Monday, December 28, 2015

शनिशिंगणापूर महिलांच्या अपमानाचे केन्द्र

भारत हा महिला विकासाच्या संदर्भात आघाडीवर दिसत असला तरी महिलांच्या धर्म व पूजा स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मात्र मागासच दिसतो. वेदकालीन कालखंड ते आजतागायत दिसणारे दृश्य बघितले तर, धार्मिक बाबतीमध्ये तो  महिलांच्या अपमानाचे केंद्र बनलेला आहे. कोणी एकाने म्हटले आहे, भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. धर्माच्या आतंकात तो एवढा बुडाला आहे की, त्यात तो स्वत:च्या बुद्धीलाच हरवून बसतोय. धर्म व देव ह्या गोष्टी आल्या की त्यांचे  विज्ञान व तर्क गळून पडत असतात. धर्मव्यवस्थेचा तो पार गुलाम झालाय.

कोणीही, मग ती महिला असो वा एखाद्या खालच्या जातीचा असो, त्यांनी शनी शिंगणापूरचा शनी असो वा तो ब्रम्हचारी हनुमान असो वा दुसरा कोणताही देव असो, यांच्या मुर्त्यांना स्पर्श केल्याने कोणाचेही काही बिघडत नाही हे शनीशिंगणापूरच्या घटनेने पुरते सिद्ध झाले आहे. स्पर्श केल्याने संकटाचे पहाड कोसळते, या ना त्या प्रकारचे प्रसंग ओढवतात हे सारे थोतांड असल्याचे साऱ्यांना कळून चुकले आहे. देवाची भीती हा पोटभरण्याचा धंदा झाला आहे.  


शनी शिंगणापूरच्या प्रसंगांने बऱ्याच बाबी उघड झाल्या. कोण कोणत्या चेहऱ्याचा हे स्पष्ट झाले. भारतातील महिला ह्या धर्मपरंपरा व श्रद्धेच्या चौकटीतून बाहेर पडल्या नाहीत हे सुध्दा जाणवले. आपल्या वडिलांच्या मृत्यूशय्येची तिरडी उचलणाऱ्या पंकजा मुंडेनी, जुन्या चालत आलेल्या परंपरा तोडू नए, हनुमान बालब्रम्हचारी होते. व शनी हा  हनुमानाचा अंश आहे. त्यामुळे शनीचे दर्शन महिला करीत नाहीत. असा जो फुकटचा सल्ला दिला, तो मात्र धक्का देणारा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी सावित्रीबाई फुलेंचे नाव घ्यायचे आणि समाज सुधारणेचा एखादा प्रसंग येतो तेव्हा धूम ठोकून पळून जायचे याला काय म्हणावे?  एकीकडे या देशातील धर्ममार्तंड हे दुर्गा, सीता, गौरी, लक्ष्मी यांचे गुणगान गातात तर दुसरीकडे यांचेच प्रतिक असलेल्या महिलांना प्रवेश बंदी. या अशा अंधश्रध्दे विरुध्द कोणत्याच महिला संघटना आवाज उठविताना दिसत नाही. यावरून महिला शिक्षित व  सुशिक्षित झाल्या परंतु त्या अजूनही सावित्रीबाई फुलेच्या लायकीच्या झाल्या नाहीत हेच यातून दिसून येते. विधान भवनाच्या गेटवर काही कांग्रेसी आमदार महिलांनी विरोध केल्याची बातमी वर्तमान पत्रात झळकली. परंतु तो त्यांचा राजकारणाचा भाग होता. कारण ह्या महिलांनी स्वत: शनीशिंगनापुरात जावून मंदिराच्या प्रवेशासाठी आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही.

शनीच्या मूर्तीला महिलेने हात लावल्यामुळे त्या मंदिरांचे विश्वस्त, पुजारी यांनी ती मूर्ती अपवित्र झाली म्हणून त्या मूर्तीला दुधानी धुतले. यापेक्षा महिलांचा दुसरा कोणता मोठा अपमान होवू शकतो?. ज्या दुधाने त्या मूर्तीला धुण्यात आले ते दुध तर एक स्त्रीत्व असलेल्या गाईचे व म्हशीचेच होते. या स्त्रीत्व असलेल्या गाई म्हशीचे दुध या शनीला कसे काय चालते? तेव्हा दुधाने ती मूर्ती अपवित्र होत नाही का?  ही दुहेरी नीती कशासाठी? याचे उत्तर धर्मांधानी देण्यापेक्षा सरकारनेच दिले पाहिजे.

भारतीय महिलांची कीव करावी तेवढी कमीच आहे. धर्म व देव या संबंधातील अत्याचार व भेदभाव या संबंधात तिला काहीच वाईट वाटत नाही. उलट अशा मंदिरात जावून ती दुरूनच हात जोडत असते. ज्या महिला या धर्मव्यवस्थेविरुध्द बंड करू बघताहेत त्यांच्याकडे कोणीही सहानुभूतीने पहात नाहीत. राष्ट्रीय तथा राज्य महिला आयोगाच्या महिला सुध्दा या व्यवस्थेच्या बळी आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकाराविरोधात कोणीही आवाज उठवीत नाही. संसद व विधानसभा सारख्या कायदे बनविणाऱ्या संस्थामध्ये सुध्दा देशाच्या ५० टक्के महिलांच्या अधिकार व हक्कासंदर्भात आवाज उठत नाहीत याला काय म्हणावे? सरकारने मंदिराच्या शुद्धीकरणाबाबतच्या कारवाईचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावरील कारवाईचे संकेतही दिले नाही. त्यामुळे केवळ शनी शिंगणापूरच नव्हे तर भारतातील सर्व धर्मस्थाने व मंदिरे ही स्त्रियांच्या अपमानाचे केंद्र झाले आहे असे म्हटल्यावाचून राहवत नाही.

बापू राऊत
मो.न.९२२४३४३४६४
ई मेल: bapumraut@gmail.com

No comments:

Post a Comment