जगाच्या इतिहासात ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तुत्वाची
छाप पाडली त्या सम्राटामध्ये मौर्यवंशीय सम्राट अशोकाचे स्थान अविवादीत आहे. प्राचीन
वा अर्वाचीन सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा
शेवटचा चक्रवर्ती सम्राट होय. सम्राट अशोकाने भारतावर इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. सुमारे
४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व इराण, पूर्वेकडे आसाम तर
दक्षिणेकडे म्हैसूर व केरळ पर्यंत आपला राज्य विस्तार केला होता. ५०,००,०००
वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत
मोठ्या साम्राज्यांपैकी एक व
भारतीय खंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.
राज्यरोहण झाल्यानंतर
आठ वर्षांच्या काळात अशोकाने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले. जवळपास अफगाणिस्तान,
इराण सकट सर्व भारत त्याने आपल्या साम्राज्याच्या छायेत
आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली
आला तरी कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग म्हणजे
आजचा
ओरिसा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग
होय. सम्राट अशोकासाठी कलिंग चे युद्ध हा महत्वाचा अध्याय होता. त्याने कलिंगवर केलेल्या
स्वारीत अतिरंजित हिंसा झाली. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे
१ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. या
युध्दामुळे त्याला चंड अशोक असे म्हणत.
अशोकाने कलिंगचे युद्ध
पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी
केली. त्यावेळेस त्याने पाहिले ते फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग,
सडणाच्या दुर्गंध, जळलेली शेती,
घरे व मालमत्ता. हे पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध
जिंकले? हा विजय नाहीतर पराजय आहे असे म्हणून त्याने
स्वत:ला प्रचंड विनाशाचे कारण मानले. बायका, मुले व इतर अबलांची
हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे तो
स्वत:लाच प्रश्न विचारू लागला. एका राज्याची संपन्नता
वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे?. युध्दानंतर
त्यांनी आपले ध्येय साधण्याचे एक साधन म्हणजे युध्द ही कल्पनाच त्यांनी ताज्य
ठरविली. ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसेचा,
प्रेम दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे
ठरवले. या नंतरच
अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. अशोकाने
पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे त्याने
शांतताप्रिय बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी सम्राट
अशोकाला छेडण्याचे साहस केले नाही. त्यांनी अहिंसा हे राष्ट्रीय
धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले
होते.
अशोकाचा
भारतीय इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने
राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्वाच्या शहरांमध्ये
शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर
सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत
व काही काळाच्या ओघात लुप्त झाले
असावेत. त्यांच्या शिलालेखामुळेच भारताचा इतिहास जगाच्या नकाशात प्रतीबध्द झाला. शिलालेखाव्यातिरिक्त
अशोकाचे
वर्णन अशोकवदन, महावंश
व दिपवंश या बौध्द ग्रंथात आढळतात.
सारनाथ येथील अशोक स्तंभ
हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. अशोकाने सारनाथला भेट दिल्याची
त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा
स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांना व
शास्त्रज्ञांना अशोक कालिन
चिन्हे,
लेख, स्तंभांचा हा खूप
महत्त्वपूर्ण ठेवा वाटतो. अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पीढ्यांनी
त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या
गुणासाठी लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते.
अशोक राज्यावर आला तेव्हा तो बौध्द धर्माचा निस्सीम उपासक
नव्हता. त्याची बौध्द धर्माविषयीची आस्था काही वर्षांनी वाढली. तसे बघितले तर मौर्य
घराण्यातील कोणत्याही राजांनी ब्राम्हणी धर्माला राजाश्रय वा पाठिंबा दिला नाही वा
कोणतीही सहानुभूती दाखविली नाही. चंद्रगुप्त मोर्य मात्र जैन धर्माचे समर्थक असल्याची
नोंद आढळते. मोर्यकाळ म्हणजे तर्कशुध्द विचार आणि सांस्कृतिक विचारप्रगती यांच्या
सर्वोच्च विकासाचा काळ होता. ब्राम्हण व श्रमन यांच्यातील वैचारिक संघर्षातून समता
प्रस्थापित होण्याचा तो काळ होता. आपल्यालाच केवळ ब्रम्हज्ञान प्राप्त झालेले आहे.
या ब्राम्हणांच्या गर्वाला विरोध म्हणून बौध्द विचारधारकानी अनुभवजन्य तत्वज्ञान विकसित
करून त्याची पेरणी समाजात केली होती. धर्मविधी किंवा तपश्चर्या यात अतिनिमग्न
होण्याचे टाळणे हा सामान्य माणसासाठी एक समाधानकारक तोडगा काढण्यात आला होता.
प्रचलित सामाजिक नितीशास्त्राच्या पध्दतीवर या नव्या संकल्पनाचा फार परिणाम झाला
होता. ब्राम्हणांनी जाती संस्थेच्या ताठरतेवर निर्माण केलेल्या गुंतागुंतीवर श्रमनानी
सुलभ तोडगे काढत विकसित केलेले नितीशास्त्र व व्यापक सामाजिक जाणीवेचा आग्रह
धरणारा बौध्द धर्म लोकांना अधिक जवळचा वाटू लागला होता.
गौतम बुद्धाने जीवनातील समस्यावर माध्यम मार्गाचा व्यवहारी
तोडगा सुचवीत गुढ अध्यात्मविद्या व तपश्चर्या सारख्या गोष्टी साफ नाकारल्या
होत्या. प्रथम व्यापारीवर्ग हा बौध्द धर्माचा समर्थक होता. ब्राम्हण व क्षत्रियाच्या
कैचीत सापडलेला हा वैश्य वर्ग ब्राम्हणांच्या वर्चस्वाला झुगारु इच्छित होता.
नंतरच्या काळात बौध्द धर्माने पुकारलेली सामाजिक समता चौथ्या कष्टकरी वर्गाला
आकर्षक वाटू लागली.
अशोकाच्या धम्म
कार्यात त्याच्या देवी या पत्नीपासून झालेल्या मुलांची मोठी
मदत झाली. मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर
श्रीलंकेत जाउन तेथील राजाला व प्रजेला बौध्द धर्माची शिकवण दिली. तर
अनेक विद्वान भिख्खुना त्यांनी युरोप व ग्रीकाच्या प्रदेशात पाठवून बौध्द धर्म भारताबाहेर पसरण्यास
सुरुवात झाली. बौध्द भिक्षू व भिक्षुणी हिवाळ्यात
व उन्हाळ्यात भिख्खूसंघ जनतेला बुद्ध धर्माची शिकवण देत असत व पावसाळ्यात आपापल्या
मठामध्ये परत येत असत. ही प्रथा बुद्धाच्या काळापासून सुरु होती, ती अशोकाच्या
काळापर्यंत कायम होती. अनेक शिलालेख व स्तंभाची
निर्मिती करून अशोकाने ८५ हजार स्तूपांची व विहारांची निर्मिती
केली. त्यातील अनेक स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात
तर काहीं हिंदू मंदिराच्या स्वरुपात अस्तित्वात आहेत. आजची वाराणसी व मथुरा हे बौध्द धर्माच्या वारशाचे
सांस्कृतिक केंद्र होते. गौतम बुद्धाच्या मुर्तीकलेचा विकास याच दोन शहरात झाला
होता. परंतु आज ते हिंदू धर्माच्या मुख्य केंद्रात स्थापित करण्यात आली.
बौध्द वाड़.मयामध्ये
अशोकाला विश्व सम्राट म्हटले असून संपूर्ण जंबूद्वीपावर त्याचे राज्य होते. त्याचा
राज्यकारभार न्यायी होता व त्याची
कारकीर्द भरभराटीची होती. तो एक सदगुणी राजा म्हणून गणला जात होता. अशोकाच्या
आज्ञालेखाचे परीक्षण केल्यास अशोकाच्या वैश्विक सत्तेच्या कल्पनेत लीनभाव व
मानवतावाद अधिक झळकून येतो. आपल्या प्रजेकडून निवडून आलेला एक थोर मनुष्य असे तो
स्वत:ला समजत नव्हता तर पितृसदृश्य मानीत
होता. राजा व प्रजा यांच्यातील नातेसंबंध हा पितापुत्रासारखा असावा असे तो मानीत
होता. (सव्वे मुनिस्से पजा ममा. अथा पजाये इच्छमि हंक किति सव्वेन हित सुखेन
हिद्लोकिकपाललोकिशेन युज्जेवुती तथा ....मुनिस्सेसु पी इच्छामि हक ...) त्यामुळे
संपूर्ण अशोक काळ हा पितृवत्सल मनोवृत्तीचा होता. अशोककालीन राज्यव्यवस्था
लोकशाहीवादी होती.
आताच्या काळात आपण बघतो राजसत्तेत जाईपर्यंत लोकप्रतिनिधी
म्हणविणारे जनतेची हाजी हाजी करतात. जनतेच्या ते पायाही पडतात परंतु एकदाचे
सत्तेमध्ये गेले की ते एककेंद्री होत हुकुमशहा बनतात व जनता परावलंबी होते. ते विशिष्ट
वर्गाची बाजू घेत बहुजनांच्या असंघटीतपणाचा फायदा घेत त्यांच्या मागण्या उडवून लावण्यात
येतात. परंतु सम्राट अशोक हा राजा असूनही लोकास पितृतुल्य होता. अशोक हा जरी
बौध्दधर्मीय असला तरी तो धर्मवेडा मुळीच नव्हता. त्याच्या दृष्टीने धम्म म्हणजे एक
जीवनपध्दती होती. स्वत:च्या धम्माबाबतच्या शिस्तीची इतर कोणत्याही शिस्तीपेक्षा
अधिक कळकळ होती. इतर पंथांना त्यांनी कधीच इजा पोहोचविलेली दिसत नाही. त्यामुळे
त्याचे धम्म विषयक धोरण हे साहिष्णूच होते. लोकांना राजाची भीती वाटत नव्हती.
स्वामी व सेवक संबंधाचा फार मोठा परिणाम कोणत्याही समाजात असतो व यासाठी अशोकाने
खास मंडळ नेमले होते.
अशोकाने कधीही भिक्षू संघात ढवळाढवळ केली नाही वा तो भिक्षू
संघप्रमुख बनला नाही. पाटलीपुत्र येथे भरलेली तिसरी धर्मसंगीती अशोकाच्या काळात
झाली असली तरी तिचे नियमन अशोकाने केल्याचा उल्लेख नाही. सांची, सारनाथ व कोसम या
शिलालेखातील मजकुरानुसार मात्र ते कठोर वाटतात. संघातील ऐक्य नष्ट करण्याचा
प्रयत्न जर भिक्षू व भिक्षुणी यांनी केला तर त्यांना संघातून काढून टाकण्यात येईल
असा उल्लेख आढळतो. संघाचे कार्य एकमताने व शिस्तीने चालावे अशी त्यांची इच्छा दिसते.
यावरून अशोक बौध्द धर्मासी पूर्ण एकरूप झाले होते. कायदा व सामाजिक सुव्यवस्था या अर्थाने
अशोकाचा धम्म घेतल्यास त्यांनी आपल्या धम्म प्रसाराबरोबर तो अधिक दयामय व सदगुणी
वर्तनाचा असेल याची काळजी घेतलेली दिसते. उदार जाणीव आपल्या संपूर्ण साम्राज्यात
वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
सम्राट अशोकाने आपल्या आज्ञापत्रात यज्ञात कोणत्याही
प्रकारच्या प्राण्याचा बळी देवू नये असे म्हटले आहे. तसेच त्याने वैदिकांच्या
धार्मिक कार्यक्रमावरही बंदी घातली होती. कारण यज्ञ व विधी ह्या केवळ असामाजिक व
लुटीच्या बाबी आहेत हे त्याने जाणले होते. हा ब्राम्ह्णावर अशोकाने केलेला घणाघात
होता. अशोकाने पशुयज्ञ व वैदिक यज्ञ कालबाह्य ठरविले. हा ख-या अर्थाने कृषी
अर्थव्यवस्थेचा विजय व प्रचलित धर्मविधींचा पराभव होता. पशुपालन अर्थव्यवस्थेकडून
स्थिर ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे नेणारा हा काळ होता. या आमुलाग्र बदलामुळेच अहिंसावादी
बौध्द धर्म स्वीकारण्याच्या जंबूद्विपात संपूर्ण शांतता नांदत होती.
अशोकाच्या शिलालेखात धम्म विषयक कार्यात समाजकल्याण विषयक
उपाययोजना याचा समावेश होतो. माणसे आणि प्राणी यांच्यासाठी वैद्यकीय केंद्रे, विहिरी
व रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सावल्या देणारी झाडे व औषधी वनस्पतीची लागवड करण्यात
येत असे. व्यापार व वाणिज्य कल्पनांचा त्या काळात अधिक विस्तार झाला होता. त्यांनी
महामार्गाचे जाले निर्माण केले होते. अशोकाच्या या धोरणामुळे दैनंदिन जनजीवन
सुखकारक झाले होते. बेजबाबदार वागणा-या कैद्यांसाठी कल्याणकारी उपाययोजना व
जबाबदार कैद्यांची सुटका करण्यात येत असे. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक
विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचे
कालवे बांधले. सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना
मान व दासांना माणुसकीने वागवणे
ही त्याची आचार तत्वे होती. अशोकाचा
धम्म म्हणजे धर्मविधी नव्हे तर त्यात आर्थिक, सामाजीक आणि राजकीय अंगे अंतर्भूत
होती. अशोकाने एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध
वाढवले. अशोकानी
आपल्या कारकीर्दीच्या दहाव्या वर्षी बोधीवृक्षाला पाहण्यासाठी भेट दिली होती. या
घटनेनंतर त्यांनी धम्मयात्रा काढण्याची पध्दत सुरु केली. आठव्या शिलाशासनात याचे
वर्णन आले आहे. पूर्वीचे राजे लष्करी मोहिमा, सहल व प्राण्याची शिकार करण्यासाठी मोहिमा
काढीत असत. अशोकाने प्राण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या
हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन दिले.
त्यांनी अहिंसा हे राष्ट्रीय
धोरण बनवले.
अशोकाचा धम्म म्हणजे वस्तुत: बुद्धाने सांगितलेला मूळ बौध्द
धर्म होता. त्यानंतरच्या काळात मात्र बौध्द धर्मावर अनेक पुटे चढलेली आढळतात.
त्यातून अनेक पंथ उदयास आले. त्यानुसार अनेक साहित्य निर्माण झाले. मात्र त्या
साहित्याच्या पृथक्करणाचे काम कोणत्याही सरकारांनी हाती घेतले नाही. जैन व बौध्द
काळ हा वस्तुस्थिती व सत्याधारित इतिहास आहे. हाच भारताचा खरा इतिहास आहे. परंतु
हा इतिहास झाकून बौध्द काळातील राजे व त्यांच्या साम्राज्यातील घटनाक्रमावर
कल्पनाविलास करून रामायण, महाभारत व गीतेसारखे लिखाण करण्यात आले. सम्राट अशोकाला
रामाच्या अवतारात रंगविण्यात आले तर बिन्दुसार राजाच्या वंशावळीतील भाऊबंदकीच्या
अंतर्गत संघर्षाला कौरव-पांडव युध्द असे नामोदर्षित स्वरूप देवून महाभारत
लिहिण्यात आले. मत्स्यपुरान पासुनच्या सर्व पुराणात मौर्यराजे व बौद्धकालीन घटनाचा
आढावा घेण्यात आला आहे. यावरून सर्व पुराने ही मौर्यकाळानंतर लिहिलेली आहेत हे सिद्ध
होते. ब्राम्हण वैदिकांनी या देशातील खरा इतिहास बंदिस्त करून खोट्या पात्राचा
इतिहास भारतीयांच्या मानगुटीवर बसविला आहे. आज त्याचेच भव्य प्रमाणात गौरवीकरण व
विस्तारीकरण चालू आहे. अनेक ब्राम्हणी इतिहासकारांनी मौर्याच्या काळात हिंदू धर्म
अस्तित्वात नसतानाही अशोक हा हिंदू धर्मीय होता असे म्हटले आहे. यावरून वैदिक
ब्राम्हणांनी लिहिलेला इतिहास विश्वसनीय असू शकत नाही असे म्हणण्याला अधिक जागा
आहे.
लेखक: बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment