लोकहितवादी, महादेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर
हे महात्मा फुल्यांच्या समकालीन सुधारक होते. परंतु हे सुधारक हे बहुजन समाजाविषयी
केवळ शब्दामधून उसासे व सहानुभूती दाखवत. हे सुधारक आपल्या सुधारकी विचाराच्या विरोधी कृतीही करीत असत. पण ज्योतिबा
फुले अशा सुधारक फळीतील नव्हते. 'बोले तैसा चाले' हा त्यांचा बाणा होता. ब्राम्हणेत्तराना जागे करण्याबरोबरच
ब्राम्हण महिलावर होणार्या अन्यायाच्या निर्मूलनाला सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य समजले.
म.फुलेंची जडणघडण ही
थॉमस पेन यांच्या विचाराच्या मानवतावादी चिंतनातून झाली होती. भारतातील धार्मिक परंपरा, धर्माभिमान व स्थितिप्रियता ही आपमतलबीपणाची असून याविरोधात
प्रस्थापितांशी लढले पाहिजे अशी त्यांची धारणा
बनली होती. होती. १८५७ च्या बंडानंतर भारतात राज्य
करताना त्यांच्या धार्मिक व सामाजिक बाबीमध्ये हस्तक्षेप न करण्याच्या धोरणामुळे सुधारणाना
ब्रेक लागून पुनरुज्जीवनवादी बलवान झाले होते. जेव्हा जेव्हा सुधारणेसाठी सरकार व सुधारकाकडून
पावले पडत तेव्हा तेव्हा टिळक व चिपळूणकर राणीच्या जाहिरानाम्याचा हवाला देवून सुधारणास
विरोध करीत असत.
प्रथमत: उच्चवर्गास पाश्च्यात्य शिक्षण व ज्ञान देवून नंतर हे शिक्षण मध्यम व
कनिष्ठ जातीकडे झिरपत जाईल. अशी काही सनातनी व ब्रिटिशांची कल्पना होती. याला फिल्टर
डाऊन थेअरी असे म्हटले होते. पण जातीभेदाची अभेद्य भिंत बघता उच्च वर्ग ते ज्ञान खालच्या
वर्गास देईल याची खात्री नव्हती. हा धोका वेळीच ओळखून या सिद्धांतास फुलेंनी कडाडून
विरोध केला होता. शिक्षणाचे दरवाजे सर्वांना सारखेच खुले झाले पाहिजेत, त्याशिवाय समाजाची
उन्नती होणार नाही हा विचार त्यांनी पुढे रेटला होता. एवढेच नव्हे तर वयाच्या बारा
वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण कायदा करून सक्तीचे करावे अशी त्यांनी हंटरकडे मागणी केली
होती.
भारतात प्रथम महिला शिक्षणाची सुरुवात फुले
दांपत्यानी १८४८-१८५१ या काळात चार शाळा
काढून केली. या काळापर्यंत भारतात महिलाना शिक्षणबंदी होती. चूल आणि मूल हीच त्यांची
मर्यादा होती. मुलगी शिकल्यास तिच्यामुळे सर्व
कुटुंब शिक्षित होते, ही फुलेंची मूलगामी भूमिका होती. १८८१-८२ सालच्या शिक्षण खात्याच्या अहवालात
अखिल मुंबई इलाख्यात एकसुध्दा महार व मांग मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात काय पण
माध्यमिक शाळेतही नव्हती. या पार्श्वभूमीवर फुलेनी अस्पृश्य वर्गाची बाजू मांडून
त्यांच्या शिक्षणातील सहभागाची सरकारकडे ठाम मागणी केली होती.
ज्योतिबा फुलेनी पंडिता रमाबाईनी केलेल्या धर्मांतराची प्रशंसा करून तिने स्थापन
केलेल्या शारदासदनाच्या कार्यास सतत पाठींबा दिला. ताराबाई शिंदेनी स्त्री-पुरुष तुलनात्मक
निबंधात, “बायकांनी सती जाण्यापेक्षा व आत्महत्या करण्यापेक्षा नवर्यांनी पत्नीच्या
निधनानंतर सती जाने मुलांच्या दृष्टीने योग्य होईल. यामुळे सावत्र आई येणार नाही”.
असा विद्रोही विचार मांडला होता. सावित्रीबाईच्या या शिष्येचे फुलेंनी मोठे कौतुक करून
१८८५ साली लिहलेल्या “सत्सार” या पुस्तकात पंडिता व ताराबाईवर टीका करणार्या सनातनी
विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
भारतातील सनातनी संस्थाविरोधात विद्रोह करणारे ज्योतीबा फुले हे पहिलेच. त्यांचा
विद्रोह हा तत्कालीन सामाजिक, धार्मिक परिस्थिती आणि अंधाधुंध वर्णव्यवस्थेसी होता. आपल्याच
देशबांधवांना समान मानीत नसलेले तुम्ही देशभक्त
कसे? असा प्रश्न
करून, अन्नधान्य पिकविणार्या शेतकर्यांना शूद्र मानणारे तुम्ही वरिष्ठ कसे? असा दूसरा सवाल
केला होता.
फुलेंचा “गुलामगिरी” हा ग्रंथ भारतातील ब्राम्हणप्रधान व्यवस्था, धार्मिक रूढी
व अंधश्रध्दाग्रस्त सामाजिक संस्कृतीविरुध्द उठाव करण्यास प्रेरित करतो तर अशी परंपरागत
व्यवस्था नष्ट करून त्याऐवजी नवी मानवोपयोगी, समतावादी व पुरोगामी व्यवस्था ज्या नीतीतत्वावर
आधारित असली पाहिजेत ती तत्वे त्यांच्या “सार्वजनिक सत्यधर्म” या ग्रंथात आहेत. क्रांतिकारक
फुल्यांनी वर्णव्यवस्था व त्यातून उपजलेले जातिभेद यावर प्रहार केले. वेदांचे अधिष्ठान
झुगारून व मनुस्मृती, श्रुति व पुराणांचा धिक्कार करून मानवधर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी “सत्यशोधक”
चळवळ सुरू केली होती
शोषित समाज व शेतकर्यांच्या अन्यायाविरुध्द आवाज उठविणारे फुले हे केवळ महाराष्ट्रातील
नव्हे तर अखिल भारतातील पहिले समाजचिंतक होते. शेतकर्यांच्या हिनदीन अवस्थेसाठी जबाबदार असणारा
शोषक समाज व शेतकर्यांचे अज्ञान यावरील फुलेंचे कवण फार प्रसिध्द आहे, ते म्हणतात, “विद्येविना मती
गेली, मतिविना नीती गेली, नीतीविना गती गेली! गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र
खचले, इतके अनर्थ एका अविदयेने केले.” त्याकाळात शेतकर्यांच्या शोषणांचे असे वस्तुनिष्ठ
विश्लेषण कोणीही केल्याचे दिसत नाही.
सर्वच धर्मग्रंथ हे मानवनिर्मित असल्याचे बहुतेक सर्वच सुधारकांनी मान्य केले होते.
सृष्टी हीच दृश्यस्वरूप ईश्वर हा विचार, सत्यनिष्ठा व नैतिक अधिष्ठान यावर भर देवून त्यांनी “निर्मिक”
हा नवा शब्द योजला. सृष्टीचा निर्माता कोणीही नाही असे त्यातून विदित होते. त्या काळात
असे विचार ऐकून घेणारा वर्ग नव्हता परंतु त्यांनी अशा वर्गाच्या निर्मितीची पावले उचलली
होती. फुल्यांच्या या विचारनिर्मिती मुळेच टिळकांच्या गणेशोत्वास ब्राम्हनेत्तर वर्ग
जात नव्हता. हा एक फार मोठा सामाजिक बदल होता. शेवटी लोकांच्या समर्थनासाठी टिळकास
शिवाजी उत्सव सुरू करावा लागला होता.
फुले हे प्रत्यक्ष कृती करणारे द्रष्टे होते. त्यांनी १८६४ मध्ये पुण्यातील नातू
बागेत एका शेणवी जातीच्या माणसाचा पुनर्विवाह घडवून आणला होता. त्याकाळी विधवा स्त्रीला
कुलटा समजून तिचे स्थान घराच्या एका कोपर्यात असे. अशा परिस्थितीमध्ये काशीबाई नावाची
एक ब्राम्हण विधवा १८६५ मध्ये प्रसूत झाली होती. तिच्या अनौरस मुलास फुलेनी दत्तक घेतले.
विधवा झालेल्या स्त्रीयांचे मुंडन करून त्यांना विद्रूप करण्यात सनातन समाज धन्यता
मानत असे. या प्रथेविरोधात फुलेनी लढा उभारून १८६५ मध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणत
ही प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून म.फुले हे स्त्री मुक्तिचे उदगाते म्हणतात.
२४ मे १८८५ सालच्या साहित्य संमेलनांचे निमंत्रणाबाबत रानडेंनी फुले यास लिहले
होते, यावरील
उत्तरात फुले म्हणाले, “तुमच्या पुस्तकातील भावार्थासी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ बसत नाही. आम्हा
शूद्र अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात, हे उंटावरून शेळ्या हाकणारास व आगंतुक भाषण करणारास
कोठून कळणार? असो.. यापुढे आम्हा फसवणूक करणार्यांच्या थापावर आम्ही भुलणार नाही”. यावरून त्यावेळच्या
तत्कालीन वाडमयात अब्राम्हनाना स्थान नव्हते व त्यांचे ब्राम्हणेत्तराविषयीचे कार्य
शून्यवत होते असे दिसते. कांग्रेस पक्षावर ब्राम्हणांचाच प्रभाव असून शेतकर्यांच्या
व ब्राम्हणेत्तरांच्या हिताबाबत हा पक्ष दक्ष नाही. अशी महात्मा फुलेनी व्यथा व्यक्त
केली होती.
महात्मा फुले, खरे तर प्रबोधन चळवळीचे अग्रदूत होते. त्यांचा संघर्ष हा मानवी प्रतिष्ठेसाठी होता.
त्यांच्यावर टीका व प्राणघातक हल्लाही झाला. त्याकाळचा समाज पुरोगामी सुधारणा म्हणजे
भयंकर व धर्माची अपरिमित हानी मानायचा. पण फुलेंचे विचार व कृती ही कोणा व्यक्ती विरोधी
नव्हती तर धर्माचे स्तोम माजविणार्या कर्मठाशी होती हे लक्षात घेतले पाहिजेत.
महात्मा फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आजच्या काळातील बहुजन चळवळीचे मोठे अभियान
उभे राहिले आहे. इतरा सारखे ते बोलून थांबले नाही तर प्रत्यक्ष कार्यारंभ केला. दुष्ट
चालीरीती, दैवी चमत्कार व अवतार कल्पनेवर त्यांनी प्रहार केले. ब्राम्हण पंडिताच्या निरुपयोगी
विद्येचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्या विचारसरणीत सामाजिक नीतीमत्तेला प्रमुख
स्थान होते.
वंचिताचे त्राते, स्त्री शिक्षणाचे जनक, महिला मुक्तिचे उदगाते व शेतकर्यांचे कैवारी या नात्याने त्यांनी
महान कार्य केले. महात्मा फुले हे लोकोत्तर पुरुष होते. लोकनिंदा सहन करून बहुजन समाजाची
दू:खे चव्हाट्यावर आणली. म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना “खराखुरा महात्मा” म्हटले.
तर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द व कबीर यांच्या बरोबरीने आपला गुरु मानला. म्हणून
म.फुले हे मोठे थोर समाज क्रांतिकारक ठरतात.
महात्मा फुल्यांनी आपल्या कृतीतून, साहित्यातून व निर्माण केलेल्या साधनातून समताधिष्टीत समाज निर्मितीचे
कार्य केले. त्यांनी आपल्या काळात सर्वसामान्यांच्या हितासाठी स्वत:चा जीव धोक्यात
घालून धर्मांधाना सळो की पळो करून सोडले होते. परंतु आजचा त्यांचा अनुयायी अंधश्रध्दा, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, वाढलेली सामाजिक
व आर्थिक दरी, असहिष्णुता, जातीय व धार्मिक तेढ, राजकारणातील असमतोल आणि कपोलकल्पित धर्म थोतांडाच्या प्रश्नावर स्थूल व थंड
दिसतो. तो केवळ फुल्यांचे नाव घेतो पण तो कृतीशून्यच आहे. असे कृतीशून्य अनुयाई आज
शोषकासी दिलजमाई करून सत्ता उपभोगीत आहेत. तर काहींनी या महात्म्याचे विचार भाषणात
लोणच्यासारखे तोंडी लावण्यासाठी ठेवले आहे. आज म.फुल्यांचा सत्यशोधक शोधुनही सापडत
नाही. हे एक दुर्दैवच होय.
लेखक: बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment