याअगोदर वंचित (दलित) समाजावर जातीय अत्याचार होत
नव्हते असे नाही. कांग्रेस सत्तेमध्ये असलेल्या महाराष्ट्रात अमानुष असे खैरलांजी हत्याकांड
झाले. सातारा जिल्ह्यातील मुळगाव (२०१२) येथे रेखा चव्हाण या महिलेस विवस्त्र करून
लाकडी दांडक्याने मारहाण करीत गावातील रस्त्यांवर फिरविण्यात आले होते. अहमदनगर
जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि पाथर्डी याठिकाणी वंचित समाजावरील अत्याचाराच्या
कौर्याने तर परिसीमा गाठली. सतरा वर्षीय नितीन आगे यास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध
असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली व त्याचे शरीर झाडाला अडकविण्यात आले होते.
सोनई गावात तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यात शेतात
विहीर खोदली म्हणून मधुकर घाटगे यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे
करण्यात आले होते. वसई येथे महापुरुषाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने एक
पत्रकारासह दोन भावावर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला
केला. अशा या
अत्याचारात महाराष्ट्र सरकारची भूमिका काय होती? वंचित समाजाला संरक्षण मिळाले तर
नाहीच परंतु अत्याचार करणार्यालाही शिक्षा झाल्या नाहीत. याउलट अॅट्रासिटीचा कायदाच कमकुवत करण्याचे प्रयत्न सत्ताधार्याकडून झाले.
जातीचा अहंकार बाळगून कायद्याला न जुमानणारे लोक व त्यांनाच साथ देणारे पोलीस खाते
अशी अभद्र युती झाल्यावर वंचित समाजावरील अत्याचार कमी कसे होतील.? उलट ते वाढतच
जातील. सरकार कोणाचेही असो जातीय अहंकाराची फुशारकी मानणारा समाज जोपर्यंत
अस्तित्वात राहील तोपर्यंत अत्याचार हे होत राहतीलच.
हरीयाणात झज्जर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग
दलाच्या कार्यकर्त्यांनी वंचित समाजाच्या पाच लोकांना गाईचे कातडे काढल्याच्या
संशयावरून जिवंत जाळले होते. तेव्हा विहिपचे
गिरीराज किशोर यांनी गाईला मारणाऱ्याचे असेच हाल होतील असे म्हटले होते. तेव्हा
सत्तेमध्ये असलेल्या कांग्रेस सरकारने त्यावर कोणती कारवाई केली? वंचित व
अत्याचारित समाजाला कांग्रेसने न्याय मिळवून दिला काय? केवळ आश्वासनाची बोळवण करून
वंचित समाजाला या देशात बळीचा बकरा करण्यात आला आहे. कोणीही यावे व कापून घ्यावे. काही दिवसासाठी हातपाय
हलतात मग सगळे शांत होत असते हे त्यांनाही कळून चुकले आहे.
जागतिक महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या भारतीय
समाजात जातीयवादाची पाळेमुळे किती घट्ट रोवली आहेत हे महाराष्ट्रातील केवळ अहमदनगर
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच पहावयास मिळते. महाराष्ट्रात सन २०१२ या
वर्षात अॅट्रासिटीच्या १०५१
तर २०१३ साली १६३४ केसेस नमूद करण्यात आल्या. या केसेसच्या निपटाऱ्यासाठी सहा
फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापण करण्याचे तेव्हाचे गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडून घोषणा
करण्यात आली होती परंतु पुढे तिचे काय झाले ते कोणासही कळले नाही.
भारतात २०१४ ला केंद्र
व राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जातीयवाद्यांना व धर्मवाद्यांना अधिकाधिक बळ
मिळाले. कारण निवडून आलेल्या पक्षांचा (भाजपा) स्वभाविक गुणधर्म हा वर्णव्यवस्था व
जातीव्यवस्थेचे गोडवे गाणारा होता. त्यामुळे अत्याचार करणाऱ्या उच्च व सांमंती
जातींना आता आपलेच सरकार आलेले आहे व आपले कोणीही वाकडे करू शकणार नाही हि
आजपर्यंत दबा धरून असलेली मानसिकता निर्भयपणे बाहेर आली. या मानसिकतेला अधिक बळ
देण्याचे काम आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदावर असलेल्या
लोकांकडून झाल्यावर तर मग बघायलाच नको. याचाच परिणाम म्हणून देशात जातीय अत्याचाराचे
थैमान व द्वेषाचे वादळ घोंघावू लागले आहे. आपल्या विचाराच्या विरोधी वागनार्यावर
हल्ले करून गोळ्या घालण्यात येत आहे.
हरियाणाचा मुख्यमंत्री व संघाचा प्रचारक
असलेल्या मनोहरलाल खट्टर यांनी नुकतेच मुसलमानाना संबोधून भारतात राहायचे असेल तर बीफ खाणे सोडावे
लागेल असा इशारा दिला होता. जणूकाही हा देश यांना आंदनातच मिळाला आहे. उत्तरप्रदेशात
झालेल्या दादरी हत्याकांडाचे
पडसाद जगभर उमटत असतानाच खट्टरच्या राज्यातील सुनपेड गावात जातीयवाद्यांनी
वंचित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन निष्पाप बालकांना
जिवंत जाळले. हे हत्याकांड “तुमचा वंशच आम्ही खत्म करू” अशी धमकी देवून करण्यात
आले आले होते. हृदय पिळवटून टाकणारे त्याहूनही भयानक म्हणजे हे हत्याकांड पोलिसांच्या
नजरेखालीच घडविण्यात आले होते. तर दुसरे हरियाणातील
गोहाना येथे १५ वर्षीय दलित मुलाची कबुतर चोरी प्रकरणावरून हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून देशात वंचितांचे
“मरण स्वस्त होत आहे” या साहित्यिक बाबुराव बागुलांच्या प्रसिध्द वाक्याची आठवण
होते. याची प्रचीती दोन निष्पाप मुलांच्या हत्येवर भाजपाचे केंद्रीय मंत्री
व्ही.के.सिंग या मंत्र्याने ‘एखाद्या कुत्र्यावर कोणीतरी दगड मारण्याची’ उपमा देवून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याहून अधिक
विवेकशून्य व अधमपणाचे दुसरे कोणते उदाहरण असू शकते? दलित हत्याकांडावर भारताची प्रसारमाध्यमे सुध्दा जातीयवादी मनोवृत्ती दाखवित
असतात. आखाती देशातील समुद्रकिनार्यावर एका मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रसंगावर याच
मिडीयानी किती हळहळ व्यक्ती केली होती. त्यावर त्यांनी स्पेशल रिपोर्ट दाखवून
न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु हेच सुनपेड गावात वंचित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन निष्पाप बालकांना जिवंत जाळले जाते तेव्हा हाच मिडीया आपले डोळे बंद करतो व तोंडाला कुलुपे लावून
बसल्यासारखे करतात. दिल्लीतील निर्भया त्यांना महत्वाची वाटते परंतु उत्तर
प्रदेशात गरीबांच्या व वंचितांच्या दोन बहिणींवर अत्याचार करून झाडावर लटकाविन्यात
येते तेव्हा ही घटना बिनमहत्वाची वाटते. हे फार दुर्दैवी आहे. ह्या केवळ आकस्मिक
घडणार्या घटना नसतात. समाजव्यवस्थेची जडणघडण व मानसिकता यास कारणीभूत आहे.
भारतात हा वंचित समाज हिंदू हे लेबल लावून जगत
आहे. तरीही हिंदू असणारे लोकच त्यांच्यावर अधिक अत्याचार करतात. त्यांना मंदिरात
जाता येत नाही, लग्नात घोड्यावर बसण्याचीही परवानगी नाही, बरोबरीने बसण्याचाही
हक्क नाही. या समाजावर मुस्लीम किंवा ख्रिश्चन सामाजाने अत्याचार केल्याच्या कधी
बातम्या येत नाहीत. म्हणून हिंदू म्हणून गुलामीचे जीवन जगण्यापेक्षा या वंचितानी स्वाभिमानी
जगण्यासाठी दुसर्या धर्माची दारे ठोठावली तर त्यासाठी हिंदुत्ववाद्यांना कहर माजविण्याचा
हक्क तरी उरतो काय? कशाला घरवापसीची नौटंकी करताय?. येल्लम्मा या देवतेचा टॅटू पायावर गोंदविल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने आपला छळ केला असा आरोप ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या मॅट कीथ आणि इमिली यांनी केला आहे?. यावरून
भारतातून सहिष्णुता व विवेकता पार हद्दपार झाली आहे असेच दिसते.
मध्यप्रदेशातील महोईकाला येथे वंचित समाजाच्या महिला सरपंचाची निर्वस्त्र नग्न
धिंड काढण्यात आली. महिला सरपंचाचा गुन्हा काय तर तिने गावातील शुक्ला
परीवाराविरुध्द विकास निधीतील पन्नास हजार रुपये मागत असल्याची तक्रार पोलिसात
केल्यावरून ह्या दबंगानी हे अमानुष कृत्य केले. तर उत्तरप्रदेशात दादरी
प्रकरणानंतर मैनपुरी येथे गोहत्येची अफवा व गाईचे कातडे काढल्याप्रकरणी वंचित
समाजाच्या दोन तरुणाना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तामिळनाडू मध्ये थेवास व वंचित समाज यांच्या मध्ये नेहमीच संघर्ष होताना
दिसतो. कोडीयामकुलम मध्ये थेवास या जमातीने वंचित समाजाची घरे दारे लुटली तसेच त्यांच्या
विहिरीच्या पाण्यामध्ये विषारी किटकनाशके टाकण्यात आली होती. १९९६ मध्ये मदुराई
जिल्ह्यातील मलावलावू ह्या पंचायतीमध्ये राजकीय आरक्षण लागू करण्यात आले होते.
आरक्षणाच्या माध्यमातून निवडणुका होवू नये यासाठी उच्चवर्णीयांनी वंचित समाजाच्या
वस्त्यावर हल्ले करून अनेकांना जिवंत मारले व निवडणूक प्रक्रियाच थांबविली. एकूणच
वंचित समाजाने राजकीय सत्तासूत्रे हातात घेणे हे उच्चवर्नियांना सहन होण्यापलीकडचे
आहे. कर्नाटकामध्ये सुध्दा लिंगायत व वोक्कालिंगा ह्या जाती वंचित समाजाला रोखण्याचे
प्रयत्न करीत असतात. केरळमध्ये चन्नार ह्या जातीच्या स्त्रियांना परंपरेनुसार आपले
वक्षस्थळ उघडे ठेवावे लागते. त्यांचा स्वाभिमान जागृत होवून त्या जेव्हा आपले
संपूर्ण शरीर झाकायला लागल्या तेव्हा प्रगत जातीच्या स्त्री पुरुषांनी चन्नार समाजावर
हल्ले करने सुरु केले. वंचित समाजावरचा हा अन्यायाचा पाढा हजारो वर्षापासूनचा आहे.
बरोबरीचा हक्क मागितल्यास ही व्यवस्था हक्कच नाकारताना दिसते.
देशाच्या अनेक भागात वंचित समाजावर असे अनन्वित अत्याचार होतात. काही अत्याचार
रजिस्टर्ड होतात तर हजारो प्रकरणे उच्चवर्णीयांच्या भीतीमुळे रजिस्टर्डच होत
नाहीत. अत्याचाराचे हे मूळ या देशाच्या वर्णवर्चस्ववादी मानसिकतेमध्ये दडलेले आहे.
याच मानसिकतेला अधिक प्रबळ करण्याचे प्रयत्न या देशाची शासनकर्ती जमात व राज्यकर्ते
करू लागले आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे, पाचजन्य या संघाच्या साप्ताहिक
मुखपत्रात “गोहत्या करने हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे” असे
वेदामध्येच सांगण्यात आल्याचे लिहिण्यात आले. म्हणजे संघाला भारताच्या राज्यघटनेनुसार
कर्मे करायची नाहीत तर वेद व स्मुर्त्यांमध्ये लिहिलेल्या कायदे व नियमानुसार अंमल
करावयाचा आहे. संघाच्या पोटातला हा लाव्हा बाहेर आला. संघाचा हा लाव्हा देशाला असहिष्णुतेच्या,विध्वसांच्या
व गृहयुध्दाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही.
देशात वंचित समाजावर असे अत्याचार होत असताना वंचित
समाजातील राजकीय नेते, साहित्यकार व शिक्षित कर्मचारी वर्ग हा नपुसकांच्या भूमिकेत
दिसतो. एकेकाळी सिद्धांत सांगणारी माणसे विरोधी विचाराच्या छावण्यात शिरली आहेत. दगडाला
दुध पाजनाऱ्यासी त्यांनी समझौते केले आहेत. आपल्या विचारधारा सुध्दा तथाकथित
नेत्यांनी विकायला काढून त्यांची भाषा बोलू लागले आहेत. वंचित समाजाची आसवे
पुसणारी व दिलासा देणारी तत्वे नष्ट झालेली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात वंचित
समाजावर हल्ले होवून त्याची जीवन जगण्याची साधने हिसकावून त्यांना गुलाम व बंधूवा
मजदूर बनविण्याची प्रक्रिया सुरु झाल्यास नवल वाटायला नको. परंतु त्यातही एक इशारा
द्यावासा वाटतो, तो हा की, या प्रक्रियेतून तुम्हीही सुटणार नाहीत.
बापू राऊत
प्रवर्तक: फुले आंबेडकर विचार अभियान
मो.न.९२२४३४३४६४
dhokla khanar ka?
ReplyDelete