Monday, January 14, 2013

दलित-बहुजनांना अडकवलेय रोजी-रोटीतच! - डॉ. ऊर्मिला पवार

दलित-बहुजन समाजाला रोजी- रोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच त्याला सर्व ताकद पणाला लावावी लागते आणि उरलेल्या ताकदीने तो स्वत:ला घडवू पाहतो. स्वत:ला घडविताना तो कुठेतरी व्यक्त होऊ पाहतो, आपलं अस्तित्व निर्माण करू पाहतो. पण प्रत्येक ठिकाणी त्याला कमी लेखले जाऊन नाकारण्यात येतेय. ही स्थिती बदलण्यासाठी आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ११ व्या
विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.ऊर्मिला पवार यांनी अध्यक्षीय भाषणात केले. 
त्या पुढे म्हणतात, मंगेश पाडगावकरांना डोंगरावरची किरणे दिसतात, पण डोंगराच्या कडेकपारीत राहणार्‍या आदिवासींचे शोषण दिसत नाही. त्यांचे खपाटीला गेलेले पोट दिसत नाही. गुजरातमधील डांग जिल्ह्यात होणार्‍या शबरी मेळ्यासारख्या प्रतिगामी कार्यक्रमांना सत्यशोधक आदिवासींनी केलेला विरोध हे आदिवासी समाज जागृत झाल्याचा पुरावा आहे, उच्चवर्णीय स्त्री ब्राह्मणधाजिर्णी आहे. उच्चवर्णीय स्त्रिया पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध बोलतात पण जातीव्यवस्थेवर त्या बोलत नाहीत. पण दलित स्त्री जातीव्यवस्थेकडून होणारे शोषणही मांडते. हा स्त्रीवाद वेगळा आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. 
प्रा. रणजित परदेशी यांनी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले व योजना आयोगाचे सदस्य डॉ.नरेंद्र जाधव यांच्यावर कडाडून टीका करीत ते ब्राह्मण्यवादी असल्याचा आरोप केला. स्वागताध्यक्ष अँड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रस्थापित साहित्यिकांना ब्रिटिशांशी लढा देणार्‍या तंट्या भिलाचा परशू आणि हिंसाचार करणार्‍याचा परशू यातील फरक समजत नसला तरी सुजाण नागरिकांना तो समजत असल्याचे सांगितले. दलित-बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल कुणीही जागरुक नाही. शासनाचे धोरण आहे की, आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही. का, तर मुलांमध्ये न्यूनगंड येतो. मुले आत्महत्या करतील. नववीत गेलेल्या मुलाला वाचता येत नाही. त्यामुळे दहावीच्या पुढे ही मुले जात नाहीत. मग कामगारांचीच पिढी त्यातून घडवणार आहात काय?. असा सवाल साहित्यिकांनी केला.

No comments:

Post a Comment