Friday, May 31, 2013

तथागत गौतम बुध्दाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन

सोलापूर येथे सप्टेंबर २०१२ मध्ये दुसरे राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात “हिंदू महिलांचे कर्मकांड की प्रगतीतील अडसर” या विषयावर झालेला परिसंवाद हा तात्विक वादविवादाने बराच रंगला होता. सदर परिसंवादात महिलांच्या अधिकार व हक्क या संदर्भात बोलताना सुनिता रेणके यांनी तथागत गौतम बुद्धाने सुध्दा महिलांना भिक्षु संघात घेण्यास विरोध करीत स्त्री-पुरुष समानता नाकारली असे म्हटले. जगातील एकमेव प्रथम पुरुष की ज्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा उदघोष केला ते पुरुष म्हणजे तथागत गौतम बुध्द हे होते.
रेणकेच्या आरोपाने सभागृह थोडावेळ स्तब्ध झाले होते. तेवढ्यात त्याच परिसंवादातील ज्यांचे पहिले भाषण संपले त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सुनिता रेणके यांचे भाषण संपताच माईक हातात घेत रेणके यांच्या वाक्याचा जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून प्रतिवाद करीत गौतम बुद्ध हे स्त्री समानतेचे कसे पुरस्कर्ते होते हे सभागृहास सांगण्याचा प्रयत्न केला. प्रा.ज्योती वाघमारे यांनीच “बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळायला नको होती तर ती पुस्तकाच्या ढीगा-यात आपसूकच दबून गेली असती” या एका स्त्री वक्त्याचा विचाराचा खरपूस समाचार घेत मनुस्मृती हा स्त्रि देहावरील कलंक असून स्त्रिनेच मनुस्मृतीची बाजू घ्यावी यापेक्षा मोठे दुर्दैव तरी कोणते असू शकते? असा रोखठोक प्रश्न त्या स्त्री व्यक्तीस केला होता. यावरून बौध्द महिलामध्ये सभेतच प्रतिवाद करण्याचा धीटपणा निर्माण होत कोणतेही वैचारिक आव्हान पेलण्याची ताकद निर्माण झाली हा आंबेडकरी स्त्री चळवळीचा मोठा विजय मानला पाहिजे.
सदर संमेलनात झालेल्या प्रतीवादावरून तथागत गौतम बुध्दाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन समजून घेणे फार अगत्याचे आहे. परिसंवादातून तथागतांनी स्त्रियांस संघ प्रवेश नाकारला होता काय? हा एक उपस्थित झालेला प्रश्न आहे. अनेकदा हा प्रश्न विचारण्यात येतो.  सामान्य जनतेमध्ये तथागताच्या स्त्रीविषयक भूमिकेवरुण द्विधा व संदिग्ध मनस्थिती निर्माण होवू नये यासाठी योग्य उत्तराची आवश्यकता आहे. तथागत गौतम बुध्द स्त्रियांकडे आदर व श्रद्धायुक्त दृष्टीकोनातून पहात असत. ते पुरुषा  प्रमानेच स्त्रियांना लायक व पात्र समजत असत. एवढेच नव्हे तर प्रत्येक स्त्रीला आपला स्वत:चा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे स्त्रिच्या उद्धाराचा मार्ग कोणालाही बंद करता येणार नाही असे तथागताने आनंदाला सांगितले होते.
एकदा तथागत राजे प्रसेनजित सोबत चर्चा करीत होते. बुध्दाचा उपदेश ऐकत असतानाच त्यांचा राजसेवक तेथे आला व राजाला कन्यारत्न झाल्याची वार्ता देवून गेला. या बातमीने प्रसेनजित नाराज झालेला असल्याचे बुद्धाने ओळखले. तेव्हा बुध्दाने प्रसेनजीतला उपदेश केला. राजे, आपण मुलगी झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करू नये. पुत्र जसा पराक्रमी राजा वा प्रसिध्द धर्मप्रचारक होवू शकतो तशीच कन्या सुध्दा आपल्या कुळाची कीर्ती जगभर पसरवू शकते. ती सुध्दा प्रसिध्द तत्वज्ञानी वा पराक्रमी सम्राज्ञी बनू शकते. या उपदेशाने राजा प्रसेनजिताची नाराजी क्षणात नाहीशी झाली व उत्साहवर्धक वातावरणात तथागत व प्रसेणजित यांची धम्मचर्चा परत सुरू झाली.  
वरील पाश्र्वभूमीवर भिक्षूसंघात स्त्रि प्रवेशाच्या विचाराची मीमांसा केल्यास तथागत बुद्धाच्या तोंडी आलेले बुध्दाचा स्त्रीस संघप्रवेशास नकार” हे विचार तथागत बुध्दाचे नसून ते मागाऊन कोणीतरी घुसाडले असावेत. भिक्षू संघातील कोणीतरी स्त्रीविरोधाचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  तथागताच्या तोंडी अशा प्रकारची विधाने घातली असावीत याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. प्रसिध्द बौध्दचिंतक धर्मानंद कोसंबी लिहितात की, भिक्षू “संघात काही दोष निर्माण झाल्यावरच ते दोष दूर करण्यासाठी तथागत विनय नियम करीत असत परंतु भिक्षुणी संघाबाबत असे दिसत नसून नियम अगोदर बनविलेले दिसतात यावरून तथागताच्या परिनिब्बानानंतर पुरुष भिख्खूसंघातील काहींनी संघाची सर्व सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून मागाहून नियम बनवून ते विनय आणि अंगुत्तरनिकाय मध्ये घातल्या गेले”. आणि हे शक्य आहे कारण तथागताच्या काळातच अनेक  भिख्खुनिनी उच्च गुणवत्ता व  विद्यासंपनता प्राप्त केली होती त्यामुळे असे घडणे दृष्टीआड करता येत नाही. पुरुष भिख्खू संघातील काहीना स्त्रि भिख्खुनीच्या हुशारीची भीती वाटत होती. तथागताच्या परीनिब्बानानंतर आनंदावर अनेक आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक आरोप स्त्रियांच्या संघप्रवेशा संदर्भातील होता. तसेच तथागताच्या परीनिब्बानानंतर अनेक वर्षानी बौध्द तत्वज्ञानाचे हस्तलिखित तयार करण्यात आले होते. बौध्द तत्वज्ञानाची हस्तलिखिते निर्माण करना-या मंडळीत काही अहंकारी भिक्षुक असावेत की ज्यांचा स्त्रीसंघास विरोध असावा व त्यांनीच आपल्यावर कोणतेही बालंट येवू नये म्हणून बौध्द ग्रंथात तथागताचा स्त्रीस संघप्रवेशास नकार होता हे वचन घुसाडले असावे यात तीळमात्र शंका उरत नाही. भिक्षू संघामध्ये बरेच भिक्षुक हे पुरुषप्रधान ब्राम्हणी व्यवस्थेमधून आले असल्यामुळे स्त्रियांना बरोबरीने वागविण्याची निकोप मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली नव्हती.    
याच संदर्भात दुस-या बाजूने विचार केल्यास, तथागत बुद्धाना स्त्रियांचा अध्यात्मिक अधिकार मान्य होता. परंतु तथागत हे अंतर्ज्ञानी असल्यामुळे स्त्रियांना संघप्रवेश दिला तर स्त्री पुरुष साधकाच्या एकत्रिकरणातून प्रमाद घडण्याची मानवी चूक होण्याची समस्या त्यांना भेडसावीत असावी. यातून मार्ग काढण्यासाठी स्त्री व पुरुष साधकासाठी/ भिक्षुसाठी कडक नियमावली बनविण्यात आली. अशा नियमाची बुद्धांना गरज वाटली कारण कोणतीही संघटना चालवायची व ती हजारो वर्ष टिकविण्यासाठी कडक व सक्तीच्या नियमाची गरज असतेच. एखाद्या संघटनेत सक्तीचे नियम व शिक्षेची तरतूद नसेल तर अशा संघटनेत गोंधळ व अराजकता माजत असते. परिणामी अशी कोणतीही संघटना फार काळ टिकत नसून लवकरच संपुष्टात येत असते मग ती स्थापन करणारा कोणताही महापुरुष का असेना. त्यामुळे तथागताने संघातील भिक्षू व भिक्षूनीसाठी नियमावली बनविण्याच्या वेळेपर्यंत स्त्रियांना संघप्रवेश केवळ काही दिवसापुरता थांबविला होता. यावरून केवळ बुध्द हे स्त्रीच्या संघप्रवेशास नकार देत होते असे म्हणणे म्हणजे आपल्या मनात निर्माण झालेली विकृत भावना दुस-यावर ढकलणे होय. धर्मानंद कोसंबी यांच्या म्हणण्याप्रमाणे तथागथाने स्त्रियांच्या संघप्रवेशा अगोदरच संघ नियमावली बनविली होती व त्या नंतरच संघात स्त्रीप्रवेश झाला. यावरून सुरूवातीस स्त्रियांच्या संघ प्रवेशास तथागताचा नकार होता असे म्हणणे हे सर्वस्वी झुठ खोटेपणाचा प्रमाद आहे.   
