शिवसैनिकाला महाराष्ट्राचा “मुख्यमंत्री” बनविणारच असे वचन शिवसेना संस्थापक बाळासाहेब
ठाकरे यांना दिल्याचे उध्दव ठाकरे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेत
५०-५० टक्केचा हिस्सा मागत भाजपाकडे अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली
आणि महायुतीच्या बिघाडीला सुरुवात झाली.
दरम्यान भाजपाला पूर्णचंद्राची सवय झाल्यामुळे आणि सत्तास्पर्धेमध्ये समान
विचारधारेचा कोणीही प्रतिस्पर्धी नको असल्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या
मागणीला केराची टोपली दाखविलेली दिसते. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी
कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सहकार्य मिळाले तरच त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत
पोहोचता येते. परंतु सत्तास्थापनेत आड येणारी बाब म्हणजे विरोधाभासी विचारधारा आणि
त्याचा परंपरागत मतदारावर होणारा परिणाम होय. त्यामुळे सरकार बनले तरी ते टिकेल आणि
चालेल काय? याची सांशकता सगळेच व्यक्त करू
लागलेले दिसतात.
आजच्या विरोधाभाषी विचारधारेच्या संदर्भात भूतकाळाकडे नजर टाकल्यास आपल्याला
काही सम तर काही विषम असी मतमतांतरे दिसतात. कांग्रेस व शिवसेनेचे पूर्वसबंध हे पाल्य
व पालका सारखे असल्याचे दिसते. १९५०-६० च्या दशकात कांग्रेसचे तत्कालीन
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे सोबत बाळासाहेब ठाकरेंच्या जवळीकीमुळे शिवसेनेला
“वसंतसेना” म्हटले जायचे. कांग्रेसनेच खतपाणी घालून फुलविलेले ते अपत्य होते. काँग्रेसला मुंबईच्या
कामगारामध्ये घर करून बसलेल्या डाव्या कॅम्युनिस्ट चळवळीला संपवायचे होते. त्यामुळे कॅम्युनिस्टाना नेस्तनाबूत
करणारा त्यांना कोणीतरी हवा होता आणि शिवसेनेच्या रूपात तो मिळाला. बाळासाहेब
ठाकरे व कांग्रेसच्या नेत्यांचे सबंध मधुर होते हे अनेक प्रसंगावरून सिध्द होते. त्यामुळे
कांग्रेस व शिवसेनेला मोठ्या विरोधाभाषी चषम्यातून पाहणे हे न्यायप्रविष्ट नाही.
पूर्वीचे मित्र काही काळाने परत भेटल्यास परत मैत्रीची पालवी फुटू शकते हे नाकारता
येत नाही. त्यासाठी काँग्रेसला कॅम्युनिस्टाच्या ऐवजी “भाजपाला” समोर ठेवावे
लागेल.
शिवसेनेचा राजकीय प्रवास तसा हिंदुत्ववादी नव्हताच. १९६७ च्या पोटनिवडणूकीत
बाळ ठाकरेंनी कांग्रेसच्या स.का.पाटील यांना पाठींबा दिला होता. तर १९६८ ला प्रजा
सोशालिस्ट पार्टी सोबत त्यांनी निवडणूक आघाडी केली होती. एवढेच नव्हे तर १९७० च्या
मुंबई महानगर पालिकेमध्ये महापौराच्या निवडणुकीसाठी मुस्लिम लीग सोबत बाळासाहेब
ठाकरेंनी हातमिळवणी झाली होती. तर १९७३ च्या मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेने
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत युती करून मुंबईकराना आश्चर्याचा धक्का दिला
होता.
आणीबाणी नंतर झालेल्या निवडनुकातही जनता पक्षाला पाठींबा न देता शिवसेनेनी
काँग्रेसचीच पाठराखण केली. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी, वामनराव महाडीक आणि प्रमोद नवलकर यांना विधान परिषदेत जाण्यास
कांग्रेसने मदत केली होती. तर मार्च १९७७ ला मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदासाठी
कांग्रेसच्या मुरली देवरा यांना पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे कांग्रेस आणि
शिवसेनेचे यांचे सबंध विळा भोपळ्याचे आहे असे समजण्याचे कारण नाही.
बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे सबंध मधुर होतेच परंतु शरद
पवाराचे काहीही खरे नसते. १९१४ मध्ये भाजपाला सरकार बनविण्यासाठी त्यांनीच सर्वात अगोदर
पाठींबा जाहीर केला होता. पण खरे बिनसवले ते इडीने आणि राष्ट्रवादीच्या
नेत्यांच्या भाजपात जाण्याने. त्याचा बदला घेण्यासाठी शरद पवार भाजपाला सत्तेच्या
बाहेर ठेवण्याची खेळी करीत आहेत.
शिवसेनेच्या हिंदुत्वाची सुरुवात १९६७ च्या मध्यात होते. कल्याण जवळील
दुर्गाडी किल्ला हा त्यास कारणीभूत होता. ८ ऑगस्ट १९६७ ला बाळासाहेब ठाकरेंनी
दुर्गाडी किल्ल्यात जावून भगवा फडकविण्याची घोषणा केली. शिवसेनेच्या हिंदुत्वाची
ती पहिली पायरी होती. नंतरच्या काळात त्यांनी शिवाजी महाराजांना वापरात आणून
जनतेसमोर त्यांना हिंदू रक्षक व मुस्लिम विरोधक म्हणून प्रोट्रेट केले. त्यासाठी
शिवाजी महाराजाच्या जयंतीला साधन बनविण्यात आले. तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक
दिनाचा वापर हौसिंग सोसायट्यामध्ये सत्यनारायनाच्या पुजा घालण्यास केला. ठाण्याजवळील
भिवंडीला त्यांनी मिनी पाकिस्तान संबोधणे सुरू केले. १३ मे १९६९ ची भिवंडी दंगल
प्रथमच हिंदुत्वाच्या नावावर झाली. १९८६
ला शिवसेनेची मुंबई-ठाणेच्या बाहेर वाढ करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी विदर्भ व
मराठवाड्यात जावून दलितांना लक्ष्य करीत हिंदू विरुद्ध दलित असा संघर्ष निर्माण
करण्यात आला.
कांग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेदाची सुरुवात १९८४ पासून झाली होती.
शिवसेनेने २२ जानेवारी १९८४ ला शिवाजी पार्क वरील सभेत हिंदुत्व आणि हिंदू
राष्ट्रवादाचा आलाप करणे सुरू केले होते. बाळासाहेब ठाकरेने मी भारत राष्ट्र वगैरे
मानत नसून हे हिंदू राष्ट्र असून इथला प्रत्येक जन हिंदू आहे ही भूमिका घेतली.
नंतरच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण हे धर्म व जातीभोवती फिरत जाते. कांग्रेस
नेते मराठ्याच्या राजकारणास सुरुवात करतात. जनसंघ व आरएसएसने केवळ ब्राम्हणिकल
लीडरशिपच नव्हे तर ब्राम्हणवादाचे रणगाडे पुढे सरकविण्यास सुरुवात केली. रिपब्लिकन
पक्ष गटातटात विभागला गेल्यामुळे तो
राजकरणात परिणामशून्य होत गेला. शिवसेनेची भूमीपुत्र, मराठी माणसाची हाक व हिंदुत्वाची झूल यामुळे मुंबईतील कोकणस्थ
वर्ग शिवसेनेकडे झुकला. हा वर्ग मुख्यत: ओबीसी होता. शिवसेनेने ओबीसींच्या
विकासाच्या मंडल आयोगाला विरोध केल्यानंतरही तो शिवसेनेपासून वेगळा झाला नाही. याचे
कारण ओबीसीमध्ये मजबूत नेतृत्वाचा अभाव, जागृतीची कमतरता आणि
ओबीसी म्हणून अनेक जातीचे कडबोळे यामुळे तो शिवसेनेचा कायम मतदार बनून राहिला.
शिवसेनेचे हेच मतदार युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मतदान करू लागले.
भाजपा व शिवसेना यांची युती पहिल्यांदाच इंदिरा गांधीजीच्या हत्येनंतर झाली.
तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे स्थान हे शून्यवत असल्यासारखेच होते. प्रमोद
महाजनांनी शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यास भाजपाला सुगीचे दिवस प्राप्त होतील या
उद्देशाने युतीचे बारशिंग बांधले होते. सामना मधील एका लेखात महाजन म्हणतात, मी एकदा बाळासाहेब ठाकरेंना विचारले की,
हिंदू व्होटबँक ही मराठा, माळी, कुणबी, दलित आणि मारवाडी असी फिरते. मी ब्राम्हण असल्यामुळे आम्हाला हिंदू व्होट
मिळत नाहीत, मग आमचे राजकारण कसे यशस्वी होईल? यावर बाळासाहेब म्हणाले, मी जेव्हा शिवसेना स्थापन
केली तेव्हा लोक म्हणायचे मराठी माणूस मराठी माणसाला कधीच व्होट करणार नाही परंतु
मी ते मत “चुकीचे” ठरविले. नंतर ते म्हणाले, तू बघतच रहा, मी हिंदू व्होट “केवळ हिंदुसाठीच” अशी परिस्थिती निर्माण करीन. महाजन
लिहतात, मला हे शक्य वाटत नव्हते परंतु पुढच्या पाच वर्षातच
त्यांनी हे सिध्द केलेय. मला वाटते, नंतर भाजप कडून “हिंदुत्वाची
लाटच संपूर्ण देश जिंकून देईल” या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमेयावर पुढचे सारे राजकारण करण्यात आले. त्यामुळे
भाजपा-संघाने खरे तर बाळासाहेबाचे आपल्यावरील ऋण मानून शिवसेनेला मुख्यमंत्री पद
द्यावयास हवे होते.
हिंदुत्वाबाबत शिवसेना मवाळ झाली हे निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी घेतलेल्या
शेतकर्यांचे प्रश्न आणि दहा रुपयाची थाळी यासारख्या मुद्द्यावरून दिसून आले. नव्या
पिढीतील आदित्य ठाकरे हे हिंदुत्वाबाबत फारसे बोलताना दिसत नाही. सावरकराचा मुद्दा
हा फारसा महत्वाचा नसल्यामुळे शिवसेना आता बदलत आहे आणि हेच त्यांचे भविष्यातील
स्वरूप असायला पाहिजे. शिवसेनेची खरी व्होटबँक ही ओबीसी आहे. त्यामुळे मंडल आयोगा
संदर्भातील पूर्वीची भूमिका बदलून, पुराणातील वांग्याचे दफन करून
आणि मराठी माणूस हा केंद्रबिंदु मानून प्रबोधनकार
ठाकरे यांच्या सामाजिक विचारातून वाटचाल केल्यास पुढील काळात शिवसेना भाजपावर सहज
मात करू शकेल.
वरील मुद्दे हे कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस यांच्या वैचारिक बैठकीत
बसणारे असल्यामुळे शिवसेनेसोबतच्या
वैचारिक मतभेदाचा गुंताच निघून जाईल व महाराष्ट्र स्थिरतेकडे झेपावेल. विषमतेच्या
आकड्यात ‘एक’ अंक मिळविल्यास
त्याची बेरीज ही ‘सम’च होत असते. पण
राजकरणात काहीही होवू शकते हे भारतातील राजकारण्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे.
त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेचे भोई कोण असतील याचा अंदाज बांधन कठीणच आहे.
मात्र बनणार्या कोणत्याही नव्या सरकारने पाच
वर्षात आंतरिक मतभेदाचा गोंधळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू नये. अन्यथा जनता
परत एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी खबरदारी घ्यावी.
लेखक: बापू राऊत
मोबाईल न. ९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment