून देते. परंतु भारतीय जनता आजही स्पृश्य-अस्पृश्याच्या दलदलीमध्ये फसलेली आहे. भारताची मानवताहीन व संवेदनाहीन सामाजिक रचना आजही जशीच्या तशी टिकून असलेली बघायला मिळते. ती पुढील उत्तरोत्तर संघकाळात अधिकाधिक मजबूत बनेल. आज भारताचे उदारमन प्रकाशातही चाचपडत आहे. हे प्रकाश दिवे अचानक कधी बंद केले जातील? याचा नेम नाही. 

लेखक: बापू राऊत,
मुंबई
9224343464

No comments:

Post a Comment