Wednesday, December 30, 2015

इतिहासाचा काय गर्व? नवा इतिहास तर रचा !

समाजातील प्रत्येक वर्ग वा देश आपापल्या इतिहासाचा गर्व करीत असतो. कोणाचा इतिहास हा कु प्रथानी भरलेला असतो, तरीही तो त्या विक्षिप्त इतिहासाला गौरवान्वित मानीत असतो. कोणाचा इतिहास हा कपट नीतीने भरलेला असतो. अशा इतिहासाला काही लोक आदर्श इतिहासाचे लेबल लावीत असतात. समाजातील एक वर्ग अशा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न बघत असतो. गत इतिहासात काही पुरुष निर्माण झालेत, की ज्यांच्या विचारामुळे सामाजिक व्यवस्था व मानवी जीवन नरकयातनाचे केंद्र बनलेली होते. असे विनाश पुरुष सुध्दा आज त्यांचे आदर्श बनलेले आहेत. आजच्या वर्तमान काळात जे लोक अशा इतिहासाला व विनाश पुरुषांना आपला आदर्श व गर्व मानून
ती समाजव्यवस्था परत आणण्याचे प्रयत्न करीत असतील तर त्या लोकांना लोकशाही, समानता व मानवता विरोधीच म्हटले पाहिजेत. त्यांना समानतेची भीती वाटत असते. समानतेच्या तत्वामुळे आपल्याला मिळालेला विशेष दर्जा जाण्याची भीती वाटत असते. अशा अहंकारी लोकांच्या मेंदूमध्ये जातीश्रेष्ठतेचे बीज ठासून भरलेले असते. या विचारधारेचे लोक कधीच बहुसंख्यांक नसतात. परंतु अल्पसंख्येच्या परिस्थितीतही ते मजबूत व ताकदवार असतात. त्यांच्याकडे संसाधनतेचे भांडार असते. जाती श्रेष्ठतेच्या आधावर समाजाच्या विविधांगी भागावर त्यांचे वर्चस्व असते. त्याच आधारे ते बहुसंख्यांक लोकांना गुलाम बनवीत असतात.  धर्म, धर्मशास्त्रे  आणि परंपरा हे त्यांचे सर्वात मोठे हत्यार असते. धर्म व त्याच्या परंपरा याचे ते स्वत:ला चालक व मालक समजत असतात.
आजच्या वैज्ञानिक व सभ्य नागरिक समाजाच्या काळात अशा दमनकारी व कुप्रथानी भरलेल्या इतिहासापासून उत्साहित होण्यापेक्षा त्या इतिहासाला विसरणे व काळाच्या ओघात त्याला फेकून देण्यातच खरी समजदारी असली पाहिजे. आणि नव्या इतिहासाच्या नवनिर्माणाची कास धरली पाहिजेत. वास्तविकत: आपल्या गुंड व बलात्कारी आजोबांची कोण आठवण काढतो? अशा आजोबाच्या निशानीला पुढच्या पिढ्या विस्मृतीत टाकीत असतात. हाच कित्ता दमनकारी इतिहासाला लागू होतो. अशा इतिहासाचे विस्मरण झालेलेच बरे असते. परंतु भारतातील ब्राह्मणवर्ग आपल्या ताकदीच्या जोरावर अशा इतिहासाला बहुजनांच्या मनात अधिकाधिक खोलवर रुजविण्याचे प्रयत्न करतो.
समाजाचा दुसरा एक आरसा सुध्दा असतो. गौरवान्वित इतिहास आणि महापुरुषांचा केवळ आणि केवळ गर्व करीत असतात. गर्व करण्यातच ते समाधान व धन्यता मानीत असतात. महापुरुषांच्या समानतावादी विचारांना व नैतिक मूल्ल्यासमोर त्यांना आकाश ठेंगणे वाटत असते.  त्यांच्या महान विचारांना केवळ भाषानापुरते मर्यादित ठेवून पिंजर्यात कोंडून ठेवण्याची त्यांची धारणा बनलेली असते. परंतु त्यांच्या महान विचारावर चालणे त्यांना फार अवघड वाटत असते. महापुरुषांच्या विचारावर आधारित नव्या क्रांतीची ज्योत त्यांना पेटवावीशी वाटत नाही. हे काम फार अवघड आहे. महापुरुषांचे विचार म्हणजे स्वत:ला फकीर बनविण्याचा कारखाना समजत असतात. पुढच्या पिढ्यांच्या जीवनाचा विचार न करता केवळ वर्तमानाचा विचार करीत असतात. त्यामुळे महापुरुषांच्या विचारातील इतिहास रचण्याचा ते कधी विचारच करीत नाहीत. केवळ आपसातच भांडण करीत बसने आणि तु मोठा की मी, यातच ते आपले भविष्य  दावणीला लावीत असतात. महापुरुषांच्या अनुयायीत्वापेक्षा ते भक्त बनलेले दिसतात. हे भक्त त्यांना केवळ जयंती व पुतळ्यात बंदिस्त करून ठेवीत असतात. केवळ छापील व पोपटपंछी विचारानी इतिहास निर्माण होत नाही तर विचाराना प्रवाही व कार्यप्रवण करने गरजेचे असते. काट्याच्या कुंपणावरून चाल करीतच नवक्रांती घडत असते.
वर चर्चीलेल्या दोन्ही परस्पर विचारधारा भारतात अस्तित्वात आहेत. दोन्ही विचारधारेचे प्रवक्तागण आपापल्या बाजू मांडताना दिसतात. त्यापैकी एक मजबूत तर दुसरी कमजोर. एक विचारधारा दुसर्याच्या घरात घुसून मारण्याची क्षमता ठेवते तर दुसरी गुटबाजीच्या विकलांगतेमुळे आपल्या बचावाची. विकलांगतेमुळे तिला पाहिलेच्या काठीचा सहारा घ्यावा लागतो. कमजोरतेमुळे एकाला नष्ट होणे अपरिहार्य असते. एक स्पष्ट आहे, विचारधारा कधीही कमजोर नसते तर अनुयायी वर्गाच्या निष्क्रियतेमुळे ती कमजोर बनत असते. इतिहासात वैशालीच्या लिच्छवी लोकांचा पराभव हा उदाहरणाच्या स्वरुपात बघितला पाहिजे. लीच्छ्वी लोकांच्या गटबाजीपणामुळे व आपल्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे अजातशत्रूने आपल्या नीतीने वैशाली राज्य नष्ट केले. वैशालीच्या लीच्छवी लोकांचे हे उदाहरण केवळ भाषनापुरतेच मर्यादित राहिले आहे. परंतु त्या उदाहरणाने मात्र कृती कधीच शिकविली नाही.   
वर मी भारतातील दोन मुख्य विचारधारांचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ पुरस्कृत हेगडेवार – गोळवलकर विचारधारा तर दुसरी फुले पेरियार आंबेडकरादी विचारधारा. हेगडेवार –गोळवलकर विचारधारेला मुख्यत: संघीय विचारधारा असे म्हणतात. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ एक मुखौटाधारी संघटना आहे. ही संघटना लोकांच्या समोर बोलते एक, परंतु त्यांची कृती मात्र दुसरीच असते. लोकांना भ्रमामध्ये ठेवणे हा तिचा गुणधर्म आहे. समानतेच्या विपरीत विषमता हा संघाचा आवडता सिद्धांत. भारतीय लोकांना श्रद्धा व अंधश्रध्देच्या गर्तेत गुंतवून ठेवणे हा सिद्धांताचा एक बिंदू असून ते नेहमी कुप्रथाना व कुपरंपरांना गौरवान्वित करीत असतात. संघ (आरएसस) पुराणे, धर्मशास्त्रे व  स्मुर्त्यावर आधारित चातुर्वर्ण्यव्यवस्था आणि विषम समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करू बघतो आहे. ब्राम्हणांना भारतीय धर्मव्यवस्थेचे मालक व ईश्वराचा जमिनीवरील दुवा बनवू बघत आहेत.
आजच्या परिस्थितीमध्ये संघ ही भारतातील सर्वशक्तीशाली संघटना आहे. लोकसंख्येचा प्रमाणात ब्राम्हण ही केवळ ५ टक्केपेक्षाही कमी असणारी जमात परंतु तिने भारतातील ८५ टक्के लोकसंख्येवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेचे आम्हीच केवळ एकमेव मालक आहोत असा त्यांचा दावा व अहर्भाव  असतो. इतर धर्मांना ते आपली शाखा समजत असतात. संघाच्या शाखेत जाणारे आजची बालके हे उद्याची समाजव्यवस्था आपल्या हंटरने चालवतील. हा भारतीय लोकशाहीसाठी फार मोठा धोका आहे. ते भारताचा नवा इतिहास घडवू इच्छित नाहीत तर हजारो वर्षापूर्वीच्या सनातन धर्माचे पुनरुज्जीवन त्यांना अभिप्रेत आहे.

तर दुसरीकडे बहुसंख्यांक समाज हा जाती जाती मध्ये विभाजित आहे. प्रत्येक जातीच्या लोकांना वाटत असते की, आपण त्यांच्या पेक्षा उच्च जातीचे आहोत. प्रत्येक जाती ह्या विषमता व असमानतेच्या ठोकरी खात असतात परंतु त्यातच तो स्वत:ला आनंदी समजून बेफिक्र जीवन जगत असतो. याच बहुसंख्य समाजातील महात्मा फुले, बिरसा मुंडा, महात्मा बसवेश्वर, रामसामी पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकर या  महापुरुषांनी गुलामीची जाणीव करून दिली होती. विषमतावादी व्यवस्थेविरुध्द त्यांनी बंड पुकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रे जाळली आणि तथाकथित देवाच्या मुर्त्यांना चौकात आणून बदडवले. त्यांनी सांगितले, हे आमच्या गुलामीचे प्रतिक आहेत. त्यामुळे या प्रतीकानाच प्रथम नष्ट करावयास हवे. याची त्यांनी स्वत:पासूनच सुरुवात करून क्रांतीचा बिगुल वाजविला होता. या महापुरुषांनी विचारधारा दिल्या, विवेकवाद शिकविला, विज्ञानाच्या तर्कातून समीक्षा व चिंतन करने शिकविले. त्यांनी धर्माच्या दलालापासून सावधान राहण्याचे आवाहन केले. त्यांनी धर्मशास्त्रे, पंडे  आणि परंपरा याच्या दलदलीत न फसण्याचे आवाहन केले होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी तर देशाचे संविधान लिहून नव्या क्रांतीची बीजे पेरली. बहुसंख्यान समाजाला घटनेद्वारा त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले. परंतु या महापुरुषांचे अनुयायी त्यांच्या विचारांच्या प्रति हताश झालेले दिसतात. ते आपापसातच विभाजित असलेले दिसतात. आपापली शरणस्थळे शोधत कोणी कांग्रेस मध्ये, कोणी भाजपा मध्ये तर कोणी शिवसेनेमध्ये जातात. आपल्या समाजांच्या व्होटबँकेच्या जोरावर त्यांना सत्तेमध्ये बसवितात. ते समाज व इतर पक्षामधील दलालाचे काम करीत असतात. महापुरुषांनी चालू केलेल्या चळवळीचे भविष्य या दलालांच्या हातात कसे काय सुरक्षित राहील? काहीजण तर कायदे बनविणाऱ्या संसदेमध्ये जावून जोक करून इतरांना हसविण्याचे काम करीत असतात. जसे की नर्तकी मुजऱ्यात आपल्या नाचगाण्याने जमलेल्यांना खुश करीत असते. काही जन संपूर्ण पाच वर्ष तोंडाला कुलूप लावल्यांतर्गत संसदेत बसलेले असतात. काय, असे लोक फुले आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करण्यास लायक व सक्षम असतात?. संविधान दिनाच्या संदर्भात संसदेतील चर्चेत सहभागी होत शरद यादव काय म्हणाले, ते लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले, “मै इस चर्चा मे सामील नही होना चाहता था, मुझे लगा था, यहा बैठे दलित और आदिवासी समाजके लोक कुछ बोलेंगे, अपने समाज की समस्या, दु:ख और दर्द सदन के सामने रखेंगे, लेकिन सबके सब अपने मालिक से डरे हुए है, अगर कुछ बोलू तो अगले इलेक्शनमे मेरा टिकट न कट जाये. ऐसे गुलाम लोग अपने समाज का भविष्य कैसे बना पाएंगे? इन लोगो की वजहसे इन्ही के समाज के लोगो के हालात भयावह हो चुके है”

पेशव्यांना हरविणाऱ्या भीमा कोरेगावच्या युध्दाबाबत गर्व केला जातो. बाबासाहेब नित्यनेमाने जावून त्या बहाद्दुराना सलाम करीत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातूनच प्रेरणा घेवून प्रतिक्रांती केली. परंतु आज भीमा कोरेगावच्या युध्दाचा गर्व करणारे केवळ त्या इतिहासाचा गर्व करतात. परंतु प्रेरणा घेत नवा इतिहास निर्माण करण्याचे त्याच्या ध्यानी मनी येत नसते. ते या इतिहासाला केवळ भाषणापुरते मर्यादित ठेवू इच्छितात. स्मारकावर माथा टेकल्याने काहीच साध्य होत नाही. तर त्या स्मारकापासून व त्यांच्या चारीत्र्यातून प्रेरणा घेत युध्द जिंकून नवा इतिहास रचावा लागतो. बाबासाहेब म्हणत, बकऱ्या कोंबड्यांचा कोणीही बळी देतो, सिंहाचा कोणीही देत नाही. म्हणून, तुम्ही सिंह बणा असा संदेश ते देतात.

गटातटात विभाजित लोकाचे हाल वैशालीच्या लीच्छवी लोकासारखेच होत असतात. ज्या लोकांना ५० वर्षे  झाले तरी आपला नेता निवडता येत नाही. असे लोक काय, महापुरुषांच्या विचाराचे वाहक बनून त्यांची स्वप्ने साकार करू शकतील? गटातटाच्या नेत्यासोबत वाहत जाणारे लोक नवा इतिहास घडवू शकत नाही. तर ते आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत आपला पैसा, हुन्नर आणि वेळ बरबाद करीत असतात. गटबाज नेत्यांना डंडा लावणारेच क्रांतीचे वाहक बनू शकतात. म्हणून इतिहासाचा गौरव करा परंतु त्याचा साधन म्हणून उपयोग करणेही शिकले पाहिजेत. तेव्हाच नवा इतिहास घडवून महापुरुषांचे खरे अनुयायी म्हणून स्वत:ची ओळख जगाला दाखवू शकता. अन्यथा आपल्या खुबीने व नीतीने शत्रूना व त्यांच्या प्रतीकांना आपल्या पोटात सामावून घेत नष्ट करण्याची क्षमता राखणारा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दरवाज्या समोर उभा ठाकून आहेच. आज संघाच्या स्टेजवर जाण्यासाठी हपापलेले व संघीय लोकांना आवतन देवून घरात घेणाऱ्या आंबेडकरी भक्तांची लगबग बघितली की पुढच्या इतिहासाचे पान कसे असेल? याची कल्पनाच भयावह वाटते.

बापू राऊत, 

मो.न. ९२२४३४३४६४, ई-मेल: bapumraut@gmail.com

No comments:

Post a Comment