Tuesday, April 9, 2024

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

 


स्वातंत्र्यपूर्व काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते. प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे  लोक राहत होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही. 

स्वातंत्र्यापूर्व भारताची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी स्वातंत्र्योंतर काळात संविधानसभेची निर्मिती करून संविधान निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या मसुदा समितीकडे सोपविण्यात आले. आपल्या संविधानाचे सार हे संविधानाच्या उद्देशिकेत बघायला मिळते. त्याची सुरुवातच, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही या शब्दांपासून सुरु होते. आधुनिक भारताच्या निर्मितीची मुळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा ब्रिटीश काळात सहभाग असलेल्या विविध कृत्यातून दिसतो. २७ जानेवारी १९१९ ला साउथबरो समितीला दिलेल्या साक्षेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते कि, लोकप्रिय शासनाचा अर्थ केवळ लोकांकरिता शासन नव्हे, तर लोकांचे शासन असा आहे. लोकप्रिय शासनाकरिता मताधिकार व निर्वाचन क्षेत्राची व्यवस्था करून लोकांच्या विचारांच्या प्रतिनिधित्वाची व्यवस्था करावयास हवी. भारतीय राज्यघटना लिहून देशाचा विकास, अखंडता व एकता टिकवून देशाला विशेष योगदान देत सर्व नागरिकांना मुलभूत हक्क व न्यायाची हमी दिली. कायद्यापुढे सर्व नागरिक समान असण्याच्या तत्वाबरोबरच एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हि भारतीय राज्यघटनेची विशेषता आहे.

कामगारांचा विकास हे ध्येय: बाबासाहेबांनी कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी १५ आगस्ट १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. शासनाने मुंबई विधानसभेत मांडलेल्या औद्योगिक विवाद विधेयकाला मजुरासाठीचा काळा कायदा असे संबोधून त्यास कडाडून विरोध केला होता. हे विधेयक कामगारांचे नागरिक स्वातंत्र्य हनन करेल असे म्हटले होते. विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांनी ७ नोव्हेंबर १९३८ ला एक दिवसाचा लाक्षणिक संप घडवून आणला. शासकीय कर्मचार्यांना महागाई निर्देशकाच्या आधारावर जो महागाई भत्ता मिळतो त्या योजनेची सुरुवात डॉ. आंबेडकरांनी केली होती. सेवायोजन कार्यालयाची स्थापना करताच अनेक तरुणांना नोकऱ्या मिळण्यास प्रारंभ झाला होता. 

डॉ. आंबेडकर हे स्त्रियांचे कैवार घेणारे नेते होते. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी आणलेले हिंदू कोड बिल पास होण्याची शक्यता मावळल्या नंतर त्यांनी तात्काळ आपल्या कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मजूर मंत्री असताना स्त्रियांना कारखान्यामध्ये रात्रकाम करण्यावर बंदी आणली होती. स्त्रियांच्या प्रसूती काळात विशेष भरपगारी सवलत मिळावी यासाठी ते झटले व यशस्वीही झाले. एवढ्यावरच न थांबता महिला-पुरुष कामगारांना समान वेतनाचीही मागणी करीत त्यांनी कामगारांच्या कामाचे तास कमी करण्यासाठी १९३४ च्या कारखाना कायद्यात सुधारणा घडवून आणली. स्वातंत्र्योत्तर काळात कायदामंत्री असताना त्यांनी अनेक कायदे करून कामगारांना न्याय मिळवून दिला.  

आर्थिक विकासासाठी औद्योगिक व जलनितीचे योगदान : बाबासाहेब आंबेडकरांनी शाश्वत विकासाची ( Sustainable Development) कल्पना सर्वप्रथम १९४२-४६ च्या दरम्यान मांडली होती. देशात औद्योगीकरण हे महत्वाची गरज असून ती देशातील संसाधनावर आधारित असली पाहिजे असे त्यांचे मत होते.  ह्या मागील त्यांचा मुख्य उद्देश येथील शेतकरी, कामगार, महिला, युवा व मध्यम वर्गाचे जीवनमान उंचावण्याची संधी आपल्या देशातच निर्माण व्हावी हे होते. त्यापैकी विद्युत निर्मिती प्रकल्प हा राष्ट्रीय धोरणाचा एक भाग होता. स्वस्त व मुबलक विद्युत असल्याशिवाय औद्योगिकीकरण यशस्वी होवू शकणार नाही हे त्यांचे ठाम मत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ विचार मांडले नाहीत तर महत्वाकांक्षी असे बहुउद्देशीय प्रकल्प उभारले. त्यापैकी दामोदर नदी खोरे प्रकल्प त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाला होता, तर हिराकुंड प्रकल्प, कोसी व सोने नदी खोरे प्रकल्प योजनांचे प्रारूप त्यांनी तयार केले होते. ३ जानेवारी १९४५ रोजी कोलकाता येथे बोलताना आंबेडकर म्हणाले कि, दामोदर प्रकल्प हा बहुउद्देशीय असून आमचा उद्देश केवळ पुराची समस्या सोडविण्यापुरता मर्यादित नसून सिंचन, विद्युत निर्मिती व जलवाहतूक हा आहे.. विद्युत(ऊर्जा) वाटपासाठी ग्रिड पद्धतीचा विचार त्यांनीच मांडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकंरानीच १९४५ ला केंद्रीय जल आयोगाची स्थापणा केली. भारतीय  रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. १९२५ साली त्यांनी लिहिलेल्या दि प्रॉब्लेम ऑफ रुपी –इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" हा ग्रंथ आधारभूत होता. डॉ. आंबेडकरांच्या नियोजन व दूरदृष्टीतत्त्वावरच आजच्या धोरणांची  व्यवस्था उत्क्रांत झाली, असं म्हणता येईल. 

शेतकरी व शेती योजना: भारतीय  शेतकऱ्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात विशेष कळवळ होती. हे त्यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनातून स्पष्ट होते. शेतकऱ्यांची खोतांच्या दास्यातून मुक्तता  करण्यासाठी १४ एप्रिल १९२९ चिपळूण येथे शेतकरी परिषद आयोजित केली होती. खोती पध्दत नष्ट करण्यासाठी त्यांनी १७ सप्टेंबर १९३७ साली मुंबई विधीमंडळात कायदा विधेयक मांडले. त्यांच्याच नेतृत्वाखाली १० जानेवारी १९३८ रोजी २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधीमंडळावर नेण्यात आला होता. शेती हा राष्ट्रीय उद्योग असावा हि अभिनव संकल्पना त्यांनी मांडली होती. शेती सरकारच्या अधीन राहून शेतीच्या लागवडीचा सर्व खर्च सरकार उचलेल व पिक आल्यानंतर शेतकरी सरकारचा लागलेला खर्च परत करतील अशी ती योजना होती. परंतु दुर्दैव्याने विरोधामुळे राज्यघटनेत तिचा समावेश होवू शकला नाही. त्याचे दुष्परिणाम आज शेतकऱ्यांच्या असंतोषात बघायला मिळू लागले आहेत. डॉ. आंबेडकरांची संकल्पना मान्य झाली असती तर धान्यावरील एमएसपी सारखे प्रश्न उद्भवले नसते कारण सरकारचा खर्च निघण्यासाठी सरकारनेच उत्पादन मूल्य ठरविले असते. डॉ. आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर देशातील मोठे व पायाभूत उद्योग हे केवळ राष्ट्राच्या मालकीची असली पाहिजे हि त्यांची मुख्य धारणा होती.  आंबेडकरांच्या संकल्पनेचा हा मोठा दूरदर्शीपणा होता असेच मानावे लागेल.. 

राष्ट्रीय एकतेसाठी अस्सल भारतीय धर्माचा स्वीकार 

धर्मचिकित्सा व्हायलाच हवी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील ब्रीद होते. बाबासाहेब ज्या धर्मात होते त्या धर्माची त्यांनी परखड चिकित्सा केली. त्यांना जेव्हा वाटले कि, हा धर्म सर्वसामान्य जनतेचे हित व त्यांच्या सर्वांग विकास  विरोधी आहे, तेव्हा त्यांनी आपला जन्मदत्त धर्म सोडून देण्याचा संकल्प जाहीर केला. त्यांनी इतर धर्माचा अभ्यास व चिंतन करणे सुरु केले. चिकीत्सेंअंती त्यांनी या देशातीलच एका विवेकनिष्ठ व विज्ञानवादी धर्माची निवड केली आणि भारताला सृजनशिलतेच्या वाटेवर आणून सोडले. ज्या धर्मानी भंपकतेच्या जोरावर इतरांवर काबू करण्याची प्रक्रिया राबविली त्याच्या अगदी विरोधी  करुणेच्या व  हृदय परिवर्तनाच्या मार्गातून लोकांची मने जिंकणाऱ्या बौध्द धर्माची निवड केली. ज्या धर्माने जगाला शांती व अहिंसेच्या मार्गाने समृध्द केले त्या धर्माचा स्वीकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला वैश्विकतेकडे  नेण्याचा प्रयत्न केला. अशा या महामानवाची आज जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जातेय, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपणही अभिवादन करुया.   

 लेखक: बापू राऊत 


8 comments:

  1. खूप छान बापू...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर

      Delete
  2. Maker of Modern India असे एक पुस्तक लिहिलेल आहे. त्यात सविस्तर माहिती दिली आहे. ती वाचावी.

    ReplyDelete
    Replies
    1. Maker of Modern India हे पुस्तक वाचले आहे साहेब

      Delete
  3. छान लेख आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राया बद्दल धन्यवाद सर

      Delete
  4. छान लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राया बद्दल धन्यवाद सर

      Delete