खरे तर भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्यांचे शोषण होणे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. सत्ता कोणाचीही म्हणजे स्वतंत्र भारतातील असो वा पारतंत्र्यातील ब्रिटिशांची, शेतकरी हा कायमचा नागविला गेला आहे. शेतकर्यांना स्वत:चा आवाजच नसतो. त्यांना नेता नसतो. त्यांचा वापर करून नेता झालेले लोक सत्तेमध्ये गेल्यानंतर शेतकर्यांचे शत्रू व उद्योगपतीचे मित्र बनत असतात. हे तात्कालिक नेते शेतकर्यासाठी नीती बनविताना शेतकर्यांच्या अधिकच्या फायद्याचा विचार न करता सावकार, कॉर्पोरेट कंपन्या व मोठे उद्योगपती यांचेच अधिक फायदे बघत असतात. त्यांच्या अशा कारनाम्यामुळे हे तथाकथित शेतकरी नेते नंतर मालमाल झालेले बघायला मिळतात.