Friday, October 9, 2015

असा भारत हवाय कुणाला?

भारतीय घटनेने लोकशाही जीवन प्रणालीची सर्व समावेशक व्याख्या केली आहे. न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ही मूल्ये लोकशाही जीवन प्रणालीचा गाभा आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व संधीची समानता याचे सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता निर्माण करणाऱ्या बंधुतेवर तिने भर दिला आहे. असे असले तरी वरील मुल्यांचा वेगवेगळा व सुट्या पध्दतीने विचार करता येत नाही. प्रत्येक मूल्य एकमेकाशी अतूटपणे जोडले गेले आहे. ह्याच एकत्रित जीवन प्रणालीला “लोकशाही जीवन” असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीयाने ही “लोकशाही जीवनप्रणाली” जपने अपेक्षित आहे. ह्या “लोकशाही जीवन” पध्दतीला तडे गेल्यास तिचे फार अनिष्ठ परिणाम होवू शकतात. याची अनेक उदाहरणे आज बघायला मिळतात. अफगाणिस्थान मध्ये तालिबानने, सिरीया व  इराक या देशात इसीसने तर आफ्रिकेमधील काही देशात बोको हराम सारख्या संघटनांनी ‘एकात्म लोकशाही जीवनप्रणाली’ ला आवाहन देत ती उधळून लावीत आहेत. मानवतेला मोठ्या हिंसक, विक्राळ व क्रूर पध्दतीने चीरडण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. धर्मांधतेवर आधारित संघटना कोणत्या थरावर जातात याचे हे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण आहे.
भारतात सुध्दा अशा धर्मांध संघटनांची अरेरावी वाढलेली आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून तर त्यांना नव संजीवनीच मिळाल्यागत झाली आहे. स्त्रियांनी कसे व कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे? लोकांनी काय खायचे व काय खावू नये असे जबरदस्तीचे बंधन लादु लागले आहेत. अल्पसंख्यांकानी  दुय्यम नागरिक म्हणून जगले पाहिजे व इथच्या (वैदिक) संस्कृतीचे पालन केले पाहिजे. हिंदुच्या नवरात्री (गरबा), होळी अशा सणामध्ये इतर धर्माच्या तरुणांनी भाग घेवू नये अशा प्रकारच्या निर्बंधाचे फतवे ह्या संघटना काढू लागल्या आहेत. अशा प्रकारे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश धर्मांधाच्या विळख्यात सापडणे म्हणजे देशाची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली तर जातीलच परंतु देश नेहमीसाठी अशांत व अस्थिर बनेल हा मोठा धोका आहे.

भारतात त्याची सुरुवात बाबरी मसजिद पाडण्यापासून झाली आहे. तेव्हाच भारताचा धर्मनिरपेक्षवादी चेहरा  तथाकथित फ्राड राष्ट्रवाद्याकडून फाडल्या गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व तिच्या शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व निगडीत अशा अनेक संघटनानी भारताचे तालिबानीकरण करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतो. याचा दोष कांग्रेसकडेही जातो कारण कांग्रेसचे सरकार दिल्ली व अनेक राज्यात सत्तेवर असतानाही या संघटनाच्या अरेरावी व विखारी संदेश पसरविण्याच्या प्रक्रियेला रोखले नाही.  कांग्रेसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले हितचिंतक व हिंदुत्वावर असलेल्या त्यांच्या मायेमुळे  त्यांनी संघाला हातपाय पसरू दिले. बाबरी पतनाच्या कार्यात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी होते तर कांग्रेसमध्ये सहानुभूतीकार होते. खुद्द नरसिंहराव यांचेवर ते आरोप लागले होते. याअर्थाने कांग्रेस हा छदम धर्मनिरपेक्षवादी पक्ष आहे.

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत हजारो अविवेकी कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली. बाबरी कांडानंतर देशात मोठ्या दंगली उसळल्या. गुजरात, बिहार (भागलपूर), उत्तरप्रदेश व मुंबईत झालेल्या दंगली मनाला अस्वस्थ करणाऱ्या होत्या. यात मुस्लीमासकट इतर धर्मियानांही आपले प्राण गमवावे लागले. हजारो लोक बेघर झालेत. दंगेखोराकडून काहींनी आपल्या आईवडिलांना तर काहींनी आपल्या मुलांना मारताना व जाळताना बघितले. आस्ट्रेलीयन धर्मगुरू ग्रहम स्टेन व त्याच्या दोन निर्दोष मुलांना जिवंत जाळण्यात संघाच्या बजरंग दल व विहिपचे कार्यकर्ते आरोपी आहेत. मेलेल्या गाईचे मास व कातडे काढल्यावरून हरियाणातील झज्जर येथील पाच मागासवर्गीयांना जाळण्यात आले होते. एका मागास व्यक्तीने मंदिरात प्रवेश केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील हमिद्पूर येथे जिवंत पेटवून देण्यात आले.(डीएन. दिनांक ०४.१०.२०१५), बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी मंदिरात जातात. मंदिराच्या बाहेर आल्यावर मंदिर बाटले म्हणून मंदिर मंत्रोपचाराने व गोमुत्राने शुध्द करण्यात आले. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी तर साफ म्हटले आहे की, शास्त्रानुसार अनु.जातीच्या लोकांनी मंदिरात जावू नये. त्यांनी आपल्या मर्यादेचे पालन केले पाहिजे.  जिथे मुख्यमंत्र्याला अशी वागणूक दिली जाते तिथे सामान्य व खालच्या जातीच्या लोकांचे काय हाल होत असतील.? याची कल्पना करून बघा. उत्तर प्रदेशातील बिसादा गावातील अखलाद या मुस्लीम युवकाला गाईचे मास खाण्याच्या केवळ अफवेवरून हत्या करण्यात आली. यात ज्या आरोपींना पकडण्यात आले त्यावरून या देशाला अफगाणिस्थान कोण बनवू पाहात आहे हे लोकासमोर आले आहे. मुझफ्फरनगरला निवडणुकांच्या अगोदर हिंदू मुस्लीम दंगे घडवून मुसलमानाच्या वसाहती पेटविण्यात आल्या. जे गुन्ह्यात सापडतात त्या आरोपींना वाचविण्यासाठी काही पक्षसंघटना वकिलाची फौज उभी करतात.

कोणती विचारप्रणाली व संघटना अशा घटनांच्या पाठीमागे असावी? १९२५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कट्टरपंथी हिंदुत्वाचे पांघरून घेवून देशात राष्ट्रवादाच्या नावाने विषमतावादी वर्णव्यवस्थेचा अबाधीतपणा, परधर्मद्वेष, पूर्वांपार चालत आलेली भक्ती, धार्मिक विधी व त्याचे कट्टरपणाने पालन केल्याने अमृततत्व प्राप्त होवून स्वर्ग सुख प्राप्त होत असते. हिंदू सोडून सगळ्यांना परकीय मानले पाहिजे. संघाच्या ह्या शिकवणीनेच आज देशाला अस्थिर व हिंसाचाराच्या गर्तेत सोडले आहे. संघाच्या विचारधारेचे मूळस्थान म्हणजे म्हणजे संघाचे दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजी यांचे “ विचारधन (Bunch of Thought)” हे पुस्तक. वर्ण व जातीसंस्थेला उपकारक संबोधून समतेवर आधारित समाजव्यवस्था नाकारणारे गोळवळकर हे व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार व हक्क, बंधुता तसेच संधीची समानता हि मूल्य मांडणाऱ्या लोकशाही प्रणालीलाच ते नाकारतात. समाजातील सर्व लोकांना एकाच भौतिक पातळीवर आणणे हे गोळवळकराना मान्य नव्हते. गोळवळकराच्या विचाराला प्रमाणभूत मानून स्वयंसेवक संघाला भूतकाळातील वैदिक व मनुवादी व्यवस्थेचे उदात्तीकरण, वर्णव्यवस्था आधारित विषम समाजव्यवस्था आणि या व्यवस्थेला चालविण्यासाठी ब्राम्हणांच्या हातात अमर्यादित अधिकार अशी समाजव्यवस्था संघाला हवी आहे. संघाचा विचार व व्यवस्था प्रत्येकाने मानलीच पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघ शिस्तबध्द पध्दतीने मार्गक्रमण करीत आहे असे आजच्या एकूण हालचालीवरून वाटते. संसद, न्यायपालिका, कार्यपालिका या देशाच्या मुख्य खांबामध्ये संघीय विचारप्रणालीचे लोक घुसविण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. संघ यात यशस्वी झाला की घटनेला बाद करण्यास त्यांच्या बाह्या पुढे सरसावतील.