स्त्री-पुरुष समानतेच्या जाणिवेतूनच बुद्धाकडे बघितले पाहिजे कारण बुध्द हे स्त्री-पुरुष समानतेचे प्रथम  उदगाते होते. बुद्धांनी स्त्रियांना एवढी प्राथमिकता दिली होती की त्यांनी वैशालीच्या लीच्छवी गणराज्याने दिलेले जेवणाचे निमंत्रण केवळ यासाठी नाकारले होते की वैशालीची नगरवधू असलेल्या आम्रपालीकडे  प्रथम जेवायचे आमंत्रण स्वीकारले होते. बुद्धांना स्त्रीचा अनादर तर सोडाच त्यांनी वेश्येनाही आदर दिला होता. बुद्धांनी स्त्रियांना मातुगम हा शब्द वापरला आहे.
बुध्दाचा धर्म हा ब्रम्हचर्येच्या अधिष्ठानावरच आधारला होता. बुध्द म्हणतात, ब्रम्हचारी हे उत्तम धन होय. बुध्दाची भिक्षुणा सक्त ताकीद होती की अब्रम्हचर्य वर्ज्य करावे पण जर ब्रम्हचारीपणा पाळणे शक्य नसेल तर त्याने परदारगमन करू नये. बुद्धाने आपल्या धर्मविनयात भिक्षुणा वैराग्यप्रवण नियमाचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. जो भिख्खू विषयवासनेला बळी पडतो तो भिक्षु केवळ निंदनीयच नव्हे तर त्याला संघातून काढून टाकले पाहिजे असे सक्त आदेश बुध्द देतात. तथागतांनी जशी स्त्रिकडून स्वशिलाच्या रक्षणाची अपेक्षा केली तसीच अपेक्षा त्यांनी वारंवार पुरुष भिक्षूकडून केली हे विसरता येत नाही. स्त्रि असो वा पुरुष, ज्या व्यक्तीकडे धम्माचे यान असते ती प्रत्येकच व्यक्ती निब्बानाजवळ पोहोचत असते. यावरून पुरुषाच्या बरोबरीनेच स्त्रियांचा हक्क असतो हे तथागतांनी मान्य केले हे स्पष्ट दिसते.  
स्त्रीचे रूप पुरुषाच्या चित्तावर कमालीचे दडपण आणीत असते. स्त्रिबद्दल जशी पुरुषाची आसक्ती तसीच पुरुषाबद्दल स्त्रीची आसक्ती असते. मानवी स्वभावाची ही उणीव बुध्दाला ठावूक होती म्हणून त्यांनी स्त्रीबद्दलचा आदर बाळगून भिख्खु व भिख्खुनीच्या संघाना स्वत:चे रक्षण करण्याचा सल्ला दिला होता. स्त्री-पुरुष भिख्खूना असा सल्ला देण्याचे कारण म्हणजे साधका/साधिकेच्या मनात स्त्री-पुरुष देहाबद्दल नासक्ती निर्माण करून त्यांच्यावर वैराग्य वृत्तीचा प्रभाव पाडणे हा होता.
एखाद्या पुरुषाचा एकदम जवळचा परम मित्र कोण? असा प्रश्न तथागताला विचारण्यात आले होता, त्यावर ते म्हणाले “भार्या ही परम सखा होय” म्हणजे पत्नी हीच त्या पुरुषाची सखी वा मित्र असतो.  पत्नी ही पतीची दासी असते हे वैदिक परंपरेतील तत्व बुद्धांनी साफ फेटाळून लावले होते. म्हणून तथागत बुध्दाचा स्त्रीविषयक दृष्टीकोण शंकाकर्त्यांना वा  प्रश्नकर्त्यांना समजावून सांगताना परिस्थितीजन्य व सभ्रंमात टाकणारे विवेचन सादर करने हे उत्तरकर्त्याचे कर्तव्य असते.
बापू राऊत
९२२४३४३४६४

1 comment:

  1. The Vinaya does not allow for any power-based relationship between the monks and nuns. Dhammananda Bhikkhuni wrote:

    Nuns at the time of the Buddha had equal rights and an equal share in everything. In one case, eight robes were offered to both sanghas at a place where there was only one nun and four monks. The Buddha divided the robes in half, giving four to the nun and four to the monks, because the robes were for both sanghas and had to be divided equally however many were in each group. Because the nuns tended to receive fewer invitations to lay-people's homes, the Buddha had all offerings brought to the monastery and equally divided between the two sanghas. He protected the nuns and was fair to both parties. They are subordinate in the sense of being younger sisters and elder brothers, not in the sense of being masters and slaves."[9]



    https://en.wikipedia.org/wiki/Bhikkhuni#cite_note-thubtenchodron.org-9

    ReplyDelete