अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४ पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.