Tuesday, May 26, 2020

टिळक व गांधी : राजकीय सत्ता संघर्षातील विरोधाभासी केंद्र

टिळक व गांधी या दोहोंमध्ये एक मूलभूत फरक होता. अस्पृश्योद्वार झाल्याशिवाय भारत स्वातंत्र्य होणार नाही ही गांधीची ढोंगी विचारसरणी तर ब्राह्मणांनी कौन्सिलात गेल्याशिवाय देशोद्वार होणार नाही ही टिळकांची जातीश्रेष्ठतेची भूमिका. देशाच्या राजकारणांची व ब्रिटीशविरोधातील आंदोलनाची सर्व सूत्रे ही आपल्या हातामध्ये असावी याची सुप्त धडपड दोघांच्याही अंतरंगात होती. रानडे व गोखले यांचेकडून राजकीय सूत्रे आपल्या हातात घेवू पाहण्याची टिळकांची नीती तर राष्ट्रीय राजकारणातून टिळकांना घालविण्याची गांधीची व्युव्हरचना,  दोघांची ही पध्दत वेगळी असली तरी उद्देश मात्र एकच होता आणि तो म्हणजे एकमेकांना राजकारणातून घालविण्याचा.  
गांधी आफ्रिकेत असताना त्यांना वंशवाद (रॅसीझम) म्हणजे काळ्या आफ्रिकन लोकावर फार मोठा अन्याय व पिळवणूक वाटत होती. परंतु भारतात परत आल्यावर तुलनात्म्क दृष्ट्‍या अस्पृश्यता व वंशवाद सारखाच असला तरी अस्पृशावर होणार्‍या अन्यायाची मूळ प्रेरक संस्था असलेली “जाती संस्था व वर्णव्यवस्था” त्यांना गौरवाची वाटत होती. ही गांधीची दोगली नीती होती. त्यांना जातीनिर्मूलन वैयक्तिक प्रयत्नानी, विधायक कार्यातून शासनांनी लक्ष न घालता व्हावी असे वाटत होते. गांधीची ही भूमिका टिळकांच्या “सुधारणा कालांतराने होत राहतील, त्यासाठी प्रयत्नपूर्वक उचित उपाय करण्याची गरज नसून त्यासाठी बुध्दीचा व प्रयत्नांचा अपव्यय करण्याची गरज नाही” या समाजसुधारणा विरोधी भूमिकेसी साम्यता दर्शविणारी होती.  
१९१९ च्या राज्यसुधारणा कायद्यासंदर्भात टिळकांची संमती, त्यांनी मानलेले बादशहाचे आभार  व सहकाराच्या आश्वासनामुळे कॉंग्रेसच्या अमृतसर अधिवेशनात टिळक व गांधी यांच्यात खडाजंगी झाली. गांधीजीच्या सत्याग्रहामुळे व त्यांच्या भारत दौर्‍यात लोकामध्ये जावून मिसळण्याच्या प्रवृत्तीमुळे टिळकांच्या उपस्थितीत गांधी लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनू लागले होते. भारताच्या राजकीय क्षेत्रात आपल्यासाठी नवा प्रतिस्पर्धी निर्माण झाला याची जाणीव टिळकांना झाली. त्यांचे एकेक समर्थक गांधीकडे जावू लागले. म्हणून आपली तटबंधी व पडझड थांबविण्यासाठी टिळकांनी एप्रिल १९२० मध्ये कॉंग्रेस अंतर्गत “कॉंग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष” स्थापन केला. निवडणुकीच्या राजकारणातून कायदेमंडळामध्ये प्रवेश करायचा व ब्रिटिश सरकारशी सशर्त सहकार्य करायचे असे टिळकांचे धोरण होते. याउलट अन्यायकारक व शोषक स्वरुपाच्या सरकारशी असहकार करून बहिष्कार घालायचा अशी गांधीची योजना होती. १९१६ ते १९१८ या काळात टिळकांचा राजकीय दबदबा होता. तरीही त्यांना निसंदेह काँग्रेसचे नेतृत्व करता आले नाही.
गांधीच्या असहकारिता आंदोलनावरून नोकरशाहीच्या अटकेत पडून राहण्यापेक्षा विलायतेस वर्ष सहा महीने जावून राहने बरे! असा विचार टिळकांच्या मनात घोळत होता. परंतु अचानक आलेल्या मृत्यूमुळे टिळकांचा हा विचार विचारच राहून गेला. मुंबईमध्ये टिळकांच्या प्रेतयात्रेच्या दिवशी गांधीचे सरकारविरोधी असहकाराचे आंदोलन ठरले होते. रस्त्याच्या एका बाजूने टिळकांची प्रेतयात्रा जात होती तर दुसर्‍या बाजूंनी असहकारितेच्या सत्याग्रहीचा मोर्चा. टिळकानंतर त्यांच्या राहिलेल्या भक्तामध्येही दोन गट पडले. त्यातील एका गटाने गांधीचे नेतृत्व स्वीकारले.
गांधीनी गोखले आणि टिळक या दोघांचीही तत्वे उचलली. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील परिस्थितीला तोंड देताना गोखलेंचा आचार आणि विचार घेत हिंदू व मुस्लिम यांची एकता घडवून आणली. तर दुसरीकडे अस्पृश्यतेचा विरोध केला. रानडे व गोखलेनी जातीसंस्था व धर्मशात्रे यावर हल्ले चढविले. परंतु सुधारकांच्या या विचाराला गांधींनी मोठ्या सफाईने सोडचिठ्ठी देवून टिळकांच्या जातीसंस्था, चातुर्वर्ण्य व कर्मठतेच्या भूमिकेचे समर्थन केले. अस्पृश्यांना हरिजन हे नाव देवून त्यांच्या कामाचे महिमामंडन करण्यात आले. पूर्वजांचे व्यवसाय पुढील पिढ्यांनी चालविले पाहिजे असा सिध्दांत त्यांनी मांडला. पण गांधी स्वत: वैश्य वर्णाचे, त्यांनी राजकारणात न पडता वैश्यांचा धंदा करावयास हवा होता. एकूणच सिध्दांत हे केवळ दुसर्‍यांना सांगण्यासाठी असतात. गांधीजींच्या नैतिकतेचा हा पराभव होय.   
टिळकांना कधी न मिळालेला मुस्लिम समाजाचा पाठींबा गांधीस मिळू लागला. ब्राह्मणेत्तर समाज मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या चळवळीत सामील झाला. कॉंग्रेस चळवळ ही सर्व समाजाची होवू लागली. असे असले तरी सनातनी, कर्मठ व पुनरुज्जीवनवादी टिळकभक्त गांधीकडे आकृष्ट का झाले? याचे उत्तर गांधीजीच्या जातिसंस्था आणि चातुर्वण्यव्यवस्थेच्या समर्थनाच्या टिप्पणीत आढळते. टिळकाप्रमाणेच गांधीनाही भीती वाटत होती की, जर त्यांनी जाती व वर्णव्यवस्थेस विरोध दर्शविला तर राजकारणातील आपले स्थान धोक्यात येईल. म्हणून सत्य व नैतिकतेचा आव आणणार्‍या गांधीला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, यांना कोणीतरी सांगायला हवे की, ते स्वत:ची फसवणूक करीत तर आहेतच परंतु वर्णव्यवस्थेच्या नावाखाली जातीव्यवस्थेचे समर्थन करून जनतेचीही फसवणूक करीत आहेत. गांधीच्या दुहेरी भूमिकेवर डॉ. आंबेडकरांनी नेहमीच सडकून टीका केली आहे. देशात असे शेकडो ब्राह्मण आहेत की, जे दररोज जात व शास्त्राचे नियम पायदळी तुडवित असतात. तरीही ते शास्त्राचे व जातिसंस्थेचे कट्टर समर्थक असतात. हे असे दुहेरी वर्तन का? यावर डॉ. आंबेडकर म्हणतात की, यांना असे वाटते की जर जनतेला जातीच्या बंधनातून मुक्त केले तर ते ब्राह्मण वर्गाच्या धर्म श्रेष्ठत्वाला व अधिसत्तेला सुरुंग लावल्यावाचून राहणार नाहीत. म्हणून बहुजन समाजाला विचार प्रक्रियेपासून लाभणार्‍या फळापासून वंचित करणारी ब्राह्मण वर्गाची अप्रामाणिकता ही अत्यंत शरमेची बाब आहे.

टिळक भक्तांचा एक गट गांधीप्रणीत कॉंग्रेसमध्ये प्रविष्ट झाला असला तरी त्या गटाने गांधीजीची विचारसरणी स्वीकारली नव्हती. तो केवळ शरीराने कॉंग्रेसमध्ये होता परंतु  विचाराने नव्हे. कॉंग्रेसमध्ये राहून मुसलमानविरोधी व वर्णव्यवस्थेचा विचार बळकट करणारा, हिंदु, हिंदुत्व व हिंदुराष्ट्र या विचाराने उद्दिपित झालेला हा गट कॉंग्रेसच्या सहाय्याने आपले उद्दीष्ट साध्य होईल या आशेच्या व संधीच्या शोधात होता. परंतु कॉंग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरूच्या प्रवेशाने व गांधीवरील त्यांच्या प्रभावामुळे आपले उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार नाही याची जाणीव होताच या टिळकपंथीय गटाकडून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी “राष्ट्रीय स्वंयसेवक संघ” नावाची संस्था उदयास आली. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हे टिळकांच्या विचारसरनीमधून प्रसूत झालेले एक “अपत्य” होय, असा निष्कर्ष काढता येतो.      

लेखक: बापू राऊत 

(आगामी 'टिळक' यांचे वरील पुस्तकातील एक लेख)



No comments:

Post a Comment