Friday, April 8, 2016

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ

आंबेडकरोत्तर काळात मुख्यत: पाच चळवळीचा उदय झाला. त्यापैकी १९५७ मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना,   १९७२ ला दलित पथरचा उदय, तिसरा अन्याय व शोषणाविरुध्द लेखणीच्या माध्यमातून रोष प्रगट करीत जगाला आपली कैफियत सांगणारे दलित साहित्य तर चौथे बहुजनवादी भूमिका घेत निर्माण झालेली बामसेफ व बहुजन समाज पक्ष आणि पाचवे धम्मपरिवर्तन चक्राला गतिमान करण्याच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या खंडीत धार्मिक संघटना. रिपब्लिकन पक्षाचे रचनाकार स्वत: बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु १९५६ ला अचानक झालेल्या महापरीनिर्वानामुळे रिपब्लिकन पक्षाची घोषणा त्यांना करता आली नाही. १९६२ च्या मध्यात झालेल्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाने आपल्या भविष्याची दमदार सुरुवात केली होती. पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये अनुक्रमे ३ खासदार व ८ आमदार तर महाराष्ट्रात ३ आमदार, १९६७ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये १ खासदार व १० आमदार तर महाराष्ट्रात ५ आमदार निवडून आले होते. मात्र हे यश पक्षाला पचविता आले नाही. रिपब्लिकन पक्षावरील वर्चस्ववादाच्या भांडणात पक्षाचा राजकीय ग्राफ तेजीने घसरू लागला. कांग्रेस पक्षाने याचा नेमका फायदा घेत रिपब्लिकन पक्षाची गटातटात विभागनी करून भविष्यात हे गटतट कधीच एकत्र येणार नाही याचीही तजवीज करण्यात आली.


दलितावरील बहिष्कार, दलित स्त्रियांची धिंड व गवई बंधूचे डोळे काढणे यावर आंबेडकरी तरुणात असंतोष खदखदत होता. रोजच्या वर्तमानपत्रातील अत्याचाराच्या बातम्या वाचून तो आपल्या मुठी आवळत होता. कांग्रेस पक्षासोबत असलेल्या युतीमुळे रिपब्लिकन पक्षाचे प्रस्थापित नेते दलितावरिल अन्याया संदर्भात केवळ गुळमिळीत प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त व बघ्याची भूमिका घेण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. या पार्श्वभूमीवर दलित पैन्थर उदयास आली. या पैन्थर्सनी आंबेडकरी विचारांना मार्क्सवादाची जोड दिली होती. दलित पैन्थरच्या डरकाळीमुळे शिवसेनेला शिवाजी पार्कचा दसरा मेळावा सुध्दा रद्द करावा लागला होता. नामांतरासाठी डरकाळ्या फोडणारी व अत्याचार पिडीत गावात कोणतीही तमा न बाळगता प्रस्थापितांना थेट आवाहन देणारी पैन्थर वैचारिक दुराभाव व सत्ताधारांच्या आमिषाला बळी पडत तिचेही रिपब्लिकन पक्षासारखी शकले झाली. पथरला फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या व्ह्यूनीतीला आलेले यश म्हणजे नामदेव ढसाळ व राजा ढाले यांच्यात निर्माण झालेला वैचारिक दुरावा होता. कांग्रेस पक्ष व त्यांच्या पोलीस खात्याने चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यावर केसेस टाकीत हैराण केल्यामुळे पैन्थरचा चुराडा झाला हेही मुळीच नाकारता येत नाही.

तिसरीकडे आंबेडकरी साहित्य प्रवाहाचा उदय होत होता. आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेल्या या साहित्याला दलित साहित्य या नावाने ओळखल्या गेले. भारतात या साहित्य चळवळीने एक नवी दिशा दिली. आंबेडकरी लेखक व विचारवंतानी आपल्या लेखणीद्वारे विषमतावादी समाजव्यवस्थेवर प्रहार करने सुरु केले होते. काहींनी आत्मकथने लिहून स्वत:च्या व समाजाच्या वेदना जगासमोर आणल्या. “अखिल भारतीय दलित साहित्य” या नावाने सुरु झालेला हा आंबेडकरी विचाराचा प्रवाहही रिपब्लिकन पक्षाप्रमाणे हेलपाट्या खात कसा नामशेष झाला हे कोणाला कळलेही नाही?. दलित साहित्य (आंबेडकरी साहित्य) या नावाने सुरु झालेले साहित्य मेळावे हे मुख्यत: कांग्रेसी राजकारण्याच्या कृपेने होत असत. दलित साहित्य संमेलनाचे काही आजी माजी अध्यक्ष कांग्रेसच्या चरणी तर काहीजन आंबेडकरी जनतेच्या नावाने दलालगिरी करणाऱ्या  रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यासोबत पदाच्या अपेक्षेत झिंगत राहिले. दुर्दव्य हे की, या साहित्याने मोठा विचारवंत, सामाजिक व राजकीय असे प्रगल्भ नेतृत्व निर्माण केले नाही हे निराशाजनक आहे. आज काही ठिकाणी तुरळक साहित्य संमेलने होतात परंतु त्यांचे परिणाम हे पेल्यातील वादळासारखेच क्षणिक असतात. अखिल भारतीय किंवा राज्यस्तरावर मराठी साहित्य महामंडळासारखी प्रणाली नसल्यामुळे आंबेडकरी साहित्य संमेलने ही उद्दिष्टाविनाच भरलेल्या तावदानासारखी कोरीच वाटतात. संमेलनाच्या शेवटी होणाऱ्या ठरावाचे काय फलित होते? ते त्यांनाच माहीत. सत्तेचा वरदहस्त अशा संमेलनासाठी आवश्यक झाला आहे हे मराठी साहित्य संमेलनाकडे बघितल्यावर वाटते. सत्तेचा असा वरदहस्त आंबेडकरी साहित्याकडे नसल्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली असेल का? कदाचित हे खरेही असू शकते. 

वर्ष १९८० नंतरचा कालखंड हा मुख्यत: गांधी विचारसरणी ओसरण्याचा तर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीला बळ प्राप्त होण्याचा काळ होता. गांधी विचारधारा ही मानवता, समता मुलक समाजव्यवस्था, जातीयवाद व वर्णवाद नष्ट करण्याच्या मार्गातील अडथळा वाटू लागला. परंतु दुर्दव्याने रिपब्लिकन पक्षांच्या संधीसाधू नेतृत्वामुळे आंबेडकरवादी सामाजिक व राजकीय चळवळ समोर सरकत नव्हती. रिपब्लिकन नेत्यांनी चळवळीला बहुजनवादी स्वरूप दिले तर नाहीच परंतु तिला संपूर्ण मागासवर्गाचीही (अनु.जाती व जमाती) होवू दिली नाही. कांग्रेसच्या दावणीला रिपब्लिकन पक्ष बांधल्यामुळे “कांग्रेसला जळते घर” मानणाऱ्या आंबेडकरवादी शिक्षित व नोकरदार वर्गाला एका नव्या संघटनेची गरज भासू लागली होती. याच गरजेतून मा.कांशीराम यांचा उदय झाला. मा.कांशीराम व डी.के.खापर्डे यांनी बामसेफ ह्या संघटनेची १९७१ ला स्थापना केली तर १९८४ साली बहुजन समाज पक्ष स्थापन केला. याला “सामाजिक चळवळीतून राजकीय चळवळीचा उदय” असे म्हणता येईल. बामसेफकडून मूळ भारतीयांचा आक्रमणकारी आर्यांनी पराभव करून त्यांना शूद्र व अस्पृश्य ठरविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. ‘ब्राम्हनवाद’ हे मूलनिवासी समाजाला असंख्य जातींमध्ये विभागून ठेवणारे व्यवस्थापन असून तिचे खरे स्वरूप बहुजन समाजाला सांगण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अनु.जाती / जमाती, ओबीसीं व अल्पसंख्यांकांना एकत्र करण्याची प्रक्रिया राबवून अस्पृश्यांना सन्मान, प्रतिष्ठा व शक्ती प्रदान करण्याची भावना बामसेफच्या स्थापनेत असल्याचे दिसते.
मा.कांशीराम यांनी सांस्कृतिक व सामाजिक चळवळीपेक्षा राजकीय सत्तेला अधिक महत्व दिले. आंबेडकरी विचारतत्वाच्या हे उलटच होते. परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली  आहे” या घोष वाक्याचा शस्त्रासारखा वापर केला. बहुजनवादावर लक्ष केंद्रित करून सर्वप्रथम ब्राम्हनवादाला खिळखिळे करीत निवडणूक प्रक्रियेतील “मतपत्रिकेच्या” माध्यमातून सत्ताप्राप्त झाल्यास सामाजिक सुधारणांच्या प्रवाहाला आपोआपच गती मिळेल हा त्यामागील उद्देश होता. महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे उत्तर प्रदेशची निवड करण्यात आली. सोशल इंजिनियरिंगच्या नावाखाली मायावतीने ब्राम्हणांच्या सहाय्याने सन २००७ ला सत्ता प्राप्त केली. परंतु ह्या सोशल इंजिनियरिंगला बहुजन जनतेने २०१२ च्या निवडणुका मध्ये अविश्वास दाखवीत झटका दिला. कांग्रेसच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी व कम्युनिस्ट पक्षाला लागलेली घरघर याचा फायदा बहुजन समाज पक्षाला घेता आला नाही. भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नेता समाजाला दिशा व योग्य नेतृत्व देवू शकत नाही, हे मायावती प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला राजसत्तेचे वेड नसून ती केवळ भूलथापेवर जगणारी जमात असल्याचे दिसते. “जयभीम बोलो और किधरभी चलो” असा महाराष्ट्रीयन आंबेडकरी जनतेचा महिमा आहे. याला “आंबेडकरी स्वाभिमानी बाणा” कसे म्हणता येईल?. महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेला बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीही गोलबंद होता आले नाही.  

देशात मागासवर्गीय समाजावर विविध सांस्कृतिक विचारधारेचा पगडा असल्यामुळे अखिल भारतीय स्तरावर आंबेडकरी चळवळ मूळ धरू शकली नाही. ती संपूर्णपणे कोणत्याही राज्यात विकसित झाली नाही. मा.कांशीराम यांच्यानंतर नेतेपदाची जी पोकळी निर्माण झाली ती अजूनही भरता आली नाही हे या चळवळीचे दुर्दव्यच म्हटले पाहिजेत. ओरिसा, मध्यप्रदेश, झारखंड व प.बंगाल या राज्यात बहिष्कृत जातीचे जीवनमान अत्यंत खालच्या पातळीवरचे असूनही या राज्यात आंबेडकरी चळवळीला पाय रोवता आले नाही. ज्या ज्या राज्यात समंजस व जागरूक नेते आहेत तिथे ते शोषक जातीविरूध्द आपल्या न्याय हक्कासाठी लढताना दिसतात. परंतु त्याकडे सरकारचे व प्रसारमाध्यमाचे साफ दुर्लक्ष असते. असुरक्षिततता व दबावामुळे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक लढे लढता येत नाही. शहरी व ग्रामीण विचारात तफावत निर्माण झाली असून ग्रामीण दलितांवर झालेल्या अत्याचाराचा आवाज शहरी दलित बनू पहात नाही. दलिता मधील जाती व पोटजातीचा आपसात संघर्ष निर्माण होत असल्यामुळे मुख्य शोषक जाती विरुध्दचा संघर्ष एकदमच कमकुवत व बोथट झाला आहे. देशातील बहुजन समाजात वेगवेगळया विचारधारा अस्तित्वात असल्या तरी ‘शोषित समाज’ हा बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतेपद स्वीकारून आंबेडकरी विचारात आपल्या प्रश्नांचे मूळ शोधीत असतो.  

आज कोणत्या आंबेडकरी चळवळीकडे व नेत्याकडे आशेने बघता येईल? वास्तविकता बघितली तर निराशाच दिसेल. प्रत्येक सामाजिक व धार्मिक संघटना अनेक गटात विभागल्या आहेत. राजकीय पक्षाचे तर बघायला नकोच. फुले आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या व त्यांना आपला मार्गदाता मानणारे नेते एकमेकाचे कट्टर शत्रू असल्या सारखेच दिसतात. तर विरोधी विचाराच्या गटाचा समूह त्यांना कट्टर मित्रासारखा वाटत असतो. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या यशाचे गमक शोधता येणे फार कठीण झाले आहे. दिशाहीन व नेतेहीन झालेली चळवळ आजच्यासारखीच पुढच्या शतकातही चाचपडत जगणार याला कोण नाकारू शकेल?. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा जल्लोष साजरा करताना आपल्या कार्याची, नीतीची, चळवळीची व तिच्या भविष्याची चिकित्सा व चिंतन करून सुधारण्याचे उपाय शोधून त्यात परिवर्तन वा बदल घडवणार नसाल तर आहे त्या दगडावर (चळवळीवर) हातोड्याने घाव घालणारे हात पुढेही घाव घालून चळवळीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत. देशाच्या वर्तमानकाळात ज्या घटना घडताहेत व त्याचे धोके समजन्याची लायकी असणारा अभिजन वर्ग जर निद्रावस्थेत राहू इच्छित असेल, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरू इच्छित नसेल व गटातटाच्या खेकड्याविरोधात एल्गार पुकारणार नसेल तर आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे भविष्य परत परत अंधारमय होत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक गुलामीच्या बेड्या पायात कधी अडकतील? हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

बापू राऊत
९२२४३४३४६४

5 comments:

  1. Will our leader learn something from this article! !!

    ReplyDelete
  2. Will our leader learn something from this article! !!

    ReplyDelete
  3. Problem of Ambedkari movement is it's leaders are being compared with the Great Dr Ambedkar. One way it is good as well since it will not misleaded, misguided or hijacked.

    ReplyDelete