Pages

Saturday, August 18, 2012

आज आसाम जळतोय उद्या दुसरे काहीतरी जळेल!



कोणत्याही असंतोषाचे मूळ हे अपमान, अन्याय, पिळवणूक, आर्थिक व सामाजिक असमानतेत असते. आसाम या पूर्वेत्तर राज्यालाही याच समस्येने ग्रासले आहे. आसाम मधील संकटाचे लोन आता देशाच्या इतर राज्यात पसरले आहे. आसाम समस्येने मुंबई, लखनौ व इतर शहरात दंग्याचे स्वरूप धारण केले आहे. देशातील मुस्लीम समाज हा आसामात केवळ मुस्लीम सामाजावर अन्याय होत आहे, त्यांचे घरेदारे जाळन्यात येऊन त्यांना बेघर करण्यात येत आहे या अफवेवर आपले मनोगत बनवीत असून शहरी मुस्लीम संघटना देशात इतरत्र पसरलेल्या पूर्वोत्तर राज्यातील लोकामध्ये भीतीचे वातावरण तयार करीत आहेत. ही एक आखीव रणनीती असून मूळ बोडो आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार आहे.

आज आसाम अशांत आहे, उद्या सारा भारत देशच अशांत होण्याची चिन्हे आहेत कारण देशात अनेक प्रश्न आहेत व ते सोडविण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न होत नाहीत. आज हेच साधे दिसणारे प्रश्न उद्या उग्र रूप धारण करू शकतात. काय आहे ही आसाम समस्या?. आसाम मधील मूळ बोडो आदिवासी व बांगला  देशातून आसामात स्थलांतरित झालेले मुस्लीम यांच्यातील संघर्ष म्हणजे आसाम समस्या होय. आसाम समस्या आता केवळ त्या राज्याची आर्थिक, सामाजिक  तसेच राजकीय राहिली नसून ती आता धार्मिक बनत चालली आहे. देशातील कोणत्याही समस्येकडे दूरदृष्टीने न बघणे तसेच ज्वलंत समस्येतही राजकीय स्वार्थ बघणे हा राजकीय पक्षांची तिरकी चाल असल्यामुळे देशातील सगळ्याच  समस्या गुंतागुंतीच्या व न सुटना-या बनत आहेत. मुख्यत: आसाम समस्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे राज्य तथा केंद्र सरकारचा अदुरदर्शिपना, व्होट बेंक चे राजकारण व बांगला देशातील स्थलांतरित मुस्लिमांनी मुळ बोडो आदिवासीच्या जमिनीवर, त्यांच्या व्यवसायावर व आर्थिक क्षेत्रावर केलेला कब्जा होय.

१९७१ ला भारत सरकारने तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या बांगला मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिला. पाकिस्तान सरकार  बांगला देशी जनतेवर अत्याचार करीत होती. भारताचीही बांगला देशी लोकांप्रती सहानुभूती होती त्यामुळे अनेक बांगला देशी भारतात शरणार्थी बनून आलेत. दरम्यानच्या काळात पूर्व पाकिस्थान स्वतंत्र होऊन बांगला देश निर्माण झाला परंतु शरणार्थी बांगला देशी मुस्लीम परत आपल्या भूमीत न जाता भारतातच राहिले, भारत सरकारनेही त्यांना परत जाण्यासाठी दबाव आणला नाही. उलट त्यांचा देश स्वतंत्र झाल्यानंतरही मुस्लीम बांगला देशी लोकांचे भारतात येणे सुरूच राहिले व येथूनच आसाम सारख्या समस्यांची निर्मिती झाली. 

स्थालानातरीत मुस्लीम बांगला देशी लोकांमुळे आसामातील नव जिल्ह्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मूळ बोडो आदिवासी पेक्षा अधिक वाढली.  १९९१ मध्ये कोक्राझार जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या १०.५५ % होती ती वाढत २५% झाली. तर बोडो आदिवासींची लोकसंख्या ३९.५ टक्क्यावरून ३० टक्क्यापर्यंत खाली घसरली. धुब्री जिल्ह्यामध्ये १९४७ साली मुस्लिमांची लोकसंख्या १२% होती आज ती वाढून ९०% झाली आहे. स्थालानातरीत मुस्लीम समाजाने मूळ बोडो आदिवासींच्या जमिनी व त्यांच्या काम धंद्यावर आक्रमण करणे सुरु केले.राजकीय नेते व त्यांच्या पक्षांनी या समस्येला व्होट बेंकेच्या चष्म्यातून बघितल्यामुळे या पक्षांनी देशहित व स्थानीय बोडो आदिवासींच्या जीवनासी खेळ खेळला आहे. यातूनच मग असंतुष्ट आदिवासी तरुणांनी उल्फा, आसू, एआययुडीएफ या संघटनांची निर्मिती केली व त्याद्वारे संघर्ष चालू केला. १९८५ साली राजीव गांधीने आसाम समझोता केला. या समझोत्यानुसार बांगला देशी घुसखोरांना रोकण्यासाठी भिंत व तारेचे कुंण घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच आदिवासीच्या जमिनीच्या मालकीचे रक्षण करणे हेही अंतर्भूत होते. परंतु हे समझोते केवळ कागदोपत्रीच राहिले.

दरम्यानच्या काळात आसाम मध्ये मुस्लीम संघटना निर्माण झाल्या. या मुस्लीम संघटना मुख्यत: स्थलांतरित मुस्लिमांच्या होत्या. त्यापैकी बद्रुद्दीन अजमल या अब्जोपती मौलवीने स्थापन केलेली आसाम युनायटेड डेमोटीक्राटिक फ्रंट ही एक संघटना होय. या संघटनेने २००६  च्या विधानसभा निवडणुकीत १० सदस्य तर २०११ च्या निवडणुकीमध्ये १८ आमदार निवडून आणून आसाम मध्ये आपला दबदबा वाढविला. अजल्माल २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये धुब्री लोकसभा क्षेत्रातून सानासादेमध्ये निवडून गेले. बद्रुद्दीन अजमल  यांचा फ्रंट हा मुळात बांगला देशी मुसलीम लोकांच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आला. यात मूळ आसामी मुसलमानांना कसलेही स्थान नसते. मूळ आसामी मुस्लीम तसा राजकारणापासून दूरच आहेत. स्थलांतरीत मुस्लीमामानी मात्र अल्पसंख्यांकाचे सगळे फायदे घेत राजकीय व आर्थिक वर्चस्व प्राप्त केले आहे.  

आसाम संघर्षात मुस्लीम व मूळ बोडो आदिवासी या दोघांचेही नुकसान झाले आहे. दोन्ही समुदायाची घरेदारे नष्ट झाली आहेत. राजकीय इच्छाशक्तीवर आसामच्या प्रश्नांचे उत्तर अवलंबून आहे. सर्वानी मिळून तो सोडविला पाहिजे. अन्यथा हीच राजकीय इच्छाशक्ती एक दिवस  देशाच्या एकात्मेवर घाला घालेल.


                                     लेखक: बापू राऊत,
                                 (अध्यक्ष, मानव विकास संस्था)
 




No comments:

Post a Comment