Sunday, December 29, 2013

आम आदमी पार्टी व आंबेडकरी आंदोलन

अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना स्पर्श करीत आंदोलन उभे करणा-या चळवळींना जनतेचा पाठिंबा प्राप्त होतो हे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. रामलीला मैदान व जंतर मंतर येथे जमलेला गर्दीचा उच्चांक हेच दर्शवितो. सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर राजकारण करणा-या पक्षाना जनता स्वीकार करते व त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेमध्ये बसवू शकते हे
दिल्लीतील विधानसभा निवडणुकावरुण स्पष्ट झाले. आम आदमी पार्टीला  मिळालेल्या यशाचे गमक हे सामान्य जनाचे प्रश्न हाच आहे. त्यामुळे आप सारखे पक्ष प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना संपविन्यासोबतच राष्ट्रीय पक्षांना बाजूला सारतील वा त्यांना सशक्त पर्याय उभा करू शकतील की नाही हे येना-या काळात स्पष्ट होईलच.
६० ते ८० च्या दशकापर्यंत लोक स्वत:हून नेत्यांचे भाषण ऐकायला मिळेल त्या साधनाने जायचे परंतु आता हा ट्रेंड बदललेला दिसतो. राजकीय पक्षांना नेत्यांच्या सभांना श्रोते मिळविण्यासाठी पैसे देवून व आणण्या नेण्याची व्यवस्था करूनच लोकांना सभांसाठी आणावे लागते. लोकांनी अवलंबलेला हा ट्रेंड भविष्यात बदलण्याची शक्यता फारच कमी दिसते. याला प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते जबाबदार असून नेत्यांचा भ्रष्टाचार, प्रशासनाची उदासीनता व खावू वृत्ती तसेच वाढती महागाई हे मुद्दे जबाबदार आहेत. आम आदमी पार्टीने नेमके याच मुद्यांना हात घालून लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. केजरीवाल व त्यांचा कंपू लोकाचा हा विश्वास कसा सार्थ ठरवतील? हा येणारा काळच सांगू शकेल.
आम आदमी पार्टीने व्यवस्था परिवर्तनाचा नारा दिला. वास्तविकता व्यवस्था परिवर्तनाचा नारा हा फुले आंबेडकरी तत्वज्ञानाची व चळवळीची देन आहे. फुले आंबेडकरी चळवळीला व तिचे तत्वज्ञान घेवून चालना-या राजकीय पक्षांना सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्था परिवर्तन हवे आहे. या परीवर्तनासोबतच त्यांना आर्थिक बरोबरी साधायची आहे. परंतु केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पार्टीला सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्था परिवर्तन साधायचे नाही. ज्योतिष्य शास्त्राची ढोंगबाजी / बुवाबाजी  व अंधश्रद्धा त्यांना घालवायची नाही. त्यांना केवळ सरकारी प्रशासनातील व्यवस्था परिवर्तन करायचे आहे. आम आदमी पार्टीचा जाहीरनामा हेच दर्शवितो. सरकारी कर्मचारी, राजकीय नेते व भांडवलदार या त्रयीने देशात काळाबाजार, सरकारी भ्रष्टाचार, जमिनीवरील अतिक्रमण, शैक्षणिक महागाई, सरकारी कंपन्या उद्योगपतीना वाटण्याची खैरात, नैसर्गिक साधनसंपतीची लुटमार केली यावर केजरीवाल यांना कायदा व शिक्षेच्या माध्यमातून लगाम लावायचा आहे. राजकीय नेत्यांनी काहीही कृत्य केले तरी त्यांची सहिसलामत सुटका व त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे हा मुद्दाही त्यांचा केंद्रबिंदू आहे. हा सारा बदल सत्तेच्या माध्यमातून होवू शकतो हे केजरीवाल यांना जनलोकपाल आंदोलनातून शिकायला मिळाले. त्यातूनच अण्णा हजारे यांचा विरोध असतानाही त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. तरुणाईचा जल्लोष तसेच गरीब व मध्यम वर्गाच्या पाठिंब्याने आप पार्टीने दिल्लीमध्ये पहिल्याच झटक्यात सत्तेत बसविण्याची किमया केली.
दैनंदिन सामान्य प्रश्न घेवून राजकारणात उतरना-या नवीन पक्षांना सत्ताप्राप्ती होत असताना आंबेडकरवादी पक्षांचे राजकारणातील स्थान अधिकच दृढमूल व ढासळलेले दिसते. देशात तिस-या नंबरचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेला बहुजन समाज पक्षाला चार राज्यात मिळालेले नगण्य स्थान बघता पक्षनेतृत्वाला मंथन करने आवश्यक झाले आहे. मा. काशीरामजींच्या हयातीमध्येच मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात फुले-आंबेडकरवादी राजकारणाची पायाभरणी होवून त्याचे सार्थक परिणाम दिसू लागले होते. परंतु मा. काशीरामजींच्या पश्चात फुले-आंबेडकरी राजकारनाला उतरती कळा लागली. हा आजच्या नेतृत्वाचा पराभवच होय. मा. काशिरामजी लोकामध्ये मिसळत, कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवीत चळवळ समजावून सांगत असत. कांशिरामजीचा  आत्मविश्वास  व स्वाभिमानी वृत्तीमुळे कशाचीही पर्वा न करता नोकरदार वर्ग आपल्या नोक-यांचा राजीनामा देत मा. काशीरामजींच्या कारव्यात सामील होत असत. हाच प्रवाह आज उलट दिशेने वाहतो आहे. असे का होत आहे? याचा आजच्या बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वाने विचार केला पाहिजे. वातानुकुलीत खोलीतून व स्वार्थी चौकडीच्या झगमगातटातून बाहेर पडले पाहिजेत. समाजाच्या नावाने राजकारण करायचे परतू समाजासाठी काहीही करावयाचे नाही हे आता अधिक काळ चालणार नाही हे सुध्दा या निवडणुकीने नेत्यांना दाखवून दिले आहे.
फुले आंबेडकरी चळवळीचा पाया ज्या भूमीत प्रथम रुजला त्या महाराष्ट्राच्या भूमीत आंबेडकरी चळवळीची  दैनावस्था फारच हीनदीन झालेली आहे. ज्याला थोडेफार भाषण करता येते तो लगेच नेता बनतो. महाराष्ट्रात रिपब्लिकन नावाचे अगीनत पक्ष आहेत. यावर रिपब्लिकन पक्षाचे काही नेते म्हणतात, हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत जो गट टिकेल तोच समोर जाईल. रिपब्लिकन पक्षाच्या या गटातटाच्या स्पर्धेत आंबेडकरी चळवळीच्या –हासाचा व जनतेच्या प्रश्नाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही हे स्पष्ट आहे. आता तर ‘रिपब्लिकन’ हे नाव सोडून ‘बहुजन’ नाव धारण करून नवीन पक्ष निर्माण होत आहेत. १९५६ पासून आंबेडकरवादी राजकारणाची चळवळ चालू आहे. परंतु या राजकीय चळवळीचे रुपांतर यशात न होता तुकड्यात झाले. सामान्य लोकांना याचे वाईट वाटते परंतु नेत्यांना साधा पश्चाताप होत नाही.
महाराष्ट्रात राज ठाकरे व दिल्लीत केजरीवाल या कालच्या पोरांनी राजकीय धमाल केली. परंतु आंबेडकरी राजकीय चळवळीचे काय? आंबेडकरी राजकीय चळवळ यशस्वी होत नाही याला काही लोक भारतीयाची जातीय मानसिकता जबाबदार आहे असे उत्तर देतील. परंतु दुस-याकडे एक बोट दाखविताना तुमच्याकडे चार बोटे वळलेली असतात त्याचे काय? सांघिक शक्तीचा अभाव व गटातटाचे राजकारण याला कारणीभूत नाही काय? आंबेडकरी समाजाच्या १०० मतांपैकी प्रत्येकी २० मते कांग्रेस/राष्ट्रवादीला, प्रत्येकी १० मते भाजपा व शिवसेनेला, १०-१० मते बसपा व भारीप पक्षाला व प्रत्येकी ५ - ५ मते आठवले, गवई, कवाडे व खोब्रागडे यांना मिळत असतात. मताच्या अशा विभागणीच्या अंकगणीतामध्ये आंबेडकरी राजकारण विभागले आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी राजकारण कधीही यशस्वी होवू शकत नाही हे शेंबड्या पोरालाही समजेल. परंतु हे आंबेडकरी राजकारणातील नेत्यांना समजत नाही हे मोठे दुर्दव्य आहे. आजच्या राजकारणात आंबेडकरी गटतट हे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या हातातील खेळणे झाले आहे.
आंबेडकरी राजकीय चळवळीचा असा बट्याबोळ झाला असताना सामाजिक चळवळीचेही तीनतेरा वाजलेले आहे. बामसेफ या सर्वात मोठ्या सामाजिक चळवळीचेही गटातटात विभाजन झाले आहे. वामन मेश्राम यांच्या बामसेफचे राष्ट्रीय अधिवेशन लखनऊला, बि.डी.बोरकर यांच्या बामसेफ चे नागपूरला व तीस-याचे पटना येथे होत आहेत. आंबेडकरी आंदोलन व विचारधारेचा हा बिखराव (विस्कळीतपणा) नव्हे काय? आंबेडकरी चळवळीमध्ये संस्थागत लोकतांत्रिक ढाचा निर्माण झाला नाही त्याचे हे फलित होय.
जन आंदोलने करायचे सोडून केवळ स्वार्थी नेत्यामध्ये आपला महानायक शोधन्याचा प्रयत्न आंबेडकरी जनता व चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. फुले-आंबेडकर-कांशीराम यांची विचारधाराच परिवर्तनवादी चळवळीचा पाया असून या त्रयीच्या विचारधारेवर कार्य करणारा व्यक्तीच चळवळ यशस्वी करू शकतो.  
आंबेडकर चळवळीचे हितचिंतक व वाट चुकलेल्या नेत्यांना दिशा देण्यासाठी टीकातम्क लिहना-या लेखकांच्या भाषेत  बाबासाहेब आबेडकरांच्या निळ्या झेंड्याचे दावेदार सत्तारूपी तुकड्यांच्या जहागीरीसाठी आपसात मारकाट करताना दिसतात. राजकीय आंबेडकरी चळवळ ही शॉपिंग माल झाली असून विविध गटाच्या दुकानावर शिवसेना-भाजपा-कांग्रेस-राष्ट्रवादी या खरेदीदाराची झुंबड कालही झाली होती व पुढे २०१४ च्या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा पहायला मिळणार आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका ह्या गल्लाबोळीतल्या दादापासून ते आंबेडकरी गटाच्या प्रमुख नेत्यांच्या राजकीय धंद्यांचा सुवर्णकाळ असतो. आंबेडकरी नेत्यांच्या व्यक्तीमत्वावर व चळवळीवर व्यंगात्म्क जहरी टीका होत असते. तरी गेंड्याच्या कातडीचे आंबेडकरी नेते सुधारण्यास तयार होत नाहीत. आंबेडकराचे नाव घेवून भोगविलास करणारे हे नेते आंबेडकरी विचाराचे व चळवळीचे मारेकरी आहेत.
आंबेडकरी आंदोलनाची फटफजिती करणा-या या मारेक-यांना आंबेडकरी जनतेने सडेतोड उत्तर दिले पाहिजेत. अन्यथा कुंभमेळ्यात जमना-या झुंडी व आंबेडकरी जनतेच्या जमावड्यात फरक तो कसला?.

बापू राऊत

9224343464

No comments:

Post a Comment