भारतीय जनतेच्या मनात चाणक्य या व्यक्तीरेखेविषयी अनेक कांगोरे कोरले गेले आहेत. “अर्थशास्त्र” या पुस्तकाचे लेखक म्हणून चाणक्य (कौटिल्य) यांचेकडे बघितल्या जाते. हा ग्रंथ अर्थकारणापेक्षा राजकारण व प्रशासन यावर अधिक भाष्य करते. भारतात उपद्रवी मूल्यांना चाणक्यनीती संबोधण्याची परंपरा असून उपद्रवी व्यक्तिला चाणक्याची उपमा दिली जाते. कुणाचा कसा गेम करायचा यावर हि नीती (साम,दाम,दंड,भेद) अधिक भर देते. चाणक्य हे महान रणनीतीकार होते अशा स्वरूपाच्या कथा कादंबरी व नाटकातून प्रस्तुत केल्या जातात.
चाणक्याच्या कथा कोणी लिहिल्या ?
इसवी सनाच्या चौथ्या शतकात विशाखादत्त यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या “मुद्राराक्षस” या नाटकात चाणक्य यांचे पात्र आहे. या नाटकामध्ये विशाखादत्तने चाणक्यला धनानंद राजाचा नाश करणारा व सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचा गुरु म्हणून प्रस्थापित केले. मुद्राराक्षस हे नाटक चंद्रगुप्ताच्या मृत्युच्या ६०० वर्षानंतर लिहिण्यात आले. मुद्राराक्षस या संस्कृत नाटकाचा प्रथम हिंदी अनुवाद हिंदी साहित्यकार भारतेन्दू हरिश्चंद्र यांनी १८७८ साली केला.
कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ इसवी सन १९०९ मध्ये प्रथम प्रकाशात आला. आर. शामशास्त्री यांनी हा ग्रंथ संपादित केला. मात्र काही लोकांनी कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथकर्त्याचा सबंध विशाखादत्तच्या मुद्राराक्षस ह्या नाटकात उभा केलेल्या चाणक्याशी जोडला गेला. तेव्हापासूनच कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ इतिहासकाराच्या दृष्टीकोनातून विवादास्पद ठरला आहे. शामाशास्त्रींनीच आपल्या ग्रंथाचे सर्वात प्रथम इंग्रजी भाषांतर केले. या इंग्रजी ग्रंथाला प्रमाणभूत मानून अनेक विदेशी लेखकांनी त्यावर लेखन केलेले आहे.
धनानंद, सम्राट चंद्रगुप्त यांचे पासून अशोकापर्यंत केवळ पाली प्राकृत भाषेचा वापर होत असे. त्यामुळे पाली भाषेतील शिलालेख व अन्य समकालीन साहित्यात चाणक्याच्या अर्थशास्त्राची नोंद व्हावयास हवी होती. शामाशास्त्री यांनी मल्याळी भाषेत लिहिलेल्या साहित्याचा संपादनासाठी वापर केला. याचा अर्थ अर्थशास्त्र हे दक्षिण भारतात निर्माण होवून त्यातील वर्णन दक्षिणेतील कोणत्यातरी राजाच्या काळातील असण्याची शक्यता आहे.
कौटिल्यीय अर्थशास्त्राचा कालखंड व त्यावरील विवाद
लेखक जेव्हा एखादा ग्रंथ लिहावयास घेतो, तेव्हा तो आपल्या सभोवतालच्या घटनांचे वर्णन करीत असतो. चाणक्याला ग्रंथच लिहावयाचा असता तर त्याने आपल्या आयुष्यात घडलेल्या साऱ्या घटनांचा उहापोह आपल्या ग्रंथामध्ये केला असता. चाणक्य ज्या राजदरबारात चाकरी करीत होता तेथील राजा धनानंद, चंद्रगुप्त मौर्य, राजधानी पाटलीपुत्र, सिकंदराचे आक्रमण व ग्रीक वकील मेगॅस्थिनीस यांचा उल्लेख त्याने आपल्या अर्थशास्त्रात नक्कीच केला असता परंतु संपूर्ण ग्रंथात त्यांचा कोठेही उल्लेख नाही. याचा अर्थ अर्थशास्त्र ह्या ग्रंथाचा लेखक धनानंद-चंद्रगुप्त यांच्या समकालीन नसून त्याचा कार्यकाल भिन्न असावा.
मेगॅस्थिनीस हा ग्रीक राजा सेल्युकस ह्याचा वकील म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारात होता. पाटलीपुत्र येथील वास्तव्यात त्यांने चंद्रगुप्ताचे शासन, प्रशासन व तेथील प्रत्यक्ष जीवन पध्दती यावर आधारित इंडिका हा ग्रंथ लिहिला. मेगॅस्थिनीस यांच्या ग्रंथामध्ये विशाखादत्तने मुद्राराक्षस या नाटकात मांडलेली चाणक्य, धनानंद व चंद्रगुप्त यांची कैफियत आढळत नाही. सम्राट चंद्रगुप्ताचा कोणी सल्लागार होता व त्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला याबाबत उल्लेख दिसत नाही. शामाशास्त्रीकृत चाणक्याच्या अर्थशास्त्रातील निर्देश व मेगॅस्थिनीसकृत इंडिका यात मोठी तफावत असल्यामुळे या अर्थशास्त्राचा लेखनकाळ व त्यातील वर्णन विवादग्रस्त झाले आहे. शामाशास्त्रीनी हा ग्रंथ संपादित करताना इंडिका हा ग्रंथ आपल्या नजरेखालून घातला नसावा. ओ स्टाईन यांनी मेगॅस्थिनीस आणि कौटिल्य या दोन्हीच्या ग्रंथातील विधानाची विस्तृत तुलना करून दोहोत मेळ नसल्याचे दाखवून दिले आहे.
विशाखादत्तने आपल्या नाटकात चाणाक्य हा ग्रंथकार होता व त्याने अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले असे म्हटले नाही. चंद्रगुप्त मौर्य हा धनानंद याचा पुत्र होता. वंशपरंपरेने पित्याचे साम्राज्य हे मुलास मिळत असते. त्यातूनच धनानंदचे राज्य चंद्रगुप्तास प्राप्त झाले. परंतु चंद्रगुप्ताने वडिलांच्या नावाऐवजी आपल्या आईचे नाव (मुरा) धारण केल्यामुळे चंद्रगुप्त नंद हा चंद्रगुप्त मौर्य या नावाने प्रसिध्द झाला. चंद्रगुप्ताचे ग्रीकासोबत सोयरेसबंध प्रस्थापित झाले होते.
चाणक्याच्या अर्थशास्त्रात चीन भूमी व चीनचे रेशमी वस्त्र याचा उल्लेख आला आहे. परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये हान राजवंशाचे राज्य स्थापन झाल्यानंतरच त्याने रेशीमला "चीनचा राष्ट्रीय व्यापार” बनविला. म्हणजे पहिल्या शतकानंतरच भारतासह इतर देशांमध्ये चिनी रेशीम विकली गेली. हे रेशीम चीनहून पाटलीपुत्र व बनारस येथे येत असे. परंतु मौर्यकाळात रेशीम भारतात आयात होत नसे व रेशीम मार्गाचे कोणतेही 'अस्तित्व' नव्हते. ज्याअर्थी अर्थशास्त्रामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर भारतात आलेल्या रेशमाचा उल्लेख आहे, त्याअर्थी हा ग्रंथ पहिल्या शतकानंतरचा असल्याची अधिक संभावना आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मंत्र्याच्या कार्यकलापाला मंत्रीपरीषद /मंत्रीमंडळ हा शब्दप्रयोग वापरला गेला. परंतु चंद्रगुप्तच नव्हे तर सम्राट अशोकापर्यंत मंत्रीपरीषद /मंत्रीमंडळ हे शब्द वापरण्यात येत नव्हते. मंत्रीपरीषद ऐवजी परिसा या शब्दाचा वापर करण्यात येत होता. परिसा या शब्दाचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखावरही बघायला मिळतो. मेगॅस्थिनीसने पालीबूत (पाटलीपुत्र) या शहराची सुरक्षा भिंत व घरे लाकडाची असल्याची म्हटले आहे. १९०३ ला पालीबूतच्या उत्खननात लाकडाची सुरक्षा भिंत मिळाली. परंतु चाणक्याने अर्थशास्त्रात भवन निर्माणामध्ये लाकडाच्या वापरास घातक असल्याचे म्हटले.
कौटिल्यीय अर्थशास्त्र व मनुस्मृतीतील साम्यता
कौटिल्यीय अर्थशास्त्र वाचताना मनुस्मृती वाचत असल्यासारखे वाटते एवढी साम्यता या ग्रंथात आहे.हा ग्रंथ वर्णाश्रम धर्माची री ओढत असून यात समानतेचा अभाव आहे. त्यात महिलाविरोधी गोष्टी आल्या असून महिलांना नीच समजले गेले आहे. प्रत्येक स्त्रीला वेशाव्यवसाय करणाचे बंधन कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आहे. मग ती स्त्री कोणत्याही वर्गाची असो. तिच्या कमाईतून अर्धा हिस्सा कराच्या स्वरूपात वसूल करण्यात यावा. मेगॅस्थिनीस लिहितो कि, येथील स्त्री चारित्र्य संपन्न असून ती स्वत:ला शुध्द ठेवण्याचा प्रयत्न करते. हि दोन्ही ग्रंथातील फार मोठी तफावत असून मेगॅस्थिनीसचे म्हणने अधिक विश्वाहार्य ठरते. यातून चाणक्य हा चंद्रगुप्ताच्या दरबारी नसल्याचा स्पष्ट स्पष्ट अर्थ निघतो.
