Sunday, August 25, 2019

दहीहंडी: मरणोत्सवाची की उत्सवाची


देशात दरवर्षी कृष्णजन्मोत्सव येतो, तो येतो एक नव्या जागृत मानवतेची, प्रेमाची व बंधुत्वाची उमेद घेवून. कट्टर धर्मांधतेला, असहिष्णूतेला व अमानवीय मूल्यांना नष्ट करणारा हा उत्सव केवळ उत्तर भारतापुरता मर्यादीत न राहता विदेशात या उत्साहाचे लोन पसरले आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सवदिनी देशात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा उत्सव कृष्ण मंदिरात व परंपरा प्रेमींच्या घरात साजरा होतो. एवढेच नव्हे तर रस्त्यावरून वाजतगाजत शोभायात्रा  काढण्यात येवून मोठ्या तल्लिनतेने नागरिक यात सहभागी होत उत्साही होवून नाचत असतात. हीच तर आहे धर्मस्वातंत्र्याची व आपला उत्सव जबाबदारीने पार पाडण्याची पध्दत. सद्सदविवेकबुध्दीच्या स्वातंत्र्याचा आणि दुसर्‍याच्या धर्मतत्वाना मान देत आपला धर्म मुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याचा तो एक अधिकार आहे.
 
महाराष्ट्राच्या मुंबई सहित काही शहरात या उत्सवाने एक वेगळे स्वरूप घेतले बघायला मिळते. त्याने रस्त्यावरच बिभित्स स्वरूप घेतले आहे. चौकाचौकामध्ये रस्त्यांच्या मधोमध मोठ्या उंचीवर  दहीहंडी बांधल्या जातात. आयोजकाकडुन दहीहंडी फोडणार्‍यासाठी मोठमोठ्या रकमेचे बक्षीस ठेवल्यामुळे ते मिळविण्यासाठी युवकयुवती समूहाने मोठ्या उंचीचे थर रचतात. हे थरच मग त्यांच्यासाठी जीवघेणे ठरतात. काही कुटुंबासाठी ते मरणोत्सव ठरत असतात. किंकाळ्याचा भेसूर आवाजात सामान्याचे भान हरपविणारे ते क्षण परत येवू नयेत असे वाटू लागते. यात कधी कधी आई वडिल आपल्या एकलुत्या एक मुलाला वा मुलीला गमावून बसतात. या उत्साही उत्सवात काही युवकांची १०० टक्के मरणाची खात्री असतेच. परंतु कोण मरेल हे येणारा क्षणच सांगत असतो. तर शेकडो तरुण लुळेपांगळे होत असतात. मागील २०१७ ते २०१९ पर्यंतचे आकडे बघितल्यास हे अधिक स्पष्ट होते. २०१७ मधील दहीहंडी उत्सवात जखमीची संख्या ही ११७, २०१८ मध्ये १५३ होती.  तर मृताचा आकडा २०१७ व २०१८ मध्ये अनुक्रमे २ व १  होता. या वर्षीच्या (२०१९) दहीहंडीत थरावरून कोसळताना मुंबईत १५० युवक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील म्हसळा,तळा आणि खालापूर तालुक्यात तीन युवकांचा मृत्यू झाला.

मग मरणाचे असे दहीहंडी प्रयोग कोणी का रोखत नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. सरकारच जर अशा आयोजकांना व उत्साहिना घाबरत असेल तर सामान्य माणसे तरी कसा आवाज काढतील? २५ ते ५०   लाखाच्या दहीहंड्याच्या आयोजकाकडे एवढे पैसे आले तरी कोठून म्हणून चौकसी का होत नाही? या आयोजकांच्या खुनशी खेळात उदयोन्मुख  युवकांचा बळी का जावा? दहीहंडी बांधणारे मुख्यत: त्या त्या विभागाचे राजकारणी असतात. राजकारण्यांनी या उत्सवाला खरे तर मरणोत्सव बनविला आहे. या राजकारण्याची मुले मात्र या मरणोत्सवात कधीच सामील होत नाहीत. तर ते भविष्यात या युवकांना मारणार्‍याच्या कळपातील घटक बनत असतात. 

जे लोक आपली मुले यात गमावून बसतात त्यांनी हे रोखण्यासाठी समोर यायला पाहिजे. त्यांनी प्रश्न केला पाहिजे की, कशासाठी असली मरणाची हांडी साजरी करताय? हे प्रश्न नागरी समाजाला व बुध्दीवाद्याना पडत नाही हे एक दुर्दव्यच म्हणावे लागेल. अन्यथा मुंबई शहरात या विरोधात एक चळवळ उभी राहिली असती. मुंबई ठाण्याचे हे लोन आता राज्याच्या इतर भागात झपाट्याने पसरत आहे.
हा पूर्ण दिवस कसा जातो? याचे विश्लेषण केले तर तो असतो, गोंगाटाचा, मोठमोठे डिजे वाजवून शांतमय जीवन जगणार्‍या लोकांना अत्यवस्थ करण्याचा, रस्त्यांची व वाहतुकीची कोंडी करण्याचा आणि पाण्याची वानवा असताना फवारे मारून पाण्याचा अपव्यव करण्याचा. या दिवसी केईएम, सेंट जार्ज, जेजे, जसलोक, हिंदुजा, जीटी, शताब्दी, राजवाडी आणि भाभा  ही रुग्णालये नातेवाईकांच्या रडण्याची व किंचाळण्याची केंद्रे बनलेली असतात. कारण त्यात कोणी आपल्या मुलाला, कोणी आपल्या भावाला तर कोणी आपल्या नातवाला गमावलेले असते. कोणाचे पाय तुटून पुर्णपणे पंगु झालेले बघायला मिळतात.

दहीहंडी या उत्सवाचे पुरते व्यावसायिकीकरण झालेले असून स्थानिक राजकारण्यांचा तो खेळ झाला आहे. यांच्याकडून मोठ्या बक्षिसाची स्पर्धा लावली जाते. सहभागी युवकांना मद्यही पुरविल्या जात असते.  कोणतेही उत्सव असो, राजकारण्यासाठी नवीन कार्यकर्ते बनविण्याची ती नियोजनबध्द योजना असते. दहीहांडी फोडणारे युवक सक्तीची हेल्मेट असताना विनाहेल्मेट, एकेका बाईकवर चार चार जन बसलेले, रॅश ड्रायव्हिंग करणारे, हॉर्नचा गोंगाट करणाऱ्या व मद्यपी युवकांना रोखता येणार नाही का?. युवकांना मरणोत्सवात ढकलणार्‍या अशा प्रथाना आळा घालता येवू शकतो. यावरचा उपाय म्हणजे,  या दहीहंड्याना नवीन स्वरूप देणे होय. कृष्णाच्या प्रतिमेसोबतच दहीहंड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढत लोकांना गोडधोड खाऊ घालून व प्रसादाचे वाटप करता येवू शकते. या निमित्ताने विविध स्पर्धा आखून युवकांना प्रोत्साहित करता येवू शकते. परंतु यास गरज आहे ती जबर इच्छ्याशक्तीची. उत्सवाच्या बेसुर क्षणिकतेचे महत्व पटवून देण्याची. अन्यथा मरणोत्सवात सामील होण्याशिवाय आपल्याकडे दूसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.

बापू राऊत
अध्यक्ष, मानव विकास संस्था, नवी मुंबई
मो.न. 9224343464

1 comment: