Monday, March 25, 2024

महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांची आकडेवारी काय निर्देश देते ?

देशात निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणुक हि एकूण पाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकांच्या घोषणाबरोबरच विविध पक्ष व गठबंधन यांच्यात मतदार संघासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत: दोन निवडणूक आघाड्या दिसतात. त्यापैकी एक शरद पवार -उद्धव ठाकरे प्रणीत महाविकास आघाडी असून दुसरी भाजपाप्रणीत महायुती..यात एक तिसरा  महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे सध्यातरी स्वत: निवडून न येता एकाला जिंकवून देणारा तर दुसऱ्याला हरविणारा. बहुजन वंचित आघाडी (बविआ) हा तो घटक होय. मागच्या निवडणुकाप्रमाणेच यावर्षीच्या  निवडणुकामध्ये बविआ हाच महत्वाचा घटक ठरू शकतो. बहुजन वंचित आघाडीची  ठाकरे -पवार आघाडी सोबत युती होवू नये. यासाठी अदृश्य खेळ व वाटाघाटी चालू असणे हे राजकारणात नवे असे काही नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा वंचितला किती जागा द्यायच्या हा घोळ असून त्यांना स्वत:चेच मतदारसंघ वाटप करण्यात अडचणी येत असून महायुतीला सुध्दा त्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.