Friday, August 29, 2025

वारकर्‍यांच्या विठ्ठलाचे हिंदुत्वीकरण !


पंढरपूरचा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणार्‍याला वारकरी म्हणतात. हि वारी सर्वसमावेशक समतेच्या प्रवासाची असते. या वारीत कुणबी, मराठा, महार ब्राम्हण, माळी व धनगर सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र चालतात. हा लोकसमतेचा जिवंत प्रयोग असतो. संत नामदेव, ज्ञानेश्वरतुकाराम, चोखामेळा, सावता माळी,  जनाबाई आणि  मुक्ताई यांच्यासारख्या अनेक संतांनी उभारलेली वारी परंपरा लोकसामान्यांची परंपरा बनली असून वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा वारकरी संप्रदाय प्रेम, समता, भक्ती आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा आहे, तर  पंढरपूरचा विठोबा  आपल्या भक्तांचा निर्विवाद असा लाडका देव व सखा असून त्याचे अधिष्ठान जाती व धर्मव्यवस्थेच्या पलीकडील समतेचे आहे.