सर्वेक्षणानुसार, भारतीयांच्या अनेक समुदायात भिन्न भिन्न समजुती प्रचलित आहेत. कर्मावर विश्वास ठेवणे ही त्यापैकीच एक. भारतात ७७ टक्के हिंदू हे कर्मावर विश्वास ठेवतात, मुस्लिम देखील त्याच टक्केवारीच्या प्रमाणात कर्मावर विश्वास ठेवतात. ८१ टक्के हिंदुबरोबरच एक तृतीयांश ख्रिश्चन गंगेच्या पाण्यात सर्वांना पवित्र करण्याची शक्ति आहे या संकल्पनेला मानतात, तर उत्तर भारतात हिंदू (१२%), शीख (१०%) आणि त्याच बरोबर ३७ टक्के मुस्लिम इस्लामशी सबंधित असलेल्या सुफीवादाच्या गूढ परंपरेशी नाते जोडतात. धार्मिक पार्श्वभूमी असलेले व बहुसंख्य भारतीय हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तीचा मान राखणे हे त्यांच्या श्रध्देच्या दृष्टीकोणाचा भाग आहे असे मानतात. असे असले तरीही, काही विशिष्ट मूल्ये, धार्मिक निष्ठा आणि एकाच संविधानाच्या छ्त्रछायेखाली राहत असतांनाही त्यांना आपल्यात भिन्नता आहे असे वाटते. ६६ टक्के हिंदू स्वत:ला मुस्लिमापेक्षा अत्यंत भिन्न असल्याचे समजतात तर ६४ टक्के मुस्लिम समुदायात सुध्दा आपण हिंदूपेक्षा वेगळे असल्याची भावना आहे. सर्वसाधारणपणे ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट धर्माच्या समुदायात सुध्दा हीच प्रवृत्ती दिसते.
सामाजिक विज्ञानाचा एक
सिध्दांत आहे, जसजसा एखादा देश आर्थिक
विकासात पुढे पुढे जातो, तसतसा त्या
देशातील जनता अधार्मिक व आधुनिक विचाराची बनत जाते. दुसर्या महायुध्दानंतर
पश्चिमी युरोपिय देश, दक्षिण कोरिया, जपान व
चीनमध्ये हे बघायला मिळते. परंतु भारत हा त्यास अपवाद असल्याचे अनुभवास येते.
प्युच्या सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार, जवळपास अधिक भारतीय (९७%) ईश्वरावर
विश्वास असल्याचे कबूल करून ८० टक्के लोक ईश्वर अस्तीत्वात असल्याचे मान्य करतात. देवावर
व त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यामध्ये शिक्षित, अशिक्षित, शहरी व ग्रामीण भागातील लोकांचे सारखेच प्रमाण आहे. यावरून आधुनिक शिक्षणाने धर्म-कर्मकांड व (अंध) आस्था यात अधिक बदल होत नाही. मात्र बहुतांश बौध्द
धर्मीय लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारून त्यावर अविश्वास व्यक्त करतात. अधिकतर हिंदूचा देवावर विश्वास असला तरी, कोणता देव तुमच्या अधिक जवळचा असे
विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकापेक्षा अनेक व व्यक्तिगत देव निवडले. सामान्यपणे सर्वात प्रिय म्हणून ४४ टक्के हिंदूना शिव अधिक जवळचा
वाटतो. त्यानंतर हनुमान (३५%) आणि गणपती (३२%) यांचा नंबर लागतो.
स्त्रिया संदर्भात झालेल्या निरीक्षणात भारतीयांचा वैचारिक खुजेपणा दिसून येतो. अनेक भारतियाना स्त्री-पुरुषात होणारे धर्मबाह्य विवाह रोखले पाहिजे असे वाटत्ते. ६४ टक्के भारतीयाना त्यांच्या समाजातील स्त्रियांचा आंतरजातीय होता कामा नये असे वाटते तर ६२% लोकांना आपल्या पुरुषांनी आंतरजातीय लग्न करू नये असे वाटते. ६७ टक्के हिंदूना आपल्यातील स्त्रियानी आंतरधर्मीय विवाह करण्यास मज्जाव केला पाहीजे असे वाटते. याहून अधिक मुस्लिम समाजातील ८० टक्के लोक मुस्लिम स्त्रियांनी इतर धर्मातील व्यक्तिसी विवाह करू नये या मताचे आहेत.
सर्वेक्षणानुसार भारतीय समाज हा
ठिगळ जोडलेल्या कापडा सारखा आहे. भारतीयांना (८६%) त्यांच्या स्वत:च्या
समुदायातील लोकामध्येच उत्कंठतेने मैत्री करावीशी वाटते. ही प्रवृत्ती हिंदू (८६%), मुस्लिम (८८%), जैन (७२%) व शिख (८०%) समुदायात जवळपास सारखीच असल्याचे बघायला मिळते. यावरून भारतीयांच्या आंतरिक मनातील भिन्नता व प्रेमभावना ही ज्याच्या
त्याच्या जाती व धर्म समुदायाशीच अधिक निगडीत असते असेच दिसते. गाव वा शहरीकरण यात
भिन्नता असू शकते. भारतातील ५४% लोक मुस्लिम
समुदायातील लोकांना आपला शेजारी ठेवू इच्छित नाहीत. तर ४५ टक्के हिंदूना आपल्या
शेजारी कोणत्याही धर्माचे लोक असण्याला काहीही हरकत नाही.
भारतातील अधिकतर हिंदू भारतीयत्वाचा मक्ता स्वत:कडेच
ठेवताना दिसतात. खरेखुरे भारतीय होण्यासाठी ६४% हिंदूंना हिंदू असणे गरजेचे आहे तर
५९% हिंदू भारतीयत्वासाठी हिंदी भाषेच्या आवश्यकतेवर जोर देतात. याच विचारांच्या
हिंदुनी (६०%) २०१९ च्या राष्ट्रीय निवडणुकी मध्ये भाजपाला मत दिल्याचे मान्य
करतात. म्हणूनच भाजपने सत्तेचे स्थान मिळविण्यासाठी हिंदू, हिंदी आणि धर्मपरायनतेला आपले प्रचाराचे
केंद्रबिंदु बनविलेले आहे. भाजपला मतदान करणार्या ८० टक्के हिंदूंना आपल्या
स्त्रियांनी धर्मबाह्य विवाह करण्यास रोखले पाहिजे असे वाटते.
भारतातील ९५% मुस्लिम जनतेला आपण भारतीय असण्याचा अभिमान
वाटत असून त्यांना भारतीय संस्कृतीविषयी कमालीची आस्था आहे. भारतात सामुदायिकपणे
होणार्या हिंसेला, देशातील फार
मोठी आपत्ति असे मानणार्या गटात शीख
(७८%) वगळता सर्व धर्मियांचे (६५%) सारखेच प्रमाण आहे. सर्व भारतीयांच्या जीवनात
धर्माला महत्वाचे स्थान आहे. ८१% बुध्दिस्ट स्वत:च्या धर्माचे चांगले ज्ञान आहे
असे मानतात, परंतु इतरांच्या तुलनेत ते रोजच्या प्रार्थनेला
अधिक महत्व देत नाहीत.
प्यूच्या सर्वेक्षणानुसार, मुसलमानामध्ये
तीन तलाक संदर्भात अधिक जागृतता बघायला मिळते. ५६ टक्के पेक्षा अधिक मुसलमान तीन
तलाकास विरोध करतात तर केवळ ३७% मुस्लिम त्याचे समर्थक आहेत. ६१% मुस्लिम महिलांचा
या प्रथेस विरोध दिसतो. स्वर्ग, आत्मा,
कर्म, भाग्य, वाईट नजर या प्रकारांना मानण्या संदर्भात भारतीय हिंदू व
मुसलमानाचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे.
सर्वेक्षणानुसार, आपल्या देशात जाती आधारावर भेदभाव होतो याची बर्याच भारतीयांना
जाणीवच नाही. क्रमानुसार केवळ २०%, १९% आणि १३ % टक्के भारतीयांना अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीवर सामाजिक भेदभाव होत असल्याची जाणीव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनुसूचीत जातीतील केवळ २७ टक्के लोकांनाच त्यांच्या
समुदायावर होणार्या अन्यायाची जाणीव आहे. अनुसूचीत जमातीच्या २६ टक्के आणि ओबीसीच्या
१३ टक्के समुदायानाच आपल्या जातीवर अन्याय होतो असे वाटते. तर २४ टक्केच मुस्लिम जनतेला मुसलमानावर अत्याचार होत
असल्याचे वाटते.
सध्याच्या काळात धर्म व राजकारणाची पूर्णता सरमिसळ झाली
आहे. धर्मपालन व्यवहारात सक्रिय झाले असून त्याचा उपयोग राजकारणाच्या फोडणीत
करण्यात येवू लागला आहे. राष्ट्रवादाचे संगोपक अधिकाधिक लोकांना धर्मभावनेत अडकवू
पाहताहेत. याचा सारासार विचार केला तर लोकही त्यात सहज अडकू लागले आहेत. उपाशी व
बेरोजगार अवस्थेत मेलो तरी चालेल पण माझ्या धर्मभावनेला आच यायला नको असे त्याला
वाटते. भारतीय जनता पक्षाला मिळत असलेल्या यशाला याच धर्मभावनेचा मोठा आधार
आहे. या अगोदर भारतीय राजकरणात राजकीय सत्तेत उलथापालथी झाल्या आहेत, परंतु तेव्हा धर्म भावनेचा व मुस्लिम
धर्माच्या द्वेषाचा एवढा आगडोंब नव्हता. त्यामुळे भावी भारतीय राजकारणासाठी हा एक
नवा अध्यायच म्हणायला हवा.
प्यू रिसर्च सेंटर्सच्या सर्वेक्षणावरून, एकीकडे सह जगण्याच्या
मतभिन्नतेतूनही भारतीय एकात्मकतेची गढी मजबूत दिसत असताना दुसरीकडे भारत एका नव्या धार्मिक देशाच्या प्रस्थापनेकडे वाटचाल करीत
असून हिंदुत्व, हिंदू आणि हिन्दी भाषा ही त्याचे
इंडिकेटर्स आहेत. मीडिया तंत्र, उत्कृष्ट भाषणशैली, आस्था आणि संस्थागत संस्था या मुख्य साधनांचा वापर सत्ता निरंकुशपने
आपल्या हातात ठेवण्यासाठी होणे हे लोकशाहीच्या अंताचेच लक्षण आहे. भारतीय लोकांची
भावनात्मक नाडी बघण्यासाठी प्रत्येकाने प्यू रिसर्च सेंटरचा “Religion
in India: Tolerance and Segregation” हा रिसर्च रिपोर्ट बघितला
पाहिजे. हा रिपोर्ट https://www.pewforum.org/2021/06/29/religion-in-india-tolerance-and-segregation/ या वेब पेजवर उपलब्ध आहे.
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment