हिंदू समाज धर्मग्रस्त
तर होताच पण त्याहीपेक्षा धर्माचरणाने भयंकर विकृत रूप धारण केले होते. स्वधर्मीयाबद्दलची
सहिष्णुता सुद्धा लोप पावली होती. मानवतेला काळिमा फासणार्या गोष्टी होत होत्या. अन्याय
व अत्याचाराच्या पर्वात समाजाचा काही भाग जगत होता. अशा समाजांचे अधिकार गोठविण्यात
आले होते. अनिष्ट रूढीना धर्म व शास्त्राची मान्यता लाभली होती. त्याहीपेक्षा राजकारण
करणारे पूर्वगौरववादी व कर्मठ असल्यामुळे अत्यंत अमानवीय अशा वाईट प्रथाही त्यांच्यासाठी
गौरवाच्या झाल्या होत्या. सतीची चाल, विधवावरील जुलूम, बालविवाह, मुलींची विक्री, केशवपन, मूर्तिपूजेचे स्तोम, स्त्रीशिक्षणावर बंदी, ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाच्या शिक्षणावर बंधने, अस्पृश्य वर्गाचे
गावकूसाबाहेरचे दरिद्री जीवन आणि अंधश्रध्दांच्या महापुराने मानवी जीवनाला विळखा घातला
होता. ह्या अमानवीय प्रथा व पध्दतीचा विरोध करण्यासाठी सुधारकांचा गट पुढे आला होता.
या सुधारकांनी धर्मशास्त्रातील कलमांची उकल करून त्यातील अंतर्भाव लोकास सांगण्यास
सुरू केले. त्यांनी इंग्रज सरकारकडे सुधारणासाठी नवे कायदे करण्याची मागणी केली. परंतु
या सुधारकांना विरोध करण्यासाठी काही दुर्धारक समोर आले होते. या दुर्धारकांचे नायक
होते विष्णुशास्त्री चिपळूणकर व बाळ गंगाधर टिळक.
जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, केशवचंद्र सेन, राजा राममोहन रॉय, लोकहितवादी, न्या. रानडे, नामदार गोखले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. भांडारकर, नारायण चंदावरकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यासारखे सुधारक व
विचारवंत सुधारणेसाठी समोर आले. हे सुधारक मुख्यत: ब्राह्मण समाजातील होते. या सुधारक
विचारवतांच्या सुधारणांचा परीघ हा त्यांच्या ब्राह्मण जातीपुरताच सीमित होता. आपल्या
समाजात सुधारणांची चक्रे फिरविताना त्यांना दुर्धारक जहालाकडून मारसुध्दा खावा लागला.
परंतु या सुधारकांच्या कथनी व करणीमध्ये कधीच एकवाक्यता दिसत नव्हती. त्यांची नैतिक
मूल्ये ही केवळ दुसर्यांना सांगण्यासाठी होती परंतु जेव्हा स्वत:च्या वैयक्तिक जीवनात
आचरण करण्याची पाळी येत असे तेव्हा ते आपल्या विचाराच्या अगदी उलट वागत. त्यामुळे जनमानसात
या सुधारकांनी आपली विश्वसनियता गमावली होती. त्यामुळे दुर्धारकापुढे त्यांच्या शब्दांची
धार एकदम बोथट होत असे. अविश्वसनीयतेमुळे सुधारकांना अन्याय व वाईट चालीरीती विरोधात
जनचळवळ उभारता आली नाही. केवळ कागदोपत्री विनंती अर्ज करून आपले सुधारकी कार्य करीत.
त्यामुळे समाजसुधारणावर पाहिजे तसा परिणाम
होत नव्हता. स्वत:ला सुधारक म्हणविणार्यांना आपल्या समाजाच्या रिती
व प्रथाविरुध्द जाण्याचे धाडस होत नव्हते. त्यामुळे हे सुधारक केवळ बोलके, कर्मकांडी व नैतिकतेचा झोला पांघरणारे पुतळे होते असेच म्हणावे
लागते.
सुधारकांच्या यादीतील
पहिले नाव लोकहितवादी यांचे. त्यांनी आपल्या शतपत्रातून कर्मकांडी व्यवस्थेवर
प्रहार केले. त्यांना उच्चप्रतीचे सुधारक म्हटल्यास वावगे होणार नाही. डॉ. आंबेडकरांनी
त्यांची शतपत्रे मुकनायक मध्ये परत प्रकाशित केली
होती. लोकहितवादीनी आपला मुलगा शिक्षणासाठी विदेशी पाठविला होता.
विदेशगमन करणे हे धर्मविरोधी कार्य आहे, असे सनातनी ब्राह्मणांनी
सांगताच त्यांनी शरणचिठ्ठी लिहून देवून प्रायश्चित घेतले. दुसर्या प्रसंगी, ब्रिटिश सरकारने त्यांना काही कामासाठी विलायतेस जाल काय? म्हणून विचारना केली असता, इंग्लंडला गेल्यास माझी जात माझ्यावर बहिष्कार टाकेल असे म्हणून
मिळालेले निमंत्रण प्रायश्चिताच्या भीतीने नाकारले. तिसर्या प्रसंगी, याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे त्यांनी आपल्या ६ व ८ वर्षाच्या
नातवंडाचे लग्न लावून दिले. अशा या कागदावरच्या सुधारकांना सुधारकांचे अग्रणी म्हटल्या
गेले.
दुसरे सुधारक, महादेव गोविंद रानडे. हे न्यायमूर्ती पदावर
होते. यांची बहीण अचानक विधवा झाली. मित्र म्हणून म. ज्योतीराव फुले रानडेस भेटण्यास
गेले. विचारपूस व सांत्वन करून झाल्यावर ज्योतीराव त्यांना म्हणाले, आपण सुधारक आहात. लोकांना जो उपदेश देताय तो प्रत्यक्षात येण्यासाठी
आपण आपल्या बहिणीचा पुनर्विवाह करावा. यावर रानडे म्हणाले, जर विधवा बहिणीचा पुनर्विवाह केला तर माझ्या वडिलांना अपार दू:ख
होईल आणि पुण्यातील ब्राह्मण माझ्यावर बहिष्कार टाकतील. ज्योतीराव रागावून त्यांना
म्हणाले, रावसाहेब मग सुधारकांचे ढोंग तरी कशाला करता? दुसर्या घटनेत, रानडे यांनी ३२ व्या
वर्षी एका ११ वर्ष वयाच्या कुमारिकेशी विवाह केला. हा सामाजिक सुधारणाशी केलेला विश्वासघात
आहे असे सांगून ज्योतीरावांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
तिसर्या घटनेत महादेव
रानडे न्यायाधीश असताना त्यांच्याकडे सत्यशोधक समाजातर्फे लावण्यात आलेले लग्न हे बेकायदेशीर
असून लग्न लावणे हा ब्राम्हण पुरोहिताचाच खास हक्क आहे. म्हणून पुरोहितानी लग्न लावले नाही तरी त्यास नुकसान भरपाई दिली पाहिजे.
असा निकाल त्यांच्यापुढे आलेल्या केसच्या संदर्भात पुरोहिताच्या बाजूने दिला. तर चौथ्या
घटनेत म्हणजेच पंचहौद प्रकरणात त्यांनी ख्रिश्चन चर्चमध्ये चहा ग्रहण केला नाही, फक्त कप हातात
पकडला होता. तरी धर्ममार्तंडांनी धर्मभ्रष्ट झाल्याचे सांगताच त्यांच्यापुढे मान
तुकवून प्रायश्चित्य घेतले. यावरून यांना समाजसुधारक तरी कसे म्हणावे? हा मोठा प्रश्न पडतो.
गोपाळ गणेश आगरकर यांनी एक व्यथा मांडली, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणार्या पत्राकडून (केसरी व
मराठा) होत असलेल्या शिव्यांचा व शापांचा प्रचंड भडिमार आपणाला व पत्नीलाही अखंड सोसावा
लागला. आगरकराचा हा रोख पुर्णपणे टिळकावर होता. आई मरण पावल्यावर आगरकरांनी डोक्यावरील
केस व मिशी कापण्यास नकार दिला. परंतु त्यांनी आपल्या मुलाची मुंज करवून घेत
धर्मशास्त्रापणे वागून सुधारणेच्या तत्वाशी प्रतारणा केली.
प्रार्थना समाजाचे केशवचंद्र सेन हे बंगाली बाबू सुधारक होते. प्रार्थना
समाजाच्या कार्यासाठी महाराष्ट्रात होते. विधवांच्या केशवपणावर कायद्याने बंदी आणावी
यासाठी कार्यरत होते. आपली भाषणे व लिखाणातून ते बालविवाहाचा धिक्कार करून कायद्याने
विवाहाचे वय निहित करावे अशी सरकारकडे मागणी करीत. तथापि त्यांनी आपल्याच तत्वाला काळीमा
फासून संमती वयापेक्षा लहान असलेल्या स्वत:च्या मुलीचा विवाह कूच बिहार संस्थानचा वारसदार
असलेल्या राजपूत्रासी मोठ्या थाटामाटात लावून दिला. पंडिता रमाबाई ह्या केशवचंद्र सेन
सोबत काम करीत होत्या. राष्ट्रीय कॉंग्रेस अंतर्गत “सामाजिक परिषदेच्या” भर सभेत रमाबाईनी
केशवचंद्र सेन यांना प्रथम आपण सुधरा आणि मगच लोकांना सांगा, असा मोलाचा सल्ला
दिला होता.
न्यायाधीश असलेले नारायण तेलंग हे सुध्दा समाजसुधारक म्हणवून घेत होते.
त्यांनी रूढ प्रथेविरुध्द वागून अरिष्ट ओढवून घ्यायला नको या भावनेने आपल्या केवळ ८
वर्षाच्या कन्येचा विवाह लावून दिला. धोंडो केशव कर्वे यांनी शिक्षण क्षेत्रात
बरेच काम केले. परंतु विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या बहिणीला कर्वेच्या स्त्रीशिक्षण
संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी कर्वे यांना संपर्क केला तेव्हा, “मराठ्यांच्या
मुलींना वस्तीगृहात प्रवेश देण्याचा काळ अद्यपी आला नाही” असे सांगून त्यांनी विठ्ठल
शिंदेची बोळवण केली होती. नावापुरती “सुधारक” नावाची पट्टी आपल्या नावासमोर लावली
म्हणजे कोणीही सुधारक होत नाही. त्यासाठी मनाची, जिद्दीची व तत्वनिष्ठेचा खंबीरपणा असावा लागतो
हे सुधारक म्हणविणार्यांच्या वरील कृतीतून दिसून येते.
या सुधारकांचा त्यांच्या जातीनी व धर्ममार्तंडानी खूप छळ केला हे मान्य पण त्यापैकी
कोणामध्येही साक्रेटिस, कार्पोनिक्स आणि प्लेटो होण्याची धमक नव्हती हे सुध्दा तेवढेच
सत्य होय. याच सुधारकांच्या समकालीन असलेले म.ज्योतिराव फुले यांचे गुणधर्म हे सुधारकांचे
नव्हे तर क्रांतिकारकांचे होते. ते व्यवस्थापरिवर्तनाचे अग्रदूत होते. स्वत:ला मारण्यास
आलेल्या मारेकर्यांचे ह्रदयपरिवर्तन करून त्यांना आयुष्यभर आपले अंगरक्षक व अनुयायी
बनविणारा दूसरा महापुरुष जगात कोठेही मिळणे नाही. अपमान व हेळसांड सहन करूनही आपल्या
तत्वासाठी तसूभरही मागे न हटणारा हा ज्योतिबा खरा क्रांतिबा होता.
लेखक:बापू राऊत
(बाळ गंगाधर टिळक यांचे वरील अप्रकाशित पुस्तकातील एक लेख)
हा लेख वाचल्यावर एक त्रुटी अशी लक्षात आली की, या ठिकाणी जिथे जिथे सुधारकांवर टीका केली आहे तिथे तिथे लेखकाने संदर्भ द्यायला हवे होते. ते दिले असते लेखाला आणखी वजन (authenticity) प्राप्त झाले असते. असो. एकंदरीत लेख मात्र विचार करण्यासारखा आहे, हे नक्की. लेखकाने हा विचार धाडसाने मांडलेला आहे त्याबद्दल त्याचे आभार.
ReplyDeleteसर, वरील लेख माझ्या प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील आहे. सन्दर्भ बुक पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहे. असे सन्दर्भ लेखाच्या प्रत्येक पेजवर देने गरजेचे आहे का? मार्गदर्शन करावे
Deleteपुस्तकात असेल पण असा सुटा लेख लिहिला असेल तर मात्र नक्कीच संदर्भ द्यायची गरज आहे. कारण ज्या कुणाला हा लेख फॉरवर्ड करायचा असेल त्याला ते संदर्भ लेखाला वजन प्राप्त होण्यासाठी देणे आवश्यक ठरते. त्यावरून तो प्रतिवादही करू शकतो.
Deleteमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद काबरे साहेब
Deleteबरीच दुर्मिळ माहिती एका लेखात आहे. वाचकांना याचा फायदा होईल.जेथून माहिती मिळाली ते संदर्भ देऊन या लेखाचे संशोधन मूल्य खुप वाढवता येईल.
ReplyDeleteधन्यवाद साहेब
ReplyDelete