Saturday, September 19, 2020

हे आमचे गुरु नव्हेत !

 


हे आमचे गुरु नव्हेत ! अशा प्रकारची लेखमाला टिळकांनी केसरीतून लिहली होती. हे लेख केसरीतून १७ ऑक्टोबर १९०५, २४ ऑक्टोबर १९०५ आणि ७ नोव्हेंबर १९०५ रोजी प्रसिध्द झाले होते. हे लेख स्वदेशी चळवळीत पडणारे विद्यार्थी व त्यांच्या गुरूमधील परस्पर सबंध दाखविण्यासाठी लिहले होते.  हे आमचे गुरु नव्हेत, हे वाक्य त्यांनी डेक्कन कॉलेजचे ब्रिटिश प्रिन्सिपाल सेल्बी आणि शिक्षणतज्ञ मेकॅले यांना उद्देशून केले. हे गुरु यासाठी नव्हेत कारण, ते आपल्या विद्यार्थ्यास स्वदेशी व राष्ट्रीय चळवळीत सहभागी न होण्याचे व विद्याभ्यासाकडे लक्ष देण्याचे मार्गदर्शन करीत होते. राष्ट्रवाद हा धर्म व  जातीच्या गर्वाशी सबंधित नसून त्या त्या भूभागात राहत असलेल्या लोकांच्या एकात्मकतेच्या सहजीवनाशी निगडीत असल्याचे प्रतिपादन करीत होते. दुसरीकडे टिळक गुरूंच्या सन्मानाची भाषा करताना, आमच्या धर्मशास्त्रात पित्यापेक्षा गुरुस अधिक मान द्यावा असे म्हटल्याचे  सांगतात. ज्ञानासारखी जगात दुसरी कोणतीही पवित्र, वस्तु नाही; पण स्वार्थासाठी ज्ञानाच्या पुंजीचा विक्रम करण्यास जेव्हा एखादा मनुष्य तयार होतो तेव्हा त्याच्या ज्ञानास शुध्द व पवित्र ज्ञानाची किंमत देणे म्हणजे हिमालयातून गोमुखाच्या द्वारे पडणार्‍या गंगोदकांची  गटारातील पाण्याशी तुलना करणे होय ! असेही म्हणताना दिसतात.

राष्ट्रीय चळवळीचे बीज जर आमच्या तरुण पिढीस शिकायचे असेल तर ते सुरेन्द्रनाथ बॅनर्जी सारख्या राष्ट्रभक्ताकडून शिकले पाहिजे असे टिळक म्हणतात. पण हे सुरेन्द्रनाथ बॅनर्जी महिला शिक्षणाच्या प्रखर विरोधी व जातीभेद व्यवस्थेचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी असे अनेक विरोध दर्शविले होते. तेव्हा त्यांच्या सारखा व्यक्ति राष्ट्रवादी व राष्ट्र भक्त कसा असू शकतो ? न्याय करणारे न्यायाधीश व विद्या शिकविणारे विद्यागुरु हे जेथे राजसत्तेच्या तंत्राने वागणारे असतील तेथे न्याय मिळणे दुरापास्त होऊन शिक्षण व्यवस्थेचा बट्टयाबोळ कसा होतो ? हे आजच्या युगातही स्वतंत्र देशात राज्य करणार्‍या  लोकाकडून आपल्याला बघायला मिळत आहे. त्या दृष्टीने ब्रिटिश राज्यव्यवस्थेचे शैक्षणिक धोरण बघितल्यास ते न्याय देणारे नसले तरी ते अशिक्षितपणा व अज्ञानाच्या गर्तेतून सामान्य जणांची सुटका करणारे होते. परंतु असे धोरण राबविणारे गुरु व व्यवस्था टिळकांना नकोसी होती.

ब्रिटिश गुरूंना जुन्या धर्मशास्त्रात सांगितलेल्या गुरुप्रमाणे मान देणे म्हणजे म्हसोबास परब्रम्हपदास चढविणे असून प्राचीन गुरुशिष्य सबंधाचा अवमान करणे होय असे टिळक म्हणतात. परंतु प्राचीन काळातील कोणती गुरूपरंपरा अभिमानाची होती ? मिथ्या युगातील द्रोणाचार्य व एकलव्य ही गुरुशिष्य परंपरा अभिमानाची होती असे म्हणणे म्हणजे सूर्यास चंद्र आणि दिवसास रात्र म्हणण्यासारखे होईल. आपणाकडून विद्या घेत नसलेल्या एकलव्याचा अंगठा कापण्याचा अधिकार द्रोणाचार्यास कोणी दिला ? केवळ एक आदिवासी तरुण आपण विद्या देत असलेल्या अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये यासाठी अंगठा कापणारा द्रोणाचार्य जर टिळकांचा आदर्श गुरु ठरत असतील व त्या परंपरेस ते आदर्श गुरु शिष्य परंपरा म्हणत असतील तर टिळकांच्या अशा  विद्वतेचा भारतीय समाजास कोणताही उपयोग नव्हता. असे मानावयास  काय हरकत आहे ?. जिंकलेल्या लोकांना जेते लोक अथवा त्यांनी नेमलेले शिक्षक हे राष्ट्रधर्माची खरी तत्वे सांगतील, ही गोष्ट मनुष्य स्वभावाच्याच विरुध्द आहे. ही बाब  इंग्रज विद्वानाच्या संदर्भात खरी आहे असे टिळकांना वाटते असे मानले तर,  आर्यांनी अनार्य लोकांना जिंकल्यानंतर त्यांनी जे आपले तत्वज्ञान, रूढी व परंपरा पराभूत भूमीपुत्रावर लादल्या त्याचे काय ? चातुर्वर्ण्यव्यवस्था ही वेदकर्त्यांनी पराभूत लोकावर लादली आणि त्यांना रूढीच्या व जाती नियमाच्या चौकटीत बसविले अशा परंपरेला टिळकांच्याच व्याख्येनुसार गौरवाची परंपरा कसे म्हणता येईल ? अशी व्यवस्था लादनार्‍या वैदिक आर्यांना भारतीय भूमिपुत्राचे गुरु जसे म्हणता येणार नाही तसेच भारतातील  ब्रिटिश प्रिन्सिपाल व प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये ठरविता येऊ शकते.

टिळक आपल्या लेखात सरकारी शाळा व त्यातील शिक्षकांच्या भौगोलिक  परिस्थितीवर  ( ब्रिटिश शिक्षक)  बोट ठेवून ते कितीही विद्वान असले तरीही कुचकामी आहेत. असा अभिप्राय नोंदवितात. कारण हे विद्वान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य शिक्षण देवून त्यांना मानवाधिकार, जगाचा इतिहास, धर्मातील विषमता व स्त्रीमुक्तीचे ज्ञानार्जन करीत होते. टिळकांना असे ज्ञान परवडणारे नव्हते कारण हे ज्ञान घेतलेले विद्यार्थी पूर्वगौरवपरंपरा, धर्मातील असमानता व एकाच वर्गाच्या श्रेष्ठतेवर आधारित वर्णव्यवस्थेवर प्रश्न विचारतील अशी टिळकांना भीती होती. म्हणून टिळक वारंवार खाजगी शिक्षण व राष्ट्रवादी शिक्षकावर भर देतात. कारण अशा व्यवस्थेत सरकारचे बंधन नसून त्यांना हवे ते शिक्षण देता येणार होते. केंद्रातील भाजपा सरकार जी नवी भारतीय शिक्षण पध्दती आणू इच्छित आहे तिचे मूळ टिळकांच्या विचारधनात आहे. हे लक्षात येते.

टिळक म्हणतात, हिरण्यकश्यपूने आपल्या प्रल्हाद नावाच्या मुलास आपल्या मताप्रमाणे शिक्षण देण्यासाठी अनेक शिक्षक नेमले होते, परंतु वामनाने वर्णन केल्याप्रमाणे त्याला कृष्णभक्ति शिकविण्याच्या कामी ते गुरु म्हणून निरुपयोगी ठरले.  हिरण्यकश्यपूसारख्या परकी राजांनी काढलेल्या शाळातून ही तत्वे (भक्ति व धार्मिक शिक्षण)  शिकविली जाणे शक्य नाही व ती शिकविली जाणे अशी अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. प्रल्हादाने पित्यानी नेमलेल्या गुरूची विद्या झिडकारून दिली. त्याचप्रकारे विद्यार्थ्यानी प्रि. सेल्बी सारख्या गुरुचे ते आपले कितीही हितचिंतक असले तरी त्यांनी दिलेली विद्या झिडकारली पाहिजे. कारण इंग्रज म्हणून उपदेश करण्यास ते अपात्र आहेत. त्यामुळे ते आमचे गुरु नव्हेत. पुढे ते म्हणतात, वामनाने प्रल्हादच्या मुखातून वदविल्याप्रमाणे हे गुरु पोटभरू किंवा पापभीरू समजले पाहिजेत.

टिळकांची गुरूंना मान न देण्याची भाषा किंवा विद्यादान करणार्‍या गुरुस हे आपले गुरुच नव्हेत असे म्हणणे ते सांगत असलेल्या वा मानत असलेल्या धर्मशास्त्राच्या विरोधात होते. कारण धर्मशास्त्रे ही गुरुस देवाची संज्ञा देतात. गुरूंनी दिलेले ज्ञान हे प्रथम विवेक व सद्सदविवेक  बुध्दीच्या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजे. त्यानंतरच त्या गुरुच्या विचाराला स्वीकारले पाहिजे किंवा झिडकारले पाहिजे असे तथागत बुध्दाने म्हटले होते. प्रि. सेल्बीच्या भारतीय विद्यार्थ्यात विवेक व सद्सदविवेकाचा अभाव होता असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच होय. त्यांनी प्रि. सेल्बीच्या विचारांना झिडकारलेही असते. परंतु टिळकांना त्यांच्यातील विवेकाला जागृत होऊच द्यायचे नव्हते. विवेकाची स्वतंत्रता टिळकासाठी भयप्रद होती. म्हणून स्वत:च गुरुशिष्य धर्म सांगून हे आमचे गुरु तर नव्हेतच परंतु आमचे विद्यार्थी त्यांचे शिष्यही नव्हेत असे ते कंठरवानाने सांगतात.

तिन्ही लेखात टिळक हिरण्यकश्यपू , प्रल्हाद व वामन पंडित यांचे उच्चारवान करताना दिसतात. हिरण्यकश्यपू हा एक कपटी राजा असून त्याची संज्ञा त्यांनी लॉर्ड कर्झन राजवटीस दिली. लॉर्ड कर्झन यांची राजवट ही जुलूमशाहीची व विभाजनकारी होती हा इतिहास आहे. परंतु हिरण्यकश्यपूचा असा कोणता इतिहास आहे की, जो जुलूमशाही व विभाजनकारी होता. मिथ्यांचा अवतारी मिर्चीबाजार बघितला तर हिरण्यकश्यपू हा मूळ भारतीय होता. तर वामन हा अप्रवासी भारतीय होता. म्हणजे ब्रिटिशांची राजवट जशी भारतात आली तशीच वामन व त्यांचे साथीदारही भारतात चोरवाटेने आले असावेत. त्यांनी हिरण्यकश्यपूच्या साम्राज्यावर आक्रमण करून राज्य जिंकण्यासाठी त्याच्या प्रल्हाद या मुलास आमिष दाखऊन फितूर बनविले असावे. तसाही भारत जगात फितुरीसाठी प्रसिध्द असा देश आहे. आजही राजकीय सत्तेसाठी अशी फितुर होताना आपण बघतोच. त्यामुळे फितूरी करविणारे व नंतर  राज्य करणारे  वामन व त्यांचे साथीदार हे सुध्दा प्रिन्सिपल सेल्बी प्रमाणे मूळ भारतीयांचे गुरु ठरू शकत नाही. कारण त्यांनी सुध्दा ब्रिटिश राज्यकर्त्याप्रमाणे मूळ भारतीयावर आपली धोरणे लादुन त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक हक्क हिसकाऊन घेऊन त्यांचेवर आपल्या फायद्यांची नवी व्यवस्था लादली असेल. लॉर्ड कर्झनने ज्याप्रमाणे भारतीय नागरिकास गोर्‍या राज्यकर्त्यांच्या बरोबरीचे हक्क मिळू नये यासाठी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न वामन पंडित नावाच्या राज्यकर्त्यांने मूळ भारतीय लोकावर धर्मशास्त्र नीतीच्या माध्यमातून केले असावे. त्यामुळे टिळकांचे नितीशास्त्र व विदेशी लोकास गुरु म्हणून झिडकारण्याची प्रवृत्ती तर्कशास्त्रानेच हिरण्यकश्यपूच्या साम्राज्यावर वर्चस्व गाजविलेल्या वामन पंडित व त्यांच्या साथीदारावर सारखीच लागू होते. म्हणूनच हे आमचे गुरु नव्हेत व आम्ही त्यांचे शिष्यही नाही हे टिळकांचे म्हणणे आर्य – अनार्य आणि सुर - असुर यांच्यातील संघर्षाच्या संदर्भात भारतीयांनी लक्षात ठेवले पाहिजे.

लेखक: बापू राऊत

1 comment: