Wednesday, July 21, 2021

ओबीसी समाजाच्या वैचारिक मागासलेपणातील घटक

 


मानवाला शिक्षणाची गरज का भासते? याचे उत्तर शोधायचे झाल्यास, निसर्गाने मानवाला दिलेल्या बौध्दिक क्षमतेला अधिक विकसित करण्यासाठी व मानवी मूल्ये जोपासत आधुनिक पध्दतीचे जीवन जगण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. बौध्दिक क्षमतेच्या आधारेच मानवाने प्रगति केली आहे. मात्र ज्यांना शिक्षणाचे दवबिंदू मिळाले नाहीत, ते समाजघटक अधिकाधिक बौद्धिकदृष्ट्या मागास होत गेले. भारताच्या इतिहासातच ओबीसी समाजाच्या मागासलेपणाची बीजे बघायला मिळतात. वर्णव्यवस्था आणि धर्मशास्त्राच्या आधारावर ओबीसीना शिक्षण व संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवून आपल्या सोईप्रमाणे राहण्यास भाग पाडण्यात आले. वर्णश्रेष्ठतेच्या पायावर अधिकार वंचित करणे व ८५ टक्के लोकसंख्येने विरोध न करता मूकेपणाने स्वीकारली. म्हणजेच हा निशस्त्र समाज १५ टक्के लोकांच्या किती दहशतीखाली वावरत होता याची कल्पना येते. आजही त्यात फार बदल झाला असे दिसत नाही. “ठेविले अनंत तैसेची राहावे” आणि आलेया भोगासी असावे सादर” याच धर्म शिकवणुकीवर ओबीसी समाज चालताना दिसतो. 

महात्मा ज्योतीराव फुलेंनी ओबीसी समाजाच्या मागासलेपणाचे मर्म ओळखले होते. फुले दांपत्यांनी मागासवर्गीयासाठी १८४८-१८५२ च्या काळात शाळा काढल्या. त्यांनी मागासवार्गीयामध्ये शिक्षणाचे स्फुलिंग चेतविण्यासाठी विद्येविंना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले !’ असे सांगून मागासवर्गीय समाजाच्या वस्तुनिष्ठ सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून अविद्येला कारणीभूत  ठरविले. ज्योतिबा फुले शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकरी पेहरावात ब्रिटिश सत्ताधार्‍यासमोर गेलेत. महिला हक्कासाठी झगडत त्यांनी धर्मशास्त्रे व धर्मांधपिपासूनी ओबीसींना गुलाम बनविल्याचे ठासून सांगत ओबीसीसाठी पर्यायी सांस्कृतिक व्यवस्था निर्माण केली. विचाराचा हा फार मोठा वारसा असतानांही तरुण पिढीने विकासाचे मार्ग दाखविणार्या आपल्या महापुरुषांच्या विचारांना महत्व दिले नाही. परिणामी तो आपल्या सद्सद्विवेकबुध्दी न चालता कर्म, नशीब व दैवावर विश्वास ठेवतो. 

शिक्षण हे खरे तर, डोक्यात असलेल्या इवलाषा मेंदूच्या विकासासाठी व त्याद्वारे निर्माण होणार्‍या विचारांना अधिकाधिक प्रगल्भ व विकासक बनविण्यासाठी असते. परंतु, ओबीसी तरुणांना व समाजकर्त्यांना शिक्षणाचा मूळ उद्देशच समजून घेता आला नाही. शिक्षणाला अधिक महत्व न देता धर्मव्यवस्थेने लादलेल्या पारंपारिक व्यवसायाला कवटाळणे व त्यातच समाधान मानने हे ओबीसीच्या अविकसित मानसिकतेचे लक्षण होते. शिक्षण हे विचारासाठी नसून केवळ पोटार्थासाठी असते, हे सांगण्याचे काम धर्माच्या व हिंदुत्वाच्या ठेकेदारांनी केले. आपले कुटील कारस्थान शिक्षणाने विचारी झालेली माणसे ओळखू शकतात, हे धर्माच्या ठेकेदारांनी पुरते ओळखले असल्यामुळे ओबीसीना शिक्षण व ज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी धर्मातील वचनाचे पालन करण्याचे आवाहन केले. वरुन धर्मपालन न केल्यास काहीतरी मोठे अनिष्ट घडून सर्वनाश होतो हेही ओबीसीना सांगण्यात आले. त्यामुळे ओबीसीनी अंधश्रद्धा, अध्यात्म, होमहवन, व्रतवैकल्ये, कर्मकांड, धर्मयात्रा, संकष्टी आणि कावडयात्रा यासारख्या गोष्टीत वर्षाचे ३६५ दिवस गुंतून राहण्यातच आपले हित समजून घेतले. 

स्वातंत्र्यपूर्व काळात ओबीसी समाज विखुरलेल्या ९० टक्के गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती. उच्चवर्णीयांची मुले शहरातील सोयीचा लाभ घेत. तथापि शेतकर्‍यांच्या, बलुतेदार व अलुतेदाराच्या मुलांना हा अत्यल्प लाभ घेणे अशक्य होते. सुधारकांच्या मदतीने ब्रिटीशांनी शिक्षणाची मोहीम राबविण्याचे ठरविले, तेव्हा ओबीसी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्याचा, वाचनाचा, लेखनाचा आणि इतिहास, भूगोल व गणिताचा त्यांच्या शेतीविषयक नित्याच्या व्यावहारिक जीवनात खास उपयोग नसल्याने त्यांना तसे शिकविण्यात काहीही अर्थ नाही. अशी भूमिका खुद्द बाळ गंगाधर टिळकांनीच मांडली होती. स्वातंत्र्योत्तर काळानंतरची शिक्षण प्रणालीसुध्दा ओबीसीना पूरक नाही. त्यामुळेच आजच्या काळात ओबीसीमध्ये अशिक्षित, अल्पशिक्षित व बेरोजगारीचे प्रमाण अधिक दिसते. 

ओबीसी तरुणांच्या मागासलेपणाच्या कारणापैकी एक कारण म्हणजे त्यांचे तर्क न करणे हे होय. तुकाराम महाराजांच्या गाथा नदीत बुडविल्यानंतर त्या जशाच्या तशा वर आल्या असतील का? सर्वात संतश्रेष्ठ म्हणून जर ज्ञानेश्वरांना स्थान असेल तर पुष्पक विमानाने प्रथम स्वर्गात जाण्याचा मान ज्ञानेश्वरालाच मिळायला हवा होता, परंतु वैकुंठाला ज्ञानेश्वराला न पाठविता तुकारामानाच का पाठविले? ज्ञानेश्वराने भिंत चालवली हे जर सत्य असेल, तर त्याने महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अल्लाउद्दिन खिलजी समोर भिंतच उभी का केली नाही? तुकाराम महाराजांची जमीन मंबाजी भटाने का बळकावली? सत्यनारायनाच्या कथेत काय सांगितल्या जाते? त्यातील कथा खर्‍या आहेत का? यावर ओबीसी तरुण कधीच तर्क करताना दिसत नाही. थोतांडाची उत्तरे शोधण्याची ताकद केवळ तर्कात असते. महत्वाचे म्हणजे तर्काच्या या प्रश्नांनीच आपण मागास का राहिलो आहोत, याची उकल होत आपल्या  मागासलेपणाच्या उत्तराजवळ जाता येवू शकते.  

समाजातील विचारांच्या मागासलेपणाची ज्वाला केवळ ओबीसी तरुणापर्यंत सीमित राहत नसून त्याचे धागे महिला / तरुणीपर्यंत जातात. वनस्पती शास्त्रात एखादी उच्च विद्याविभूषित झालेली तरुणी जर वडसावित्रीच्या दिवशी वडाभोवती फिरून वडाच्या बुंध्याला धागे बांधत असेल तर तिला वनस्पति शास्त्राचे ज्ञान समजून ती विवेकी झाली आहे असे म्हणता येत नाही. तिचा विवेक वडाच्या बुंध्याला धागे बांधणार्‍या महिलांच्या जागृतीसाठी असला पाहिजे. शेणाचा मार खाणाऱ्या सावित्रीबाई फुलेनी त्याकाळात धर्ममार्तंडाच्या अरेरावी व धमक्यांना न भिता ओबीसी महिलांना शिक्षित करून त्यांना सामाजिकदृष्ट्या जागृत करण्याची धडाडी अंगी बाळगली होती, तर आजच्या आमच्या ओबीसी महिला ते आव्हान स्वीकारण्यास का कचरतात?. जिच्या हातात शिक्षणाची दोरी ती आपला समाज उध्दारी या म्हणीप्रमाणे समाज संक्रमित होत असतो. हे आव्हान आजच्या ओबीसी तरुणींनी स्वीकारले पाहिजे.

ओबीसी तरुण व समाजाच्या मागासलेपणाच्या कारणापैकी, त्यांचे वैज्ञानीक व बौध्दिक अवांतर वाचनाच्या अधिक दूर जाणे हे एक कारण होय. तो रामायण, महाभारत आणि हनुमान चालीसा अशा धार्मिक वाचनाच्या सोबतच मनोरंजनात्मक कादंबर्‍या, गूढ कहाण्या, कथासार व भजनी साहित्याच्या पलीकडे गेलाच नाही. त्याने वैज्ञानिक ग्रंथ, चार्वाक, गौतम बुध्द, महावीर, प्लेटो, साक्रेटिस, गॅलिलिओ, महात्मा फुले, कबीर, कार्ल मार्क्स, आंबेडकर आणि लोहिया यासारख्या जैविक विचारवंताचे मौलिक व सामाजिक ज्ञान नजरेखालून घातले नाही, तर तो अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक देवी देवतांच्या पुढे मागे तो भटकत राहिला. फ्रेंच, रशिया आणि युरोपातील सामाजिक व राजकीय क्रांत्या त्यांनी केवळ पढिक ज्ञानासाठी वाचल्या परंतु त्याचा उपयोग सामाजिकदृष्ट्या वैचारिक घुसळणीसाठी केला नाही. म्हणून ओबीसी तरुणातील मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्याचे कार्य जोपर्यंत शिक्षण व प्रबोधनाद्वारे होणार नाही तोपर्यंत सामाजिक व धर्मवादी शोषणाधिष्ठ वास्तवतेला ते समजू शकणार नाहीत.

सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या ओबीसी समाजाला इतरांच्या बरोबरीने आणायचे असेल तर, त्याला सवलती मिळणे गरजेचे आहेच. डॉ. आंबेडकरांनी ओबीसींच्या विकासासाठी संविधानात ३४० वे कलम अंतर्भूत केले. हे कलम म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची पहिली पायरी होती. मंडल आयोगाच्या सुरुवातीच्या काळात एखादा जागरुक कार्यकर्ता ओबीसीमध्ये जावून आरक्षण मागण्यासाठीचा विचार सांगू लागला तर आम्हाला आरक्षण घेवून दलित व्हायचे आहे काय? असे प्रतीउत्तर मिळत असे. १९९० मध्ये व्ही.पी. सिंग सरकारने ओबीसीसाठी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करताच देशामध्ये हिंसात्मक आंदोलनाचा भडका उडाला. हे आंदोलन ओबीसींच्या आरक्षणा विरोधात होते. तरीही ओबीसी तरुण आपल्याच आरक्षण विरोधी  आंदोलनात सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर, ओबीसीना मंडल आयोग लागू होवू नये म्हणून त्या विरोधात काढलेल्या रामरथ यात्रेतसुध्दा ओबीसी तरुण सहभागी झाला होता. याचा अर्थ तरुणाईमध्ये माहिती शून्यता व बुध्दीचातुर्याची कमतरता होती. म्हणून ओबीसी तरुण हा आपल्या विरोधातील कारस्थाने समजून घेवू शकत नव्हता. 

ओबीसीतील उच्चशिक्षण घेवून शिक्षित झालेल्या व विचार करू शकणार्या तरुणांनी सुध्दा आपल्या ज्ञानाचा वापर समाजातील इतर तरुणापर्यंत पोहोचविला नाही. त्यांनी आपले विचार व आर्थिक बळ केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवले. ओबीसीतील प्राध्यापक व कर्मचारी ज्ञानी वर्गाने धर्ममार्तंडाच्या अविवेकी विचारांना छेद देत नवसमाज घडविण्यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. उलट तोच धार्मिक कर्मकांडाच्या आहारी गेला. त्यामुळे ओबीसी समाजातील तरुण वर्ग विवेकी विचाराचा न बनता सत्संग, संभाजी भिडे सारख्या सनातनवाद्यांचा बळी ठरत गेला.  

अनेक जातीचा समुच्चय असलेला ओबीसी समाज हा अनेक रंगाचे ठिगळ लावलेल्या बोथरी (गोधडी) सारखा आहे. त्यामुळे ओबीसी हा एकसमान कार्यासाठी कधी एकत्र येताना दिसत नाही. उलट त्यातील विविध रंगाचे ठिगळ एकसमान धाग्याअभावी एकमेकापासून निसटताना दिसतात. ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसीमध्ये भारताचा सत्ताधारीवर्ग बनण्याची कुवत असतानाही तो बहुरंगी मागास बनलेला आहे. जातीय जनगणनेचा प्रश्न असो, संसद, विधानसभा आणि पंचायतराज व्यवस्थेमध्ये संख्येच्या प्रमाणातील प्रतिनिधित्व असो, उच्च शिक्षणातील आणि संस्थाना मधील सहभाग असो, नोकर्‍यातील प्रमाण असो, ओबीसींच्या या मागण्यांना कोणत्याही सरकारकडून कधीही किंमत दिली गेली नाही. भारतात सत्ताधारी बनलेला अल्पसंख्य जातीचा समूह हा बहुसंख्यांक जातीचा मालक बनला आहे, ही आजची वास्तविकता आहे. अल्पसंख्य जातींचा हा उच्चवर्णीय वर्ग कोणत्या बळावर ओबीसी बहुसंख्यांकाचा मालक बनला, याचा शोध व चर्चा ओबीसी वर्गातील विचारवंत, बुध्दिवादी व राजकारणी करताना दिसत नाही. त्यामुळे ज्या समाजात स्वत:चे अधिकार व हक्कासबंधित प्रश्नाच्या चर्चांचीच वानवा आहे, तिथे त्याचा विकास व उन्नतीची उत्तरे तरी कशी मिळतील ?.

लेखक: बापू राऊत





3 comments:

  1. प्रदीप ढोबळे लिखित आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकात कारण मीमांसा करण्यात आलेली आहे; गरज आहे हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, सदर पुस्तक pdf स्वरुपात लोकापर्यंत पोहोचविता येईल

      Delete
  2. Sir आपने बहुत अच्छे से Fundamental Right Hindi Explain कि हैं। Very Nice post

    ReplyDelete