भारतात जातीव्यवस्थेची भीषणता मांडणारे व जातीची लक्तरे जगाच्या वेशीवर
टांगणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होत. जातीची मीमांसा करताना ते
कोणासही भीत नसत. म्हणूनच जाती व वर्णव्यवस्थेची जननी असणाऱ्या मनुस्मृतीला जाळून
टाकण्याचे धाडस त्यांनी केले. कोणत्याही देशात न आढळणारी जातीसंस्था हा भारतातील
एक “महारोग” असे ते म्हणतात. हिंदू लोक बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून जातीभेद
पाळतात असे नव्हे, तर ते अधिक धर्मपरायण असल्यामुळे जातीभेद पाळतात. त्यासाठी
त्यांच्या मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच जबाबदार आहे. बाबासाहेब म्हणतात,
जातीव्यवस्थेचे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास
शिकविणारी शास्त्रे आहेत. शास्त्रवचने पवित्र व अपरिवर्तनीय असून ती सदैव पाळली
पाहिजे. ही मानसिक श्रद्धा लोकांच्या मनात ठासून भरली आहे. म्हणून प्रथम
शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करने हाच खरा उपाय आहे असे ते म्हणतात. वेद व
शास्त्रे ह्याचे
आधिपत्य उध्वस्थ केल्याशिवाय जातीव्यवस्थेला मुक्ती मिळणार नाही.
शास्त्राच्या जोखडातून स्त्रीपुरुष मुक्त झाल्यास व त्यांच्यावर झालेले दुषित संस्कार
धुवून काढल्यास जातीभेद नष्ट करण्याचा मार्ग निघू शकतो.
बाबासाहेब आंबेडकरांचा “अॅनिहीलेशन ऑफ कास्ट” हा ग्रंथ असंख्य भारतीयांना अपरीचयाचा आहे. एखाद्या पुस्तकावर बाबासाहेब
आंबेडकरांचा फोटो व नाव दिसले की ते पुस्तकच अस्पृश्य होत असते. त्या पुस्तकांना
चाळने तर सोडाच, त्यावर नजर पडली तरी ते न पाहिल्यासारखे केल्या जाते. हा भारतीय
जातीयवादाचा अस्सल नमुना आहे. ह्या जातीय मानसिकतेमुळे डाक्टर आंबेडकरांचे अनेक
गाजलेली व तर्काने तुडूंब भरलेली पुस्तके सामान्य हिंदुच्याच नव्हे तर उच्चवर्णीय
हिंदुच्या ग्रंथालयातील बुकसेल्फ मध्येही मिळणार नाहीत. बाबासाहेबांचे अॅनिहीलेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया व
अनटचेबल हे समाजशास्त्रावरील प्रभावी ग्रंथ भारतातील विद्यापीठात अभ्यासक्रमात
अजूनही लावले नाही. हे पाहता देशातील विद्यापीठे देखील जातीय मनोवृत्तीपासून
अलिप्त नाहीत असे म्हणावे लागते. आंबेडकरांचे
विचार न वाचताच त्यांच्याविषयी द्वेषमुलक भावना ठेवणारी पिढीच या देशात निर्माण करण्यात
आली आहे. काही संघटना द्वेषाचा हावारसा आजही चालवीत आहेत. तसे नसते तर
आंबेडकरांच्या विचारांनी हा देश कधीचाच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जापान व नेदरलंड
या देशाच्या रांगेत जावून बसला असता.
बाबासाहेब आंबेडकर लोकांना आग्रहाने सांगतात की, तुम्ही तथागत बुद्ध व गुरुनानक
यांच्याप्रमाणे शास्त्रप्रामाण्य धुडकावले पाहिजे. तुम्ही धर्ममार्तंडाना निक्षून
सांगितले पाहिजेत की, ही सारी जी कीड आहे, ती ज्या धर्माने जातीभेद पवित्र आहे असी
भावना जनमानसात पसरविली, त्या त्यांच्या धर्मात आहे. आहे. हे सांगण्याचे धैर्य
तुमच्यात आले पाहिजे. भारतात अमानुष कृती व अविवेकपणा यावर बोचरी टीका करणाऱ्या
सामाजसुधारकाचा एक वर्ग आहे. परंतु हाच बेगडीवर्ग असहिष्णू शास्त्रप्रामाण्यास व
धर्ममार्तंडास कधीच आवाहन देताना दिसत नाही. हिंदू धर्मतत्वे व हिंदू समाज यातील
भेद स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात, हिंदू माणूस हा मुळात वाईट नाही मात्र
त्यांचे धर्मग्रंथ त्यांना अमानुष वागणुकीची शिकवण देतात. म्हणून तो अन्य जातीसी
अमानुषपणे वागत अत्याचार करतो.
हिंदू समाज वा भारतीय समाज हा अठरापगड जातीचे कडबोळे आहे. जातीना अधिक महत्व
दिल्या जात असल्यामुळे या देशाला जातीचा देश असेही म्हटल्या जाते. प्रत्येक जात ही
आपल्या जातीचा अभिमान बाळगते. त्यामुळे एका जातीला दुसऱ्या जातीबद्दल कधीच
सहानुभूती निर्माण होत नाही. ती सतत स्वत:चे वेगळेपण कायम ठेवण्यासाठी झटत असते.
आपल्याच जातीमध्ये विवाह व जातीय भोजन, जातीवर्धक पेहराव. आदर्श हिंदू तोच असतो जो
जातीरूपी बिळात असतो व आपल्या जातीला विभागून दिलेल्या कामात गर्क असतो. एकमेकाचे
वर्णश्रेष्ठत्व मान्य करीत जगत असतो. हिंदुत्वाची भावना ही केवळ हिंदू विरुध्द
मुस्लीम दंगलीच्या संघर्षात बघायला मिळते. अन्यथा, एरवी प्रत्येक जात ही दुसऱ्या
जातीविरुध्द लढण्यास उभी ठाकलेली सेनाच असते. आजही जातीय मानसिकतेचे प्रत्यय बघायला मिळतात. एखाद्या आफिस मध्ये
नवीन कर्मचारी नियुक्त झाल्यास प्रथम त्याची जात कोणती असावी याचा शोध चालू होतो. तर निवडणूक काळात प्रत्येक जातीच्या
आकड्याचे गणित मांडून तिकीट वाटप होतात. जात बघून मंत्री बनविले जातात. मंत्र्याचा
सुध्दा आपल्या जातीच्याच लोकांचे कामे करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळेच
बाबासाहेब म्हणतात, या जातीसंस्थेने हिंदूचे पूर्णत: नैतिक अध:पतन केले आहे.
बाबासाहेबांचे विचार आजही किती प्रासंगीक आहेत हे लक्षात येते.
हिंदू धर्म म्हणजे तरी काय? सोवळ्या ओवळ्याचे नियम, कर्मकांडे व पूजाअर्चा यालाच हिंदू लोक धर्म मानतात. बाबासाहेब म्हणतात, हिंदूचे तत्वज्ञान हे
सर्वसमावेशक व स्थलकाल निरपेक्ष नाही म्हणून तो लोकधर्म होवू शकत नाही. हिंदू
धर्माचे धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत असे सावरकर व आगरकर
यांच्यासारखे सांगुन ते थांबत नाहीत, तर धर्मग्रंथाच्या आज्ञा हिंदुसमाजाच्या
हिताकरिता नसून त्या समाजाच्या नाशासच कारणीभूत ठरल्या आहेत असे स्पष्ट बजावताना
हिंदू समाजाची पुनर्घटना आधुनिक मानवी मूल्यांच्या निकषावर व्हायला हवी यावर ते
अधिक जोर देतात.
हजारो वर्षापासून भारतात स्मुर्त्यांनी वर्णाची निर्मिती प्रजापतीच्या
निरनिराळ्या अवयवापासून दाखवून प्रत्येक वर्गाला त्याचे निहित कर्तव्ये वाटून दिली
आहेत. या व्यवस्थेमध्ये ब्राम्हणाना सर्व जातीवर आधिपत्य गाजविण्याचे अमर्याद अधिकार
दिले. शूद्रांना इतर वर्णाची सेवा करण्याचे काम देतानाच शूद्राच्या स्त्रिया बायका
म्हणून वापरण्याचा अधिकार वरच्या वर्णाना दिला, नावे देखील प्रत्येक वर्ण व जातीने
आपल्या श्रेणीला साजेशी ठेवावीत, म्हणजे नावावरून वर्ण ओळखता येईल. शूद्रांची
संपत्ती राजाला पूर्ण जप्त करण्याचा अधिकार, परंतु ब्राम्हणांची संपत्ती राजाने
कधीही जप्त करू नये अशी धर्माज्ञा घातली. सामाजिक प्रतिष्ठा देखील स्मुर्त्यांनी ठरवून
दिली. ब्राम्हण वयाने लहान असला तरी तो श्रेष्ठ समजावा व शूद्र वयाने कितीही मोठा
व विद्वान असला तरी त्याला मान देवू नये अशी धर्माज्ञा. अशाच काही धर्माज्ञाचे आजही
पालन केल्या जाते. सनातन संस्था व आर.एस.एस सारख्या संघटना अडगळीत पडलेल्या जुन्या
एजेंडाला नवसंजीवनी देण्यासाठी कार्यरत आहे.
जातीनिर्मुलनाच्या संदर्भात भूतकाळात तसेच वर्तमान काळातही ब्राम्हणांनी
विरोधी भूमिका घेतलेली दिसते. ह्या देशात संपूर्ण राजकीय,सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे
व काही अंशी आर्थिक चळवळीचे धुरीणत्व ब्राह्मणाकडे आहे. परंतु जातीयता नष्ट
करणाऱ्या समाज सुधारकाच्या अनुयायामध्ये ब्राम्हण चटणीलाही सापडत नाही. याचे कारण
विदित करताना बाबासाहेब म्हणतात, जातीभेद हा हिंदू धर्माचा कणा आहे व याची त्यांना
जाणीव आहे. ते बुद्धिमान असल्यामुळे जातीनिर्मुलनाचे कसे व कोणावर परिणाम होतील हे
समजण्यात ते चाणाक्ष आहेत. जातीचे उच्चाटन हे ब्राम्हण जातीवरच आघात करणारे आहे.
त्यामुळे जी चळवळ ब्राम्हणांच्या सत्तेला व प्रतिष्ठेला कुठाराघात करते त्या
चळवळीचे नेतृत्व कोणताही ब्राम्हण करणार नाही. मग तो ब्राम्हण पुरोगामी असो वा
नास्तिक. म्हणून ब्राम्हणात पुरोहित व धर्मातीत असा भेद करने मूर्खपणाचे आहे असे
बाबासाहेब म्हणतात. कारण ते एका शरीराचे दोन भाग आहेत. आणि एकाच्या अस्तित्वासाठी
दुसऱ्याला लढल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे ब्राम्हणात क्रांतीकारक तर सोडाच
समाजसुधारक निर्माण होईल याची कोणीही अपेक्षाच करू नये.
बाबासाहेब ब्राम्हणावर आरोप करताना म्हणतात, शेकडो ब्राम्हण हे दररोज जात व
शास्त्राचे नियम पायदळी तुडवीत असतात.तरीही ते जातीसंस्थेचे कट्टर समर्थक असतात.
ब्राम्हणांचे असे दुहेरी वर्तन का?. याचे उत्तर देताना ते म्हणतात,ब्राह्मणाना असे
वाटते की या ब्राम्हनेत्तर जातीना जातीच्या बंधनातून मुक्त केले तर ते ब्राम्हण
वर्गाच्या धर्माश्रेष्ठत्वाला व अधिसत्तेला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाहीत.
ब्राम्हणाच्या अप्रामानिकतेचे हे मोठे उदाहरण असल्याचे ते सांगतात.
बुद्धिमत्ता हे एक साधन आहे व तिचा उपयोग कसा करावा हे बुद्धिमान व्यक्तीच्या
अंतिम हेतूवर अवलंबून असते असे बाबासाहेब म्हणतात. बुद्धिमान व्यक्ती जसा सज्जन
असतो तसा तो दुर्जनही असू शकतो. एखादा महापुरुष जसा रंजल्यागांजल्याचा उध्दार करतो
तसा तो इतरासाठी दुष्ट प्रवृत्तीचा ठरत असतो. भारतात बुद्धिमान संपदेचा ठेका
ब्राम्हणाकडे आहे. ते ब्राम्हणेत्तर समाजासाठी वंद्य व पूज्यनिय आहेत. ब्राम्हण हे
भूदेव असल्याचे ब्राम्हनेतर समाजाला वाटते. असा हा समग्र बहुजन समाज ज्या
बुद्धिमान ब्राम्हणाच्या मुठीत आहे. परंतु संपूर्ण ब्राम्हण वर्ग हा जाती
विच्छेदनाच्या चळवळी विरुध्द असताना या देशातील जातीयवाद कसा संपुष्टात येईल? याची
एक दुसरीही बाजू आहे, ती म्हणजे जातींचे क्रमिक सामाजिक स्थान. जातीच्या उतरंडीत
प्रत्येक जात ही कोणत्या तरी जातीपेक्षा श्रेष्ठ असते. जात जितकी श्रेष्ठ तेवढे
तिचे अधिक अधिकार व जी जात कनिष्ठ तेवढेच तिचे निकृष्ठ काम. जातीची ही उतरंडच
जातीव्यवस्था विरोधी चळवळीस हानिकारक् ठरत आहे. तीच जातीबहिष्कार व्यवस्थेची
निर्माती असते. त्यामुळे जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे हे दिवास्वप्नच ठरते की काय
अशी शंका व्यक्त होणे साहजिकच आहे.
भारतातील जातीयव्यवस्था म्हणजे ‘श्रम विभाजन’ होय हा युक्तिवाद उडवून लावताना
बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, भारतात जाती ह्या गुणानुसार नसून जन्मत:च
ठरत असतात. यामुळे श्रम विभाजन हे ‘स्वाभाविक’ नाही.’ तर श्रम विभाजन हे जन्मत:च
लादलेले असते. असा आक्षेप घेत जाती
व्यवस्था ही श्रम विभाजन नसून श्रमिकांची कृत्रिम जातीय विभाजनी आहे असे म्हणतात.
वास्तविकत: भारताच्या चातुर्वर्ण्य
आणि जातीव्यवस्थेविरुध्द धडाडणारी सर्वात मोठी प्रभावी तोफ म्हणजे
बाबासाहेब आंबेडकर. जातीव्यवस्थेचे विष पचवितानाही, ज्यांच्यामुळे निर्दयी जुलूम
सहन करावा लागला त्या हिंदू समाजाच्या हानीची कारणमीमांसा ते देतात. केवळ कनिष्ठ
जातीवर अन्याय झाला असे बाबासाहेब म्हणत बसत नाही तर जातीव्यवस्थेमुळे हिंदू
समाजाचेच विघटन कसे झाले आणि या देशाचा वारंवार पराभव का व कसा झाला? यावरही ते
तितकाच भर देतात. बाबासाहेबाची महानता यावरच थांबत नाही, तर चातुर्वर्ण्य
व्यवस्थेमुळे आर्थिक, सामाजिक व धार्मिक हक्क नाकारलेल्या स्त्रियांना त्यांचे
अधिकार व हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपल्या प्रकृतीची जराही काळजी न घेता
त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल तेव्हा जसेच्या तसे स्वीकारले असते तर
देशात फार मोठी क्रांती झाली असती. स्त्रिया आधुनिक विचाराच्या बनून सर्वहक्क
अधिकाराच्या कधीकाळीच पाईक झाल्या असत्या. बाबासाहेबांनी घटना लिहिताना जातीच्या
पलीकडे बघितलेले आहे. याचा प्रत्यय घटनेच्या ३४० व ३४१ व्या कलमात स्पष्टपणे दिसून
येतो.
बाबासाहेब भारतीयांना इशारा देवून सांगतात की, तुम्ही जातीयतेचे उच्चाटन केलेच
पाहिजे. माझ्या मार्गाने करावयाचे नसेल तर तुमच्या मार्गाने करा. परंतु मी
तुमच्यासोबत राहणार नाही, याबद्दल मला खेद वाटतो. मी धर्मांतर करावयाचे ठरविले
आहे. परंतु, जरी मी तुमच्या धर्मातून बाहेर पडलो तरी तुमच्या समग्र हालचालीकडे
सक्रीय सहानुभूतीने पाहत राहीन व प्रसंगविशेष सहाय्य करीन. बाबासाहेबांच्या
मनाच्या थोरवीचा हा उच्चांकच नाही काय? म्हणून बाबासाहेबांना केवळ अस्पृश्यापुरते
मर्यादित ठेवणे म्हणजे, आकाशाला छप्पर व सुर्याला बल्ब म्हणण्यासारखे आहे. वर्ष
१९३५ ला बाबासाहेबानी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेमुळे सर्व हिंदू समाजसुधारक
भांबावून गेले होते. या सुधारकांनी हिंदुसमाज सुधारणेचे मार्ग अवलंबविण्यापेक्षा
अस्पृश्योद्वाराच्या चळवळीसी जोडून घेतले, यावरून डॉ.आंबेडकरांनी जातीनिर्मुलनाचे
सुचविलेले उपाय त्यांनी एकतर जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले अथवा ते त्यांना पेलनेच
शक्य झाले नाही. धर्मग्रंथावरील लोक श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न तर आज करताना
दिसत नाही. उलट त्या अधिकाधिक दृढ
करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहेत. या सर्व परिस्थितीकडे बारकाईने
पाहिल्यास हिंदू समाजच नव्हे तर समग्र भारतीय समाजच डोळे समोर ठेवून मागे
धावण्याची शर्यत खेळत असल्यासारखे वाटते.
बाबासाहेब म्हणतात, ब्राम्हण वर्गच या देशातील धर्मशास्त्रे व जातीव्यवस्था
नष्ट करू शकतात. कारण ज्यांनी देव व धर्मव्यवस्था निर्माण केली, तेच लोक
ब्राम्हनेत्तराना आवाहन करून निर्मितीचे कारण सांगून मुक्तीचा मार्ग दाखवू शकतात.
परंतु आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित घेण्यास ब्राम्हणवर्ग तयार
होईल?. साक्रेटीस, कार्पोनिक्स व गॅलीलीयो सारख्या व्यक्ती ब्राम्हणवर्गात तयार होवून सत्य सांगण्यासाठी विषाचा
प्याला हातात घेतील?. असे जेव्हा भारतात घडेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरासाठी तीच
मोठी श्रद्धांजली ठरेल.
जाती नष्ट करण्यासंदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची भूमिका काय?
मा.कांशीरामजीने बामसेफच्या माध्यमातून जाती तोडो समाज जोडो हा नारा दिला होता. हा
नारा बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीनिर्मुलनाच्या भूमिकेसी सुसंगत होता. परंतु
नंतरच्या काळात त्यांनी विशिष्ट जातीच्या नेत्यांच्या जयंत्या, त्यावर चर्चासत्रे
आयोजित करून जातीय संमेलने भरविली. हा एक तात्विक विरोधाभास आहेच. परंतु त्यातून
एक फार मोठा सकारात्मक परिणाम घडून आला. हा परिणाम म्हणजे, एकमेकांना विरोध
करणाऱ्या, जातीभेद व विषमता पाळणाऱ्या जाती महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर
“बहुजन” या नावाखाली शासक जातीविरुध्द एकवटल्या. म.फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे
विचार घेवून त्यांच्यात स्वाभिमानदर्शक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जागृती
निर्माण झाली. भारताच्या विधानसभा व संसदेमध्ये बहुजन टक्का वाढून ब्राम्हणी टक्का
कमी झाला. बहुजन जातीपैकी काही जाती आता थेट ब्राम्हणवादासी लढण्यास सिद्ध झाल्या
आहेत. असे असले तरी जातीनिर्मुलनाच्या मुद्द्यास कोणीही हात घालू इच्छित नाहीत. उत्तर
प्रदेशात मायावतींनी आपल्या राजकारणाला ब्राम्हणी जातीचा मुलामा चढविला. मायावतीचे
हे सूत्र केवळ सत्तेसाठी होते. या सत्तासुत्राचा वाईट परिणाम संपूर्ण चळवळीवर
झालेला आहे. मायावतीच्या कालखंडात अनु.जाती/जमातीचा किती विकास झाला? किती
भूमिहीनांना जमिनी मिळाल्या? यावर वस्तुस्थिती कळण्यासाठी एखाद्याने संशोधकपर
प्रबंध लिहायला पाहिजे. अशा युत्यांनी समाज परिवर्तन वा जातीव्यवस्था नष्ट होत
नाही तर सत्तेचे दलाल निर्माण होतात. महाराष्ट्रामध्ये व्यवस्थापरिवर्तन व जाती
उच्चाटनाचा मुद्दा मागे पडून दलालांची नवी संस्कृती उदयास आली आहे.
रोजची वर्तमानपत्रे चाळल्यास वंचित समाजावर देशाच्या संपूर्ण भागात अत्याचार
होत असताना दिसतात. वंचिताच्या वस्त्या अत्यंत किळसवाण्या अवस्थेत असतात. आता दलित
हा शब्दच एक अपमानास्पद वाटू लागला आहे. हलक्या प्रतीच्या या शब्दाला फुटबाल सारखे
हवेत उडविणे चालू आहे. भाजपाचे काही नेते याला कुत्र्याची उपमा देवू लागले. तर
काहीजण दलीत व महादलित असे वर्गीकरण करू लागले आहेत. सत्ताधारी जमात वंचित समाज व
त्यांच्या पक्षाचा सत्ता मिळविण्यासाठी वापर करू लागले. सामाजिक व्यवस्था परिवर्तन
आता या वंचित समाजाच्या पक्षाचा एजंडा
राहिला नसून केवळ आमदार व खासदार बनून भाजपा व कांग्रेसना सत्ताधारी
बनविण्यापर्यंत त्यांचे कार्य मर्यादित झाले आहेत. जातीवादी व्यवस्था टिकावू
पाहणाऱ्याच्या हातात हात घालून जातीव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावीत
आहेत.
जातीवरून अत्याचार हे आजचे मोठे वास्तव आहे. हरियाणातील भगाना खेडयात चार दलित
मुलीना गावातील उच्चवर्णीय जातीच्या लोकांनी बेअब्रू केले. सोनपेड येथे लहान
मुलांना जिवंत जाळण्यात आले. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र या
राज्यात जातीअत्याचाराने तर परिसीमा लांधल्या आहेत. लोकांना भीतीयुक्त वातावरणात
जगणे भाग पडत आहे. सध्या कर्नाटक राज्य असहिष्णुतेचे माहेरघर बनले आहे. देवनागरे
येथे वसतिगृहात राहणाऱ्या हुचांगी प्रसाद या पत्रकारिता करीत असलेल्या
अनु.जातीच्या युवकाला होस्टेलमधून बाहेर काढून सात आठ लोकांच्या टोळक्याने
त्याच्या तोंडाला काळे फासून धक्काबुक्की केली. तुझे हिंदू विरोधी लिखाण बंद कर,
अन्यथा तुला आम्ही जिवंत मारू असी धमकी दिली. पेरूमल या तामिळ लेखकाने तर लिहिणेच
सोडून दिले. हा जातीव्यवस्था, भेदभाव व गुलामी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी
चाललेल्या धडपडीचा मोठा नमुना आहे.
जाती अत्याचार हे या देशात कधीच न थांबणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रीय गुन्हे
अन्वेषण विभागाने अनु.जातीच्या विरोधातील आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार
वर्ष २०१४ मध्ये ४७०६४ एवढे गुन्हे नोंदविले गेले तर वर्ष २०१३ साली संख्या ३९०४८
तर २०१२ साली गुन्ह्याची संख्या ३३६५५ एवढी होती. २०१४ साली ७४४ दलितांच्या हत्या
करण्यात आल्या. खरे आकडे याहूनही अधिक आहेत. कारण भीतीपोटी ते आपल्या
अन्यायाविरुध्द तक्रारीच करीत नाही. तर तक्रार करण्यास गेल्यास उच्चवर्णीय पोलीस
तक्रारी नोंदवून घेत नाहीत. सरकारे अनु.जातीना केवळ आश्वासने देत असते. अशी
आश्वासने केवळ पोकळ असतात. महाराष्ट्रातही परिस्थिती इतर राज्याहून भिन्न नाही.
सागर शेजवळ या दलित युवकांचा मोबाईलवर आंबेडकरांच्या गाण्याची रिंग टोन
वाजल्यामुळे खुण करण्यात आला.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आदी संघटनाचे मंदिरोद्वार, गंगाजल, रामजन्मभूमी, घरवापसी, लवजिहाद आदी धार्मिक भावनावर जनजागरण म्हणजे बहुजन जातीना त्यांच्या
जागरूक होण्याच्या प्रक्रियेवर घाला घालून हिंदुत्वाच्या विषमता व जातीवादी
वैचारिक बंधनात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न होय. जातीचे निर्मुलन हा संघाचा एजंडा
कधीच नव्हता व भविष्यातही राहणार नाही. जाती टिकवून ठेवणे व त्या अधिकाधिक मजबूत
करने हा संघाचा ब्राम्हणी एजंडा आहे. हिंदू जातींना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची
जाणीव होवू नये व त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध बंडाळी करू नये. यासाठी
नेहमीच संघाकडून धर्मसापळा रचण्यात येतो. त्या सापळ्यात हिंदू जाती सहजच अडकत
आहेत. ‘जाती व जातीयवाद’ हाच ब्राम्हणांचे
आपले ब्राम्हण्य टिकवून ठेवण्याचे शस्त्र आहे. ह्याला कोण नाकारू शकेल?. असे असले तरी जाती नष्ट करण्याच्या प्रक्रियेतील
बाबासाहेबांच्या अनुयायांची भूमिकाही दृढमूलच आहे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून
तो नापासाच्या यादीतच आहे. जनतेला नेता निवडता येत नाही तर नेत्याला आपले नेतेपद
सिद्ध करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांची जातीनिर्मुलनाची चळवळ
बंदिस्त तरुंगातील धुळीच्या कणात मिसळून दिसेनाशी झाली आहे.
बापू राऊत
मो.न.९२२४३४३४६४
ई मेल:bapumraut@gmail.com
No comments:
Post a Comment