पंढरपूरचा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणून
ओळखला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणार्याला वारकरी म्हणतात. हि वारी
सर्वसमावेशक समतेच्या प्रवासाची असते. या वारीत कुणबी, मराठा, महार ब्राम्हण,
माळी व धनगर सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र चालतात. हा लोकसमतेचा जिवंत प्रयोग असतो.
संत नामदेव, ज्ञानेश्वर,  तुकाराम, चोखामेळा, सावता माळी,  जनाबाई आणि  मुक्ताई यांच्यासारख्या
अनेक संतांनी उभारलेली वारी परंपरा लोकसामान्यांची परंपरा बनली असून वारकरी संप्रदाय
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा वारकरी
संप्रदाय प्रेम, समता, भक्ती आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा
आहे, तर  पंढरपूरचा विठोबा  आपल्या भक्तांचा
निर्विवाद असा लाडका देव व सखा असून त्याचे अधिष्ठान जाती व धर्मव्यवस्थेच्या
पलीकडील समतेचे आहे. 
मात्र अलीकडच्या काळात विठोबाच्या मूळ लोकधर्मी, बहुजनाभिमुख प्रतिमेचे हिंदुत्वीकरण होत असल्याचे
स्पष्ट दिसते. याचा अर्थ विठोबाला एका विशिष्ट धार्मिक-राजकीय चौकटीत  म्हणजे हिंदू राष्ट्रवादाच्या प्रतीकात बसवण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदुत्व या संकल्पनेत हिंदू
समाज जसा आहे त्या अवस्थेत हिंदू संस्कृतीचे वर्चस्व स्थापित करणे. म्हणजेच
जातीविषमता व वर्णवर्चस्व कायम ठेवून जातीधर्म निरपेक्षता व समतेला मूठमाती देणे
होय. आणि हे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या विरोधी आहे. विठ्ठलाची भक्ती
म्हणजे त्यांचे नामस्मरण, अभंगगान व कीर्तन
असे लोकसुलभ व सर्वसमावेशक माध्यम होते. त्यात कठोर शास्त्रोक्त विधीचा समावेश
नव्हता
खरे तर, प्राचीन काळापासुनच
विठ्ठलाच्या सांस्कृतिक ध्रुवीकरणास सुरुवात झाली होती. आजचा  विठ्ठल व त्याचे व्यवस्थापन हे पूर्वी घडून
गेलेल्या एका ध्रुविकरणाच्या स्वरुपातील आहे. तर आताचे ध्रुवीकरण हे विठ्ठलाचे हिंदुत्वीकरण करण्याचे आहे. पहिले ध्रुवीकरण विठ्ठलाचे  वैदिकीकरण करणे होते. वैदिकीकरणात विठ्ठल
सर्वांचे होते परंतु स्वत: विठ्ठल व त्यांच्या  व्यवस्थापणाचा ताबा हा पूर्णत: वैदिक ब्राह्मणाच्या
हातात गेला होता. विठ्ठलाच्या विधी ब्राम्हणी पध्दतीकडे वळविल्या गेल्या. 
सुरुवातीच्या काळात वैदिक वर्ग विठ्ठलाविषयी उदासीन होता,
परंतु त्यांना जेव्हा विठ्ठलाची  अपरंपार लोकप्रियता दिसू लागली. तेव्हा त्या
वर्गाला विठ्ठलाचा स्वीकार करणे आणि  शास्त्रप्रतिष्ठा
देणे भाग पडले. या वर्गाने संतांच्या आणि भोळ्या भाविकांच्या धारणांशी आपल्या
परीने संवाद साधण्यासाठी रचना केली. त्यांनी लोकमानसात रुजलेल्या कथा-गाथांना
पुराणरूप देण्यासाठी 'पांडुरंगमाहात्म्यां'ची संस्कृतात रचना केली. स्तोत्र-कवच-सहस्रनामांसारख्या
उपासनासाहित्याची निर्मिती करीत क्षेत्र, तीर्थ आणि देव
यांच्याशी सबंधित नाना प्रकारच्या विधिविधानांची प्रक्रिया सांगणाऱ्या संस्कृत
पोथ्या लिहिल्या. श्रीकृष्णाने जशी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता महाभारतात आहे,
तशी विठ्ठलाने तुकारामांना सांगितलेली 'विठ्ठलगीता' संस्कृतात रचली.
संतांनी हेतुतः लोकभाषेत रचलेले आणि संतधर्माचे प्रमाणग्रंथ बनलेले काही ग्रंथ
(उदाहरणार्थ : 'अनुभवामृत', 'चांगदेवपासष्टी' आणि 'विवेकसिंधु') पंडितांनी मुद्दाम
संस्कृतात रूपांतरित केले. पुराणादी वाङ्मयीन संस्कृत साधनांतून विखुरलेले पंढरपूर
आणि विठ्ठल यांविषयीचे सर्व उल्लेख साक्षेपाने संकलित केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वैदिक ऋचांचा अर्थ विठ्ठलपर लावण्याची
बौद्धिक कसरत करून विठ्ठलाचे वैदिकीकरण केले. (श्रीविठ्ठल: एक
महासमन्वय, लेखक-रा.ची.ढेरे).
गेल्या काही दशकापासून विठोबा व वारकर्यांच्या मूळ प्रतिमेला
बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे बदल घडविण्याचे सूचकांक राजकीय, हिंदुत्ववाद व धार्मिक राष्ट्रवादाशी सबंधित आहेत. आषाढातील
विठ्ठलवारी एक राजकीय मंच बनून नेत्यांच्या विविध प्रतिमा पुढे येताहेत. आषाढी
वारी आणि विठ्ठलाचे दर्शन हे राजकीय नेत्यांसाठी मोठे प्लॅटफॉर्म झाले आहे. पंढरपूरच्या
मंदिर व्यवस्थापनात ब्राम्हण पुजाऱ्यांचे वर्चस्व वाढले असून मूळ वारकर्यांचे
स्थान गौण झाले आहे. बहुजन संत परंपरेचा केंद्रबिंदू बदलून तो केवळ ज्ञानेश्वर व
तुकाराम यांचेपर्यंत मर्यादित झाला असून विठ्ठलाचे सर्वसमावेशक, लोकधर्मी व सावित्रिक स्वरूप बदलून तो हिंदू व हिंदू
राष्ट्राचा देव असे त्याचे सादरीकरण केले जाते. त्यांचे धर्मनिरपेक्ष साक्षेप
बदलून “हिंदू वैष्णव देवता” म्हणून प्रचार केला जातो. 
हल्ली मनोहर कुलकर्णी (भिडे) व काही धर्मवादी संघटना व त्यांच्या
कृत्यांचा सर्व रोख हा वारकरी परंपरेच्या लोकधर्मी व धर्मनिरपेक्ष अशा समतावादी
स्वरूपात बदल करून त्याचे हिंदुत्वीकरण करण्यावर असतो. ते संताच्या विचारांना
हिंदू राष्ट्रवादाच्या चौकटीत बसवून त्यांचा संदेश म्हणजे हिंदू एकता आणि वारी
म्हणजे हिंदू एकतेचे प्रदर्शन असे सांगून या परंपरेने जाती न तोडता हिंदू समाजाला
एकत्र ठेवले असे सांगतात. संताच्या जातीभेदविरोधी संदेशाचे विकृतीकरण करून हिंदू
अभिमान व धर्मरक्षण यावर भर देवून बहुजन संताच्या भूमिकेला गौण ठरवीत ब्राम्हणीकृत
वारकरी परंपरा अधोरेखित करतात. एकूणच ते वारकरी संप्रदायाचा वापर राजकीय
हिंदुत्ववादी अजेंड्यासाठी करण्याबरोबरच वारी आणि विठोबाला हिंदू राष्ट्रवाद मजबूत
करण्याचे साधन समजू लागले आहेत.
संभाजी भिडे यांनी धारकरी नावाची युवकांची फौज निर्माण केलेली दिसते. शस्त्र
हाती घेतो, तो “धारकरी” असा या शब्दाचा संकेत निघतो. वारकरी या शब्दाला पर्याय म्हणून धारकरी शब्द निर्माण झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा
‘मनू’ श्रेष्ठ होता असं विधान केल होत. हे विधान संतविचाराचा घोर अवमान आणि वारकरी
संप्रदायावर हल्ला करणार होत. दुसरे एक कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी तर आम्हाला
नथुराम व्हाव लागेल असे सांगून वारकरी संप्रदायाच्या व्यासपिठावर नथुराम गोडसेचा
विचार मांडण्यास संविधानाने मला अधिकार दिलाय असे म्हटले. वारकरी संप्रदायात धर्मवाद
घुसविण्याचा व  हिंसकतेचे विचार पेरण्यामागची
हिंमत राजकीय पाठबळ व मोठ्या संघटनेचा वरदहस्ताशिवाय येवू शकत नाही. नवे पर्यायी
तत्त्वज्ञान मांडायचं आणि नावडणारा धर्म, संप्रदाय, पंथ व तत्त्वज्ञान
नष्ट करायचं ही काही संघटनांची खास कार्यशैली बनली आहे.  
वारकरी परंपरेचा मूळ गाभा हा भक्ती, समता, जातीभेद विरोध, लोकधर्म असा आहे. यात हिंदुत्व व हिंसेला अजिबात स्थान
नाही. परंतु वारकरी संप्रदायात मनोहर भिडे, संग्राम भंडारे व कट्टर धार्मिक  संघटनाचा हस्तक्षेप वाढल्यास वारकरी परंपरेतील समतेचा
वारसा झोकाळला जावून वारी व विठोबाचे हिंदुत्वीकरण झाल्यास वारकरी संप्रदायाच्या
मूळ भूमिकेला धक्का बसून आजतागायत जपलेली परंपरा व महाराष्ट्राचा पुरोगामित्व सार्वभौमवाद
यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील.  महाराष्ट्राला
हे हवे आहे का? यावर विचार होणे आवश्यक आहे.
लेखक : बापू राऊत
 
No comments:
Post a Comment