कोणत्याही ब्राम्हणास मृत्यूदंड देता येणार नाही असे सांगण्याबरोबरच त्यांनी वर्णसंकर जाती उत्पत्ती बाबत लिहिले आहे. धर्मशास्त्राप्रमाणेच वर्णाश्रम धर्माचे पालन करणे हे प्रथम कर्तव्य असल्याचे अर्थशास्त्राने म्हटले. राजाने एखादे नवीन राज्य जिंकल्यास तेथे वर्णाश्रम धर्माला अनुसरून सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करण्यात यावी. धनानंद व चंद्रगुप्ताच्या काळात कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना दंडात सवलत देण्यात येत नव्हती. स्वधर्म व वर्णाश्रम पालनाचे बंधन यात असल्यामुळे चाणक्य हा मनुस्मृतीकारासारखाच विषमतावादी होता.
सामाजिक वर्चस्वासाठी बलिदानाची परंपरा
मॅनपॉवर जर्नल, नवी दिल्ली" चे संपादक एम.एस.प्रकाश राव यांच्यामते १९२३ मध्ये अर्थशास्त्र ऑफ कौटिल्य या ग्रंथाची एकूण पृष्ठे (पाने) हि केवळ ४८६ होती. परंतु १९६८ पर्यंत यातील पृष्ठाची व्याप्ती ६५३ पानापर्यंत झाली. मागाहून वाढलेली हि १६७ पृष्ठे कोणी घुसविली ?. याचा अर्थ काही धूर्त लोक या ग्रंथामध्ये सतत बदल करीत होती. यातून १९०९ मध्ये शामाशास्त्रींने स्वत: संपादित केलेले पुस्तक चाणक्याच्या नावाने खपवून स्वत:चा बळी दिला का?. असा संशय निर्माण होतो. भारतीय इतिहासात असे अनेक ग्रंथ व महाकाव्ये उपलब्ध्द आहेत कि, जी सामुहिकपणे लिहून ते तिसऱ्याच्या नावे प्रसिध्द करण्यात आली. येथील धूर्त वर्गाने समाजव्यवस्थेमध्ये अग्रस्थानी असलेले आपले स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या लिखाणातही वर्चस्ववाद कायम ठेवला. त्यांच्या लिखाणावर कोणी आक्षेप घेवू नये वा संशयास्पद दृष्टीने बघू नये म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथाना ब्रम्हदेवाची निर्मिती वा रचना असल्याचे लोकांना सांगितले.
इतिहासकार काय म्हणतात
कौटिल्यकृत अर्थशास्त्र व इंडिकामध्ये आढळून येणाऱ्या विविध भिन्नतेवरून इतिहासकारांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या समकालीन असल्याचे गृहीतक अमान्य केले. अर्थशास्त्रात ज्या अर्थशास्त्रीय भाषेचा उल्लेख केला गेला आहे, ती भाषा चंद्रगुप्ताच्या काळापेक्षा अधिक विकसित असल्यामुळे डॉ.कल्यानोव यांनी अर्थशास्त्राची निर्मिती तिसऱ्या शतकापूर्वीची नसून ती तिसऱ्या शतकानंतरची असल्याचे म्हटले. एच.सी. रायचौधरी यांच्यानुसार मौय काळात केवळ पाली, प्राकृत किंवा मगधी भाषा प्रचलित होती. सम्राट अशोकानेही आपले शिलालेख प्राकृत भाषेत लिहिले. परंतु अर्थशास्त्र हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला गेला. भारतात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून संस्कृत भाषेत ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. म्हणजेच चंद्रगुप्ताच्या ५०० वर्षानंतर हा ग्रंथ लिहिण्यात आला. प्रसिध्द विद्वान डॉ.जौली हे सुध्दा चाणक्याच्या अर्थशास्त्राची भाषा हि तिसऱ्या शतकानंतरची मानतात.
यावरून चाणक्याचे सम्राट धनानंद व चंद्रगुप्त यांचेसंबंधात प्रस्थापित असलेले प्रसंग, नाटके व कथा ह्या काल्पनिक व तथ्यहीन असल्याचे सकृतदर्शनी दिसतेय. आज चाणक्य असते तर त्यांनी “तो मी नव्हेच” असे नक्कीच म्हटले असते.
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment