Sunday, September 28, 2014

मा.कांशीरामजींचे अप्रकाशित विचार प्रकाशित करण्याची गरज

महापुरुषाचा विचार हा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरत असतो. त्यामुळे समाजक्रांतिकारक अशा महापुरुषांच्या विचाराचे जतन ग्रंथांच्या रूपात जतन करून ठेवणे आवश्यक असते. समाजामध्ये आमुलाग्र क्रांती करण्याचा तो एक ठेवा असतो. या ग्रंथरूपी ठेव्यातूनच आंदोलनाला नवी दिशा मिळत असते. महापुरुषांच्या विचाराची संग्रह निर्मिती करने हे केवळ चळवळीचे साध्य नसते तर चळवळीला गतिमान करण्याचे ते एक प्रमुख साधन असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक आंदोलन हे गतिशील व गतिमान करण्याचे मर्म पुढच्या पिढीला त्यातून मिळत असते. त्यामुळे एक ऐतिहासिक गरज म्हणून महापुरुषांच्या विस्कळीत व अप्रकाशित साहित्यांला प्रिंट किंवा डिजीटल स्वरुपात साठवून ठेवणे फार गरजेचे आहे. महापुरुषांचे प्रायमरी स्वरुपातील साहित्य (primary data) म्हणजे त्यांनी विविध सभांमधून केलेली भाषणे, वर्तमानपत्रात त्यांचे प्रकाशित झाले लेख, त्यांच्या प्रगट मुलाखती हे असते. तर सेकंडरी (secondary data) स्वरूपातील साहित्य हे प्रायमरी साहित्याचे संकलित स्वरूप असते. हे संकलित स्वरूपातील साहित्य व्यक्तीनी, समूहांनी किंवा सरकारने ग्रंथ वा सीडी च्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असते.
कांशीराम नेहमी म्हणत असत, “जो लोग इतिहास से सबक नही सिकते, फिर इतिहास उन्हे सबक सिखाता है”. त्यामुळे इतिहासाचे महत्व हे कसे वादातीत आहे स्पष्ट होते. आज आम्ही आमच्या महापुरुषांचा इतिहास लिहिण्यासाठी सरकारवर अवलंबून आहोत. बाबासाहेबांच्या विचाराचा इतिहास हा अंदाजे एकूण ४० ते ५० खंडामध्ये प्रकाशित होणे आवश्यक होते. परंतु आतापर्यंत ते केवळ २१ खंडा पर्यंतच सीमित झालेले आहे. म्हणजे बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास अजूनपर्यंत लिहिला गेला नाही. त्यामुळे साहजिकच बाबासाहेब पूर्णपणे जनतेपर्यंत पोहोचले नाहीत. हा आंबेडकरी बुध्दिवाद्याचा पराभव समजायचा की सरकारचा जातीयवादी दृष्टीकोन ? याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. जो दुस-यावर अवलंबून असतो त्याची कधीच प्रगती होत नसते. कारण तो केवळ याचनेवर जगत असतो. आणि ही याचना त्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून असते.  आज देशाला बाबासाहेब आंबेडकरामुळे ज्योतिबा फुले कळले. तर बाबासाहेबाचा अभ्यास करताना गेल अम्वेट हिला ज्योतिबा फुले गवसले. गेल अम्वेट यांनी लिहिलेल्या कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल इण्डिया या त्यांच्या पि.एच.डी प्रबंधामुळे महात्मा फुले यांच्या विचाराचे गमक व शक्ती देशाला कळली. यात हरी नरके यांचेही योगदान मोलाचे आहे. वसंत मून यांच्या समर्पितपणामुळे बाबासाहेबांचे खंड प्रकाशित झाले. मा. जयसिंगराव पवार यांनी राजश्री शाहू महाराज यांचेवर केलेल्या लिखाणामुळे शाहू महाराज व शिवाजी महाराज कळायला लागले. तशाच प्रकारे तामिळनाडू मधील डा. वीरमणी यानी पेरियार रामासामी नायकर यांच्या संग्रहित व प्रकाशित केलेल्या साहित्यामुळे पेरियार चळवळ भारतीयांना समजली. उत्तर भारतीयांना पेरियार व शाहू महाराज समजले ते केवळ मा. कांशीराम यांच्यामुळे. बहुजन महापुरुषांचा मनुवादाच्या विरोधातील मानवतावादी संघर्ष  हा अब्राम्हनी साहित्यिकांनी/लेखकांनी लिहिलेल्या प्रबंधामुळे माहिती झाला. अन्यथा या महापुरुषाचा कधी राम व कृष्ण झाला असता ते कुणाला कधी कळलेही नसते. त्यामुळे अब्राम्हनी इतिहाकारांचा इतिहास हाच इतिहासाचा खरा स्रोत असतो, ब्राम्हणी इतिहासकारांचा नव्हे.
बहुजनवादी महापुरुषांची नाळ म्. ज्योतिबा फुले –बिरसा मुंडा- शाहू महाराज –पेरियार ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरु होते, ती सध्यातरी मान्यवर कांशीराम यांच्या जवळ येवून संपते. मान्यवर कांशीराम यांनी चालविलेले आंदोलन हे मुख्यत: परिवर्तनवादी, स्वाभिमानी व आत्मसन्मानाचे आंदोलन होते. म्. फुले- शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचे ते मुख्य आंदोलन होते. त्यामुळे मा.कांशीराम यांनी ३० वर्ष चालविलेल्या  चळवळीचे बिंदू भविष्यात येना-या पिढीना मार्गदर्शक ठरण्यासाठी त्यावर शोधप्रबंध लिहिणे व त्यांचे साहित्य सेकंडरी स्वरूपात प्रकाशित होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीतरी प्रकाशकाची भूमिका वठविणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीमध्ये मा. कांशीराम याचा विस्तृत इतिहास उपलब्ध नाही. त्यांचा इतिहास विस्कळीत व प्रायमरी स्वरुपात आहे. कांशीरामजींचे अप्रकाशित पत्र, त्यांच्या मुलाखती, भारताच्या संसदेमध्ये त्यांनी केलेले भाषण, जनसभातील त्यांची भाषणे, त्यांचे कार्यकर्त्यांसोबत झालेले संभाषण, पत्रकार परिषदा, कार्यकर्त्यांच्या आठवणीतील कांशीराम, कॅडर मधील त्यांचे मार्गदर्शन असे त्यांचे अनेक पैलू आहेत. मा. कांशीराम यांनी चालविलेल्या बहुजन नायक, बहुजन संघठक या साप्त्हीका मध्ये त्यांची भाषणे प्रकाशित झालीत. परंतु त्यांचे वेगवेगळया खंडाच्या स्वरुपात अजूनपर्यंत संकलन झालेले दिसत नाही. ज्यांनी ते संकलन करायला पाहिजे होते त्यांनी आपली भूमिका इमानइतबारे  पार पाडलेली दिसत नाही. बहुजन समाज पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ते करने आवश्यक होते. काहींनी कांशीरामजींच्या प्रेमामुळे व्यक्तिगत पातळीवर ग्रंथनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील थिंकिंग बहुजन सोसायटी फ इंडिया या संस्थेने “बहुजन नायक मा. कांशीराम साहब के भाषण” या शीर्षकाखाली दोन खंड प्रकाशित केले आहेत. परंतु त्यानंतर ते काम थांबलेले दिसते. याला काही कारणे वा अनेक अडचणी असतील.
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष सत्तेमध्ये असताना कांशीरामजीचे अप्रकाशित साहित्य सरकारी खर्चाने वा एखाद्या योजने द्वारा प्रकाशित करता आले असते. केवळ सत्तेसाठी महापुरुषांचा वापर करने परंतु त्यांच्या विचाराची जतन न करने हा फार मोठा दांभिकपणा आहे. कांशीराम यांची साहित्यकृती विविध खंडाच्या स्वरुपात आकर्षक आणि स्वस्त दरात जनतेला उपलब्ध झाली पाहिजे. महापुरुषांचे विचार, त्यांचे चारित्र, त्यांचा इतिहास हे चढ्या किमतीच्या पुस्तक स्वरुपात असेल तर ते साहित्य घेणार तरी कोण?. मध्यमवर्गीय आर्थिक संपन्नतेमुळे घेतील परंतु ते त्यांच्या कपाटातील शोभेच्या वस्तू बनून राहतात. महागड्या किमतीमुळे सामान्य लोकाकडे महापुरुषांचा इतिहास पोहोचत नाही. परंतु त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. कारण बहुजनवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू हा सामान्यजनच असतो.
आपल्याकडे आर.एस.एस चालवीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारखी संस्था नाही. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था हिंदुत्ववादी नेत्यांचे चारित्र ग्रंथमय स्वरुपात प्रकाशित करून त्यांचा प्रसार व प्रचार करते. सोबतच नेते घडविण्याचे कार्य करते. अशा स्वरूपाची संस्था आपल्याकडे नाही हे आपले दुर्दैव्यच आहे. हिंदुवादी संस्था ५० रुपयामध्ये गीता उपलब्ध करून देतात. तसे स्वस्त दरात बहुजन महापुरुषाचे चरित्र उपलब्ध्द झाले पाहिजे.
कांशीरामजींचे त्यांच्या जीवनात मुख्य दोन लक्ष्य होते. त्यापैकी पहिले, बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविणे तर दुसरे  संपूर्ण भारत बौद्धमय बनविणे. प्रामुख्याने ही दोन्ही लक्ष्ये बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु त्यांच्या हयातीमध्ये ते पूर्ण होवू शकले नाही. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर रिपब्लिकन नेत्यानी हाराकिरी केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या ध्येय व साध्याजवळ पोहोचणे त्यांना शक्य झाले नाही. मागासवर्गीयांना शासनकर्ती जमात बनविणे व भारत बौद्धमय बनविणे ह्या दोन बाबींना कांशीरामजीनी आपले ध्येय समजून जबाबदारी स्वीकारली.  पहिले ध्येय कांशीरामजीकडून पार पाडल्या गेले. त्यांनी आंबेडकरी चळवळीला बहुआयामी बनवीत एका राज्यात प्रतीगाम्याकडून सत्ता हिसकावून घेतली. प्रतीगाम्यांनी आंबेडकरांच्या चळवळीला एक जाती व गटापुरते मर्यादित करून त्यांना एका राज्यापर्यंत सीमित करून सोडले होते. मा.कांशीरामजीनी ही कोंडी तोडून टाकीत संपूर्ण बहुजन समाजापर्यंत बाबासाहेबांना पोहोचविले. परंतु भारत बौद्धमय करण्याचे त्यांचे दुसरे लक्ष्य साध्य करता आले नाही. त्यांना आलेल्या अचानक निर्वाणामुळे ते शक्य होवू शकले नाही.
मा. कांशिरामजीनी एक महत्वाचा कार्यक्रम चालविला होता. त्याचे नाव होते, “कही हम भूल न जाये.” त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक समाजातील महापुरूष उचलले. या महापुरुषांचा इतिहास त्या त्या समाजाला सांगून जागृत करण्याचे काम केले. आधुनिक भारताच्या क्रांतीकारक इतिहासाची सुरुवात ही म. फुल्यांच्या सामाजिक क्रांतीच्या बंडातून होते. म. फुलेंच्या सामाजिक क्रांतीची ही ज्योत १९२२ पर्यंत शाहू महाराजांनी तेवत ठेवली होती. १९२२ नंतर   या सामाजिक क्रांतीला बहुआयाम देण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले. १९५६ पर्यंत त्यांनी भारतातील मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून समान संधी देण्याचा प्रयत्न केला. या देशातील लाखो बहुजनांना बौध्द धम्माच्या माध्यमातून नवे जीवन व नवी ओळख दिली. १९७८ ते २००७ या कालखंडात या तीन महापुरुषाच्या  मानवतावादी विचारांचा संघर्ष मा. कांशीरामजिनी पुढे नेला. कोणत्याही समाजाच्या चळवळीची विचारधारा ही त्या आंदोलनाच्या यशस्वीतेतून ठरत असते. आंदोलनाचा मुख्य उद्देश, त्याची प्रक्रिया, कार्यशैली, रणनीती, कार्यकर्ता , नेतृत्व, संगठन ह्या आंदोलनाच्या यशातील महत्वाचे घटक असतात. कांशीरामजीनी या घटकांचा पुरेपूर वापर करीत बहुजन समाजात नवी चेतना निर्माण केली. १९९६ ला बहुजन समाज पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संपूर्ण भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेल्या राजकीय क्रांतीची ती मोठी पावती होती. आंबेडकरी राजनीतीचा  बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण होणे हे मान्यवर कांशिरामजीने घेतलेल्या श्रमाचे व जबाबदारीचे फलित होते. 
आज आम्ही कांशीरामपर्वा नंतरच्या कालखंडात वावरत आहोत. नव्या पिढीचे सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात पदार्पण होते आहे. अशा स्थितीमध्ये कांशीराम नावाचा झंझावात नव्या तरुणांना कळला पाहिजे. महापुरुषांच्या विचारावर आधारित चळवळ चालविण्यासाठी त्याग करावा लागतो. अशी त्यागी मूर्ती कांशीराम शिवाय दुसरी कोण असू शकते?. त्यांचा हा त्याग शब्दबध्द होवून तरुणांचा / कार्यकर्त्यांचा प्रेरणास्त्रोत बनला पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा त्यांचा संपूर्ण जीवनपट शब्दबद्ध होईल व त्या जीवनपटाचा प्रसार होईल तेव्हाच ते शक्य आहे. म्हणून मा.कांशीरामजींचे अप्रकाशित विचार प्रकाशित करण्याची गरज आहे. प्रकाशनाची ही जबाबदारी बहुजन समाज पक्ष पार पाडतो की कांशीरामजींच्या प्रेमाने भारावलेले बुद्धीजीवी पार पाडतात ते पहावे लागेल.

बापू राऊत

९२२४३४३४६४

Saturday, September 13, 2014

नैतिकतेवर अनैतीकतेची मात ही लोकशाहीवर संक्रात


विपरीत विचाराची माणसे एकदा सत्ताधारी झाली की ते आपल्या सोयीप्रमाणे व्याख्या बनवायला लागतात. त्यासाठी ते आपल्या बालहटटासाठी प्रचलित प्रवाह वा पद्धती बाद करण्याचा प्रयत्न करतात. आपले म्हणने ग्राह्य ठरविण्यासाठी तर्काचे नवनवीन प्रमेये मांडायला लागतात. संविधानात्मक परंपरेची नैतिकता जपणारा समूह की जो स्वत:ला लोकशाहीचा चौथा खांब समजतो तो (प्रिंट/इलेक्ट्रानिक मिडिया)  “नवे काही तरी घबाड हाती लागले” असे समजून २४ तास चर्चा करीत त्याची ब्रेकिंग न्यूज बनवितो व सभ्य समाजाचे  (सिविल सोसायटी) प्रतिनिधी म्हणून मिरविणारे सफेद कुर्ताधारी माणसे अनैतिकतेला नैतिकतेचा मुलामा देण्यात सामीलही होतात. यात घटनेच्या नीतीनियमाची पायमल्ली होते हे ते सहज विसरतात. एकूणच अराजकता व विध्वंसकारी प्रथेला जन्म देण्यास त्यांना अयोग्य असे काहीही वाटत नाही.