Sunday, June 14, 2015

उजवीकडे झुकलेल्या नेते व विचारवंताचा चळवळीवरील प्रादुर्भाव

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील श्री रावसाहेब कसबे यांनी पुरोगामी चळवळीच्या ऱ्हासाचे कारण दलितांचा ब्राम्हणद्वेष असल्याचे सांगितले. रावसाहेब कसबे यांच्या या वाक्याला प्रसिध्दी माध्यमांनी लागोलाग प्रसिध्दी दिली. झी टीव्ही वर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके या तथाकथित विचारवंतांना चर्चा करण्यासाठी बोलाविन्यात आले. टीव्ही स्वर उद्घोषक जसे नेहमी नेहमी हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बळरत असतात. तसेच काहीसे उदय निरगुडकर नावाचे झी चे उद्घोषक समरसता समरसता नावाचा सतत होषा करीत होते. समता या शब्दावर समरसतेचे आक्रमण होते असे निरगुडकराना ठणकावून सांगण्याची हिंमत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके यांना झाली नाही. हे दुर्दैवच आहे. चर्चेमध्ये या तिघाही तथाकथित
विचारवंतांनी ब्राम्हणाची रि ओढत त्यांची बाजू घेतलेली दिसते. शेषराव मोरे तर चातुरवर्ण्य कधी अस्तित्वातच नव्हते असे म्हणाले. कसबे  यांनी, आता ब्राह्मणात शोषण करण्याची शक्तीच उरली नाही. उलट सुधारलेले लोकच आपापल्या जातीबांधवाचे शोषण करतात असे सांगत पुरोगामी व प्रतिगामी याची व्याख्याही त्यांनी बदलली. इतिहासातील घटनांची वारंवार उजळणी करीत त्याचा आदर्श मानने म्हणजे प्रतीगामितव असे ते म्हणतात. हरी नरके म्हणजे कालचे व आजचे चालते बोलते नारायणच आहेत. त्यांनी आपला नंबर वन चा शत्रू म्हणून मराठा सेवा संघ तर दुसरा बामसेफ यांना घोषितच केले आहे (पुणे येथे भरलेल्या पहिल्या सत्यशोधकीय संतसाहित्य संमेलनातील हरी नरके यांचे भाषण). आजपर्यंत बामसेफच्या विचारपीठावरून ब्राम्हनाविरुध्द बोलणारे हरी नरके असे एकदम बामसेफ विरोधी का झाले? हे नरकेनाच माहीत. बामसेफ ही समस्त फुले आंबेडकरी व बहुजन जनतेचे वैचारिक नेतृत्व करते वा नाही हा इथे चर्चेचा विषय नाही परंतु ह्या तीनही तथाकथित विचारवंतानी आता आपल्या विचाराची कुस बदललेली दिसत असून ते  राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या सुरात सूर मिळवू लागले आहेत. केवळ या तीघावरच खापर फोडणे योग्य नाही. तर आंबेडकरी चळवळीत असे अनेक नावे आहेत की ज्यांनी संघाच्या समरसता संमेलनात वा संघाच्या व्यासपीठावर जावून हजेरी लावत आपली मुळ भाषा बदललेली आहे. त्यापैकी अस्मितादर्शचे प्राणवायू गंगाधर पानतावणे, माझा बाप अन् आम्ही चे नरेंद्र जाधव, रामनाथ चव्हाण, पुण्याचे टेक्सास गायकवाड व भगवे वस्त्र घालून मिरविणारे राहुल बोधी यांची नावे घेता येतील. अशी अनेक नावे आहेत जे संघीय ढगावार स्वार झाले व स्वार होवू पाहत आहेत.    
