Pages

Tuesday, June 21, 2016

सत्तापर्वात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

२०१४ च्या निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी यांनी रंगविलेल्या गुजरात मडेलची भूरळ जनतेवर घालून भाजपाने केंद्रात सत्ता हस्तगत केली. राजकीय सत्तेची चव मोदीजी चाखत तर आहेतच परंतु त्याहीपेक्षा संघ हा सत्ताकारणाच्या शिर्षस्थानावर विराजमान होवून आपल्या योजना राबवीत आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात संघ दबूनच वावरत होता. संघावर वाजपेई यांचा वचक होता. परंतु नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात तसे नाही. संघावर मोदीचा नव्हे तर मोदीवर संघाचे पूर्ण वर्चस्व आहे. मोदी हे संघाने त्यांच्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीच्या भूमिकेमध्ये वावरत आहेत. संघ व त्यांच्या विविध शाखा आपापले ठरविलेले एजंडे पुढे रेटीत असताना दिसतात. त्यावर अंमलही होत आहे. मोदीच्या जाहीरनाम्यात नसलेले व संघाच्या पहिल्या पानावर असलेल्या मुद्यावरच देशात रोज घमासान होत आहे. यावर मोदीजी कसलीही प्रतिक्रिया न देता मौन राहणेच पसंत करतात. कदाचित त्यांच्या डावपेचाचा तो भाग असावा. मोदीजी परदेशात गेल्यावर खूप बढाया मारताना दिसतात मात्र देशात आल्यावर मौन राहतात. दोन वर्षानंतरही मोदी हे देशाचे नव्हे तर संघाचे, भाजपाचे व एका विशेष धर्माचे प्रधानमंत्री असल्यासारखे  वाटतात.