Thursday, April 2, 2020

प्लेग, टिळक, चाफेकर बंधू आणि आजचा कोरोंना


आज संपूर्ण जगाला कोरोंना विषाणूनी वेढलेले आहे. शक्तीशाली व विकासात अग्रेसर समजले जाणारे अमेरिका, इटली, स्वीडन, स्पेन, फ्रांस, जर्मनी, कॅनडा व ब्रिटन हे देश या कोरोंना विषाणूने पुरे हबकले आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे मोडायला लागले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्य सोईनी सशक्त असलेल्या या देशात लाखो लोक विषाणूनी संक्रमित होवून हजारो जन मृत्यूमुखी पडत आहेत. हा विषाणू जगासाठी एक धोक्याची घंटाच असून जगाची आर्थिक स्थिती व समीकरणे बदलविणारा  ठरू शकतो.


या पार्श्वभूमीवर लोकसंख्येचा मोठा आकार, अपुरी आरोग्य व्यवस्था व कमी संसाधने असलेल्या  अविकसित देशांना या कोरोंनानी मोठ्या चिंतेत टाकले आहे. भारतात लोकसंख्येची मोठी घनता असलेली शहरे व खेडे कोरोंनाच्या विळख्यात सापडल्यास मोठे अघटित घडू शकते. याचा विचार करुनच भारत सरकार व राज्य सरकारांनी पावले उचललेली दिसतात. मात्र यश हे नेहमी लोकांचा सहभाग व प्रतिसाद यावरच अधिक अवलंबून असते. वैज्ञानिक विचार व आचार हे महत्वाचे बंधन पाळून अवैज्ञानिक कृत्ये, भोंदुबाबा व अफवाच्या बाजारा पासून लोकांनी स्वत:ला वाचविले पाहिजेत. कोरोंना पासून कोणतीही श्रध्दा, शास्त्रे, हवन, देवाच्या मुर्त्या, मंदिर, मस्जिद व गुरुद्वारे वाचवू शकत नाही तर स्वत: पाळलेली बंधने, आपापसातील अंतर व शासन सूचना पाळल्या तर विजय हा त्या व्यक्तीचाच होईल हे सांगण्याची गरज नसावी.

आपला देश असे भयानक विषाणू व रोगराईच्या खाईतून गेलेला आहे. आठवा तो १८९७ चा प्लेग व पसरलेला दुष्काळ. या रोगाने पुण्या-मुंबई मध्ये लोक पटापट मरत होती. या प्लेगने नुसते थैमानच घातले नाही तर लोकांच्या असंतोषाचा पारा सुध्दा वर चढलेला होता. दुष्काळामुळे लोक उपाशीही मरायला लागले होते. असा  दुहेरी मार लोकावर पडत होता.  ब्रिटीश सरकारची वसाहत म्हणून ब्रिटिश प्रशासन पुणे-मुंबई मध्ये प्लेग निवारण करीत होते. पुण्याची अधिकाधिक जनता प्लेगच्या संपर्कामध्ये आली होती. ही भीषणता बघून सरकारने प्लेगच्या निवारणासाठी वॉल्टर चार्ल्स रँड यांची प्लेग निवारण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. रँडनी रोगग्रस्तांना रुग्णालयात जाण्याचा व नातलगाना शहराच्या बाहेर तंबू मध्ये राहण्याचा सल्ला दिला. हेच तेव्हाचे रोगप्रतिबंधात्मक उपाय होते. खबरदारीचे उपाय व स्वछतेसाठी म्हणून सोजिर पोलिस घरातील कपडे व अंथरुणाच्या होळया करीत. प्लेग निवारण उपायांनी व पोलिस सोजिरानी केलेल्या कृतींनी पुणेकर इतके हैराण झाले होते की, रोगाने मरणे पुरविले, पण सरकारी उपायांचा जुलूम नको अशी लोकांची भावना झाली होती. प्लेग हा राक्षसी रोग होता. या रोगावर उपाय हे जहाल असणारच पण तो सहन करणे आवश्यक होता. आजही कोरोंना काळात सरकारच्या लॉकडाउन व काही निर्णयाबाबत लोकांना तसा विषाद वाटत असेल.

१८९७ च्या प्लेगने मरणार्‍या लोकांची संख्या बघितली तर आज लोकांनी कोरोंनाची भीती बाळगली पाहिजे. तेव्हा एकट्या मुंबई इलाक्यात ११,८८२ लोक मरण पावल्याचे अहवालात नमूद केले आहे. परंतु आकडा याहीपेक्षा अधिक असावा. जानेवारी १८९७ च्या प्रारंभी दीड लाख लोक मुंबई सोडून गेले असे सीक्रेट अॅबस्ट्रॅक्टर अहवालात चिन्हांकित आहे. १८७२,१८८१ व १८९१ च्या जनगणनेनुसार पुण्यात दर दहा वर्षात किमान ९००० लोकांनी वाढणारी लोकसंख्या १९०१ च्या जनगणनेत ७५०० नी घटली. मुंबई शहराचीही लोकसंख्या १८९१ ते १९०१ या दशकात ४५,००० नी घटली. यावरून साथीची भयानकता लक्षात घेतली पाहिजे.

देशात प्लेगचा हाहाकार असताना महाराणी व्हीक्टोरियाच्या राज्यरोहणाचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्याच निमित्ताने लॉर्ड सॅंढर्स्ट यांनी  २२ जून १८९७ रोजी गव्हर्नर हाऊस म्हणजे आताचे पुणे विद्यापीठाचे मुख्यालय येथे मेजवानी दिली. आज काहीजन या प्रसंगाची आठवण करून देवू लागले की, जगावर कोरोंनाचे संकट आले असताना भारत सरकारने त्याची पूर्वतयारी  न करता डोनाल्ड ट्रम्पच्या स्वागतासाठी महाराणी व्हीक्टोरियाच्या राज्यरोहणासारखा महोत्सव आयोजित केला तर दुसरीकडे मध्यप्रदेशचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आपली शक्ती व वेळेचा अपव्यवय करण्यात घालविला. एक दिवसाच्या लॉकडाउन करून टाळी व थाली वाजविण्याचा अवैज्ञानिक प्रकार करून आपली लोकप्रियता चाचपण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरणारे लोकमान्य टिळक, त्यांचे केसरी वृत्तपत्र व चाफेकर होते. आजच्या काळात कोण कोणती भूमिका पार पाडतो हे कळायला मारगच नसतो. सकाळी उत्तरेत दिसणारा संध्याकाळ पर्यंत दक्षिण टोकावरील कळपात बसलेला दिसतो.

दामोदर चाफेकर व त्यांचे बंधु बाळकृष्ण यांचा प्लेग बरोबर अन्योन्यसबंध आहे. चाफेकर बंधुवर पूर्वगौरव, धर्मनिष्ठा व पोथ्यापुराणांचा जबर पगडा होता. सशस्त्र कार्य करणे हे धर्मकार्यच असे तो मानत असे. दामोदर चाफेकर ने आत्मचरित्रात कबुल केले की, टिळका विषयी आमचे मत चांगले नाही पण सुधारकापेक्षा पुष्कळ पटीने बरा असे म्हणत अलीकडे हा समाजाला धरून चालत आहे.  
दामोदरने हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती झालेले प्रा.वेलणकर यांना त्यांच्या घरी जावून मारझोड केली. आपल्याच नात्यातील काशीनाथ गाडगीळ यांनी आपल्या मुलीचे लग्न उशिरा म्हणजे १६ व्या वर्षी का केले म्हणून वरातीवर दगडफेक केली होती. ज्या इंग्रजी भाषेला चिपळूणकरांनी “वाघिणीचे दूध” म्हटले ती भाषा शिकण्यास चाफेकराचा सक्त विरोध होता. इंग्रजी शिक्षणामुळे लोक “फाजील विचारी झाले” असे मत त्यांनी नमूद केले आहे. मिशनरींच्या इमारतींना आगी लावणे, मुंबईच्या कुलाबा भागात मॅट्रिकच्या परीक्षेसाठी उभारलेल्या मंडपास आग लावून जाळून टाकणे अशी अनुचित कृत्ये त्यांनी केली. सुधारक पत्राचे संपादक वासुदेव बळवंत पटवर्धन आणि सीताराम गणेश देवधर यांचा शिरच्छेद करण्याचाही त्यांने विचार केला होता. जून १८८५ साली आगरकर यांना अकाली मरण आले, त्यावर चाफेकर म्हणाला, तो चांडाळ मेला म्हणून वाचला. अशा अनेक कृत्याची त्याने आत्मचरित्रात कबुली दिली आहे. असा हा धर्मवेडा दामोदर टिळकांच्या “जहाल ब्रिगेड” मध्ये होते.

प्लेग निर्मूलनासाठी लस टोचणीची सक्ती, विलगीकरण, रूग्णाला शोधण्यासाठी पोलिस देवघर, स्वयंपाक घर व बेडरूममध्ये घुसून स्त्रियांना हात लावणे आणि रुग्णांना बाहेर काढून प्लेगच्या मेडिकल कॅम्पमध्ये सर्व जातीच्या लोकांना एकत्र ठेवण्यात येई. या सार्‍या प्रकारामुळे आपला धर्म बुडत असल्याचा चाफेकराला संताप होई. केसरी, मराठा व सुधारक या वृत्तपत्र लेख लिहून कडवा धर्माभिमान जागविण्याचा प्रयत्न करीत त्यामुळे अगोदरच कर्मठ असलेल्या चाफेकरचा धर्माभिमान अधिक जागृत होत यास जबाबदार सोजिरांना ठार करण्याचा निर्णय घेतला. परंतु सोजिरा ऐवजी जबाबदार व्यक्तीस शिक्षा केली पाहिजे असे म्हणून चार्ल्स रँड यांचा खून करण्यास टिळकांनी चाफेकरांना उद्युक्त केले असे अनेक चरित्रकार सांगतात. शेवटी दामोदर चाफेकरने २२ जून १८९७ रोजी रँड व आयर्स्ट या अधिकार्‍याची हत्या केली. टिळक हे चार्ल्स रँडच्या खुनास जबाबदार आहेत असे मानून सरकारने १४ सप्टेंबर १८९७ रोजी दीड वर्षाची शिक्षा ठोठावली. तर जिल्हाधिकारी आर.ए.लॅम्ब यांच्या संशयानंतर दामोदर चाफेकर यांना अटक करून १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रकाशित झालेल्या माहितीवरून, चाफेकरांचे एक सहकारी दामोदर भिडे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहले की, “दामूने लोकमान्यांची आज्ञा घेतली.” “गणेशखिंडीतील गणपती पावला” असा दामोदर चाफेकरांनी त्यांना सांकेतिक निरोप पाठविला होता. टिळकांना सक्तमजुरी होण्यापूर्वी त्यांनी दामोदर चाफेकर अटकेत गेल्यानंतरही त्यांचे बंधु बाळकृष्ण व वासुदेव चाफेकरांच्या आश्रयासाठी सातारा जिल्ह्यातील वारगुड येथील जमीनदार पांडुरंग सबनीस यांना निरोप पाठवून गुप्त राहण्याची व्यवस्था करायला सांगितली होती. यावरून टिळकांचा चाफेकर बंधु, प्लेग व चार्ल्स रँड असा तिहेरी सबंध असल्याचे दिसते. खरे तर हा प्लेगचा संताप व धर्माभिमानी विचारानी उडवून दिलेला भडका होता. पण आजच्या कोरोंना संदर्भात असे कार्यकारणभाव लागू होत नाही तर शासकीय निर्देश पाळणे गरजेचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

लेखक: बापू राऊत

3 comments:

  1. फारच उत्कृष्ट लेख लिहीला आहे साहेब.जुने संदर्भ नव्या रोग परिस्थितीत ठळंक होत आहेत.आज टिळकांनाच आदर्श मानणारं शासन आहे.राम भरोसे जनता आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. फरक इतकाच आहे की, तेव्हा आपण गुलाम होतो,आज स्वतंत्र आहोत.इतिहासातील चुकांपासुन बोध घेत आपण अनेक सुधारणा केल्या.त्याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही.अपेक्षा करुया कोरोना च्या या संकट समयी शासन कोणात्याही विचारसरणी असले तरी बहुजन हिताय बहुजन सुखाय या बुध्द वचना नुसारच कार्यवाही करून, आपल्या प्रत्येकाच्या सहकार्याने या भयावह परिस्थितीतुन बाहेर काढेल.
      भगत के डी...

      Delete