Wednesday, March 4, 2020

लेण्यांद्री लेण्याचे विद्रुपीकरण


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर. प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या या शहराला लेण्याचे शहर असे म्हटले जाते. जुन्नर हे ‘हीनयान’ बुध्दीझमचे मोठे केंद्र होते. सातवाहन काळात जुन्नर हे पुणे शहरापेक्षा मोठे केंद्र असावे. पूर्व काळात येथील व्यापार हा नाणेघाट ते कल्याण अशा मार्गाने चालत असे. या शहराच्या आजूबाजूला असलेल्या पर्वतरांजीत लेण्यांच्या मालिकाच मालिका आहेत. डोंगरातील खडकांना काटून लेण्या कोरलेल्या आहेत. अशाच अनेक लेण्यांपैकी येथील लेण्यांद्री हि एक प्रसिध्द लेणी. लेण्यांद्री लेण्यावर जाण्यासाठी ३०७ पायऱ्या चढून जावे लागते. ह्या लेण्याची सुरक्षा व देखभाल भारतीय पुरातत्व विभाग करते. परंतु तेथील परिस्थिती बघितल्यास या भारतीय पुरातत्व विभागा विषयी मनात निराशा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हजारो वर्षाच्या या सांस्कृतीक धरोहारीला भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्षित ठेवले असून एकूण २६ लेण्यापैकी केवळ ७ नंबरची लेणी सोडली इतर लेण्या बघण्यासाठी चांगली सोय केलेली दिसत नाही.  


लेण्यांद्री लेण्या म्हणजे मूळची बौध्द विहारे. लेण्यांद्रीच्या सर्व लेण्या ह्या बौध्द धर्मातील हीनयान
कलेचा नमुना आहेत. येथे असलेल्या चैत्यगृहाची रचना हि अजिंठा व बेडसे येथील चैत्याचीच प्रतिकृती वाटते. ह्या लेण्या इसवी सनाच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकात निर्माण केल्या गेल्या असून त्यांची निर्मिती सातवाहन काळात झालेली आहे. या लेण्यांतील खोल्या बघितल्यास येथे सुमारे २००-३०० बौध्द भिक्खूचे वास्तव्य असावे. २१ व्या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असून बौध्द भिक्खू ते पाणी वापरत असावेत. लेण्यांच्या समोरील पृष्ठभागावर दोन शिलालेख कोरलेले असून त्यामध्ये दानकर्त्याची नावे आणि कालखंड प्रतिपादित केला आहे. १४ व्या लेणी समोरील शिलालेखात इसवी सन दुसर्या शतकाचा उल्लेख आढळतो.

लेण्यांद्रीच्या २६ लेण्यांच्या रांगेतील दोन लेणीवर अतिक्रमण झालेले बघायला मिळते. पैकी सातव्या लेणीचे विद्रुपीकरण करून तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येवून तिला मंदिरात रुपांतरीत करण्यात आले आहे. या रुपांतरीत मंदिराला अष्टविनायक मंदिरापैकी एक मंदिर असे म्हटले जावून तिथे हिंदू पुजारी पूजा करताना दिसतो. हा प्रकार बघितला कि अयोध्येच्या बाबरी मशिदीची आठवण येते. ज्याप्रकारे २२ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री चुपचाप रामाची मूर्ती मशिदीत ठेवण्यात आली. सकाळी उठल्यानंतर त्यांनीच मशिदीत राम प्रगट झाल्याची अफवा पसरवून दिली. कालांतराने बाबरी मशीदीचा विध्वंस करून त्या जमिनीचा ताबा संघ समर्थित ट्रस्टकडे देण्यात आला. वास्तविकता अयोध्या हि एकेकाळी बौध्दाची साकेत नगरी होती. भारतात सातव्या शतकात आलेल्या हुवान श्वांग या चीनी प्रवाशाने तशी स्पष्ट नोंद केलेली आहे. अयोध्येचीच पुनरावृत्ती या बौध्दांच्या सातव्या लेणीच्या संदर्भात झालेली बघायला मिळते. लेणीमध्ये गणपतीची मूर्ति ठेवून ते आमचेच मंदिर आहे असा दावा केला जातो. जो सर्वथा तथ्यावरील चाचणीत चुकीचा आहे.

या रुपांतरीत सातव्या लेणी मध्ये एकूण २० खोल्या असून मध्यभागी अविभाज्य असा विस्तीर्ण हाल आहे. ह्या खोल्या बौध्द भिक्खूचे निवासस्थान असून मध्यभागी असलेला हॉल हा त्यांचे विपश्यना केंद्र होते. आता याला गणेश मंदिराचे सभामंडप म्हटल्या जाते. हॉलमधील भिक्खू निवासाच्या मागील दोन खोल्यांची मध्य भिंत तोडून व त्यांचे एकत्रीकरण करण्यात येवून भिंतीलगत मध्यभागी गणपतीची प्रतिमा बनविण्यात आली. लेणीचा आतील मागील भाग तोडतानाच प्रवेशद्वाराचे रुंदीकरण सुध्दा करण्यात आल्याचे लक्षात येते. बॉम्बे प्रेसिडेन्सी (१८८२) च्या गझेटीयर नुसार लेण्यावरील या अतिक्रमणानंतर भिक्खूच्या खोल्यावर लाकडी दरवाजे बसविण्यात आलेले असून भिंतीवर प्लास्टर करून त्यावर काही कथात्मक पेंटिंग काढण्यात आले आहे. नंतरच्या काळात हॉल समोरील भागाचे नुतनीकरण करण्यात येवून त्याला रंग देण्यात आला. अशा प्रकारे बौध्द संस्कृतीची सांस्कृतिक धरोहार ब्राम्हण वर्गाकडून नष्ट करण्यात आली.

बौध्द लेण्यावरील अतिक्रमण व तिचे विद्रुपीकरण १९ व्या शतकात पेशव्यांच्या काळात झालेले दिसते. पेशवेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटीश राजवटीने प्रशासनामध्ये शिक्षित बहुजन समाजाला सामावून घेण्याचे प्रयत्न केले. संस्थानिकांनी सुध्दा ब्रिटीशांचेच धोरण अंमलात आणले. त्यामुळे हवालदिल झालेल्या ब्राम्हणांनी उत्पन्नाचे नवीन साधने शोधणे सुरु केले. त्यातूनच सांस्कृतिक ठेका व धर्म हातात असल्याचा फायदा घेवून महाराष्ट्रात बौध्द लेण्यांवरील अतिक्रमणाची मोहीम सुरु झाली. काल्पनिक कथांच्या रचना केल्या. त्यांनाच आजच्या काळात आख्यायिका व पुराण असे म्हटले जाते. या आख्यायिका व पुराणांना कोणताच आधार नसतो. केवळ त्यावर विश्वास ठेवणे व मानणे हाच त्याचा मुख्य आधार असतो. प्रथम रचना करावयाच्या व नंतर त्या रचनेप्रमाने वास्तूशिल्प निर्माण करावयाचे हि सनातन्यांची नीती होती. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बौध्द लेण्यांना पांडव लेणी असे संबोधून त्या ठिकाणी गणपती, शिव, पांडव, कृष्ण, राम व हनुमानांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या. मुळ बौध्द लेण्याचे विद्रुपीकरण करून  मंदिरे उभारली गेली आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने बौध्द लेण्यांचे संरक्षण करण्याची हमी घेत लेण्यावरील हिंदू आक्रमण रोखले पाहिजे.  

ऐतिहासिक स्थळावरील अतिक्रमणाचा इतिहास हा भारताला कलंकित करणारा आहे. ७ व्या लेण्यांद्री बौध्द लेणीचे रुपांतरीत गणपती मंदिर हे पूर्वी बौध्द भिक्खूचे निवासस्थान व विपश्यना केंद्रच असल्याचे आजही स्पष्ट प्रतीत होते. परंतु डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी बनलेल्या समाजाला, तथाकथित बुध्दीवाद्यांना, धर्ममार्तंडाना व भारतीय पुरातत्व विभागाला त्याचे काहीही शल्य वाटत नाही. तिन माकडाच्या कथेप्रमाने  ना देखेंगे, ना सुनेंगे, ना बोलेंगे असी अवस्था आता माणसांची झाली आहे. गावातील काही लोकांच्या मतानुसार, अष्टविनायक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येथे बाहेरून भाविक येण्यास सुरुवात झाली. बनावट व काल्पनिक कथेवर चित्रपट काढून लोकांना भ्रमित करणारे निर्माते व अभिनय करणारे कलाकार यांचीही मती विवेकाची व सद्सद्विवेक बुध्दीची दिसत नसून ती पोंगा पंडित संधीसाधूंचीच होती.

अलीकडच्या काळात धार्मिक स्थळावर झालेली अतिक्रमणे व त्याचा खरा इतिहास जाणून ज्याची त्याची धर्मस्थळे त्या त्या धर्माच्या स्वाधीन केली पाहिजेत. अशा आक्रमित स्थळातून कोणती आस्था, श्रध्दा, उर्जा व पुण्य मिळेल याचा भाविकांनीही विचार करायला पाहिजे. दुसर्यांच्या धर्मस्थळाचा आदर व सन्मान ठेवण्यातच खरी सहिष्णुता असते. महाराष्ट्र शासनाकडून लेण्याद्रीला पर्यटन स्थळाचा ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने या अतिप्राचीन लेण्यांतील मूळ शिल्पाचे जतन करून प्रत्येक लेणीवर जाण्यासाठी सुस्थित पायऱ्या, गाईडची सेवा व संरक्षक भिंत उभारून येणाऱ्या पर्यटकासाठी सुविधा निर्माण केल्यास त्यांना आपला इतिहास व सांस्कृतिक धरोहार याची माहिती होण्यास हातभार लागेल.  

बापू राऊत
९२२४३४३४६४  

No comments:

Post a Comment