आता तर संघाने सपूर्ण देशात आपले जाळे पसरविले आहे. ज्या ज्या ठिकाणी संघ जातो त्या त्या ठिकाणी दोन जमाती व धर्मामध्ये तेढ निर्माण होवून दंगली होतात. इतरांच्या धर्माचा द्वेष करणे संघ आपल्या अनुयायांना व हिंदू जनतेला शिकवित असतो. कारण हे धर्म वर्णश्रेष्ठतेवर आधारित सनातन धर्माच्या स्थापनेसाठी संघाला मुख्य अडथळे वाटतात. संघीय संस्थांच्या अरेरावीला कंटाळून हिंदुतील मागास समाज मोठ्या प्रमाणात धर्मान्तर करेल म्हणून संपूर्ण देशात धर्मान्तर विरोधी कायदा आणण्याचा संघाचा मनसुबा आहे. ज्या गोष्टी मुस्लीम, ख्रीश्चन व इंतर धर्मियांना प्रिय त्या हिंदुसाठी अप्रिय अशा रचनेतूनच गोवंश बंदीचा उदय संघाकडून करण्यात आला आहे. गोहत्या हा तणावाचा विषय करण्यात येत आहे. आजपर्यंत लाखो हिंदू व इतर धर्मीय गोवंशाच्या मासाचा व्यापार करायचे व त्यांतून अनेकांचे उद्योग चालायचे. परंतु अचानकच संघ व त्यांच्या संघटनांनी गोवंशाच्या खाण्यावर व उद्योगावर बंदी आणून  लाखोंना बेरोजगार केले आहे.

भारतात एकीकडे गोदामात धान्य सडत असते तर दुसरीकडे गरिबीने, दुष्काळाने व भुकेने माणसे मरतात. मेळघाट, गडचिरोलीचा ग्रामीण भाग, धुळे व ठाणे जिल्ह्यात आदिवासींची अवस्था बघितली कि मन हेलावून जात असते. या देशात गरिबांची व शेतकऱ्यांची फार थट्टा चालू आहे. एकीकडे विकासाचा दर वाढला म्हणून पाठ थोपटून घ्यायची तर दुसरीकडे  ४८ टक्के बालके कुपोषित व भूकबळी असतात त्याकडे ढुंकूनही बघायचे नाही. लाखो गावात पिण्याचे पाणी मिळत नाही, लाखो शेतकरी व मजदूर आत्महत्या करतात. यावर हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या संघटना कधी बोलताना वा आंदोलन करताना दिसत नाही. परंतु सामान्य लोकांची कर्मकांड व अंधश्रध्दा यातून सुटका करू पाहणाऱ्यावर व विवेक शिकविनार्यावर संघीय लोक तुटून पडत असतात.

महाराष्ट्रात सनातन संस्था माणसे मारू लागली आहे. सनातन विचाराच्या (वैदिक विचार व प्रथा) विरोधात जो असेल त्याला संपविलेच पाहिजे. त्यांना जगण्याचा कोणताही हक्क नाही असा आदेशवजा उपदेश आपल्या साधकाच्या मेंदूत टाकला जातो व संमोहनाच्या माध्यमातून हवे ते घडवून आणल्या जात आहे. त्याच प्रक्रियेतून नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या घडविण्यात आली. हिंदू जनजागृतीच्या लोकांनी प्रसिध्द लेखक यु.के. अनंतमूर्तीना पाकिस्थानात जायला सांगितले होते व त्यांच्या मरणोपरांत बंगलोर मध्ये पेढे वाटण्यात आले. तरीही सरकार मुग गिळून आहे. धर्माच्या ठेकेदारांच्या आवाजाला सीमा व मर्यादा उरलेल्या नाहीत. विवेकाने जगणाऱ्या लोकांनी आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय? हिंदुत्ववादयांनी व्यक्तीच्या मुक्तपनाच्या स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. तालिबानी अफगाणिस्थान मध्ये यापेक्षा दुसरे काय घडत असते? आता भारतात लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून भारताचे तालिबानीकरण (सनातनीकरण) चालू आहे.

भारतीय घटनेने लोकांच्या सुपूर्द केलेल्या लोकशाहीची जीवनमूल्ये समाजजीवनात रुजायला सुरुवात होत असतानाच संघीय संस्थाना ते होवू नये असे वाटत असते. त्याचाच परिणाम म्हणून हिंदुच्या वस्त्या व सहकारी गृहनिर्माण सोसायट्यामध्ये मुसलमान व अस्पृश्य समजल्या जाणार्या जातीना भाड्याने घरे मिळू दिली जात नाही. जात, धर्म व आडनावे विचारून घरे भाड्याने दिली जातात वा त्यांची खरेदी विक्री केल्या जाते. मानवता व माणुसकीचा येथे सपशेल पराभव झालेला बघायला मिळतो. नैसर्गिक आपदा आल्यास सरकारेही जाती व धर्मानुसार घराचे वाटप करीत असतात. गुजरात मध्ये हे प्रकार बघायला मिळतात. धर्म व जातीय वर्णवर्चस्ववादी संस्थांना आळा घातला नाही तर देशाच्या इतर राज्यात हे लोन पसरायला फारसा वेळ लागणार नाही.

संघाने प्रत्येक जाती व धर्माच्या विशेषत: मुस्लीम, ओबीसी, अनु.जाती जमाती, ख्रिश्चन लोकांच्या संघसमर्थक संघटना बनविल्या आहेत. हिंदुकडून मुसलमानावर अत्याचार झाल्यास त्याचा प्रतिवाद करण्यास संघ व भाजपतर्फे शहनवाझ हुसेन, मुक्तार अब्बास नकवी वा अहमद अकबर यांना मिडिया समोर पाठविले जाते. मोहन भागवत वा इतरांनी आरक्षणावर विवादित भाष्य केल्यास वा अनु.जाती जमातीवर हिंदू कडून हल्ले झाल्यास उदित राज, रामविलास पासवान व रामदास आठवले यांना संघ व भाजपाच्या बचावासाठी मिडिया समोर उभे केल्या जाते. संघाची असी स्वत:च्या बचावाची रणनीती आहे. कारण या बचाव नीतीमुळे संघाला आरोपातून मोकळे होवून पुढच्या मंथनासाठी सिद्ध होता येते. संघाचे हे गोबेल्स तंत्र आहे. मोठमोठे धुरीण यास बळी पडलेले दिसतात. 

हिंदू खतरेमे है असी आरोळी देत सर्व मागासवर्गीय हिंदुना ख्रिश्चन व  मुसलमानाच्या विरोधात रस्त्यावर उतरवायचे परंतु जेव्हा मागासवर्ग हिंदुच्या विकासाची, त्यांना विशेष सवलती देवून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक जीवनमान उंचावण्याची नीती सरकारे जाहीर करते तेव्हा त्याच मागासवर्गीय हिंदूच्या विरोधात दुसर्या सशक्त हिंदुना उभे केल्या जाते. मंडल कमिशनकृत आरक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने असेच दुहेरी मापदंड वापरले आहेत. म्हणजेच हिंदूतील ओबीसी व इतर तत्सम जातीं शैक्षणिक व आर्थिकदृष्टीने सक्षम होवू नये असेच संघाचे धोरण आहे याला त्यांच्याच कृतीतून पुष्टी मिळते.  भारताने परकीय आर्याबरोबरच आर्योत्तर हून, शक्, कुशाण, मुघल, ख्रिश्चन यांना आपल्या कवेत सामावून घेतले. रणांगणाच्या थाळोळ्यात सापडलेल्या या देशात कोणताही वंश शुध्द नाही. तरीही वंश व वर्ण श्रेष्ठत्वाचा टेंभा त्यांनी का मिरवावा.? एकोप्याने राहणाऱ्या वेगवेगळ्या जाती व धर्मामध्ये संघर्ष होईल अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून देश अस्थिर करण्याचा हक यांना कोणी दिला? संघाला झुंडीच्या मानसशास्त्र चांगलेच अवगत झाले आहे. परंतु ते आता लोकांनीच थांबविले पाहिजे.

संघाची असी मानवता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता विरोधी भूमिका असताना देशाचे प्रधानमंत्री मी संघाचा स्वंयसेवक असल्याचा अभिमान असल्याचे जाहीरपणे सांगतात तेव्हा घटनेची शपथ घेतलेल्या प्रधानमंत्र्यांनी कोणाचा व कोणता एजंडा राबविणार आहोत? हे सुध्दा जनतेला सांगितले पाहिजेत. आज संघीय संस्थानी माजविलेलेल्या धार्मिक व सामाजिक हिंसेवर, गोहत्येच्या संशयावरून होत असलेल्या खुनी चक्रावर, मिथक म्हणजेच इतिहास ह्याची होणारी बळजबरी, अंधश्रदेवर प्रहार करून विवेकवाद सांगणाऱ्या विचारवंताच्या होत असलेल्या हत्यावर प्रधानमंत्री बोलताना दिसत नाहीत. संघाला अभिप्रेत असलेला भारत निर्माण करून व्यवस्थेचे उलटे चक्र फिरविण्याचा एजंडा राबवायचा असेल तर तो कोणाला मान्य आहे? असा भारत कोणालाही नको आहे. आजच्या आधुनिकतेच्या वैज्ञानिक जगात प्राचीन गौरव, कर्मकांडे, पूजा विधी ह्या गोष्टी तरुण पिढीला नको आहेत. त्यांना वर्तमानातून भविष्याकडे बघायचे आहे. त्यामुळे कोणालाही आपला एजंडा कोणावरही थोपविता येणार नाही. संघाच्या संकल्पनेतील भारत तर  कोणालाही नकोच नको आहे  आणि भारतीय लोक ते सहनही करणार नाहीत.

बापू राऊत
मोबाईल.न.९२२४३४३४६४

इ मेल: bapumraut@gmail.com

1 comment: