Friday, February 14, 2020

राजकारणातील नवे प्यादे : बजरंगबली विरुध्द जय श्रीराम


राजकारण हा मोठा विचित्र खेळ आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. जवळचे मित्र कधी विरोधक बनतील तर कट्टर विरोधक कधी मित्र याचा काही भरोसा नसतो. असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात व देशातही बघायला मिळतात. मित्राचे असू द्या पण जवळचे नातेवाईकही कधी विरोधात जातील आणि निवडणूक मैदानाच्या आखाड्यात एकमेकाचे प्रतिस्पर्धी बनतील याचे भविष्य सांगणेही कठीण झाले आहे. सत्तेची लालसा हि माणसाच्या  नैतिकतेला निष्प्रभ करून टाकीत असते. सत्ता, स्वार्थ व संपत्ती हि राजकारण्यांच्या जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळे तत्व, मानवता, बंधुभाव आणि विविधतेतील एकतेला सुरुंग लागून त्याची जागा संधीसाधुत्व, द्वेष, सामाजिक फुट व हत्या या प्रकारांनी घेतली आहे.


विविध धर्माच्या संहितेमध्ये त्या त्या धर्माचे देव व उपासना पध्दती आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक भारतीय माणूस मनोभावे आध्यात्मिक पूजाअर्चना  करून जीवन जगण्याच्या प्रक्रिया पार पाडत असतो. त्यात दंभ व टेंभा नसतो. परंतु ज्यांनी केवळ  धर्माला व देवाला आपले जीवन जगण्याचे आर्थिक श्रोत बनविले त्यांनीच मग मानवी समाजात दरी निर्माण करून व कल्पनांचे मायावी जाळे विणून माणसामाणसात  धर्मांधता, कट्टरपणा व विद्वेषाचे बीज पेरून असहिष्णू बनविले. भारतीय संतांनी बंधुभाव, विनय व नम्रतेचे धडे दिले परंतु आजच्या  साधूच्या वेशातील भोंदुनी गडगंज संपत्ती व  अंधभक्तांचा वर्ग निर्माण केला आहे. या भोंदुनी महिला शोषण, बलात्कार व खून या सारखे गंभीर गुन्हे केले तरी त्या विरोधात समाजात फारसा विरोध होताना दिसत नाही. सारे सुरळीत असल्यासारखेच आहे.

राजकारणातील व शोषक समाजातील चतुर लोकांनी हेच हेरले. त्यांनी राजकारणात देव, धर्म व स्युडो राष्ट्रवाद अंमलात आणला. राष्ट्रवाद हा जसा एकांगी कधीच नसतो तसा तो कोणत्याही धर्माचा व जातीचा नसतो. राष्ट्रात राहणारे सर्व लोक हे राष्ट्रवादी असतात. आपल्या राष्ट्राला जपण्यात व जगात त्याला महान करण्यात प्रत्येक नागरिक आपली भूमिका वठवीत असतो. विविधतेला जपून बंधुभावाचे जतन राष्ट्रवाद करीत असतो. राष्ट्रवादावर कोणाचीच मालगुजारी नसते तर प्रत्येक नागरिकाच्या अभिनयाचा तो अविभाज्य भाग असतो. एखादी व्यक्ती व समूह जेव्हा आपल्यावरील अन्याय, अत्याचार  व शोषनाविरुध्द बोलतो तेव्हा  तो आपल्या राष्ट्राविरोधात नाही तर राष्ट्रातील अन्यायी व्यवस्थेविरुध्द व तिचे संगोपन करणाऱ्या शोषकाविरोधात बोलत असतो. त्याला आपले अधिकार व समानतेच्या संधी हव्या असतात. म्हणून तो माध्यमातील विविध आयुधाचा वापर करून आपल्या मागण्या लोकांच्या नजरेस आणून देत असतो. परंतु काहींनी राष्ट्रवादाची उलटी व्याख्या करून त्यावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली आहे. खरे तर हे स्युडो राष्ट्रवादीच राष्ट्रद्रोही आहेत. कारण हे लोक राष्ट्राला असंतुलित करून त्याची एकवाक्यता नष्ट करीत असतात. लोकात भेदाभेद, धर्मभेद व पंथभेद निर्माण करून भारतीय नागरिकात अविश्वासाची भावना निर्माण करून एकमेकाच्या विरोधात विषमतेचे बीज पेरीत आहेत. मुठभर लोकांच्या अधिसत्तेसाठी बहुसंख्य जनतेने आपला बळी तरी का द्यावा? याचा विचार लोकांनीच केला पाहिजे.

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकात अनेक प्रश्नाची उत्तरे सहज मिळू लागली आहेत. या निवडनुकीच्या निमित्ताने माणसाच्या मुलभूत गरजा ह्या अन्न, शिक्षण, शुध्द हवा, नोकरी, वस्त्र व निवारा ह्या खऱ्या गरजा आहेत असा विचार करण्यास भाग पाडले आहे. दिल्लीच्या विधानसभेसाठी आप, भाजपा व कांग्रेस ह्या तीन मुख्य पक्षात रस्सीखेच होती. यातील प्रत्येक पक्षांनी दिल्लीवर सत्ता गाजविली आहे. परंतु पहिल्यांदाच आपण केलेल्या वास्तविक उपलब्धीवर मतदान करा अन्यथा करू नका असा प्रचार करणारा एक पक्ष होता. तर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने मुसलमान विरुध्द हिंदू,  शाहीनबाग, गोली  मारो.., वे हिंदूओके घर मी घुसेंगे .. अशा प्रकारचे मुद्दे समोर आणले. हे मुद्दे खरे तर निवडणूक आचारसाहिंतेच्या विरोधी होते. आज टी.एन.शेषन सारखा निवडणूक कमिशनर असता तर सगळ्यांच्या उमेदवारीवर पाणी फेरले असते. धर्माचा आधार घेत निवडणुका लढविल्यास देश रसातळाला जाईल याचे भान राजकीय पक्षांनी ठेवायला पाहिजे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाच्या निवडणूक डावपेचाचा आणखी एक नमुना बघायला मिळाला. तो म्हणजे बजरंगबलीचा उदय. सौरव भारद्वाज या आप नेत्याने टीव्ही वर दिलेल्या मुलाखती नुसार निवडणूक बूथच्या काही अंतरावर भाजपचे कार्यकर्ते जेव्हा “जय श्रीराम” चे नारे लावीत  त्यांनी भाजपला मतदान का करावे हे सांगत तेव्हा आपच्या कार्यकर्त्यांनी “जय बजरंगबली” चे नारे देणे सुरु केले तेव्हा अचानकच “जय श्रीराम” चे नारे बंद झाले. म्हणजेच  भाजपला त्यांच्याच प्रतिकांनी मारण्याचा हा नवा शोध होय. याला आता “हार्ड हिंदुत्व” विरुद्ध  “सॉफ्ट हिंदुत्व” या परिभाषेत निर्देशित करण्यात येईल. हे “सॉफ्ट हिंदुत्व” कार्ड कांग्रेसला त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्वामुळे खेळता आले नाही परंतु  आम आदमी पक्षाने ते खेळले. केजरीवाल यांनी टीव्ही न्यूज चॅनेलवर तर हनुमान चालीसेचे पठण करून आपण “कट्टर हनुमान भक्त” असल्याचे जाहीर करीत  भाजपला अडचणीत आणले. त्यांनी बजरंगबली (हनुमान) च्या मंदिरांना भेटी देवून आपण धर्मिकतेत संघ व भाजप पेक्षा किंचितही कमी नाही हे दाखवून दिले. पक्षाला तिसर्यांदा विजय मिळणे हि बजरंगबलीची कृपा असून त्यांनी सेवा करण्यासाठी नवा मार्ग दाखविला असे म्हटले. भाजपाच्या हिंदुत्वाच्या मालकी हक्कात केजरीवालाची हि घुसखोरी बिहार व पश्चिम बंगाल मध्ये पोहोचण्यास अधिक वेळ लागणार नाही. लालूप्रसाद यादव आणि ममता बनर्जी केजरीवालाचे धार्मिकतेचे हे सूत्र आपापल्या राज्यात वापरून भाजपचे अस्त्र त्यांच्यावरच उलटवू शकतात.

देशात भाजपने मुसलमाना पूर्णत: एकाकी पाडले असून त्यांना पुरोगामी पक्षांना मतदान करण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे असौद्दिन ओवेसी यांच्या एआयएमआयएम सारख्या पक्षाला मते देवून व मताचे धृविकरण करून भारतीय जनता पक्षाला निवडून येवू देणे हे मुसलमानांना परवडणारे नाही. त्यामुळे पुढील काळात भाजपा विरोधी मजबूत अशा पक्षालाच ते मतदान करण्याचीच अधिक शक्यता आहे. मुसलमानांच्या या मानसिक स्थितीचा फायदा घेवून पुरोगामी म्हणविणारे पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळून भाजपाच्या “हिंदू व्होटबँक” ला छेद देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यासाठी दिल्लीतील केजरीवाल यांचे “बजरंगबली विरुद्ध जय श्रीराम” मॉडेल लाभदायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. परंतु या स्पर्धात्मक भक्तीतल्या “बजरंगबली” चा मुसलमाना सहित इतर अल्पसंख्याकांना त्रास होईल कि नाही हे आजतरी अस्पष्ट आहे.

आपल्या स्वधर्मावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी अन्य धर्मियांचा द्वेष करण्याची गरज नसते हे केजरीवालने दाखवून दिले आहे. “आप” पक्षाला मतदान म्हणजे देशद्रोह्याला मतदान हा भाजपाचा विचार दिल्लीच्या लोकांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे अलीकडील सीएए सारख्या राजकारणाचे परीक्षण मनातल्या मनात तरी करावे लागेल अन्यथा पुरोगामी पक्षांचा “बजरंगीबली” भाजपाच्या “जय श्रीरामास” अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे. यातून भाजपा कसा मार्ग काढेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.    

लेखक: बापू राऊत,
अध्यक्ष, मानव विकास संस्था

No comments:

Post a Comment