वय वाढले व शरीरातील जोश कमी झाला की माणूस कोणाच्या तरी शरण जात असतो. कुटुंब पद्धतीमध्ये मुलांवर दरडावणारे आईवडील म्हातारपणात सून व मुलांना शरण जात असतात. आईवडिलांचे शरण जाणे हे नातेसहसबंधाच्या चौकटीचा भाग असतो. परंतु विपरीत विचाराला शरण जाणे हा प्रकार दोन बाबीतून घडत असतो. पहली गोष्ट यातून आपल्या स्वत:साठी काही तरी पदरात पाडून घ्यावयाचे असते. खडतरीच्या जीवनापेक्षा सुखमय जीवन जगण्याची लालसा निर्माण होवून ते मग सत्ताधारी व शोषनकर्त्यांची चापलुसी करण्याचा मार्ग पत्कारात असतात. तर दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत अंगी बाळगलेले व व्यक्त केलेले विचार खोटे वा अतिरंजित असल्याचा भास होतो तेव्हा. मग अशावेळेस विपरीत विचाराच्या छावणीत जावून ते स्वत:ला नवा आकार देवू पाहत असतात. परंतु दुसरी गोष्ट खचितच घडते, पहिल्या बाबीच्या हव्यासापोटीच माणूस सारेकाही करीत असतो. मग आपल्या पूर्वीच्या मूळ विचारासी द्रोह होत असेल तरी तो चालत असतो.  
समरसता मंचाच्या व्यासपीठावर जाणारे फुले आंबेडकरवादी व इतर चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या फुले आंबेडकरवादाच्या संकल्पनेत ब्राम्हनवाद संमत होईल अशी वैचारिक फेरमांडणी करताना दिसतात. समरसतेच्या पिठावर जावून गंगाधर पानतावणे यांनी सामाजिक व धार्मिक विषमतेचे संरक्षण व संवर्धन करण्यात ब्राम्हणी जातीचे हितसंबंध गुरफुटले आहे असे म्हणण्याचे धारिष्ट दाखविले नाही. संघाने सामाजिक समरसतेसाठी संघर्ष करावा असे त्यांनी समरसता यात्रेचे उद्घाटन करताना म्हटले होते. म्हणजे समते ऐवजी समरसता हा शब्दप्रयोग त्यांना मान्य दिसतो. दुसरे टेक्सास गायकवाड हे तर फुले आंबेडकर ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात लढले नाहीत तर घातक वृत्ती विरोधात लढले असा नवा इतिहास मांडतात. हरी नरके तर ब्राम्हण समाजातील विवेकी वर्ग म.फुल्यांच्या बाजूने उभा होता असे सांगून ब्राम्हनाविरुध्दचा आपला मुखवटा बाजूला काढून ब्राम्हणांची पाठ थोपटतात. तर फुले आंबेडकरी चळवळीला  मार्क्सवादी मुलामा देण्याचे काम कसबे यांनी केला आहे. (संदर्भ: फुले आंबेडकराचे ब्राम्हनीकरण – संघ भाजपाचे डावपेच: प्रा.रणजित परदेसी). आता त्यात संघविचार टाकून नवीन भेसळ निर्माण करण्याचा रावसाहेब कसबे यांचा प्रयत्न दिसतो.
फुले आंबेडकरांना मदत करणाऱ्या ब्राम्हण सुधारकांच्या कार्याचे अतिमुल्यांकन हे फुले आंबेडकरी छावणीतून होणे म्हणजे समताधीष्टीत समाजनिर्मितीसाठी शोषक व ब्राम्हणी व्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्याची धार बोथट करण्यासाठी स्वीकारण्यात येणारी नियोजित रणनीती होय. ब्राम्हण व्यक्तींनी फुले आंबेडकरांना मदत केलेल्या गोष्टी एवढी शेखी मिरवून सांगायचे की त्यातून शोषितांच्या मनात ब्राम्हण शोषकाविरुद्धचा असलेला विरोध वा क्रोध संपवून टाकायचा. हरी नरके वारंवार म.फुलेना शाळा काढण्यासाठी मदत करणाऱ्या सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, केशव भवाळकर या ब्राम्हनांची स्तुती करीत ब्राम्हण्याविरुद्धचा असलेला रोष कमी करण्याची भूमिका बजावतात. तर स्वत:ला आंबेडकरी म्हणविणारे काहीजन आंबेडकरांना मदत करणाऱ्या चित्रे, सहस्त्रबुद्धे, चिटणीस, टिपणीस  यांची भलामण करीत सामाजिक, धार्मिक व आर्थिक शोषकाविरुद्धची आंबेडकरी चळवळ बोथट करतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे ते संघाच्या ध्येयपूर्तीसाठी आड येणाऱ्या चळवळीत बुद्धिभेद निर्माण करून हिंदूराष्ट्र निर्मितीच्या कार्याला मदत करतात.
बहुजन समाजात संघीय ब्राम्हण शोषकांच्या शिरकावास हल्लीचे नेते अधिक कारणीभूत आहेत. आजपर्यंत फुले आंबेडकरी समाजाच्या परिघात संघाचा चंचुप्रवेश होवू नये म्हणून जे जे नेते धडपडत होते ते आज संघाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. समाजात संघाविषयी आत्मीयता निर्माण करण्यास व संघाची विचारधारा पसरविण्यास पुढाकार घेत आहेत. संघप्रणीत भाजपा या पक्षासोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे युती करने वा पाठिंबा देणे हे सुध्दा संघाच्या विचारधारेस फुले आंबेडकरी जनतेच्या मानसिकतेमध्ये प्रवेश करू देण्यास कारणीभूत ठरणारी बाब आहे. स्वातंत्र्य काळापासूनच राखीव जागाच्या माध्यमातून निवडून जाणारे प्रतिनिधी (आमदार व खासदार) हे फुले आंबेडकरी विचाराचे दावेदार म्हणून कार्य करणारे मुळीच नव्हते. त्यांचे कार्य केवळ त्या त्या पक्षाची व्होटबँक निर्माण करण्यापुर्ती मर्यादित होते. पूर्णत: उजवीकडे (जैसे थे व्यवस्थावादी) झुकलेले हे नेते वा विचारवंत जातीव्यवस्थेमुळे त्या त्या जातीचे रबरस्टॅम्प म्हणून वावरत असतात. दलित, आदिवासी व ओबीसी यांच्यातील स्वाभाविक भातृभावाचे जातीव्यवस्थापक जनसंघर्षासाठी मित्रभावात रुपांतर करण्याच्या कार्यात ही मंडळी नेहमी अडथळे आणीत असतात. एवढेच नव्हे तर समाजावरील अन्यायावार ते मूकदर्शकाची भूमिका घेतात. चेन्नई आयआयटी तील आंबेडकर पेरीयार विद्यार्थी युनियन वरील बंदी असो, मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती असो, भूमिहीन मजुरांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न, मागास मध्यमवर्गीय नोकरदाराचे प्रश्न असो, त्यांची भूमिका मुके व बहिरेपनाचीच असते. 
संघाचा इतका विरोध का? संघाची एवढी भीती कशासाठी? असे नेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असतील. संघ जर एवढा महाभयानक आहे तर आपले नेते व विचारवंत त्यांच्याकडे का झुकले? असाही प्रश्न निर्माण होतो. संघाची नीती त्यांचे दुसरे संघसंचालक गोलवरकर यांनी लिहिलेल्या “ Bunch of Thought” या पुस्तकात उघड होते. हा संघाचा प्रमाणभूत आदेशवजा ग्रंथ आहे. संघाचे कार्य केवळ हिंदू तरुणात मुस्लीम आणि ख्रिश्चन द्वेष निर्माण करून साधे हिंदूचे देशव्यापी संघटन बनवायचे नाही तर त्यांना मनुस्मुर्ती प्रणित वर्णव्यवस्था आणायची आहे. त्यांना स्वातंत्र्यापूर्वीचा हिंदूभारत निर्माण करावयाचा आहे. स्वातंत्र्यपूर्वीच्या भारत कसा होता?  माणुसकी व मानवतेला काळीमा फासणारा, शोषक व शोषितांचा भारत होता. माणूस माणसाचा गुलाम होता. स्त्रि म्हणजे भोग व दासी असे तिचे स्वरूप होते. शूद्र अतिशुद्राचे न्याय, हक्क व अधिकार नाकारणारा, एका समाज घटकाला अमर्याद अधिकार प्रदान करणारा होता. हिंदूधर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वण्याचे रक्षण ही संघाची पुढची वाटचाल असेल. या वाटचालीसाठी  धर्मग्रंथ प्रामाण्य म्हणजे वेद,पुराणे, स्मुर्त्या व धर्मशास्त्रे यात जे जे लिहिले आहे ते ते सर्वसत्य आहे असे मानणारी पिढी निर्माण करीत आहेत. हे काम सत्संग व साधू संताच्या माध्यमातून जोरकसपणे चालू आहे. हिंदू धर्म, देवीदेवता, मंदिरे बांधणे, पूजापाठ याचा प्रचार प्रसार करने व मुस्लीम ख्रिश्चनांचा परमोच्च द्वेष करने व धर्मशास्त्राचे पालन करने म्हणजे देशप्रेम अशी संघाची व्याख्या आहे. अंधश्रद्धेचा बिमोड म्हणजे हिंदू धर्मविरोधी कार्य हे संघाचे गुप्त सांगणे असते. बहुजन समाजाला गुलाम बनवून ठेवावे हे तर धर्मशास्त्रेच सांगतात. संघाची हुकुमशाही धार्मिक स्वरूपाची आहे. संघाचा सामाजिक व धर्म सुधारनावर विश्वास नसतो. इतिहासातील राजे हे त्यांचे आदर्श दैवते, हिंदुत्वाच्या टेंभ्यासाठी परधर्म द्वेष हे त्यांचे ब्रीद. संघ आता तर ते सत्ताधारकांच्या भूमिकेत आहे. त्यांच्या हिंदुत्ववादी कार्याची झलक रोजच बघायला मिळत आहे. दाभोळकर व  पानसरे यांना तर चक्रधर व तुकाराम यांच्या भेटीला पाठविलेच आहे.
फुले आंबेडकरांना अजूनही खरे अनुयायी मिळाले नाहीत. तसे असते तर त्यांचे विचार केवळ ग्रंथात बंदिस्त करून ठेवले नसते. मराठी ग्रंथकार सभेला म.फुल्यांनी उपस्थित राहावे म्हणून १३ मे १८८५ ला न्यायमूर्ती रानडे पत्र पाठवतात. पत्राच्या उत्तरात फुले म्हणतात, “ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जावून ज्याचे त्यास हक्क, त्याच्या खुशीने व उघडपणे देववत नाही व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाही. तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हास फसवून खाणाऱ्या  लोकांच्या थापावर फुलणार नाहीत. सारांश यांच्यात मिसळल्याने आम्ही शुद्रादी अतिशुद्राचा काहीएक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे”. म.फुलेंच्या या भूमिकेवरून संघ व ब्राम्हणाच्या सावलीत जाणाऱ्या हरी नरके यांना म.फुले यांचा अनुयायी म्हणावा काय? असा प्रश्न पडतो.
सामाजिक न्याय, लोकशाही व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आपल्या धडावर आपलेच डोके असावे लागते. आपले विचार व तत्वज्ञान अंमलात आणण्यासाठी स्वत:चे सामर्थ्य उभे करावे लागते. शोषकाच्या बळावर शोषितांच्या विकासाचा विचार अमलात कधीच येवू शकत नाही. शोषक आपल्याला पाठबळ द्यायला लागतो वा तसी इच्छा व्यक्त करतो. तेव्हा त्यात धोका असतो. भारतात अधिकतर शोषकच शोषितांच्या हिताचा विचार मांडू लागले आहेत. ही बनवाबनवी शोषितांच्या नेत्यामध्ये व विचारवंताच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे अधिकतर ते पुरोगामी मुखवटाधारक संघीयांच्या भुलथापेला बळी पडू लागले आहेत. शोषितातील शिक्षित मध्यमवर्गीय नोकरदार व कंत्राटदार हे शोषितातील ब्राम्हण तर आहेतच परंतु सार्वजनिकरित्या ते दुय्यम दर्जाचे ब्राम्हण बनण्याच्या रांगेत आहेत. या देशातील क्रांती फसण्याचे कारण सांगताना आ.ह.साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे, शोषणाला बळी पडलेल्या गोटातून आलेले व ज्यांना संधी मिळाली, ते लोक मागे वळून पाहत नाही. परिणामी चळवळ फसते. शोषितांचा संघर्ष कमकुवत होतो.
आजकाल शोषितामधून आलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना शोषक जवळ करू लागले आहेत. त्यांना सत्तेमध्ये वाटा देवू लागले. हा शोषितांच्या चळवळी नष्ट करण्याचा डाव आहे. या दृष्टीने फुले आंबेडकरी चळवळीचा इतिहास ताजा आहे. म.फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे काय झाले? त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचे काय झाले. ज्या ब्राम्हण्या विरुध्द फुलेंनी कठोर संघर्ष केला ते ब्राह्मण्य आजही शिल्लक आहे. हे कशामुळे झाले? तर फुलेना त्यांचे खरे अनुयायी न मिळण्याचा तो परिणाम आहे. बाबासाहेब म्हणतात, ब्राम्हनेतरांनी म.फुले यांची स्मुर्ती पूर्णपणे पुसून टाकली आहे, इतकेच नाही तर त्या वर्गाने निर्लज्जपणे म.फुलेंचा विश्वासघात केला आहे.
म. फुलेंच्या चळवळीचे जे हाल झाले त्याचीच पुनरावृत्ती आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी तर “आंबेडकरी चळवळ केव्हाच संपली” असे म्हटले. बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात जन्मले त्या समाजात जन्माला आलेला माणूस हा आंबेडकरवादी असतो वा तसे समजने हा मुर्खपणा आहे. तसे असते तर आंबेडकरी समाजातील नेते, विचारवंत व कार्यकर्ते हे आंबेडकरी विचाराला सोडून संघकार्यामध्ये रमले नसते. भाजपा, शिवसेना व कांग्रेस या पक्षात जावून त्यांनी आंबेडकरी विचाराविरोधी कृती केली नसती. असेच होत राहिले तर प्रकाश आंबेडकर जे बोलले तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
आज आंबेडकरी चळवळीचा कोणीही प्रवक्ता नाही. आंबेडकरी चळवळीच्या प्रवक्तेपदाचे कार्य कोणतीही संघटना व तिचा मुख्याधिकारी करू शकत नाही. स्वतंत्ररीत्या एखादी व्यक्ती चळवळीचा प्रवक्ताही बनू शकत नाही. कारण आंबेडकरी समाज हा अंतर्गत फार विरोधाभाषी आहे. काटछाट प्रवृत्तीने ग्रासलेला आहे. एकेमेकांचा विश्वास हरविलेला आहे. व्यक्तिगत व संघटनात्मक द्वेष ठासून भरलेला. त्यामुळेच ही चळवळ दिशाहीन व सैरभैर अशी झाली आहे. केवळ नामसादृष्य (कामापुरती) चळवळीचे नाव जिवंत दिसणे हे मृत थडग्यासारखेच असते. मा.कांशीराम यांनी ८०-९० च्या दशकात जी राजकीय चळवळ उभी केली ती मिशनरी आंबेडकरी कर्मचाऱ्यांच्या अर्थावर उभी होती. आज कोणत्याही आंबेडकरी राजकीय गटाचा आर्थिक पाया मजबूत नाही. अर्थाशिवाय राजकारण चालत नाही. मग हे गटतट कोणाच्या अर्थावर राजकारण करताहेत? अशा राजकारणाची दिशा काय? तज्ज्ञ व विचारवंताचा दुष्काळ असलेल्या चळवळीचे भवितव्य शून्यवताशिवाय दुसरे काय असू शकते?. म्हणून महापुरुषांच्या विचारावर नवनिर्मिती घडविणे हे स्वप्न दृश्यासारखेच झाले आहे. यातून सावरायचे मार्ग आंबेडकरी जनतेने व विषेशत: तरुण वर्गाने शोधले पाहिजेत.

बापू राऊत

९२२४३४३४६४ 

No comments:

Post a Comment