Thursday, August 23, 2018

मा.राजू कांबळे: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मिशनरी सैनिक


मा. राजू कांबळे यांचे 16 ऑगस्ट 2018 ला निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली. बातमी कळताच डोळ्यासमोर अंधारल्यागत झाले आणि खिन्नतेची एक लहर चमकून गेली. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेले कार्य नजरेसमोर सरकू लागले. खरे तर कांबळे व प्रस्तुत लेखकाचा परिचय हा 6 डिसेंबर 2013 ला शिवाजी पार्कवरील डॉ.आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशनच्या स्टॉलवर झाला होता. त्यावेळेस झालेल्या चर्चेत राजू कांबळे साहेबांचे अनेक पैलू समोर येत होते. नंतरच्या काळात राजू कांबळे व त्यांच्या  डॉ. आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशनवर नजर ठेवणारा एक निरक्षक झालो. राजू कांबळे हे फुले आंबेडकरी चळवळीचे चालते बोलते आंतराष्ट्रीय केंद्र होते. जगाच्या कानाकोपर्‍यात बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणारे ते एककल्ली विद्यापीठच होते. त्यांनी सप्टेंबर 2018 मध्ये जापान च्या फुकुओका मध्ये बुराकुमिन लिबरेशन लीग (बीएलएल), जापान यांच्या सोबत अंतर्राष्ट्रीय डॉ अम्बेडकर सम्मेलन आयोजित केले होते. त्या अगोदरच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्राष्ट्रीय चळवळीवर फार मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जाण्याने जी उणीव निर्माण झाली ती कोण आणि कशी भरून काढेल हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच.


मुळचे नागपूरकर असलेले राजू कांबळे यांचा जन्म 4 जानेवारी 1954 साली झाला. रासायनिक अभियंता  असलेले कांबळे हे निर्भयी व दूरदर्शी होते. त्यांची फुले आंबेडकरी विचार व तत्वज्ञानावर प्रचंड पकड होती. आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिल्लीत काम करीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्पित कार्यासाठी स्थापन झालेल्या “बामसेफ” या सामाजिक संघटनेचे ते हार्डकोअर कार्यकर्ता होते. आपल्या जीवनात ते सदैव विवेकवादी व बुध्दिनिष्ट राहिले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराची “भाषणे, पुस्तके व शासन प्रकाशित खंड” हे जगातील प्रसिध्द व्यक्ति, विद्यार्थी, संस्था व विविध विद्यापीठात भेटीच्या स्वरुपात पोहोचविले होते. जगभरात कुठेही "आंबेडकरी क्रांतिकारी साहित्य" पाठवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. काही कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार कोणत्याही कार्यक्रमाच्या खर्चाचे विवरण कार्यक्रमाच्या दुसर्‍याच दिवशी त्यांच्याकडून सर्व सदस्यांना प्राप्त होत असे. यावरून त्यांचे कार्य किती पारदर्शी व स्पष्ट होते याची कल्पना येते. ते गरीब  पार्श्वभूमीतून येवून व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट उंचीपर्यंत पोहोचले होते. राजू कांबळेनी सामाजिक ऋणासाठी आपले कुटुंब सांभाळत व्यक्तिक त्याग केला होता. त्यांच्या या त्यागाची धुरा पुढे नेणारी व्यक्तिच मिशनच्या आखीव कार्याला समोर नेऊ शकतो.

भारतातील एक मोठा वर्ग परराष्ट्रात नोकरी व व्यवसायाच्या संधि शोधू लागला होता. त्यात उच्च शिक्षित आंबेडकरी तरुणांचाही समावेश होता. हे तरुण विदेशातही आपली नवी ओळख स्थापू इच्छित होते. साहजिकच “आंबेडकरवादी” ही त्यांची नवी ओळख होती. अशातच अभियंता असलेले राजू कांबळे 1994 मध्ये मलेशिया येथे आले. त्याच वर्षी क्वालांलपूर, मलेशिया येथे पीडित मागासवर्गीयांच्या  (दलित/आदिवासी/बौद्ध/ओबिसी) समग्र विकासाच्या प्रक्रियेत विदेशातील आंबेडकरवादयाकडून योगदान देण्याबरोबरच जाती व्यवस्थेने अत्याचारग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्याच्या भावनेतून “आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशन” ची स्थापना करण्यात आली.

जगात कोठेही असलो तरी आपला दृष्टीकोण हा आंबेडकरी विचारासी बांधिलकीचा असला पाहिजे असे राजू कांबळेना वाटत असे. त्यातूनच त्यांनी आंबेडकरी विचारावर आधारित अंतर्राष्ट्रीय मिशनचे जगभर जाळे निर्माण केले. मलेशिया, अमेरिका, कॅनडा, जपान, यूए, ओमान, कतार, बहरिन, मध्य पूर्व आणि संपूर्ण युरोप, आस्ट्रेलिया, फ्रांस व ब्रिटन इत्यादि देशामध्ये नोकरी व व्यवसाय करीत असलेल्या मागासवर्गीय तरुणांना शोधून “आंबेडकरी मिशन” मध्ये जोडण्याचा कार्यक्रम आखला होता. ऑक्टोबर 1998 मध्ये त्यांनी  क्वालालंपूर येथे प्रथम “जागतिक दलित कन्व्हेन्शन” आयोजित केले होते. त्यात मान्यवर  कांशीरामजी उपस्थित होते. त्यानंतर पॅरिस, भारत, जपानमध्ये जागतिक आंबेडकरी अधिवेशने घेवून अंतर्राष्ट्रीय  स्तरावर अनेक ठिकाणी जागतिक परिषदा भरविण्यात आल्या. जागतिक स्तरावर फुले आंबेडकरी चळवळीमध्ये भारतीय वंशाचे नसलेल्या विदेशी गौरवर्णीय तसेच कृष्णवर्णीय लोकांना आंबेडकरी तत्वज्ञान सांगून चळवळीत आणण्याचे कार्य केले. मार्टिन लूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकर विचार व तत्वज्ञानावर चर्चा होवू लागल्या. जागतिक पातळीवरील अनेक चर्चासत्रात विदेशी विचारवंतांनी भारतातील मागासवर्गीयाच्या समस्या जगासमोर मांडल्या.

कांबळेजींनी केवळ श्रीमंत लोकांनाच नव्हे तर मजुरांना सुध्दा एकत्र केले. भारतातील व विदेशातील लोकांना मित्रत्वाच्या धाग्यात बांधून ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. आज संपूर्ण जगात आंबेडकरवाद्यांचे जे समृध्द नेटवर्क बघायला मिळते त्याचे सारे श्रेय हे राजू कांबळे यांना जाते. कोणत्याही प्रकारची नेतेगिरी न करता निस्वार्थपने केवळ मिशनरी माणसे घडविण्याचे काम त्यांनी केले. आजचा शिक्षित नोकरदार / व्यावसायिक वर्ग हा डॉ. आंबेडकरांनी जीवनभर केलेल्या संघर्षांचे फलित आहे. त्यामुळे या लाभार्थी समूहातील प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी समजून “पे बॅक टु सोसायटी” या आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे पालन करीत ऋणमुक्त झाले पाहिजे. हाच संदेश राजू कांबळे यांचे कार्य व योगदांनातून मिळतो.

शिस्तबध्द अशा “आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशन” च्या कार्याची ओळख ही आपल्या भावी वाटचालीसाठी  मार्गदर्शक ठरू शकते. अनेक देशात मिशनच्या संस्था (Chapters) कार्यरत असून त्यांच्यात मासिक चर्चा होत असतात. येथे संस्थेचा प्रत्येक सदस्य हाच कार्यकर्ता असतो. मासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत असतो. प्रत्येक सदस्यासाठी / प्रत्येक कुटुंबासाठी मासिक योगदान स्वेच्छेने ठरविले जाते. डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानातील मूलभूत तत्वे अंमलात आणण्यासाठी स्वाभिमानी आंदोलनाची गरज असतेच. स्वत:च्या संसाधनाशिवाय आंबेडकरी चळवळ प्रभावीपणे चालवल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून ती संसाधने निर्माण करण्याचे कार्य मिशन करीत असते. भारताबाहेर स्थायिक झालेल्या अनागरिक आंबेडकरी लोकांना एकत्र करून आपसातील सांस्कृतिक ओळख मजबूत केली जाते. त्याचाच भाग म्हणून विदेशातील सर्व भागात जेथे असेल तेथे आंबेडकर बुद्ध जयंती सोबतच  धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाबद्दलच्या चिंताग्रस्त विषयांवर चर्चा करण्यासाठी अंतर्राष्ट्रीय विचारपिठे निर्माण करण्यामध्ये मिशनचा मोठा वाटा आहे. भारतातील अनेक शैक्षणिक व धाम्मिक प्रकल्पामध्ये मिशनचा (AIM) प्रत्यक्ष सहभाग असतो. नागपुराडॉ. आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशन तर्फे अंतराष्ट्रीय बौद्ध परिषद घेण्यात आली होती. हल्लीच्या काळात भारतात दलित, आदिवासी, बौध्द यावर हिंदुत्ववाद्याकडून हल्ले होत आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लेखक व विचारवंतांना धमक्या देवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थिती मध्ये डॉ.आंबेडकर अंतर्राष्ट्रीय मिशन वर फार मोठी जबाबदारी येणार आहे.   

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनतर्फे  अमेरिकेमध्ये डॉ. बी. आर. अंबेडकर यांच्या नावावर एक सामाजिक आणि संशोधन केंद्र बनविण्याची योजना आहे. डॉ. आंबेडकरांच्या आदर्श वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि 300 दशलक्ष दलित, अस्पृश्य आणि भारतातील आदिवासींच्या मानवाधिकारांकरिता या केंद्राचा उपयोग होईल. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देत अशा योजनांची परिपूर्ती करणे हे राजू कांबळे साहेबांना खरे अभिवादन ठरेल.

लेखक: बापू राऊत
9224343464

1 comment:

  1. Very true & honest person who devoted hid life for society ...My heartfelt condolence to Auy.Rajkumar ji Kamble

    ReplyDelete