लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका
तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बघा. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज
पक्ष या पक्षांच्या राजकीय ताकदीचा अंदाज झालेल्या या निवडणूक निकालावरून दिसतो.
रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. बहूजन समाजाचे
मताचे राजकारण करून आपली स्वत:ची झोळी भरणारे आठवले, गवई, कवाडे, मायावती व आंबेडकर
या सर्वांना बहुजन जनतेने चांगलाच धडा शिकविलेला दिसतो. त्यामुळे एकूणच
आंबेडकरवादी राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आंबेडकरी जनतेने वर्षानुवर्षे जे स्वप्न बघितले होते ते एम.आय.एम
सारख्या नवीन पक्षाने मुस्लीम समाजामध्ये स्वाभिमान व आत्मभान जागृत करून पहिल्या
निवडणुकामध्येच विधानसभा व महानगरपालीकामध्ये प्रवेश करून दाखवून दिले.
दलित चळवळीची झालेली वाताहत फार मोठी लक्षणीय आहे. २०१४
सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दलितांच्या दीड कोटी मतांपैकी केवळ २० लाख मते आंबेडकरी
पक्षांना प्राप्त झाले. त्यापैकी रिपाईचे विविध गटाना एकूण ८ लाख तर बसपाला १२ लाख
मते मिळाली. नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये रामदास आठवले यांनी
प्रचार करून सुध्दा आंबेडकरी मतदारांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. आठवलेनी
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उभे केलेल्या ११ उमेदवारांना केवळ ९६१ मते मिळाली. तर
नवी मुंबई वगळता बसपाला औरंगाबाद महापालीकामध्ये ५ उमेदवार व वाडी नगरपालीकामध्ये
७ उमेदवार निवडून आणता आले. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या
उमेदवारांकडेही लोकांनी पाठ फिरविली. हा आंबेडकरी जनतेचा नेत्यांना सरळ सरळ इशारा
आहे.
आंबेडकरांनी या देशात मागास जनतेला एका मोठ्या राजकीय
शक्तीच्या स्वरुपात बघण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्यांनी रिपब्लिकन
पक्षाची मोठी संकल्पना समोर ठेवली. परंतु रिपब्लिकन नेते कांग्रेसच्या षडयंत्राला बळी पडले व
त्यानंतरच्या आंबेडकरी राजकारणाचा सारीपाट चमचा युगात परिवर्तीत झाला. फरक एवढाच
की या चमच्यांनी आता कांग्रेस व राष्ट्रवादी सारख्या पक्षाऐवजी भाजपा व शिवसेना
सारख्या पक्षाकडे हात जोडणे व पाया पडणे चालू केले. मात्र खंबीरपने निवडणुकांच्या
रिंगणात पाय रोवलेल्या बसपा सोबत युती करणे रिपब्लिकन पक्षाच्या गटाधीपतीना कमीपणा
वाटतो. मागास जातीमध्ये आंतरिक कलह अधिक माजला असून सर्व जातीना एकत्र ठेवण्याचे
कसब आता कोणात्याही आंबेडकरी नेत्यामध्ये (मायावतीमध्ये सुध्दा ) उरले नसल्याचे
दिसते. त्याचा फायदा आता भाजपा सारखे पक्ष घ्यायला लागले आहेत.
बहुजन समाज पक्षाने हरियाणा, महाराष्ट्र व दिल्ली मध्ये
विधानसभा निवडणुका लढविल्या. यात बसपाला हरियाणामध्ये केवळ एक जागा मिळाली. तर
महाराष्ट्र व दिल्ली मध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्र हा आंबेडकरी
चळवळीचा बालेकिल्ला परंतु या बालेकिल्ल्यामध्ये बसपाला अजूनपर्यंत घुसखोरी करता
आली नाही. मागील २० वर्षापासून महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे अध्यक्षपद
ज्यांच्याकडे आहे त्यांच्या कार्यकाळात बसपाचा ग्राफ (आलेख) सतत खाली घसरत
असतानाही त्या व्यक्तीलाच परत परत अध्यक्षपद दिल्या जाते. महाराष्ट्रात मासबेस व
संघटनशैली असलेल्या डाक्टर सुरेश माने या नेत्याला काही मर्यादित काळापुरतेच महाराष्ट्राचे
नेतृत्व देवून लगेचच त्यांची उचलबांगडी केल्या जाते. यावरून मायावतींनी
महाराष्ट्रात बसपाला केवळ नामधारी पक्ष म्हणून जिवंत ठेवायची रणनीती आखलेली दिसते.
असे असेल तर मायावतींनी महाराष्ट्रीय आंबेडकरी जनतेवर राजकीय निष्क्रियतेचा आरोप
ठेवणे तरी बंद केले पाहिजे.
देशातील आंबेडकरी राजकारण हे केवळ एका आंबेडकरी पक्षापुरते
मर्यादित राहिले नसून विविध राज्यात वेगवेगळे गट व पक्ष आपले नामधारी अस्तित्व
कायम राखण्यास कार्यरत दिसतात. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यात आंबेडकरी राजकारण
हे एक नामधारी अस्तित्वासाठी धडपडत आहे. या
गटातटाच्या राजकारणात कोणीही यशाची पायरी चढू शकणार नाहीत. आंबेडकरी जनतेची
राजकीय उर्जा अशी व्याहात चाललेली आहे. मागास समाजाला त्याचे अखिल भारतीय नेतृत्व
मिळू शकत नाही हे एक दुर्दव्यच आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर आंबेडकरी नेत्यांची जनतेमध्ये
असलेली पत पूर्णत: घसरलेली आहे. याला रामदास आठवले सारखे स्वाभिमानशून्य व
कर्तृत्वहीन नेते जसे जबाबदार आहेत तसेच केवळ बाबासाहेबासी असलेले रक्ताचे नाते
सांगून आपली कार्यप्रवणता व जनताभिमुकता न दाखवता जनतेनी आम्हाला स्वीकारले पाहिजे
हा प्रकाश आंबेडकर यांचा हेकेखोरपणाही तेवढाच कारणीभूत आहे. या नेत्यांची जशी
जनतेमधील पत घसरली तसीच त्यांची इतर पक्षामध्ये असणारी वट पार किनारी लागली आहे.
जनतेचा पाठिंबा नसलेल्या एखाद्या नेत्यांची अवस्था “ना घरका ना घाटका” जशी होते
तसीच या रिपब्लिकन नेत्यांची झाली आहे.
नेते जसे स्वभिमान विसरले तसीच त्यांची री गल्लोगल्ली
जयंत्या व महोत्सव भरविणाऱ्या विविध मंडळाच्या गलीतगात्र अध्यक्ष व संयोजकांनी
ओढलेली दिसते. हि महाशय मंडळी जयंत्या व उत्सव साजरे करण्यासाठी विविध राजकीय
पक्षाकडून हजारात व लाखात पैसे घेतात. या मोबदल्यात निवडणुकांच्या काळात ते त्या
त्या राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेवून आंबेडकरी मतदारांना मत देण्याचे आवाहन
करतात. अशाप्रकारे निवडणुकीत आंबेडकरी पक्षाच्या मतांची हे नवीन भाट पळवापळवी करीत
असताना दिसतात. हे नवीन भाट भविष्यात आंबेडकरी राजकीय चळवळीचे अतोनात नुकसान
करतील.
रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्षाची पडझड
व दारुण अवस्था झालेली असताना कांग्रेस व भाजपा हे पक्ष कसे चूप बसतील? त्यांनी
डाक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच आहेत असे सांगून त्यांच्यावर आपला हक्क
प्रस्थापित करीत आहेत. आर.एस.एस चे लोक तर आंबेडकर व संघाचे विचार हे एकच आहेत असे
बडबडू लागले आहेत. पाचजन्य व आर्गनायझर मध्ये आंबेडकरावर लेख लिहून व चर्चासत्रे
आयोजित करून ते आमचेच कसे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नागपूर-कामठी परिसरातला सुलेखा कुंभारे कृत बहुजन
रिपब्लिकन एकता मंच आणि भाजपा यांची नेहमीच सलगी होत असते. वाजपेई विरोधात मत देवून सरकार पाडणारे रामविलास
पासवान, संघाला व भाजपाला नेहमी टीकेचे लक्ष्य करीत आलेले उदित राज आज कोणत्या
आंबेडकरी राजकीय चारित्र्याचा ठेवा जनतेसमोर मांडीत आहेत? या नेत्यांच्या
तत्वशुन्य कार्यामुळे केवळ सामान्यजनच नाही तर आंबेडकरी युवा तरुणाबरोबरच
बुद्धिवादी विचार करणारा गटही यांच्या चक्रभेदी राजकारणामुळे चक्रावून गेला आहे.
गरीबांचा शक्तिशाली पक्ष राहिला तर
गरिबांना आपला कोणीतरी वाली आहे असे वाटून ते त्यात आधार शोधत असतात. बाबासाहेब
आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांचा राजकारणाचा कणा हा मुख्यत: गरीबच होता. परंतु
दुर्दव्याने गरिबांचा आवाज होवू पाहणारे पक्षच लुप्त झाले आहेत.
आंबेडकरी चळवळ तळागळात कमकुवत होत आहे.
कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात वा सरकार कडून आपले हक्क व अधिकार मागण्यासाठी
एकत्र येवू शकत नाही एवढी ती कमकुवत झाली आहे. आंबेडकरांचे विचार हे डोक्यावर
ठेवून नाचण्यासाठी नाहीत तर डोक्यात घालून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिवर्तन
करण्यासाठी आहेत. परंतु यातील आज काहीएक होत नाही. हा एकप्रकारचा नेत्यांचा व
चळवळीचा पराभवच आहे. मग अशा पराभूत नेत्याची व चळवळीची पत राष्ट्रीय व राज्याच्या
राजकारणात कशी असेल? हे वेगळे सांगायला नको.
बापू राऊत
९२२४३४३४६४
nice post .
ReplyDeleteGovt Jobs ~ Latest updates
Thanks For Good Info..
ReplyDeleteEmployment News This Week